You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अजित पवारांचा विमान अपघात टाळता आला असता का? शेवटची 8 मिनिटं इतकी महत्त्वाची का असतात?
- Author, रौनक भेडा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अजित पवार यांच्या निधनानंतर, हा विमान अपघात टाळता आला असता का, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
बारामती धावपट्टीवर आणखी काही सुविधा असत्या तर दृश्यमानता कमी असतानाही सुरक्षितपणे लँडिंगची शक्यता निर्माण झाली असती, असं म्हटलं जात आहे.
बारामती विमानतळाची धावपट्टी
अजित पवारांना बारामती विमानतळावरील धावपट्टी विकसित करायची होती आणि त्यासाठी त्यांनी काही बैठकाही घेतल्या होत्या.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, "बारामती विमानतळ गेल्या वर्षी जुलैमध्ये महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) ताब्यात घेतला होता. या घडामोडींशी जवळून संबंध असलेल्या एका सूत्रानं सांगितलं की, अजित पवार यांनी अलीकडेच एमएडीसीसोबत या योजनेला अंतिम स्वरूप देण्यासाठी बैठका घेतल्या होत्या."
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, "ऑगस्ट 2025 पर्यंत अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्सकडून या विमानतळाचं व्यवस्थापन केलं जात होतं. बारामती विमानतळाचे प्रभारी एमएडीसी व्यवस्थापक शिवाजी तावडे म्हणाले की, "विमानतळाच्या व्यवस्थापनात अनेक त्रुटी असल्याकारणानेच आम्ही 19 ऑगस्ट रोजी त्याचं व्यवस्थापन हाती घेतलं होतं."
या वृत्तात असं म्हटलं आहे की, "विमानतळाचे अपग्रेडेशन करण्यासाठी अजित पवार यांनी गेल्या काही महिन्यांत अनेक बैठका घेतल्या होत्या. त्यांनी पीएपीआय, नाईट लँडिंग आणि नियमित एटीसी यांसारख्या मूलभूत सुविधांची मागणी केली होती."
निवृत्त वैमानिक एहसान खालिद यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, "बारामतीमध्ये योग्य हवाई वाहतूक नियंत्रणाचा अभाव धक्कादायक आहे. केवळ सर्टीफाईड कंट्रोलरचं जमिनीवर दृश्यमानता किती आहे, हे अचूकपणे सांगू शकतो."
"जर कुणी अनुभवी कंट्रोलर तैनात नसेल, तर पायलट त्याच्या दृश्यमानतेनुसार लँडिंग करण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी पायलटच्या डोळ्यांवर सूर्यप्रकाश देखील आला असेल, त्यामुळे विमान योग्य दिशेनं जात आहे की नाही हे ठरवणं कठीण झालं असेल."
पुढे ते सांगतात की, व्हिज्युअल अॅप्रोचबाबतची कोणतीही सिस्टीम नसेल, तर ज्यावेळी अशा परिस्थितीत पायलट स्वतः दृश्यमानतेचा अंदाज घेतो, तेव्हा धोका चार पट जास्त असतो.
द हिंदूच्या वृत्तानुसार, ही हवाई पट्टी रेड बर्ड फ्लाइंग स्कूल आणि कार्व्हर एव्हिएशनला भाड्याने देण्यात आली आहे. जिथं उड्डाणासाठीचं प्रशिक्षण दिलं जातं. त्याला 'अनकंट्रोल्ड एयरोड्रम' असं म्हणतात. कारण, तिथे इतर सामान्य विमानतळावरील सुविधा नाहीयेत. जसे की एअर ट्राफिक कंट्रोल (ATC), इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम, सुरक्षा व्यवस्था किंवा अग्निशमन दल. तिथे कुणी हवामान तज्ज्ञही नाहीत आणि वैमानिकांना माहिती देण्यासाठी नेव्हिगेशनची चांगली उपकरणंही नाहीत."
बारामती हवाई पट्टीवर प्रशिक्षण घेतलेल्या एका वैमानिकाने 'द हिंदू'ला सांगितलंय की, कॉकपिटमध्ये नेव्हिगेशनबाबतची मदत मिळणार नसल्याने वैमानिकाला केवळ त्याच्या डोळ्यांना जे दिसतं, त्यावर अवलंबून राहावं लागतं. ही धावपट्टी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या एटीसी कव्हरेज क्षेत्राबाहेर आहे. त्यामुळे, एटीसी सहाय्य फक्त उड्डाण प्रशिक्षण शाळेतील कर्मचाऱ्यांकडूनच दिलं जातं. त्यात अतिशय मूलभूत सुविधा आहेत.
विमानतळावर होता या सुविधांचा अभाव
निवृत्त वैमानिक एहसान खालिद म्हणतात की, बारामती हवाई पट्टीची धावपट्टी लहान असली तरी ती 'लिअरजेट 45' सारख्या विमानांसाठी पुरेशी योग्य आहे.
पुढे ते म्हणाले की, "मला वाटत नाही की, हा अपघात धावपट्टीमुळे झाला आहे. कारण, अपघात धावपट्टी लागण्याच्या आधी किंवा बाहेर झाला आहे. जर धावपट्टीवर इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम (ILS), VOR आणि GPS सारख्या यंत्रणा असत्या तर ही दुर्घटना टाळता आली असती. कारण, या यंत्रणांमुळे कमी दृश्यमानतेतही पायलटला मार्गदर्शन मिळतं. या यंत्रणांमुळे अपघाताचा धोका 75 ते 80 टक्क्यांनी कमी झाला असता."
इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम (ILS) ही जमिनीवर बसवलेली रेडिओ सिस्टम आहे जी विमानाला धावपट्टीवर सुरक्षित आणि अचूकपणे उतरण्यास मदत करते.
विशेषतः जेव्हा दाट धुकं, मुसळधार पाऊस, ढगाळ आकाश, अंधार किंवा इतर कारणांमुळे दृश्यमानता कमी असते, तेव्हा ILS ची यंत्रणाच विमानाला धावपट्टीच्या मध्यभागी, योग्य वेगाने आणि योग्य अँगल कोणता, यासंदर्भात मार्गदर्शन करते.
फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्सचे संस्थापक अध्यक्ष कॅप्टन एमआर वाडिया म्हणाले की, "बारामती हवाई पट्टी ही पूर्णपणे विकसित असलेलं विमानतळ नव्हतं. तिथे फक्त दोन प्रशिक्षण शाळा कार्यरत होत्या. चांगल्या पद्धतीनं विकसित असलेल्या विमानतळांवरचं ILS ची यंत्रणा उपलब्ध असते. त्यामुळे तिथं ILS नव्हतं. बारामतीला विमानतळ ATC प्राधिकरण देखील नव्हतं."
बारामतीसारख्या छोट्या हवाई पट्टीवर आयएलएस बसवता येऊ शकत नाही, यावर एहसान खालिद देखील सहमत आहेत, परंतु ते यावर एक पर्याय देखील सुचवतात.
त्यांचं असं म्हणणं आहे की, "आजकाल, जगभरातील विमानांचं उपग्रहाद्वारे जीपीएसच्या आधारानं संचालन केलं जातं. जर जीपीएस उपलब्ध असेल, तर जमिनीवरील उपकरणांची गरज नसते."
"आफ्रिकेतही, GPS च्या माहितीवरचं लँडिंग होतं. ILS साठी, तुम्हाला पैसा आणि जमिनीची आवश्यक असते. तर, GPS-आधारित प्रणाली परवडणारी असते."
लँडिंगची वेळ फार महत्त्वाची
कोणत्याही विमानासाठी अकरा मिनिटे महत्त्वाची असतात. तीन मिनिटे टेकऑफसाठी आणि आठ मिनिटे लँडिंगसाठी असतात. याला 'क्रिटिकल 11 मिनिटं' (महत्त्वाची, निर्णायक) असं म्हणतात.
इतर देशांमध्येही या महत्त्वाच्या 11 मिनिटांची विशेष काळजी घेतली जाते.
जपान फ्लाइट सेफ्टी फाउंडेशनच्या मते, ही क्रिटीकल 11 मिनिटX म्हणजे उड्डाणाची पहिली तीन मिनिटं (टेकऑफ नंतर) आणि लँडिंगपूर्वीची आठ मिनिटं होय.
या 11 मिनिटांमध्ये, केबिन क्रू (फ्लाईट अटेंडेंट) यांना कॉकपिटशी (पायलट) बोलण्यास मनाई असते.
वैमानिकांना फक्त विमान नियंत्रित करण्याचं काम करायचं असतं. इतर कोणतंही काम जसं की गप्पा मारणं किंवा इतर काहीही करायचं नसतं.
कारण व्यावसायिक विमानांचे 80 टक्के अपघात हे या दोन वेळेत होतात. या काळात विमानाला सर्वाधिक धोका असतो. टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान अनेक अडचणी उद्भवू शकतात.
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने 2005 ते 2023 पर्यंतच्या विमान अपघातांचा डेटा गोळा केला आहे.
या निष्कर्षांवरून असं दिसून येतं की, सर्व विमान अपघातांपैकी अर्ध्याहून अधिक (53 टक्के) विमान अपघात हे लँडिंग दरम्यान होतात. आणखी 8.5 टक्के अपघात हे टेकऑफनंतर होतात. यावरून वैमानिकांनी लँडिंग दरम्यान विशेष काळजी घेण्याची आवश्यकता स्पष्ट होते.
लँडिंग दरम्यान जास्त अपघात का होतात या प्रश्नाचं उत्तर देताना, निवृत्त वैमानिक खालिद हुसेन यांनी खराब हवामान हेच कारण दिलं. याचं कारण खराब हवामानामुळे दृश्यमानता स्पष्ट नसते, असं ते सांगतात.
एक उदाहरण देत त्यांनी स्पष्ट केलं की, "ज्याप्रकारे पक्षी उडतो, तसंच विमान देखील उडतं. उड्डाण करताना, एखाद्याशी धडक होणार नाही किंवा कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी घ्यावी लागते."
"जेव्हा विमान आकाशात हजारो फूट उंच असतं, तेव्हा अपघाताची शक्यता खूप कमी असते. पण लँडिंग सुरू होताच, विमानतळ कुठे आहे, धावपट्टी कुठे आहे आणि काही अडथळे आहेत का, याची काळजी घ्यावी लागते."
कॅप्टन एमआर वाडिया म्हणाले की, सध्या आपल्याला या विमान अपघाताचा तपास अहवाल येण्याची वाट पाहावी लागेल.
समजून घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. दृश्यमानता 3000 मीटर असल्याचं नोंदवलं गेलं आहे. ही दृश्यमानता काही फार वाईट नव्हती.
सुरुवातीला पायलटला धावपट्टी दिसली नाही. नंतर ती त्याला दिसली आणि त्यानंतर मग तो धावपट्टीवर विमान उतरवण्यात अयशस्वी झाला.
मात्र, या अपघातामागचं नेमकं कारण काय आहे, हे अचूकपणे सांगणारी उत्तरं सध्या तरी आपल्याकडे नाहीयेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)