You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नवऱ्याचा मृतदेह ड्रममध्ये ठेवून काँक्रिट भरलं, पत्नीसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी 'असं' पकडलं
- Author, शेहबाज अन्वर
- Role, बीबीसी प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आलं आहे. शहरातील सौरभ राजपूत नावाच्या व्यक्तीची त्याच्या पत्नीनंच तिच्या प्रियकरासह हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
29 वर्षीय सौरभ राजपूत लंडनमध्ये काम करत होता आणि तो गेल्या महिन्यातच परतला होता.
सौरभच्या कुटुंबानं मेरठ पोलिसांकडं तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा या गंभीर गुन्ह्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली.
सूचना- यातील काही मजकूर वाचकांना विचलित करू शकतो.
मेरठचे पोलीस अधीक्षक आयुष विक्रम सिंह यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणासंदर्भात माहिती दिली.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
मेरठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय मुस्कान रस्तोगीनं तिचा प्रियकर साहिल शुक्ला याच्यासोबत मिळून 3 मार्चच्या रात्री तिचा पती सौरभ राजपूतची हत्या केली.
पत्रकार परिषदेत पोलिसांनी सांगितल्यानुसार, हत्येनंतर मृतदेह एका ड्रममध्ये टाकण्यात आला होता आणि त्यात काँक्रीट भरण्यात आलं होतं.
पोलिसांनी ड्रम ताब्यात घेतला आणि पोलीस ठाण्यात आणला. नंतर कटरनं ड्रम कापून मृतदेह बाहेर काढण्यात आला.
सौरभ राजपूतचा मोठा भाऊ राहुल उर्फ बबलू यानं दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 18 मार्चला दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय.
आयुष विक्रम सिंह यांनी 19 मार्चला हत्येबद्दल माध्यमांना सांगितलं की , "सौरभ राजपूत 4 मार्चपासून दिसला नव्हता. संशयाच्या आधारावर त्याची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं."
"चौकशीदरम्यान, साहिलनं मुस्कानसोबत मिळून सौरभची हत्या केल्याचं आढळून आलं. हत्येनंतर मृतदेहाचं डोकं आणि दोन्ही हातांचे तळवे कापून ड्रममध्ये टाकण्यात आले. त्यात सिमेंट आणि वाळूचं मिश्रण भरण्यात आलं. त्यानंतर दोन्ही आरोपी शिमला, मनाली आणि कसौली इथे फिरण्यासाठी गेले."
मेरठच्या ब्रह्मपुरी भागातील रहिवासी सौरभ राजपूतनं 2016 मध्ये त्याच्या घरापासून थोड्या अंतरावर राहणाऱ्या मुस्कान रस्तोगीसोबत प्रेमविवाह केला होता.
कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता दोघांनीही लग्न केलं. 2019 मध्ये मुस्काननं एका मुलीला जन्म दिला.
घटस्फोटापर्यंत गेलं होतं प्रकरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यानं सौरभचे त्याच्या पालकांशी मतभेद झाले होते. त्यानंतर तो शेजारच्या इंदिरा नगरमध्ये मुस्कानसोबत राहू लागला.
त्यानंतर सौरभच्या अनुपस्थितीत मुस्कान आणि साहिल शुक्ला यांच्यात जवळीक निर्माण झाली.
आयुष विक्रम सिंह म्हणाले की, "27 वर्षीय साहिल सौरभच्या घरापासून थोड्या अंतरावर राहत होता. तो आणि मुस्कान आठवीच्या वर्गात एकत्र शिकलेही होते. साहिलनं बी.कॉम पर्यंत शिक्षण घेतलंय आणि तो ऑनलाइन ट्रेडिंग व्यवसायात करत होता."
त्यांच्या मते, जेव्हा सौरभला त्याची पत्नी आणि साहिल यांच्यातील संबंधांबद्दल कळलं तेव्हा त्यानं 2021 मध्ये घटस्फोटाचा कायदेशीर मार्ग स्वीकारला होता.
परंतु लहान मुलगी असल्यानं कुटुंबातील सदस्यांनी समजावून सांगितल्यानंतर त्यानं त्याचा निर्णय बदलला होता.
पण तरीही दोघांच्या नात्यात दुरावा तसाच कायम राहिला.
3-4 मार्चला नोमकं काय घडलं?
चौकशीदरम्यान मुस्काननं तिचा गुन्हा कबूल केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
मुस्काननं पोलिसांना सांगितलं की, सौरभ दोन वर्षांपूर्वी कामासाठी लंडनला गेला होता. या काळात मुस्कान आणि साहिलमधील मैत्री आणखी वाढली.
मुस्काननं पोलिसांना सांगितलं की सौरभच्या पासपोर्टची मुदत संपणार होती आणि त्याच कामासाठी तो भारतात आला होता.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुस्कान आणि साहिलनं आधीच हत्येची संपूर्ण योजना आखली होती आणि त्यांनी चाकू आणि बेशुद्ध करण्याची औषधं देखील खरेदी केली होती.
हत्येच्या दिवशी म्हणजे 3 मार्चच्या रात्री, मुस्काननं सौरभच्या जेवणात बेशुद्ध होण्याचं औषध मिसळलं.
त्यानंतर जेव्हा तो बेशुद्ध पडला तेव्हा साहिलनं सौरभचा हात धरला आणि मुस्काननं त्याच्यावर चाकूनं अनेक वार केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी मृतदेह बाथरूममध्ये नेला आणि त्याचे तीन तुकडे केले.
पुरावा नष्ट करण्यासाठी घरातील खोली ब्लीचिंग पावडरनं धुतली.
4 मार्च रोजी मुस्काननं बाजारातून एक ड्रम आणि सिमेंट विकत घेतलं. त्यात शरीराचे सर्व भाग टाकून तो ड्रम सिमेंटनं भरला.
असं उलगडलं रहस्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेह लपवल्यानंतर मुलीला आईकडे पाठवून मुस्कान साहिलबरोबर फिरायला निघून गेली.
लग्नानंतर सौरभच्या कुटुंबीयांनी त्याला दूर केलं होतं आणि त्याच्याशी त्यांचा फारसा संपर्कही नव्हता, त्यामुळेच हे प्रकरण बरेच दिवस कोणाला कळलं नाही, असंही पोलिसांनी सांगितलं.
दरम्यान, 17 मार्च रोजी मुस्कान परत आली, तेव्हा तिच्या सहा वर्षीय मुलीने वडील सौरभबद्दल विचारलं असता मुस्कान भावुक झाली.
ती माहेरी गेली आणि सासरच्यांवर सौरभच्या हत्येचा आरोप करू लागली. परंतु, मुस्कानच्या कटुंबीयांना त्यावर विश्वास बसला नाही आणि ते तिला पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
चौकशीदरम्यान मुस्कानने तिचा गुन्हा कबूल केला, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ड्रम जप्त केला.
सौरभच्या भावानं काय सांगितलं?
सौरभ तीन भावंडांमध्ये सर्वात लहान होता. त्याचा भाऊ राहुल उर्फ बबलू यांनी बीबीसीला सांगितलं की, "माझ्या भावाला निर्दयी लोकांनी ठार मारलं. मुस्काननेच माझ्या भावाला कुटुंबापासून तोडलं होते. यामागे मोठं कटकारस्थान असू शकतं. या कटात मुस्कानच्या सदस्यांचा सहभाग असल्याचा संशय मला आहे." दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भावना त्याने व्यक्त केली.
सौरभ राहत असलेल्या घराचे मालक ओमपाल सिंह बीबीसीसोबत बोलताना म्हणाले, "माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की मुस्कान असं काही करू शकते."
स्थानिक नगरसेवक राजीव गुप्ता म्हणाले, "मुस्कानचे साहिलशी प्रेमसंबंध होते. सौरभ आणि मुस्कानच्या नात्यातही आधीच वितुष्ट आलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.
दुसरीकडे, मुस्कानच्या कुटुंबीयांनीही तिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मुस्कान रस्तोगीच्या आई-वडिलांनी त्यांच्या मुलीला समाजासाठी धोका असल्याचं सांगत तिला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मुस्कानचे वडील म्हणाले , "माझ्या मुलीने आपल्या मित्रासोबत मिळून स्वत:च्या पतीची हत्या केली. ती या समाजात राहाण्यासाठी योग्य नाही आणि इतरांसाठीही धोकादायक आहे, तिला फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी."
मुस्कानची आई एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाली की, सौरभ खूप चांगला मुलगा होता, आमच्या मुलीनं त्याच्यासोबत खूप वाईट केलं.
दरम्यान बुधवारी, पोलीस साहिल शुक्ला आणि मुस्कान रस्तोगी या दोघांना सुनावणीसाठी कोर्टात घेऊन जात असताना काही वकिलांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पोलिसांनी त्यांना जमावापासून वाचवतं सुरक्षित बाहेर काढलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.