You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
100 उठाबशा काढल्या, मृतदेहाजवळ 2 दिवस झोपला, तिचीच गाडी घेऊन पसार झाला, मग पोलिसांनी 'असा' पकडला
- Author, मुस्तान मिर्झा
- Role, बीबीसी मराठीसाठी
धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरामध्ये 27 मार्च रोजी एका 39 वर्षीय महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला.
या महिलेच्या मृत्यूबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात होते. संतोष देशमुख यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी ही महिला तयार असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता.
मात्र कळंबचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांनी हा दावा फेटाळला.
या महिलेचा आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा काही संबंध नसल्याचं संजय पवार यांनी म्हटलं.
पोलिसांनी मंगळवारी (1 एप्रिल) या महिलेच्या मारेकऱ्यांना अटक केली. आरोपींनी कबुली जबाबात धक्कादायक खुलासे केले आहेत.
महिलेकडून होणाऱ्या छळाला कंटाळून तिचा खून केल्याचं आरोपींनी म्हटलं. इतकंच नाही तर आरोपी मृतदेह असलेल्या घरात 2 दिवस राहिला आणि तिथेच जेवल्याची देखील माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणातील आरोपी रामेश्वर माधव भोसले (32) आणि त्याचा मित्र उस्मान सय्यद (राहणार केज) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
ही 39 वर्षांची महिला धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब शहरात राहत होती. 27 मार्च रोजी परिसरातील लोकांना तिच्या घराकडून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी पोलिसांना संपर्क केला.
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता घराला कुलूप होतं. मग पोलिसांनी घराच्या मागच्या बाजूने खिडकीतून पाहिले असता घरात एका महिलेचा मृतदेह आढळला, तो सडलेल्या अवस्थेत होता.
या महिलेच्या डोक्याला मार लागल्याने घरात रक्त सांडलेलं होतं. या मृतदेहाची ओळख पटली. याबाबत पोलिसांनी पुष्टी केली आणि पुढील तपास सुरू केला.
पोलिसांनी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला. तपासामध्ये सुरुवातीला उस्मान सय्यद याला ताब्यात घेतलं आणि त्याच्यामार्फत मुख्य आरोपी रामेश्वर भोसले याचा तपास सुरू केला.
पुणे, आळंदी, मिरज, गोवा, कर्नाटक अशा वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांच्या पथकानं शोध घेतला. 1 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, कळंब-येरमाळा रोडवरून त्याला अटक केली. रामेश्वरनं गुन्ह्याची कबुली दिली आहे.
घटनेचा थरार
कळंब शहरात ही महिला मागील काही वर्षांपासून एकटी राहत होती. परिसरातील लोकांचा आणि फारसा काही सबंध नव्हता. ती खासगी सावकारकी करायची, असं पोलिसांनी सांगितलं.
केज तालुक्यातील टाकळी येथील रामेश्वर माधव भोसले हा तिच्याकडे कामाला होता. यादरम्यान दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले.
नंतरच्या काळात ती त्याचा मानसिक आणि शारीरिक छळ करायला लागली. त्याच्यासोबत सबंध ठेवलेले फोटो आणि व्हीडिओ दाखवून ती त्याला ब्लॅकमेल करत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांनी दिली.
रामेश्वरला मारहाण करणे, निर्वस्त्र करून छळ करणे, घरात कोंडून ठेवणे, 5 लाख रुपये दे अन्यथा केस करेल अशी धमकी देणे, असा छळ ही महिला रामेश्वरसोबत करायची. तिने यापूर्वी काही लोकांवर बलात्काराचा गुन्हा देखील केला होता, असंही संजय पवार म्हणाले.
घटनेच्या दिवशी महिलेने रामेश्वरला मारहाण करून 100 उठाबशा काढायला लावल्या. हा सगळा छळ असह्य झाल्याने त्याने हातोडीने तिच्यावर हल्ला केला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. त्याने कुठलीही पूर्वप्लॅनिंग न करता हा खून केल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले.
आरोपी मृतदेह असणाऱ्या घरात जेवला
आरोपी रामेश्वर खून करून त्याच ठिकाणी 2 दिवस राहिला. इतकंच काय तर 2 दिवस त्याच घरात त्याने जेवण देखील केले. तिसऱ्या दिवशी दुर्गंधी येऊ लागल्याने तो त्याच महिलेची गाडी घेऊन तिथून पसार झाला.
घडलेला प्रकार रामेश्वरनं त्याचा केजचा मित्र उस्मान सय्यद याला सांगितला. उस्मान सय्यद याने त्याला पळून जाण्यास मदत केली आणि नमूद महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याबाबत सांगितलं, असा जबाब रामेश्वरनं पोलिसांकडे नोंदवला.
रामेश्वरनं घरून निघताना फोटो आणि व्हीडिओ डिलीट करण्यासाठी महिलेचा मोबाईल सोबत घेतला. तो विकून त्याने पुढील प्रवास केला. तो कळंबवरून पुणे, आळंदी, कर्नाटक, गोवा या ठिकाणी फिरत राहिला.
संबंधित महिलेचा त्रास असह्य झाल्यामुळे आणि ब्लॅकमेलिंग करून पैशांची मागणी करत असल्यामुळे आपण हा प्रकार केला असल्याची कबुली रामेश्वरनं दिली, असं संजय पवार म्हणाले.
याप्रकरणी आरोपी रामेश्वर माधव भोसले व उस्मान गुलाब सय्यद दोघांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम कलम 103(1),249, 239 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)