चेंडूचा आकार ते सीमारेषेचं अंतर; महिला आणि पुरुष क्रिकेटच्या नियमांमध्ये कोणते फरक आहेत?

    • Author, अमरेंद्र यार्लागड्डा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारतीयांचं क्रिकेटवेड याबद्दल काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पुरुष आणि महिला क्रिकेटची तुलनाच करायचीच ठरवलं तर महिला क्रिकेटबद्दलची क्रेझ जरा कमी आहे, हेही नाकारता येणार नाही.

वुमेन्स प्रिमयर लीग आणि त्यात आता विश्वचषकातील जगज्जेतेपद यामुळं उलट आता ही तफावत कमी होऊन महिला क्रिकेटला मिळणारा पाठिंबाही तेवढ्याच प्रमाणात वाढण्याची अधिक चिन्हं आहेत.

महिला विश्वचषकादरम्यान स्टेडियममध्ये वाढलेली गर्दी पाहता तर आता लवकरच ही तफावत मोठ्या प्रमाणात दूर होऊ शकते. या महिला विश्वचषकात भारतात झालेल्या सामन्यांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं.

पण महिला आणि पुरुष यांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये मात्र काही मुलभूत फरक आहेत.

विश्वचषक सामन्यांदरम्यान प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये गर्दी केली होती. महिला विश्वचषकाच्या संदर्भात भारताने खेळलेल्या सामन्यांना विशेष प्रतिसाद मिळाला.

तथापि, अनेकांना हे माहिती नसेल की पुरुष आणि महिला खेळत असलेल्या क्रिकेट सामन्यांमध्ये काही फरक आहेत. क्रिकेटच्या मुख्य नियमांबाबत विचार करता त्यात फरक नाही. मात्र इतर काही बाबी दोन्ही क्रिकेटमध्ये नक्कीच वेग वेगळ्या असतात.

महिला आणि पुरुष क्रिकेटमधील वेगळे नियम

बीसीसीआयनं या संदर्भात काही 'नियम' ठरवले असून ते बीसीसीआयच्या संकेतस्थळावर ठळकपणे पाहायला मिळतात.

प्रामुख्यानं विचार करायचं झालं तर महिला आणि पुरुष क्रिकेटमध्ये चेंडूचा आकार आणि खेळपट्टीपासून सीमारेषेचे अंतर यात फरक असल्याचं पाहायला मिळतं.

क्रिकेट विश्लेषक वेंकटेश यांच्या मते, "क्रिकेटच्या मुख्य नियमांमध्ये कोणतेही फरक नाहीत. मात्र, काही तांत्रिक बाबींमध्ये नक्कीच फरक दिसून येतो."

महिला क्रिकेटची लोकप्रियता पुरुष क्रिकेटच्या तुलनेत अद्याप वाढलेली नसल्याचंही ते म्हणाले.

बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसह देशांतर्गत सामने खेळण्यासाठी काही नियम तयार केले आहेत.

पुरुषांच्या सामन्यांशी संबंधित वन डे, टी-20 आणि कसोटी सामन्यांचे नियम डिसेंबर 2023 पासून लागू झाले आहेत. तर महिला क्रिकेट सामन्यांचे नियम 1 जानेवारी 2024 पासून लागू झाले आहेत.

त्यानुसार, पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये काही फरक दिसून येतात.

त्याचवेळी वाईड, नो बॉल, षटकं आणि पंचांचे निर्णय यासारख्या महत्त्वाच्या बाबींमध्ये कोणताही बदल नसल्याचं बीसीसीआयच्या नियमावलीत स्पष्ट केलं आहे.

"आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामन्यांच्या बाबतीत महत्त्वाच्या नियमांमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत. महिला क्रिकेटमध्ये फक्त काही पैलूंमध्ये किरकोळ फरक असतील," असं हैदराबादमधील क्रिकेटर स्नेहदीप्ती यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.

चेंडूचा आकार

पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या चेंडूच्या आकारात फरक असतो. बीसीसीआयच्या मते, महिला क्रिकेट सामन्यात वापरल्या जाणाऱ्या नवीन चेंडूचे वजन 140 ग्रॅमपेक्षा कमी आणि 151 ग्रॅमपेक्षा जास्त असता कामा नये.

चेंडूचा घेर किंवा वर्तुळाकार आकाराचा परीघ 21 सेंटीमीटरपेक्षा कमी आणि 22.5 सेंटीमीटरपेक्षा जास्त नसावा.

तर पुरुषांच्या क्रिकेट सामन्यात वापरल्या जाणाऱ्या नवीन चेंडूचे वजन 155.9 ग्रॅमपेक्षा कमी आणि 163 ग्रॅमपेक्षा जास्त नसावे.

चेंडूचा घेर किमान 22.4 सेंटीमीटर आणि जास्तीत जास्त 22.39 सेंटीमीटर असावा.

फलंदाजीचा विचार करताना मात्र पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये काहीही फरक नसल्याचं क्रिकेटर स्नेहदीप्ती म्हणाल्या.

ओव्हर रेट

महिला आणि पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये ओव्हररेट (ठरावीक वेळेत सरासरी किती ओव्हर टाकायच्या) आणि डावासाठी असलेल्या वेळेत फरक आहे. बीसीसीआयने या संदर्भात नियम लागू केले आहेत.

महिलांच्या एकदिवसीय सामन्यांबाबत संघाचा डाव (50 ओव्हर) तीन तास 10 मिनिटांच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे, असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.

पण मालिका किंवा स्पर्धा ज्या देशात आयोजित केली जात असेल, त्या देशाला या वेळेत बदल करण्याचे अधिकार आहेत, असंही त्यात म्हटलं आहे. महिलांच्या एकदिवसीय सामन्यांसाठी ओव्हर रेट हा ताशी 15.79 असावा, असं म्हटलं आहे.

पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट डावांचा (50 ओव्हर) विचार करता, बीसीसीआयनं त्याला साडेतीन तासांची मर्यादा निश्चित केली आहे. ही वेळ मर्यादा मालिका किंवा स्पर्धा आयोजित करणाऱ्या मंडळाच्या निर्णयावरही अवलंबून असेल, असंही बीसीसीआयचं म्हणणं आहे.

त्यात ओव्हर रेटचा विचार करता तो ताशी 14.28 होतो. त्यावरून पुरुषांच्या सामन्यांच्या तुलनेत महिलांच्या सामन्यांमध्ये ओव्हर रेट जास्त असतो. म्हणजे महिलांच्या सामन्यात अधिक लवकर 50 ओव्हर पूर्ण कराव्या लागतात.

पुरुष आणि महिला दोन्हींच्या सामन्यांसाठी डावांमधील ब्रेक वेळ (30 मिनिटं) सारखा असतो.

सीमारेषेचे अंतर

विश्लेषक वेंकटेश यांनी पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये सीमारेषेच्या अंतरात फरक असल्याचं सांगितलं.

महिलांच्या सामन्यांमध्ये, सीमारेषा खेळपट्टीच्या मध्यभागापासून 70 यार्ड (64 मीटर) पेक्षा जास्त आणि 60 यार्ड (54.86 मीटर) पेक्षा कमी असू नये असा नियम आहे. पंच नाणेफेकीपूर्वी हे ठरवतील.

तर बीसीसीआयच्या नियमानुसार, पुरुषांच्या सामन्यांमध्ये, सीमारेषेचे अंतर खेळपट्टीच्या मध्यापासून 90 यार्ड (82.29मीटर) पेक्षा जास्त नसावे आणि 65 यार्ड (59.43 मीटर) पेक्षा कमी नसावे.

"बीसीसीआयच्या नियमांनुसार सीमारेषेच्या अंतरांमध्ये बदल असले तरी, पुरुष आणि महिला सामन्यांमध्ये काही बाजूंच्या सीमा समान अंतर राहतात," असंही स्नेहदीप्ती म्हणाल्या.

पॉवर प्लेमधील फरक

बीसीसीआयनं पुरुषांच्या सामन्यांमध्ये तीन पॉवर प्लेसाठी परवानगी दिली असून, त्यानुसार क्षेत्ररक्षणाच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच, मैदानावर दिसणाऱ्या अर्धवर्तुळांचा विचार केला जातो तेव्हा ते दोन दिसतात.

या प्रत्येकाची त्रिज्या दोन्ही बाजूंच्या मधल्या स्टंपपासून 30 यार्ड (27.43मीटर) आहे. पॉवर प्ले दरम्यान क्षेत्ररक्षकांची स्थिती निश्चित करण्यासाठी हे आधार आहेत.

महिलांच्या सामन्यांमध्ये मात्र बीसीसीआयच्या नियमांनुसार फक्त एकच पॉवर प्ले असतो.

हा पॉवर प्लेही काटेकोरपणे अंमलात आणला पाहिजे. तो पहिल्या षटकापासून दहाव्या षटकाच्या दरम्यान अंमलात आणला पाहिजे.

पॉवर प्ले दरम्यान दोन क्षेत्ररक्षकांना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर राहण्याची परवानगी असते, नॉन-पॉवर प्ले दरम्यान चार क्षेत्ररक्षकांना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर राहण्याची परवानगी असते.

मैदान दोन अर्धवर्तुळांपासून तयार झालेलं असतं. त्यांची प्रत्येकाची त्रिज्या 25.15 यार्ड (23 मीटर) असते.

कसोटी सामना किती दिवसांचा?

कसोटी क्रिकेटमध्ये महिला आणि पुरुष क्रिकेटमध्ये एक मोठा फरक आहे.

बीसीसीआयच्या नियमांनुसार, पुरुषांचा कसोटी सामना पाच दिवसांचा असणे आवश्यक आहे. महिला क्रिकेट सामन्यांचा विचार केला तर पाच दिवसांचा नियम नाही. चार किंवा पाच दिवसांचाही सामना खेळवता येतो.

भारतासोबत कसोटी खेळण्यास इच्छुक असलेल्या देशाच्या बोर्डाशी चर्चा करून दोन्ही देशांच्या बोर्डांनी मान्य केल्यानुसार सामना चार दिवसांचा की पाच दिवसांचा असेल याचा निर्णय घेतला जातो. त्यानंतर सामना आयोजित केला जातो.

बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, पुरुषांच्या कसोटी सामन्यांमध्ये ओव्हरचा रेट ताशी 15 निश्चित करण्यात आला आहे. तर महिलांच्या कसोटी सामन्यांमध्ये हा रेट ताशी 17 ठरवण्यात आला आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.