मुंबईच्या तरुणानं बंगळुरूत पत्नीची केली हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये कोंबून आत्महत्येचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

    • Author, शताली शेडमाके
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

कौटुंबिक वाद आणि त्यातून घडणारे गुन्हे यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना बंगळुरुत उघडकीस आली. रागाच्या भरात पतीने पत्नीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे एका सुटकेसमध्ये भरले आणि निघून गेला.

ही घटना गुरुवारी (27 मार्च) संध्याकाळच्या सुमारास घडली. राकेश राजेंद्र खेडेकर (वय 36) असं पतीचं नाव असून मृत महिलेचं नाव गौरी सांबेकर खेडेकर (वय 32) असं आहे. राकेशने हत्येनंतर मृतदेह सुटकेसमधून भरून बाथरुममध्ये ठेवला आणि आपल्या कारने मुंबईच्या दिशेनं निघाला.

राकेशने स्वत: आपल्या गुन्ह्याची कबुली घरच्यांना दिली. गौरीबरोबर कडाक्याचं भांडण झाल्याचंही त्यानं सांगितल्याचं राकेशचे वडील राजेंद्र खेडेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. याप्रकरणी बंगळुरु पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सध्या आरोपी बंगळुरु पोलिसांच्या ताब्यात आहे.

सूचना- यातील काही मजकूर वाचकांना विचलित करू शकतो.

राकेश आणि गौरी दोघेही मुळचे महाराष्ट्रातले. राकेश हा मुंबईतील जोगेश्वरीचा निवासी. तो एका खासगी कंपनीत कामाला होता. तर पत्नी गौरी गृहिणी असून नोकरीच्या शोधात होती. दोन वर्षांपूर्वीच दोघांच लग्न झालं होतं आणि वर्षभरापूर्वीच ते बंगळुरूला स्थायिक झाले होते.

27 मार्चरोजी राकेशनं आपल्याला वडिलांना फोन करून गौरीची हत्या केल्याची माहिती दिली. गौरीबरोबर कडाक्याचं भांडण झाल्याचंही त्यानं वडिलांना सांगितलं. परंतु, इतक्या टोकाची भूमिका राकेशने का घेतली असावी? घटनाक्रम जाणून घेऊया.

'त्या' दिवशी काय घडलं?

बंगळुरु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 मार्चला गौरीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सुटकेसमध्ये आढळून आला.

साऊथ ईस्ट बंगळुरुच्या पोलीस उपायुक्त सारा फातिमा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं, "जोड्डानेकुंडी गावाजवळील आंबेडकर अपार्टमेंटमध्ये 32 वर्षीय गौरी खेडेकर (सांबेकर) नावाच्या महिलेचा मृतदेह भरलेली सुटकेस आढळून आली.

गौरी आणि तिचा पती राकेश दोघेही मूळचे महाराष्ट्रातील रहिवासी असून हुलीमावू पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहायचे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे."

राकेशच्या वडिलांनी काय सांगितलं?

राकेशचे वडील राजेंद्र खेडेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की 27 मार्चला राकेशने घरी फोन करून आपण गौरीची हत्या केल्याची माहिती दिली.

राकेश आणि गौरीमध्ये वारंवार खटके उडत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

राकेशचे वडील राजेंद्र खेडेकर म्हणाले, "मला त्याचा फोन आला. त्यानं गौरीची हत्या केल्याचं सांगितलं. गौरी त्याच्याशी वारंवार वाद घालायची, दोन दिवसांआधी राकेशनं गौरीच्या आईलाही फोन करून गौरी सतत भांडण करून त्रास देत असल्याची तक्रार केली होती.

गौरीची आई माझी सख्खी बहीण आहे आणि गौरी माझी भाची होती. इकडे जोगेश्वरीत राहत असतानाही ती राकेशला त्रास द्यायची," असंही राकेशच्या वडिलांनी सांगितलं.

पुढे बोलताना राजेंद्र खेडेकर म्हणाले, "मला फोन केल्यानंतर राकेश म्हणाला की, तोही आत्महत्या करणार आहे, त्याला जगायचं नाही. घडलेल्या घटनेबाबत गौरीची आई आणि घरच्यांना सांगा, असंही त्यानं सांगितलं. यानंतर मी त्याला बंगळुरुहून इकडे यायला सांगितलं. तसेच पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना याची माहिती दिली.

आमचा या लग्नाला विरोध होता. चार वर्षांपर्यंत आम्ही या लग्नाला विरोध केला. परंतु, आमचं लग्न न झाल्यास आम्ही दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही, असं म्हणत ते ठाम होते. म्हणून आम्ही त्यांचं लग्न लावून दिलं होतं."

दरम्यान, 27 मार्चच्या संध्याकाळी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यानंतर राकेशने रागाच्या भरात पत्नी गौरी हिच्यावर चाकूने वार करत हत्या केली. यानंतर राकेशने मृतदेह एका मोठ्या सुटकेसमध्ये भरले आणि ती सुटकेस बाथरुममध्ये ठेवत तो मुंबईकडे निघून गेला.

राकेशचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबईकडे येताना राकेशनं वाटेत विषारी औषध विकत घेतलं आणि ते प्यायला. यानंतर तो शिरवळच्या आसपास बेशुद्ध पडला आणि काही स्थानिकांच्या निदर्शनात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं. यानंतर त्याला उपचारार्थ पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता एकनाथ पवार एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, "त्याला सातारा पोलिसांनी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

त्याने फिनाईल आणि झुरळ मारण्याचं औषध पिलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि रुग्णालयात आणलं. त्याला गिळताना त्रास होत होता, त्याशिवाय इतर कोणताही त्रास दिसून आला नाही.

आम्ही त्याची एंडोस्कोपी केली असून त्याच्या घशाला सूज आणि पोटात अल्सर झालं आहे. सध्या तो निरीक्षणाखाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. लवकरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याबाबत निर्णय घेतला जाईल."

पोलिसांनी काय सांगितलं?

याप्रकरणी बंगळुरु पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सध्या आरोपी बंगळुरु पोलिसांच्या ताब्यात आहे. बंगळुरू पोलीस आयुक्त बी. दयानंद माध्यमांना माहिती देताना म्हणाले, "बंगळुरू शहराच्या दक्षिण-पूर्व भागातील हुलीमावू पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात मृत महिलेचा पती मुख्य संशयित असल्याचं प्राथमिक तपासात आढळून आलं आहे. घटनेनंतर तो बंगळुरूतून फरार झाला होता. तो पुण्यात आढळून आला. तो सध्या रुग्णालयात दाखल आहे. त्यानं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं दिसतं, मात्र सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

आमच्या पथकानं आधीच पुणे पोलिसांशी संपर्क साधला असून ते पुण्यात पोहोचले आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर आणि रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुढील चौकशी आणि तपासासाठी त्याला बंगळुरूला आणलं जाईल."

महत्त्वाची सूचना :

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

  • हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
  • सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
  • इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
  • नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
  • विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)