You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
या गावात प्रत्येक मुलीचं 3 वेळा लग्न होतं
- Author, लक्काजू श्रीनिवास
- Role, बीबीसी तेलुगूसाठी
आंध्र प्रदेश- ओडिशा सीमेवर मलाईस नावाची एक जमात असून त्यांच्यात एक रंजक प्रथा आहे. इथं जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलीचं तीनदा लग्न लावलं जातं.
जेव्हा त्या पाच वर्षांच्या होतात तेव्हा पहिल्यांदा लग्न होतं, जेव्हा त्या वयात येतात तेव्हा दुसरं लग्न होतं. या दोन्ही लग्नात नवरा मुलगा नसतो. तरीही त्यांना लग्न म्हटलं जातं. जेव्हा तिसऱ्यांदा लग्न होतं तेव्हा तिथे नवरा असतो.
पहिली दोन लग्नं समुहात होतात. खेड्यात राहणाऱ्या सगळ्या मुलींचं लग्न होतं. जरी तिथे नवरा मुलगा नसला तरी लग्न अशा पद्धतीने होतं की संपूर्ण खेड्यासाठी ते लग्न आयोजित केलं जातं.
पाच वर्षांतून एकदा
पूर्व घाटात अशा अनेक आदिवासी जमाती आहेत. त्यांच्या प्रथा रंजक आहेत. तीनदा लग्न करण्याची प्रथा पिढ्यानपिढ्या चालू आहे, असं या जमातीतले लोक सांगतात.
ही अत्यंत खोल रुजलेली प्रथा आहे. पण ही परंपरा म्हणून पाळली जाते. नुकतेच आंध्र-ओडिशा सीमेवर डोडीपुट्टू गावात 50 सामूहिक विवाह सोहळे आणि चौडापल्ली गावात 30 विवाह सोहळे पाच वर्षांच्या मुलींसाठी पार पडले.
मात्र ते बालविवाह करत नाही. बीबीसीच्या टीमने याची पडताळणी केली आहे.
तीन लग्नं, हा आमचा सण आहे
मलाईस जमातीत मुलींना खूप आदर दिला जातो. डोडिपट्टू गावातील 55 वर्षीय कृष्णम राजू यांनी बीबीसीला या परंपरेविषयी सांगितलं,
"आमच्या जमातीत जेव्हा मुलीचा जन्म होतो तेव्हा आम्ही तो क्षण साजरा करतो. मुलींना लक्ष्मीसारखी वागणूक देणं ही आमची जुनी परंपरा आहे. आमच्या परंपरेप्रमाणे सर्व प्रथा मुलींच्या पालकांसमोर केल्या जातात. लग्न हा मुलींच्या आयुष्यातला सगळ्यांत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आमच्या वाडवडिलांनी या परंपरेचं महत्त्व ओळखलं. म्हणजे पालकांचं निधन झालं तरी त्यांना आपल्या मुलीचं एक तरी लग्न पाहता यावं हा यामागचा उद्देश आहे. आपण आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे अनुभवले नाही, असं कोणाला वाटून नये हा या मागचा उद्देश आहे. जेव्हा नवरा मुलगा नसतो तेव्हा लग्न नेहमीसारखं होतं. गावातली ज्येष्ठ मंडळी एकत्र येतात आणि हा क्षण साजरा करतात," असं ते म्हणाले.
लग्नाचा खर्च- घरटी एक लाख रुपये
लग्न म्हटलं की खर्च येतोच असा समज आहे. या जमातीत लोक लग्नावर फारसा खर्च करत नाहीत. खरं लग्न असो किंवा फक्त परंपरा म्हणून केलेलं लग्न, सर्व मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना आमंत्रण दिलं जातं. बरेच खाद्यपदार्थ केले जातात. तीन दिवस पाहुणचार केला जातो. गावात एकाच ठिकाणी जेवणावळी घातल्या जातात.
"पाच वर्षांची मुलगी असो किंवा वयात येतानाचं लग्न असेल किंवा नवऱ्याबरोबर असेल, सगळी लग्नं मोठ्या प्रमाणावर होतात. लग्नाचा आनंद प्रत्येक घरात दिसतो. नातेवाईंकांचं येणं, जाणं, भेटवस्तू देणे, लग्नासाठी स्वयंपाक, नवीन कपडे घालणं, पूजा सकाळपासून होते. नातेवाईक यजमानांकडे तीन दिवस आधी येतात. अशा लग्नात एक लाखापर्यंत खर्च येतो," मनेम्मा यांनी बीबीसी ला सांगितलं.
त्यांनी अशी कमीतकमी वीस लग्नं पाहिली आहेत. आता त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीचं लग्न आहे.
तिसरं लग्न - लव्ह मॅरेज असलं तरी फरक पडत नाही
गावातील ज्येष्ठ मंडळी पाच वर्षांच्या मुलीच्या लग्नाची वेळ ठरवतात. जर गावातले सगळे लोक सहमत असतील तर एक मुहूर्त ठरवला जातो. त्यानंतर लग्नाची खरी मजा सुरू होते. घराचं रंगकाम होतं, घराची डागडुजी केली जाते. मुलींसाठी काही वस्तू आणल्या जातात आणि गावात निमंत्रणं पाठवली जातात.
लग्नाची तयारी अशा पद्धतीने सुरू होते. गोडाधोडाचं आणि इतर पदार्थ तीन दिवस आधी तयार केले जातात.
"पाच वर्षांच्या मुलीचं लग्न होतं, त्यानंतर त्या मुली वयात आल्या की त्यांचं पुन्हा लग्न होतं. त्यामुळे आपल्या हाताने लग्न लावून दिल्याचं समाधान पालकांच्या हाती लागतं. तिसऱ्या लग्नात नवरा असतो. त्यामुळे तिथे चॉईस हा मुलीचा आहे. नाहीतर पालक लग्न लावतात," असं श्रावणी यांनी बीबीसी शी बोलताना सांगितलं. तिने विशाखापट्टणमध्ये एका व्यक्तीशी लग्न केलं आहे. श्रावणीचं सुद्धा याआधी दोनदा लग्न झालं आहे.
मलाईस जमातीत आर्थिक विषमता आहे. मात्र तरीही बराच खर्च करून या जमातीततले लोक ही प्रथा पाळतात. प्रत्येकवेळी खर्च करणं शक्य नसतं म्हणून लग्नाला येणारे लोक किराणा आणि इतर गोष्टी आणतात. त्याचबरोबर पैसे आणि इतर भेटवस्तूही आणतात.
लग्न कसं होतं?
पहिल्या दोन लग्नांत मुलींना एका फळीवर बसवलं जातं. मात्र तिसऱ्या लग्नानंतर मुलीला सासरी पाठवलं जातं. ज्या घरात मुलगी असते त्या प्रत्येक घरात ही परंपरा पाळली जाते. सगळी लग्नं थाटामाटात साजरी केली जातात.
"सगळ्या जोडप्यांना आंब्यांची पानं बांधली जातात. त्याला बाशिंग म्हणतात. मुलीच्या डोक्याला एक हार घातला जातो. मग तिला सजवून मुहूर्ताच्या आधी खांद्यावर घेतलं जातं आणि खेड्यात फिरवलं जातं. मग त्यांना सामूहिक लग्नाच्या मांडवात आणलं जातं. नंतर त्यांना चटईवर बसवलं जातं. ती बांबूची असते आणि एक होम हवन केलं जातं.
त्यानंतर मलाईस प्रथेप्रमाणे हे लग्न झाल्याचं जाहीर करण्यात येतं. पाच वर्षांत लग्न करण्यामागचा विचार असा आहे की जर कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचं निधन झालं तर त्यांना लग्न मिस केल्यासारखं वाटू नये. असं केलं नाही तर हा गुन्हा मानण्यात येतो," असं डोडीपुट्टू यांनी बीबीसी ला सांगितलं. ते या जमातीतले पुरोहित आहेत.
हाच यांच्यासाठी सण असतो
आदिवासी जमातीत अनेक रंजक प्रथा असतात. विशेषत:आंध्र-ओडिशा सीमेवर अशा अनेक प्रथा दिसतात. अशा अनेक प्रथा शेकडो वर्षांपासून चालू आहेत.
निवृत्त प्राध्यापक तिरुमला राव मानववंशशास्त्र विभागात प्राध्यापक आहे. जे आदिवासी अशा परंपरा पाळत नाही ते त्यांच्या वाडवडिलंचा अपमान करतात, असं समजलं जातं.
"मलाईस जमातीत तीनदा लग्न करणं हीसुद्धा अशीच एक परंपरा आहे. नवऱ्यामुलाशिवाय दोन लग्नं करणं ही खूप जुनी परंपरा आहे. मात्र आपल्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करण्याची परवानगी देणं यातून त्यांची संवेदनशीलता दिसून येते.
आपल्या वाडवडिलांना नाराज करू नये म्हणून ते पहिली दोन लग्नं करतात. हा त्यांच्या ज्येष्ठांच्या प्रति दाखवलेला आदर आहे. गावातल्या इतरांनी पैसे देणे हा सुद्धा आधुनिक काळातला क्राऊड फंडिगचाच प्रकार आहे. आदिवासी समाजातली ही परंपरा जुनाट वाटली तरी ती सणावारांसारखीच असते," त्या सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)