You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भटका कुत्रा भुंकला का नाही? या प्रश्नाचं उत्तर सापडलं अन् हत्येचा उलगडा झाला, वाचा शोधाचा थरार
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
(बीबीसी मराठीवर आम्ही ही लेख मालिका सुरू करत आहोत. पोलिसांनी अत्यंत अवघड वाटणाऱ्या गुन्ह्यांची उकल केली आहे त्यामागची गोष्ट काय आहे हे या मालिकेतून तुमच्यापर्यंत आणले जाणार आहे.)
मुंबईच्या जवळच असलेल्या नवी मुंबई परिसरामध्ये नेरूळ येथे भर रस्त्यात एक व्यक्तीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. या थरारक हत्येतील आरोपीचा पोलिसांनी एका छोट्या संशयाच्या धाग्यावरून लावला होता शोध.
या खळबळजनक घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहोचत, नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल आरोपीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र पुरावे सापडत नसल्याने आरोपी सापडत नव्हता.
आरोपीने निघृणपणे हत्या करत मोठ्या चलाखीने पुरावे देखील सोडले नव्हते. मात्र या प्रकरणी अखेर पोलिसांना काही दिवस वेगवेगळ्या अँगलने तपास केल्यानंतर आरोपीचा शोध रस्त्यावरील एका भटक्या श्वानामुळे लागला होता.
घटना नेमकी काय होती?
ही घटना होती 13 एप्रिल 2024 ची नवी मुंबईतील नेरूळ परिसरामध्ये पहाटेची.
सकाळी साडेसहा ते सात दरम्यान नेरूळ परिसरामध्ये एका स्कायवॉकच्या खाली आणि भर रस्त्यावर एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहायला मिळाला.
या घटनेची माहिती मिळताच नवी मुंबईतील नेरूळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी नेरूळ सेक्टर 10 येथे दाखल झाले होते.
रक्ताने माखलेल्या त्या व्यक्तीला जवळच असलेल्या रुग्णालयात नेरूळ पोलिसांनी दाखल केले होते, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता.
वेगवेगळ्या अँगलने पोलिसांचा तपास सुरू होता
याप्रकरणी तपासासाठी पोलिसांच्या दोन-तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. या घटनेने नेरूळ परिसरामध्ये खळबळ उडाली होती.
त्यामुळे डीसीपी विवेक पानसरे, एसीपी राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ढगे, निलेश शेवाळे, पोलीस हवालदार जितेंद्र पाटील, उमेश पाटील, संतोष राठोड, राहुल केलगेंद्रे, पोलीस शिपाई सागर सोनवलकर, गणेश आव्हाड, सुहास बरकडे आणि इतर पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या साहाय्याने या प्रकरणाचा तपास सुरू झाला.
याप्रकरणी घटना घडल्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये रस्त्यावरचे दुकानांमध्ये पोलिसांनी सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली होती. खबरी आणि या परिसरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं.
त्यावेळेला तपास दरम्यान मृत व्यक्ती हा कचरा वेचण्याचा काम करायचा अस पोलिसांना निष्पन्न झालं होतं. मात्र हत्या कोणी केली व का केली याचा शोध पोलिसांना लागत नव्हता.
एक टीम दिवसभर संपूर्ण सीसीटीव्ही तपासत होते. दुसरी टीम घटनास्थळी अनेकांची चौकशी करत होते. मात्र दोन दिवस उलटले तरी ठोस काहीच हाती लागत नव्हते.
तपासात अनेक अडचणी मात्र एका प्रश्नाने तपासाला वेग
सीसीटीव्ही, संशयित यांची चौकशी करताना आणि खबऱ्या मार्फत तपास करताना आरोपीबाबत आणि मृत व्यक्ती बाबत देखील अधिक माहिती पोलिसांना सापडत नव्हती.
मृत व्यक्तीला डोक्यात गंभीरपणे इजा करण्यात आली होती, त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला होता हे प्राथमिक तपासात निष्पन्न झालं होतं. तर मृत व्यक्तीच्या खिशातही काही सापडले नसल्याने तपासात मृत व्यक्ती कोण हे देखील समोर येत नव्हतं.
अखेर सीसीटीव्ही तपासात असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ढगे आणि टीमला एका सीसीटीव्ही मध्ये मृत व्यक्ती आणि संशयित व्यक्ती दिसला. त्यावेळेला दोघांमध्ये मारामारी पाहायला मिळत होती.
पुढे एका सीसीटीव्ही मध्ये शौचालय परिसरामध्ये दोघे एकमेकांशी वाद घालत असताना दिसले. पुढे काही सीसीटीव्ही मध्ये काहीच दिसत नव्हते. त्यामुळे तपास करताना अनेक अडचणी येत होत्या.
अधिक तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ढगे यांना घटना घडल्याच्या काही अंतर परिसरामध्ये एका सीसीटीव्हीमध्ये एक व्यक्ती दिसत होता. मात्र त्यात हल्लेखोराचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्यामुळे तपास करताना अडचणी येत होत्या.
अखेर त्या सीसीटीव्हीमध्ये ढगे आणि सहकाऱ्यांना एक काळा रंगाचा आणि अंगावर पांढरे पट्टे असणारा एक कुत्रा संशयित व्यक्ती सोबत दिसला.
हा कुत्रा इतर काही सीसीटीव्ही मध्ये देखील त्या व्यक्ती सोबत दिसत होता. मात्र कुत्रा इतरांवर भुंकतोय मात्र संशयित व्यक्तीवर भुंकत नव्हता हे सीसीटीव्ही पाहताना निदर्शनास आले होते. त्यामुळे हा भटका कुत्रा या व्यक्तीवरच का भुंकत नाही हा सवाल पोलिसांना पडला.
पोलिसांना कुत्रा आणि आरोपी यांच्यामध्ये काही संबंध असल्याच संशय आला होता. त्यामुळे पोलिसांनी या कुत्र्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
भटक्या कुत्र्याचा लागला शोध आणि संशयित सापडला
नवी मुंबईतील नेरूळ पोलिसांना या कुत्र्याचा शोध नेरूळ येथील शिरवणे भागात एका स्कायवॉकच्या फुटपाथवर लागला.
एका व्यक्तीसोबत हा कुत्रा या फुटपाथवर राहत होता. पोलिसांना हाती लागलेल्या सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या कुत्र्याप्रमाणेच हा कुत्रा दिसत होता.
पोलिसांनी आजूबाजूला या कुत्र्याबाबत चौकशी केली असता भुऱ्या नामक एका मुलासोबत हा कुत्रा नियमित असतो असं काहींनी सांगितलं. पोलिसांनी या मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
एके दिवशी हा भुऱ्या नामक मुलगा स्कायवॉकवर झोपलेला निदर्शनास आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता. हा संशयित पोलिसांना काहीही माहिती देत नव्हता.
पोलिसी हिसका दाखवताच संशयित सर्व घडलेला प्रकार सांगू लागला आणि या हत्याकांडाचा तपास लागला.
हत्या कशामुळे झाली होती?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील आरोपीचे नाव भुऱ्या उर्फ मनोज प्रजापती (20) होते. तो काही दुकानांमध्ये साफसफाईचे काम करायचा. त्याने हत्या करण्यामागचं कारण हे होतं की, मृत 45 वर्षीय व्यक्ती हा मनोज प्रजापतीला काही वेळा मारायचा आणि त्याच्या खिशातून झोपलेला असताना पैसे काढायचा.
13 एप्रिल 2024 पूर्वी अशाच प्रकारे एक-दोन दिवसांपूर्वी घटना घडली. त्यामुळे 13 एप्रिलला रात्री मृत व्यक्ती आणि मनोज प्रजापती यांच्यामध्ये वादावादी आणि हाणामारी झाली होती.
मनोज प्रजापती याला राग आला आणि त्याने मृत व्यक्तीच्या डोक्यात हाताला मिळालेली सळी मृत व्यक्तीच्या डोक्यात मारली आणि तो रक्तबंबाळ झाला.
तसेच आरोपीने संपूर्ण हत्येच्या घटक्रमाची कबुली दिली अशी माहिती तपास करणाऱ्या तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
तो सर्वांवर भुंकेल मात्र माझ्यावर भुंकत नाही
मनोज प्रजापती याने पोलिसांना या कुत्र्याबद्दल माहिती देताना म्हटलं होतं की, मी रोज नियमित या भटक्या कुत्र्याला खायला घालतो.
त्यामुळे माझी आणि कुत्र्याची चांगली जवळीक होती. मी या श्वानावर माया करतो, त्यामुळे तो सर्वांवर भुंकेल मात्र माझ्यावर भुंकत नाही. तो या परिसरात माझ्यासोबत कायम असतो.
तपासात महत्त्वाचा दुवा भटका कुत्रा होता
याप्रकरणी तपास करणारे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ढगे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, "याप्रकरणी तपास करत असताना अनेक अडचणी आल्या होत्या. या प्रकरणात एका संशयामुळे प्रश्नामुळे आम्ही आरोपी पर्यंत पोहोचलो होतो.
"यापूर्वीच्या आमच्या कार्यकाळातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा या तपासात फायदा झाला. सीसीटीव्ही, गुप्त बातमीदार आणि काही संशयित लोकांची चौकशी करत आम्ही आरोपीचा शोध लावला. या तपासात महत्त्वाचा दुवा हा तो भटका कुत्रा होता," असं पोलिसांनी सांगितलं.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढे न्यायालयात हजर करत कोर्टाने या आरोपीला शिक्षा सुनावली. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.
मात्र हत्या झालेल्या व्यक्तीची याप्रकरणी सुनावणी होईपर्यंत ओळख पटू शकलेली नाही. पण पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये हा परप्रांतीय व्यक्ती होता, तो कामानिमित्ताने मुंबई आणि नवी मुंबईत आला होता असं पोलिसांना निष्पन्न झालं होतं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.