You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मुंबई-पुण्यात त्यांनी आम्हाला काही हजारांतच विकलं'
- Author, हृदय विहारी
- Role, बीबीसी तेलुगू
आंध्र प्रदेशातल्या रायलसीमा भागातल्या तरुणींना देहव्यापारासाठी दिल्ली, मुंबई आणि पुणे या शहरांत आणलं जातं. असाच अनुभव आलेल्या तीन स्त्रियांची ही कहाणी बीबीसीनं 2018मध्ये समोर आणली होती. ती पुन्हा शेयर करत आहोत.
"आम्हाला ८० हजार रुपयांना विकलं गेलं."
"मला त्यांनी दीड लाखाला विकलं."
"मला तर ५ लाखांत विकून टाकलं."
या काही वस्तूंच्या किमती नाहीत. तर, दलालांमार्फत देहव्यापारासाठी विकल्या गेलेल्या तीन स्त्रियांच्या किंमती आहेत.
आंध्र प्रदेशातल्या रायलसीमा भागातल्या अनंतपूर आणि कडप्पा जिल्ह्यांची दुष्काळामुळे बिकट अवस्था झाली आहे.
त्यामुळे गेल्या काहीं दशकांपासून इथल्या तरुणींना देहव्यापारासाठी दिल्ली, मुंबई, पुणे या शहरांमध्ये विकलं जात आहे. असाच अनुभव आलेल्या तीन स्त्रियांनी आपले अनुभव बीबीसीकडे व्यक्त केले आहेत.
आंध्र प्रदेशातल्या महिलांच्या देहव्यापाराचं हे लोण सौदी अरेबियासारख्या देशांपर्यंत पसरल्याच्या तक्रारी इथल्या सामाजिक संस्था करत आहेत. मात्र हे फेटाळून लावत आता अशी परिस्थिती राहिली नसल्याचा दावा स्थानिक पोलिसांनी केला आहे.
मुळच्या अनंतपूर जिल्ह्यातल्या असलेल्या अशाच तीन महिलांशी बीबीसी प्रतिनिधी हृदय विहारी यांनी संवाद साधला. या तिघींचीही देहव्यापारातून मुक्तता करण्यात आली आहे. त्या काळात त्यांचं मानसिक आणि शारीरिक शोषण झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
या महिलांची करुण कहाणी त्यांच्याच शब्दांत त्यांनी मांडली आहे;
"माझं नाव रमादेवी आहे. माझं अवघ्या १२व्या वर्षीच लग्न झालं. माझ्या सासरच्या मंडळींकडून माझ्यावर अत्याचार झाले. एक मुलीला जन्म दिल्यानंतरही हे अत्याचार सुरुच होते. हे अत्याचार सहन न झाल्यानं मी माझ्या मूळ घरी परतले."
रमादेवी पुढे सांगतात, "तिथं माझी शरीरानं अपंग असलेल्या पुष्पा नावाच्या मुलीसोबत मैत्री झाली. पैसे कमावण्यासाठी ती एका हॉटेलमध्ये काम करायची."
"तिथं एक स्त्री आमच्याशी रोज गप्पा मारण्यासाठी येत असे आणि रोज आमची आपुलकीनं चौकशी करत असे. एक दिवस तिनं आम्हाला सिनेमा पाहाण्यासाठी येणार का? म्हणून विचारलं. मी मग माझ्या बाळाला आईकडे ठेवलं आणि सिनेमा बघायला गेले."
त्यावेळच्या घटनेचं वर्णन करताना रमादेवी पुढे म्हणाल्या की, "जेव्हा आम्ही शुद्धीवर आलो तेव्हा आम्हाला जाणवलं की, एका अज्ञात जागी आम्हाला आणण्यात आलं असून तिथलं कोणीच आमच्या ओळखीचं नाही."
"केवळ हिंदी भाषाच आमच्या कानावर पडत होती. अशातच तीन दिवस गेले. त्यानंतर आम्हाला कळलं की, त्या महिलेनं मला आणि पुष्पाला ८० हजारांत महाराष्ट्रातल्या भिवंडी इथं कोणाला तरी विकलं आहे. आम्हाला सोडावं यासाठी आम्ही त्यांना खूप विनवण्या केल्या, पण त्यांनी आमचं ऐकलं नाही. माझी मुलगी तेव्हा अवघी ६ वर्षांची होती," असं रमादेवींनी सांगितलं.
"त्यांनी आमच्या अंगावरचं सगळं सोनं काढून घेतलं होतं. माझं मंगळसूत्र, पायातलं चांदीचं वळंही त्यांनी काढलं. अपंग असून त्यांनी पुष्पालाही यातून सोडलं नाही." हे सांगून रमादेवी पुढे सांगत होत्या की, "त्यांनी आम्हाला तयार व्हायला सांगितलं आणि आम्हाला बघायला येणाऱ्या पुरुषाशी नीट वागण्यास बजावलं."
"६ महिने असेच गेले. या काळात माझ्या मुलीची आठवण काढून मी रडायचे. मी एकदा पळून जाण्याचा प्रयत्नही केला, पण पकडले गेले. त्यांनी माझे हात-पाय बांधले आणि माझ्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकली. ज्यामुळे झालेला त्रास सहन करण्यापलीकडचा होता. आम्हाला जेवणही नीट द्यायचे नाहीत. अन्न-पाणी आणि झोपेविना मी वर्षभर काढलं."
बंडखोर स्वभावामुळे त्यांनी माझी सुटका करण्याचा निर्णय घेतला. वर्षभरानंतर त्यांनी मला जाऊ दिलं. पण पुष्पाला सोडण्यासाठी ते तयार नव्हते. पुष्पालाही सोडावं यासाठी मी संघर्ष केला.
"प्रवासाला लागतील म्हणून त्यांनी आमच्या हातावर 2000 रुपये ठेवले. ही तुमची वर्षभराची कमाई असं सांगितलं."
"मी घरी परतले, तेव्हा पालकांना धक्काच बसला. कारण मी गेले असंच त्यांना वाटत होतं. माझ्या आईवडिलांची स्थिती हलाखीची होती. माझ्या लेकीला खाऊपिऊ घालायलाही त्यांच्याकडे पैसा नव्हता. मी माझ्या मुलीला कवटाळलं आणि आई कुठे आहे विचारलं तर तिनं आई देवाघरी गेली असं सांगितलं. त्या क्षणी माझ्या हृदयात चर्र झालं."
मुलीचं ते बोलणं ऐकून आपलं जीवन संपवावं असा विचार मनात आला. पण भिवंडी शहरातल्या कुंटणखान्यांमध्ये अनेक मुली देहविक्रयाच्या धंद्यात फसल्या आहेत, याची मला जाणीव झाली. त्यांच्या आयुष्याला लागलेली कीड दूर व्हायला हवी यासाठी मी लढायचं ठरवलं. स्वयंसेवी संस्थांना मी भिवंडीतल्या भयंकर परिस्थितीची कल्पना दिली. त्यांना भिवंडीला घेऊन गेले. तिथल्या कुंटणखान्यातून 30 बायकांची सुटका केली.
"मी सध्या नवऱ्याबरोबर राहते आहे. मी माझ्या कुटुंबासह राहते. पण आजूबाजूच्या माणसांपैकी काहीजण त्यांच्यासोबत झोपणार का? अशी विचारणा माझ्या नवऱ्यासमोर करतात. ते फारच अपमानकारक असतं."
सन्मानानं जगू देत नाहीत यासाठी या सगळ्या माणसांना अटक व्हायला हवी अशी मागणी रमादेवी करतात.
रमादेवी आणि त्यांचा नवरा एकत्र राहतात. सध्या त्या रोजंदारीचं काम करतात.
2010 मध्ये रमादेवींची अंधारकोठडीच्या जगातून सुटका झाली. मात्र सरकारी मदत सुरू व्हायला आणखी दोन वर्ष लागली.
2012 मध्ये रमादेवींना सरकारकडून 10,000 रुपये मिळाले. दरम्यान कुंटणखान्यातून सुटका झाली असली तरी रमादेवींच्या जगणं फारसं बदललेलं नाही. बरं जगता यावं यासाठी चांगली नोकरी त्यांच्याकडे नाही.
पार्वती
"घरगुती कामांसाठी मदतनीस म्हणून मी सौदी अरेबियाला गेले होते. माझ्या पतीला पक्षाघाताचा आजार झाला होता. आमच्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्रोत नव्हता. कमवायला लागणं मला भाग होतं, जेणेकरून कुटुंबाची गुजराण होऊ शकेल."
"माझं नाव पार्वती आणि मला दोन मुलं आहेत. काम मिळवून देतो या सबबीवर दलालानं मला सौदी अरेबियातल्या एका कुटुंबाला विकलं. सुरुवातीला मला एका घरात ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर दुसऱ्या एका ठिकाणी हलवण्यात आलं. ती जागा नरकासमान होती."
"त्या घरात अनेक पुरुष राहत होते. 90 वर्षांच्या एका माणसानं माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, मात्र मी तिथून निसटण्यात यशस्वी झाले."
"दुसऱ्या दिवशी घरमालकाच्या मुलानं बलात्काराचा प्रयत्न केला. मला सिगारेटचे चटके देण्यात आले. घरातल्या अन्य पुरुषांच्या गरजा पूर्ण करण्याची सक्ती करण्यात आली. माझ्या मुलाच्या वयाच्या व्यक्तीशी शय्यासोबत करावी लागली. मालकाच्या मुलानं बलात्कार केला. तेव्हा वडील मोबाइलवर पॉर्न दाखवत होते."
"त्यांनी आठवडाभर मला जेवायला दिलं नाही. बाथरुममधल्या नळातून पाणी प्यावं लागलं. ते म्हणतील ते करायला नकार दिल्यानं त्यांनी माझी रवानगी आणखी एका घरात केली. तिथल्या यातना याहीपेक्षा भीषण होत्या. तिथं घरातल्या सगळ्या पुरुषांची शय्यासोबत करावी लागे. यात बापलेकाचा समावेश असे."
"दररोज असं यातनामय जगण्यापेक्षा विष घेऊन मरून जावं असा विचार मनात येत असे. मासिक पाळीदरम्यानही या अत्याचारातून सुटका नसे. त्या लोकांच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांबरोबरही झोपावं लागे."
"दिवसा मी स्वयंपाकाचं काम करत असे आणि रात्री त्यांच्या शरीराची गुलाम असे. मी दलालाला हे सांगितलं. हे करण्यासाठीच तुला सौदी अरेबियाला पाठवलं आहे असं त्यानं सांगितलं. त्यानं मला पाच लाखांना विकलं होतं," असं त्यांनी अश्रूभरल्या डोळ्यांनी सांगितलं.
"या सगळ्यातून सुटका करून घेण्यासाठी ते घर सोडायचं ठरवलं. शोषणाविरुद्ध बोलायला सुरुवात केली. अखेर त्यांनी मला घरातून सोडलं. पोलिसांच्या मदतीनं भारतात पोहोचले."
"नाचणी खाऊन आम्ही दिवस काढले. मी नवऱ्याबरोबर केरळला जाण्याचा निर्णय घेतला. तो तिथं नोकरी शोधणार होता. केरळात मजुरीला दिवसाला 500 रुपये मिळतात असं मी ऐकलं होतं. तिथं काम मिळालं तर तिथं कामाला सुरुवात करीन. नाही तर भीक मागण्यावाचून माझ्यापुढे पर्याय नाही."
पार्वती यांची सौदी अरेबियातून 2016 साली सुटका झाली. 2017 मध्ये सरकारनं त्यांना 20,000 रुपयांचं अर्थसहाय्य केलं. रोजगारासाठी आता त्या केरळला जाणार आहेत.
देहविक्रीच्या धंद्यात ढकलण्यात आलेल्या दुर्देवी महिलेची ही कहाणी.
लक्ष्मी नावाच्या स्त्रीच्या वाट्यावा सुद्धा अशाच यातना आल्या होत्या. लक्ष्मी यांचं त्यांच्या मामाशीच लग्न लावून देण्यात आलं. दक्षिण भारतात ही प्रथा आजही सुरू आहे.
नवरा मामा असून तिच्याकडे संशयानं पाहत असे. तिचं शोषण करत असे.
"एके दिवशी त्यानं माझ्या अंगावर रॉकेल ओतलं. तो मला पेटवून द्यायला निघाला होता, पण मी तिथून पळ काढला. तरी त्यानं मला सोडलं नाही. त्यानं मला भररस्त्यात विवस्त्र केलं आणि त्याच अवस्थेत उभं राहायला लावलं."
"एका महिलेनं माझी स्थिती पाहिली. हैदराबादमध्ये घरगुती कामं मिळवून देईन असं सांगितलं. तू नवऱ्याला सोडून इथं माहेरी आली आहेस. हैदराबादमध्ये चार घरी कामं स्वीकारली तर महिनाकाठी दहा हजार रुपये मिळवू शकतेस," असं तिनं सांगितलं.
"पालकांसाठी मी ओझं झाले आहे, हा मुद्दा तिने मला पटवून दिला. मी कामावर गेले तरच दोन वेळच्या जेवणाची सोय होऊ शकणार होती. म्हणून मी हैदराबादला जाण्याचा निर्णय घेतला. हे मी घरी सांगितलं नाही."
"मी याआधी कधीही हैदराबादला गेले नव्हते. मला मदत करणाऱ्या महिलेबरोबर जायला मी तयार झाले. आम्ही बसने कादिरीमार्गे धर्मावरमला पोहोचलो. रामनम्मानं माझी दोन माणसांशी भेट करून दिली. त्यांनी मला बुरखा घालायला सांगितलं. असं का करायचं असं मी विचारलं. आपल्याला कोणी पाहिलं तर मला घेऊन जातील. तिथून आम्ही ट्रेननं प्रवास केला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी हैदराबाद नव्हे तर दिल्लीत होते.
"ट्रेनमधून उतरल्यानंतर आणखी एका बाईनं आम्हाला घरी नेलं. तिथं जवळपास 40 मुली होत्या. त्या सगळ्या जीन्स, मिनीस्कर्ट अशा पेहरावात होत्या. ओठाला लिपस्टिक आणि अस्ताव्यस्त केस अशा अवतारात त्या होत्या."
"आम्ही दिल्लीतल्या जीव्ही रोडवर होतो. त्याचदिवशी संध्याकाळी मला एका ब्युटी पार्लरमध्ये नेण्यात आलं. हे नक्की काय चाललंय असं मी विचारलं तेव्हा बाकी मुलींप्रमाणे तुलाही तयार करणार आहोत असं सांगण्यात आलं."
"मी गोंधळले आणि घाबरले. ज्या माणसानं मला विकलं तो रात्री आला आणि त्याने माझ्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी रेगिनानं मला पुरुषांकडे जायला सांगितलं पण मी नकार दिला."
"मी साधारण महिनाभर प्रतिकार केला. महिनाभर त्यांनी मला खायला प्यायला दिलं नाही. त्यांनी मला खुर्चीत बसवलं. माझे हात बांधून ठेवले. माझ्या डोळ्यात लाल तिखटाची पावडर टाकली. तोंडातही तिखटाचा बकाणा भरला ज्यामुळे जीभ सोलून निघाली. चव कळेनाशी झाली. महिनाभर मी खाऊ शकले नाही."
"अखेर त्यांचं ऐकण्यावाचून मला पर्याय उरला नाही. जिवंत राहण्यासाठी तसं करणं मला भाग होतं. मला कस्टमरकडे पाठवण्यात येई. तो अनुभव क्रूर आणि भयंकर असा होता. मला सिगारेटचे चटके देण्यात येत असत. त्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण कराव्या लागत. मला घराबाहेर सोडत नसत."
ऐकलं नाही तर ते इंजेक्शन्स टोचत, लक्ष्मी भरल्या डोळ्यांनी सांगत होत्या.
"रेगिना घरात नसताना वॉचमननं मला त्या घरातून बाहेर पडायला मदत केली. त्याने मला हजार रुपये दिले आणि पळून जायला सांगितलं."
"विमनस्क आणि थकलेल्या अवस्थेत मी माहेरी परतले तेव्हा कुटुंबातल्या कोणीही मला स्वीकारायला तयार नव्हतं. मी एकटीच राहिले आणि मला विकणाऱ्या माणसाविरुद्ध पोलिसात तक्रार केली. काम मिळवून देण्याच्या नावावर मला फसवण्यात आलं होतं."
"अजूनही अनेक स्त्रियांच्या नशिबी असं भयंकर जिणं आहे. दुष्काळ पडला नसता तर आम्हाला या दुष्टचक्रातून जावं लागलं नसतं. आमचं आयुष्य सुखकर असतं."
लक्ष्मी यांची या भीषण टप्प्यातून 2009 साली सुटका झाली. पण सरकारी मदत मिळायला अनेक वर्षं लागली. 2017 मध्ये लक्ष्मी यांना सरकारकडून 20,000 रुपये मिळाले. लक्ष्मी आता मजूर म्हणून काम करतात.
देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये स्त्रियांची तस्करी सुरू आहे. आंध्र प्रदेशातल्या रयालसीमा भागात चालणाऱ्या तस्करीमागे वेगळी कारणं आहेत, असं रेड्स स्वयंसेवी संस्थेच्या भनुजा यांनी सांगितलं. मानवी तस्करीत अडकलेल्या स्त्रियांची सुटका करण्यासाठी ही संस्था गेली 20 वर्षं काम करत आहे.
रयालसीमा भागाला दुष्काळाचा फटका बसला आहे. सततच्या दुष्काळामुळे शेतीवर विपरीत परिणाम झाला आहे. दुष्काळामुळे रोजगार घटला आहे. यामुळेच दलालांच्या जाळ्यात महिला गुरफटत आहेत.
स्थानिक पोलीस आणि CBCID यांच्या मदतीनं भिवंडी, दिल्ली आणि मुंबई अशा देशभरात पसरलेल्या कुंटणखान्यांतून आतापर्यंत 318 महिलांची सुटका केली असल्याचं भनुजा यांनी सांगितलं.
वेश्या व्यवसायातून सुटका झालेल्या महिलांना सरकारला प्रत्येकी 20,000 रुपयांची मदत द्यावी लागते. त्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्थाही करावी लागते. आर्थिक मदत आणि निवारा यासाठी अनेकदा दोन ते तीन वर्ष लागतात, असं त्यांनी सांगितलं.
महिलांची विक्री करणाऱ्या दलालांना रोखण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. जेलमधून सुटका झाल्यानंतर दलालांचं रॅकेट सक्रिय होतं.
"अनेकदा दलालांविरुद्धची तक्रार मागे घ्यावी यासाठी पोलीस पीडितांवर दबाव आणतात," असं त्यांनी सांगितलं.
"तस्करीविरोधात काम करत असल्यानं 2015 मध्ये माझं घर पेटवण्यात आलं होतं. सुदैवानं घरी कोणी नव्हतं. संशयितांविरुद्ध मी तक्रार दाखल केली."
एका संशयितानं दहा लाख रुपये देऊ केले आणि तक्रार मागे घ्यायला सांगितलं असंही त्या सांगतात.
दरम्यान, मानवी तस्करी पूर्वी होत असे मात्र आता तसे प्रकार घडत नाहीत, असं अनंतपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जीव्हीजी अशोक यांनी सांगितलं.
असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे, असं त्यांनी पुढे सांगितलं.
महिलांची विक्री होऊन त्यांना आखाती देशांमध्ये पाठवण्यात येण्यासंदर्भात आमच्याकडे कोणतीही तक्रार आली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
"कादिरी परिसरातील हे प्रकार रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. अनंतपूर परिसरात महिला स्वयंसेवकांची तुकडी स्थापन करण्यात आली आहे. पीडित महिलांच्या पुनर्वसनासाठी प्रायोगिक स्तरावर एक प्रकल्प राबवण्यात येत आहे," अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.
संपूर्ण जिल्ह्यात 1500 महिला स्वयंसेविकांची फौज तयार करण्यात आली आहे. या कामाकरता त्यांना प्रतिदिन एक हजार रुपयांचं मानधन देण्यात येत आहे. पीडित महिला या स्वयंसेविकांकडे आपली तक्रार दाखल करू शकतात.
याप्रकरणी पोलिसांकडे याआधी दाखल करण्यात आलेल्या तक्रारींमध्ये नावं असलेल्या व्यक्तींच्या हालचालींवर सातत्यानं लक्ष ठेवण्यात येत असल्याचही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
(ही कथा आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर जिल्ह्यातल्या रमादेवी या महिलेची आहे. सासरच्याच्या छळाला कंटाळूण त्यांनी घर सोडलं, पण त्या कुंटणखाण्यात अडकल्या. त्यांची मैत्रिण असल्याचं भासवणाऱ्या एका महिलेने त्यांना भिवंडी इथल्या कुंटणखाण्यात 80 हजार रुपयांना विकलं होतं. त्यावेळी रमा देवीच्या मुलीचं वय 6 महिने इतकं होतं.)
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)