You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आत्महत्येआधी शेजाऱ्यावर विषाची ट्रायल, 'जिरा सोड्या'नं तिघांचा बळी घेणारा 'असा' सापडला
- Author, लक्ष्मी पटेल
- Role, बीबीसी
काही दिवसांपूर्वी गुजरातमधल्या खेडा जिल्ह्यातील नडियाद येथे एक पेय प्यायल्यानं तिघांचा मृत्यू झाल्याची बातमी पसरली होती. सुरुवातीला काही जण 'बनावट दारू' प्यायल्यानं मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करत होते.
मात्र,आता या प्रकरणाचं गूढ उकललं असून या प्रकरणी एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
ही घटना 9 फेब्रुवारी रोजी घडली होती. सुरुवातीला या प्रकरणात विषारी दारू पिल्यामुळे मृत्यू झाल्याचं वाटत होतं, परंतु नंतर या प्रकरणाला वेगळंच वळण आलं.
झालं असं की, नडियादमधील जवाहरनगर रेल्वे गेटजवळ एका 'वाचा नसलेल्या आणि बहिऱ्या' व्यक्तीसह तिघांचा मृत्यू झाला.
यात किशोर चौहान, रवींद्र राठोड आणि योगेश कुशवाह यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 45 ते 54 वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे.
एफएसएल अहवाल आणि घटनेच्या इतर तपासात असं समोर आलं की, कोणीतरी मृत व्यक्तीला सोडियम नायट्रेटयुक्त पेय दिलं होतं आणि त्यामुळेच ही घटना घडली.
तांत्रिक विश्लेषण आणि मानवी बुद्धिमत्तेच्या मदतीनं स्थानिक पोलिसांनी हे प्रकरण सोडवलं आणि हरिकिशन मकवाना नावाच्या व्यक्तीला अटक केली.
हरिकिशनला आत्महत्येचे विचार येत होते आणि त्यासाठी त्यानं सोडियम नायट्रेट घेतल्याचं तपासात निष्पन्न झालं.
पण हा पदार्थ पिल्यावर त्याचा कसा परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी त्यानं आपल्या एका मुक्या आणि बहिरेपण असलेल्या शेजाऱ्याला हे पेय दिलं आणि त्यामुळे तिघांचा मृत्यू झाला.
तीन जणांचा बळी कसा गेला?
या प्रकरणाची आणि पोलिसांनी केलेल्या तपासाची अधिक सविस्तर माहिती घेण्यासाठी बीबीसी गुजरातीनं संबंधित अधिकारी आणि मृतांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.
9 फेब्रुवारी 2025 रोजी खेडा जिल्ह्यातील नडियाद येथील जवाहरनगर रेल्वे गेटजवळ जिरा सोडा पिल्यानं तिघांचा मृत्यू झाला होता.
या तिघांच्या मृत्यूचं कारण गूढ होतं. मृत व्यक्तीला दारू पिण्याची सवय असल्यानं पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.
तिघांच्या मृतदेहाचे प्रथम शवविच्छेदन करून त्यांच्या रक्ताचे नमुने एफएसएलकडे पाठविण्यात आले. या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल आढळून आलं नाही.
शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं संभाव्य कारण 'कार्डियाक रेस्पिरेटरी अरेस्ट' असल्याचं आढळून आलं.
मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलिसांनी मृताचा व्हिसेरा अहवाल तयार करून एफएसएलकडे पाठविला होता.
विषारी रसायन देऊन हत्या का करावीशी वाटली?
टेक्निकल अॅनालिसिस आणि ह्युमन इंटेलिजन्सच्या मदतीनं पोलिसांनी आरोपी हरिकिशन मकवाना याच्याशी संपर्क साधला, जो 20 वर्षांपासून एका सरकारी शाळेत शिक्षक होता.
मिळालेल्या माहितीनुसार, हरिकिशन हा पूर्वी कच्छ जिल्ह्यात शिक्षक म्हणून कार्यरत होता. 2018 पासून तो खेडा जिल्ह्यातील सनली गावात शिक्षक म्हणून कार्यरत होता.
हरिकिशन आधी आत्महत्येचा विचार करत होता कारण त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता, पण आत्महत्या केल्यास विमा कंपनी विम्याला मान्यता देणार नाही, असा विचार करून मृत्यूचं कारण नैसर्गिक वाटावं म्हणून तो आत्महत्येचा योग्य मार्ग शोधत होता.
खेडा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेश गढिया यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं की, "आरोपीनं कबूल केलं आहे की, त्याच्याविरोधात 2013 मध्ये पाटण जिल्ह्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
यासंदर्भात न्यायालयीन कार्यवाही सुरू आहे. हरिकिशनची मुले मोठी होत होती, त्यामुळे या प्रकरणात शिक्षा झाली तर मुलांच्या भवितव्यावर त्याचा मोठा परिणाम होईल, असा त्याच्यावर सतत दबाव होता. गेल्या काही काळापासून त्याला आत्महत्येचे विचार येत होते.
आरोपीनं ही हत्या का केली, या प्रश्नावर पोलिसांनी सांगितलं की, त्याला स्वत:आत्महत्या करायची होती. पण तसं केल्यास विमा कंपनी आपल्याला क्लेमचे पैसे देणार नाही, अशी भीती त्याला वाटत होती.
त्यामुळे त्याच्या मृत्यूचं कारण नैसर्गिक असू शकेल, अशा पद्धतीनं मरून जावं असा त्याचा विचार होता.
आरोपींनी कर्णबधिरांना विषारी पेय प्यायला लावण्याचा निर्णय का घेतला?
खेडाचे एसपी राजेश गढिया यांनी सांगितलं की, आरोपीनं काही काळापूर्वी सरखेज येथे सोडियम नायट्रेटनं लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती वाचली होती.
सोडियम नायट्रेटनं मृत्यू झाल्यास शवविच्छेदनादरम्यान कार्डियाक रेस्पिरेटरी अरेस्ट हे मृत्यूचं कारण ठरेल, असा त्याचा विश्वास होता.
त्यानंतर हरिकिशन यानी ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवरून 500 ग्रॅम सोडियम नायट्रेटची ऑर्डर दिली.
कुणाला तरी हा द्रावण प्यायला लावून डेथ रिपोर्टमध्ये काय येतं हे त्याला ते पाहायचं होतं. त्यामुळे त्यानं आपले मुके आणि बहिरे असलेले शेजारी किशोर चौहान यांना लक्ष्य केलं.
आरोपींनी किशोर चौहान यांना लक्ष्य करण्याचं कारण म्हणजे त्यांना ऐकू आणि बोलता येत नसल्यानं दारू पिऊन काही झालं, तरी इतरांना सांगता येणार नव्हतं, असं पोलीस तपासात समोर आलं. त्यामुळे त्यानं किशोरभाईंच्या जिरा सोड्यात सोडियम नायट्रेट मिसळलं.
एसपी गाधिया म्हणाले,"आरोपीचा किशोरभाई वगळता इतर दोन मृतांशी कोणताही संबंध नाही. पण किशोर चौहान यांनी आपल्या दोन मित्रांना 'जिरा सोडा' प्यायला लावला.
पोलिसांनी हत्येचं गूढ कसं सोडवलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत किशोर चौहान हा मुलगा आणि सुनेसोबत राहत होता.
आरोपी हरिकिशन हा त्याचा शेजारी होता, त्यामुळे हरिकिशननं त्याला सोडियम नायट्रेट असलेली जिरा सोड्याची बाटली दिली.
किशोर चौहान यांनी जवळच खेळणाऱ्या एका मुलालाही जिरा सोडा दिला पण मुलानं नकार दिल्यानं तो वाचला.
यावेळी त्यानं आपल्या दोन मित्रांना जिरा सोडा दिला. किशोर चौहान आणि त्याच्या मित्रांची तब्येत बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं असता तिघांना मृत घोषित करण्यात आलं.
एसपी राजेश गढिया यांनी सांगितलं की, किशोर चौहान यांना रुग्णालयात नेण्यासाठी हरिकिशन देखील त्यांच्यासोबत होता.
सोडियम नायट्रेट प्यायल्यानं मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन अहवालात काय येतंय हे त्यांना पाहायचं होतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिकिशन यानं सोडियम नायट्रेटनं आत्महत्या करण्याचा विचार करत असल्याचं पत्नीला बोलून दाखवल होतं मात्र पत्नीनं त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलं होतं.
त्यामुळे त्यानं टॉयलेटमध्ये सोडियम नायट्रेट टाकून त्याची विल्हेवाट लावली. परंतु आरोपीनं आधीच एका वेगळ्या ठिकाणी केमिकलचा थोडा साठा करून ठेवला होता आणि त्याचाच वापर खून करण्यासाठी केला.
मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलिसांनी मृताचा व्हिसेरा अहवाल तयार करून एफएसएलकडे पाठवला.
मृत व्यक्तीनं वापरलेल्या सोड्याच्या बाटल्या, त्याच कंपनीच्या सोड्याच्या इतर बाटल्या, घटनेच्या वेळी मृताचे कपडे, उलट्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. याशिवाय घटनास्थळी उपस्थित लोकांचे जबाब घेण्यात आले.
खेडाचे एसपी राजेश गढिया यांनी सांगितलं की, आमच्या पथकानं ई-कॉमर्स वेबसाइटवर सोडियम नायट्रेट मागवणाऱ्या व्यक्तीची माहिती घेतली. 21 जानेवारी रोजी आरोपी हरिकिशन याच्या घरी अॅमेझॉनवरून सोडियम नायट्रेटचं पार्सल देण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालं.
पोलिसांनी जिरा सोडा विकत घेणाऱ्यांची चौकशी केली आणि अखेर हरिकिशनपर्यंत पोहोचले. चौकशीत हरिकिशननं गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.