You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
श्रद्धा वालकर हत्याकांड : 'मी पोलिसांना विचारतो की किती वेळ लागेल, ते म्हणतात प्रक्रिया सुरू आहे'
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
“पोलीस दोन महिन्यांपासून सांगत आहेत की हत्या प्रकरणाचा तपास आणि प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे पण अंतिम टप्प्यात म्हणजे किती महिने लागणार आहेत? अजून निकाल का लागला नाही? न्यायालयीन सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात जबाब अधिक असल्याने वेळ लागतोय पण एकूणच सगळं धीम्या गतीने सुरू आहे असं मला वाटतं.”
श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच श्रद्धा वालकर हत्याकांड उघडकीस आलं होतं. ज्या पद्धतीनं श्रद्धाची हत्या झाली त्याने संपूर्ण देश हादरून गेला होता.
या प्रकरणाला या महिन्यात एक वर्ष पूर्ण झालं. परंतु अद्यापही अंत्यसंस्कार करता न आल्याने वालकर कुटुंबियांंनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच वर्षभरानंतरही मुख्य आरोपीला शिक्षा सुनावली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
प्रश्न - आतापर्यंत झालेल्या तपासानंतर तुम्ही समाधानी आहात का?
विकास वालकर - मला अपेक्षा होती की निकाल चार पाच महिन्यात लागायला हवा होता. पण एक वर्ष उलटलं तरी निकाल लागू शकत नाहीय. अजून किती महिने लागतील माहिती नाही. मला हेच विचारायचं आहे की निकाल का लागत नाही?
प्रश्न - पोलिसांचं काय म्हणणं आहे, त्यांनी तुम्हाला काय सांगितलं आहे?
विकास वालकर - मी दिल्लीत गेल्यावर पोलिसांना विचारतो की किती वेळ लागू शकेल, ते म्हणतात प्रक्रिया सुरू आहे.
सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत निकाल दिला जाणार नाही असं ते सांगतात. आतापर्यंतच्या सुनावणीनुसार 30 टक्के स्टेटमेंट झालेल्या आहेत. अद्याप 70 टक्के स्टेटमेंट रेकाॅर्ड करणं बाकी आहे. यामुळे मला काही कळत नाहीय, अंदाज येत नाही की किती वेळ लागणार.
एका स्टेटमेंटसाठी समोरच्या वकिलांकडून जाणीवपूर्वक वेळ घेतला जात आहे.
प्रश्न - निकाल काय लागावा अशी तुमची अपेक्षा आहे?
विकास वालकर - कमीत कमी फाशीची शिक्षा व्हायला हवी. याहून अधिक कठोर शिक्षा असेल तर ती ही द्यावी.
माझं असंही म्हणणं आहे की, हे प्रकरण फास्ट ट्रॅक करून वेगाने सुनावणी व्हावी. फास्ट ट्रॅक केलं असलं तरी प्रत्यक्षात वेगाने प्रक्रिया पूर्ण व्हावी, ही माझी मागणी आहे.
तसंच या खटल्याचा निकाल दोन महिन्यात किंवा लवकर लागला नाही तर मी दिल्ली येथे धरणे आंदोलन करणार आहे.
प्रश्न - तुम्ही आणखी एक मागणी पोलीस आणि न्यायालयाकडे केली आहे. काय मागणी आहे?
विकास वालकर - माझ्या मुलीवर अंत्यसंस्कार करणं अद्याप बाकी आहे. आता एक वर्ष उलटलं आहे. मला अपेक्षा होती की निकाल लवकर लागेल आणि मी मुलीचे अंतिम संस्कार करेन. पण याला उशीर लागतोय.
मुलीच्या मृतदेहाचे भाग कोर्टात आहेत. ते मिळू शकले असते तर मी अंतिम संस्कार करू शकलो असतो. याबाबत मी मागणी केली आहे.
मी कोर्टाकडे लेखी पत्र पाठवलेलं आहे. सध्या फास्ट ट्रॅक सुनावणी सुरू आहे एवढीच माहिती त्यांनी दिली.
सुरुवातीला नोव्हेंबर महिन्यात मी स्वतः पोलिसांसोबत जंगलामध्ये गेलो होतो. शरीराचे भाग शोधताना मी तिथे उपस्थित होतो. मला कल्पना आहे की किती शरीराचे भाग सापडले आहेत. यामुळे मला लवकरात लवकर काही भाग मिळाले असते तर मी अंतिम संस्कार करू शकलो असतो.
प्रश्न - देशभरातील लोकांना या घटनेचा धक्का बसला. तुम्ही तर तिचे पालक आहात. आता वर्षभरात काय काय घडलं? याविषयी तुम्हाला काय वाटतं?
विकास वालकर - माझं स्टेटमेंट कोर्टात रेकाॅर्ड होत होते तेव्हा मला बोलताही येत नव्हतं. ज्यापद्धतीने हत्या झाली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली हे सांगताना मी कोर्टात अक्षरश: कोसळला. मला बोलताही येत नव्हतं. इतक्या यातना झालेल्या असतानाही मी न्यायासाठी लढतोय. पण मला अजूनही न्याय मिळालेला नाही.
सरकारकडे माझी एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर या प्रकरणाचा निकाल द्या.
प्रश्न - तुमचं श्रद्धाशी शेवटचं बोलणं काय झालं होतं?
विकास वालकर - मी शेवटी श्रद्धाला सांगितलं होतं की हे योग्य नाही. तू जाऊ नकोस. पण तिने माझं ऐकलं नाही. तिला जे करायचं होतं तेच तिने केलं. तू अजूनही परत येऊ शकतेस हे सुद्धा मी तिला सांगितलं.
मला खंत वाटते की तिने माझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. हे सगळं घडलं नसतं. याचं मला दु:ख आहे.
प्रश्न - तुमच्या कुटुंबात तणाव होता अशाही अनेक बातम्या प्रसारित झाल्या आहेत. तुमचं काय म्हणणं आहे याबाबत?
विकास वालकर - त्या मुलानेच तिला फसवलं. तिला घरापासून वेगळं केलं. त्याच्या प्लॅनिंगप्रमाणे तिने केलं. तिला हे कळू शकले नाही. मी तिला सावध केलं होतं. त्या मुलाच्या घरीही जाण्याचा प्रयत्न मी केला होता. त्याच्यापासून वेगळं रहा हे वारंवार सांगत होतो.
मी आफताब पूनावाला याला एक-दोनदा भेटलो होतो. माझी पत्नी आजारी असताना आणि निधनाच्यावेळेस तो आला होता. तेवढीच आमची ओळख होती.
तिच्या काही आठवणी सांगायला गेलो तर मी बोलू शकणार नाही. मी ते सहन करू शकत नाही आज माझी ही परिस्थिती... स्वतः मुलीविषयी मी हे कसं बोलू शकेन. मी तिला लहानाचं मोठं केलं. तिच्या आठवणी मी बोलू शकणार नाही.
प्रश्न - सुरुवातीला तुम्ही वसई पोलिसांच्या चौकशीवर काही आक्षेप नोंदवले होते. त्याचं पुढे काय झालं?
विकास वालकर - महाराष्ट्र सरकारने एसआयटी समिती गठीत करण्याचं आश्वासन दिलं होतं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आश्वासन दिलं होतं. परंतु याचं पुढे काहीच झालेलं नाही. यावर कोणीच काही बोलत नाही
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)