You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शाळेत असल्यापासून होती ओळख, ब्रेकअपनंतर प्रेयसीची हत्या; तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
- Author, शीतल पटेल,
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
त्या दोघांची शाळेत असल्यापासून ओळख होती. नंतर ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि पण तरुणीला हे प्रेमसंबंध नंतर सुरू ठेवायचे नव्हते. त्याचा राग मनात धरून तरुणाने तिची निर्घृणपणे हत्या केली आणि नंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न देखील केला.
गुजरातमधील सुरत जिल्ह्यातल्या वांकळ इथं ही घटना घडली असून आरोपी तरुणाला कठोर शिक्षा देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
वांकळ गावाजवळील एका शेतात दुचाकीजवळ रक्ताच्या थारोळ्यात तरुणी आणि तरुण पडलेले ग्रामस्थांना दिसले.
त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांसह रुग्णवाहिकाही बोलावली. गळ्याला गंभीर दुखापत झाल्यानं मुलीचा जागीच मृत्यू झाला होता, तर तरुण जखमी होता. पोलिसांनी तरुणाला सरकारी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
सुरत जिल्हा पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलिसांनी रुग्णालयात जाऊन त्या तरुणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 103 ब आणि 135 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.
सुरत ग्रामीण पोलीस अधीक्षक हितेश जोयसर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्विनी चौधरी असं मृत तरुणीचं नाव आहे, तर सुरेश जोगी असं तरुणाचं नाव आहे. या दोघांचेही प्रेमसंबंध होते. तरुणीला हे नातं पुढे सुरू ठेवायचं नव्हतं. त्यामुळे तरुणानं रागाच्या भरात ही हत्या केली.
मंगळवारी 18 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास महामार्गापासून अर्धा किलोमीटरवर असलेल्या वांकळ गावात एका 20-25 वर्षीय तरुण आणि तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली.
पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर मुलीचा जागीच मृत्यू झाला होता तर तरुण जिवंत होता. तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात हलवलं होतं.
जोयसर या जोडप्याच्या प्रेम प्रकरणाबद्दल माहिती देताना म्हणाले, दोघेही मित्र होते आणि त्यांचं सकाळी फोनवरून बोलणं झालं होतं. त्यानंतर 15 मिनिटांत ही घटना घडली. घटनेचा पुढील तपास सुरू असून डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर तरुणाची सखोल चौकशी केली जाईल.
"सध्या तरुणाच्या मानेला झालेल्या गंभीर जखमेबद्दल चौकशी केलेली नाही. पण, प्राथमिक तपासात असं दिसून आलं की दोघांचे प्रेमसंबंध होते आणि ब्रेकअपच्या रागातून हे कृत्य झालं असावं. तपासानंतरच नेमकं कारण काय हे कळेल," असं मांगरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम. एच. सोळंकी बीबीसी गुजरातसोबत बोलताना म्हणाले.
तरुणी शाळेपासूनच होती मैत्रीण
या घटनेतील मृत मुलगी वांकळ गावची रहिवासी होती आणि ती जवळच्या एका महाविद्यालयात शिकत होती, तर तरुण सुरेश जोगी हा पलसाणा इथला रहिवासी आहे. दोघांची शाळेत असल्यापासून मैत्री होती.
मांगरोळचे पोलीस उप-अधीक्षक बी. के. वनारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. याबद्दल कुटुंबीयांना विचारपूस केली. पण, त्यांना काहीच माहिती नाही. त्यानंतर महाविद्यालयातील मित्र-मैत्रिणींना विचारलं तर दोघांमध्ये प्रेमसंबंध होते आणि तरुणीला हे संबंध पुढे सुरू ठेवायचे नव्हते.
घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांवरून असं दिसतं की तरुणानं हत्येचा कट रचला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून एक ब्लेड आणि वाकलेला चाकू जप्त केला. तसेच अॅक्टिव्हाजवळ मुलीची चप्पलही दिसली. तरुणीची हत्या केल्यानंतर तरुणानं स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
तरुणीला गळा, श्वसननलिका आणि कंबरेत जखम
तरुण-तरुणीनं आत्महत्या केल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. पण, वनारे यांनी हे वृत्त फेटाळून लावलं.
मृत तरुणीचा फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली. यामध्ये श्वसन नलिका, उजवं फुप्फुस, मूत्रपिंड, दोन्ही हात आणि पाठीवर जखमा असल्याचं समोर आलं. शरीरावर अनेक जखमा असल्यानं या तरुणीचा मृत्यू झाला.
वनारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणानं दोनवेळा तरुणीच्या कंबरेवर चाकूनं वार केला. यानंतर तरुणीनं स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हात आणि शरीराच्या इतर भागांवर जखमी झाल्या. त्यामुळे तरुणीचा मृत्यू झाला असावं.
तरुणाच्या गळ्यावर फक्त एक जखम आहे. हा घाव तरुणीनं केल्याचं दिसत नाही. सगळ्या पुराव्यावरून असं दिसतं की तरुणी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. पण, तरुणानं तिची हत्या केली.
तरुणाच्या गळ्यावर जखमी असून त्याचा आवाज देखील गेला आहे.
तरुणाला कठोर शिक्षा देण्याची मागणी
तरुणीची हत्या झाल्यानंतर पीडित तरुणीच्या कुटुंबीयांसोबत बोलण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला. पण, सध्या ते यावर बोलण्याच्या मानसिकतेत नाहीत.
मृत तरुणी तेजस्विनीच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. यामध्ये गावाशेजारच्या परिसरातूनही लोक सहभागी झाले होते. तसेच वांकळ गावात दुकानं बंद ठेवून लोकांनी या घटनेचा निषेध नोंदवला.
या हत्येचं प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून तरुणाला कठोर शिक्षा देण्याची मागणी अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या लोकांनी केली. तसेच राजकीय नेत्यांनी देखील तरुणीला न्याय देण्याची मागणी केली.
आदिवासी समाजाचे नेते अनिल चौधरी म्हणाले, "सरकार, पोलीस आणि कोर्ट या घटनेला गांभीर्यानं घेतली आणि लवकर लवकर चौकशी करून तरुणाला फाशीची शिक्षा देतील अशी आम्हाला आशा आहे. गेल्या काही घटनांमध्ये कोर्टानं लगेच निर्णय घेऊन आरोपींना शिक्षा सुनावली तसंच या प्रकरणात देखील आरोपीला शिक्षा मिळायला पाहिजे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)