आइस्क्रीमच्या शोधात घराबाहेर पडली अन् तब्बल 17 वर्षांनंतरच परतली; पाकिस्तानच्या किरणचा असा होता प्रवास

फोटो स्रोत, Sidra Ikram
- Author, मोहम्मद जुबेर
- Role, बीबीसी न्यूज उर्दूसाठी
एक छोटीशी मुलगी, आइस्क्रीम घेण्यासाठी घरातून निघाली आणि नंतर 17 वर्षांनी हरवलेली ती पुन्हा आपल्या कुटुंबाकडे घरी परतली. या अद्भुत प्रवासात धैर्य, आशा आणि प्रेमाची गोष्ट दडलेली आहे.
या वेदनादायक प्रसंगाची सुरुवात 17 वर्षांपूर्वी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या सेक्टर जी-10 मधील एका रस्त्यावरून झाली होती.
10 वर्षांची किरण भर पावसात आइस्क्रीमच्या शोधात आपल्या घराबाहेर पडली होती.
त्यावेळी किरणला आइस्क्रीम तर मिळालं पण तिचं बालपण आणि आई-वडील मात्र तिच्यापासून खूप दूर गेले.
किरण ही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील कसूर जिल्ह्यातील एका छोट्या गावातील आहे.
तिने आयुष्याची अनेक वर्षे आई-वडील, भावंडं आणि नातेवाईकांपासून दूर, कराचीच्या इधी सेंटरमध्ये घालवली आहेत.
किरणचे आई-वडील आणि भावंडांना शोधण्याचा अनेकदा प्रयत्न झाला, पण यश मिळालं नाही.
किरण परत येईल ही आशा तिच्या आई-वडील आणि भावंडांनीही सोडून दिली होती.
पण या निराशेचं आनंदात रुपांतर झालं. कारण 17 वर्षांनंतर पंजाब पोलिसांच्या 'सेफ सिटी प्रोजेक्ट'मध्ये काम करणाऱ्या टीमला किरणचा सुगावा लागला.
आपल्या आई-वडिलांपर्यंत किरण कशी पोहोचली?
किरणचे वडील अब्दुल मजीद आणि कुटुंबातील इतर लोक याबद्दल काहीही बोलले नाहीत.
पण त्यांच्या कुटुंबाशी संबंधित एक वयस्कर व्यक्ती, असद मुनीर, यांनी मात्र याबाबत बरीच माहिती दिली.
असद मुनीर हे किरणचे मामा (ताया) आहेत. असद मुनीर हे कसूर जिल्ह्यातील बागरी गावचे रहिवासी आहेत.
ते सांगतात की 17 वर्षांपूर्वी किरण दहा वर्षांची होती, "त्या वेळी ती माझ्या बहिणीकडे, म्हणजे तिच्या फुफीकडे, इस्लामाबादच्या जी-10 भागात राहत होती.
घरासमोरच जी-10 सेंटर आहे. तिथे ती आइस्क्रीम घ्यायला गेली होती. ही 2008 ची गोष्ट आहे आणि त्यावेळी मुसळधार पाऊस पडत होता."
असद मुनीर सांगतात की, किरण बराच वेळ झाला तरी घरी परतली नव्हती, तेव्हा तिचा शोध घेण्यात आला, पण ती कुठेच सापडली नाही.
"तेव्हा तिचा सर्वत्र शोध घेतला, पण किरण काही सापडली नाही."
किरण सांगते की, ती आइस्क्रीम घ्यायला घराबाहेर पडली होती. परंतु, मुसळधार पावसात ती रस्ता चुकली.
तिच्या म्हणण्यानुसार, ती बराच वेळ रस्त्यांवर भटकत राहिली आणि आपलं घर शोधत राहिली. पण "घर सापडलं नाही, तेव्हा कुणीतरी मला इस्लामाबादच्या इधी सेंटरमध्ये आणून सोडलं," असं ती सांगते.
किरण म्हणते, "सुरुवातीला मला इस्लामाबादच्या इधी सेंटरमध्ये ठेवण्यात आलं. काही महिन्यांनी बिल्कीस इधी यांनी मला कराचीच्या इधी सेंटरमध्ये नेलं आणि मी तिथेच 17 वर्षे राहिले."
कराची येथील इधी सेंटरच्या शबाना फैसल सांगतात की, 17 वर्षांपूर्वी किरण इस्लामाबादच्या इधी सेंटरमध्ये आली होती. तिला कुणीतरी तिथे सोडून गेलं होतं. कदाचित ती रस्ता चुकली असावी.
"काही काळ ती इस्लामाबादच्या इधी सेंटरमध्ये होती. त्याच दरम्यान बिल्कीस इधी तिथे आल्या. त्यावेळी त्यांना किरणची तब्येत ठीक नसल्याचे दिसून आले. म्हणून त्यांनी तिला कराचीच्या इधी सेंटरमध्ये नेलं."
शबाना फैसल सांगतात की, काही काळापूर्वी पंजाब पोलिसांच्या 'सेफ सिटी प्रोजेक्ट'मधील 'मेरा प्यारा' टीमने कराचीच्या इधी सेंटरला भेट दिली. त्यांनी किरणची मुलाखत घेतली आणि तिच्या नातेवाईकांना शोधण्याची जबाबदारी स्वीकारली.
किरणच्या मुलाखतीमुळे घर शोधण्यास मदत
सिद्रा इकराम लाहोरमध्ये 'मेरा प्यारा' या प्रकल्पात सीनियर पोलीस कम्युनिकेशन ऑफिसर आहेत.
त्या सांगतात की 'मेरा प्यारा' प्रकल्प पंजाब पोलिसांच्या 'सेफ सिटी' कार्यक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा उद्देश हा हरवलेल्या मुलांना त्यांच्या नातेवाईकांशी भेट घालून देणं आहे.
हा प्रकल्प एक वर्षापूर्वी सुरू झाला होता. या प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत 51 हजार मुलांना त्यांच्या आई-वडिलांशी भेट घालून दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सिद्रा इकराम सांगतात की, या उद्देशासाठी डिजिटल साधनांसोबतच पोलिसांच्या स्रोतांचाही वापर केला जातो.
"आमच्या टीम्स वेगवेगळ्या संस्थांमध्ये, जिथे अनाथ मुलांना ठेवलं जाते, तिथे त्या मुलांची मुलाखत घेतात आणि त्या मुलाखतीतून मिळालेल्या माहितीच्या आधारावर मुलांच्या नातेवाईकांचा शोध घेतला जातो," असं त्या सांगतात.

फोटो स्रोत, Sidra Ikram
त्या म्हणतात की, किरणच्या प्रकरणातही हेच झालं.
"आमच्या एका टीमने कराचीच्या इधी सेंटरला भेट दिली, जिथे इतरांसोबत किरणचीही मुलाखत घेतली गेली आणि माहिती गोळा केली. किरणला फारसं काही आठवत नव्हतं. ती खरंतर कसूर जिल्ह्याची रहिवासी होती. इस्लामाबादमध्ये ती तिच्या नातेवाईकांकडे राहत होती."
किरणला तिच्या वडिलांचं नाव अब्दुल मजीद आणि तिच्या गावाचं नाव आठवत होतं, असं सिद्रा इकराम यांनी सांगितलं.
"ही माहिती आम्ही कसूर ऑफिसला दिली. किरणच्या नातेवाईकांना शोधण्यात त्यांनी मदत करावी अशी त्यांना विनंतीही केली."
मुबश्शिर फैयाज हे कसूरचे पोलीस कम्युनिकेशन ऑफिसर आहेत.
त्यांनी सांगितलं की, जेव्हा किरणची माहिती त्यांना मिळाली, त्यात तिच्या गावाचं नाव आणि वडिलांचं नाव होतं. हीच माहिती आमच्यासाठी उपयुक्त ठरली.
"अवघ्या एका दिवसात आम्ही तिच्या आई-वडिलांना शोधण्यात यशस्वी ठरलो."
मुबश्शिर फैयाज सांगतात की, सर्वात प्रथम, "आम्ही त्या भागाचे नंबरदार आणि त्या परिसरातील वृद्ध लोकांशी संपर्क साधला."
त्यांच्याकडे अब्दुल मजीदचा पत्ता विचारल्यावर कळलं की, तिथे अनेक अब्दुल मजीद आहेत. आम्ही काही लोकांना किरणच्या बालपणीचे फोटो दाखवले, पण ते तिला ओळखू शकले नाहीत.
ते म्हणतात की, आता अब्दुल मजीद नावाच्या इतक्या लोकांशी संपर्क साधणं शक्य नव्हतं.
काही प्रकरणांमध्ये जुने पोलीस अधिकारी आणि पोलीस चौक्यांतील शिपाई देखील खूप उपयुक्त ठरतात.

फोटो स्रोत, Sidra Ikram
त्यांच्या म्हणण्यानुसार, "या प्रकरणातही आम्ही त्या भागाच्या चौकीतील जुन्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तेव्हा त्यातील एकाने सांगितलं की, काही वर्षांपूर्वी किरण नावाची मुलगी हरवली होती आणि तिचा खूप शोध घेण्यात आला होता."
या प्रकरणाचा अहवाल (सनहा) नोंदवण्यात आला होता, अशी माहिती त्या अधिकाऱ्याने दिल्याचं मुबश्शिर फैयाज यांनी सांगितलं.
"अशाप्रकारे त्या अधिकाऱ्याच्या मदतीने आम्हाला किरण ज्या भागात राहत होती तिथं पोहोचता आलं. तिथे आम्ही मशिदीत जाहीररित्या सांगितलं आणि त्या भागातील वृद्धांना भेटलो. तिथून आम्हाला कळलं की 17 वर्षांपूर्वी अब्दुल मजीदची एक मुलगी हरवली होती."
ते म्हणतात की, दिवसभराच्या मेहनतीचं फळ मिळालं. आम्ही अब्दुल मजीदच्या जवळ पोहोचलो होतो.
जेव्हा त्यांच्या भागात पोहोचलो, तेव्हा तेथील अनेक लोकांना किरण हरवली होती, त्यावेळच्या प्रसंगाची आठवण झाली.
'वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू'
मुबश्शिर फैयाज यांनी अब्दुल मजीद यांना त्यांच्या मुलीचे फोटो दाखवले. ज्यात तिच्या लहानपणीचे फोटोही होते.
"त्यांनी आम्हाला कुटुंबासह घेतलेला ग्रुप फोटो दाखवला आणि सोबत फॉर्म-बी ही दाखवला, ज्यात किरणची महत्त्वाची माहिती होती." पाकिस्तानमध्ये फॉर्म-बी ला बाल नोंदणी प्रमाणपत्र (चाइल्ड रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट) देखील म्हणतात.
ते म्हणतात की, अब्दुल मजीद हे किरणचे वडील आहेत, यात आता कोणतीही शंका राहिली नव्हती.
त्यानंतर व्हीडिओ कॉल झाला. वडील, मुलगी आणि इतर नातेवाईक किरणशी बोलले आणि ते कराचीला गेले.
सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर किरणला तिच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आलं आणि ती 25 नोव्हेंबरला तिच्या घर परतली.
किरणचे मामा असद मुनीर, आपल्या भाचीच्या बेपत्ता होण्याबाबत बोलताना म्हणतात, "किरण अब्दुल मजीदची सगळ्यात मोठी मुलगी होती. आता अब्दुल मजीद यांना पाच मुलं आहेत. पण ती हरवली तेव्हापासून आतापर्यंत मी नेहमी अब्दुल मजीदच्या डोळ्यांत अश्रू पाहिले आहेत."

फोटो स्रोत, Sidra Ikram
"जेव्हाही ते आपल्या मुलीचा उल्लेख करायचे, तेव्हा नेहमी ती जिवंत आहे की नाही म्हणायचे. आपली मुलगी कशा अवस्थेत असेल असा प्रश्न विचारायचे."
ते म्हणतात की, मुलगी बेपत्ता होण्याच्या दुःखामुळे ते वेळेआधीच वृद्ध झाले होते. जेव्हा अब्दुल मजीद यांना आपल्या मुलीची ओळख पटली, तेव्हा सर्वात आधी त्यांनी मला सांगितलं. मी पाहिलं की आधी त्यांच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू होते, आणि आता त्याचं रुपांतर आनंदाश्रू मध्ये झालं होतं.
किरणने स्थानिक प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. वडील आणि भाऊ-बहिणांना भेटून खूप आनंद झाल्याचे तिने म्हटलं.
इधी सेंटरमधून स्वयंपाक करण्याचे धडे, शिवण कामाचे तंत्र आणि शिक्षण शिकून घरी परतल्याचे ती म्हणाली.
"सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कठीण काळात त्यांनी मला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि माझं धैर्य वाढवलं," असंही तिने सांगितलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











