कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा; मंत्रिपद आणि आमदारकी जाणार?

फोटो स्रोत, @kokate_manikrao/x
महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपये, अशी शिक्षा न्यायालयाकडून सुनावण्यात आली आहे. या शिक्षेमुळे माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीवर टांगती तलवार आली आहे. माणिकराव कोकाटे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत.
माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी कोकाटे आणि त्यांच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला होता.
1995 साली कागदपत्रांमध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप कोकाटे यांच्यावर असून त्याबाबतचा खटला सुरू होता.
नाशिक जिल्हा न्यायालयानं आज (20 फेब्रुवारी 2025) या प्रकरणात निर्णय सुनावला आहे.
माणिकराव कोकटेंनी याप्रकरणी जामिनासाठी अर्ज दाखल केला असून ते या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत.
माणिकराव कोकाटे यांनी न्यायालयाच्या निकालानंतर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, "ही राजकीय केस होती. 30 वर्षांपूर्वी ही केस दाखल झाली होती. त्यावेळेस दिघोळे राज्यमंत्री होते. त्यामुळे त्यांनी माझ्यावर केस दाखल केली होती. माझं आणि त्यांचं राजकीय वैर होतं. त्या केसचा निकाल आज लागला आहे.
"या निर्णयाविरोधात मी वरच्या न्यायालयात आव्हान देणार आहे. ही न्यायालयीन बाब असून यासंदर्भात जास्त भाष्य करणार नाही."
पद सोडण्यासंदर्भात ते म्हणाले, "याविषयी कायदेशीर बाबी तपासून घ्याव्या लागतील."
प्रकरण काय?
1995 मधील एका प्रकरणात कोकाटेंना ही शिक्षा सुनावण्यात आलीय.
तत्कालीन आमदार, खासदार यांच्या कोट्यातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी देण्यात येणार्या सदनिका मिळवताना कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप कोकाटेंवर होता.


माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी 1995 मध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात सदनिकांच्या घोटाळ्यांसंदर्भात दावा दाखल केला होता. 1997 मध्ये तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यात माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ बंधु सुनील कोकाटे हे आरोपी नंबर 1 व 2 होते आणि 3 व 4 नंबरचे आरोपी हे कोकाटे यांचे नातेवाईक होते. त्यांनी मिळवलेल्या सदनिका नंतर कोकाटे यांनी स्वतःच्या नावावर करुन घेतल्या. कोकाटे यांनी सदनिका मिळवताना आपण स्वतः आर्थिक दुर्लभ घटकातून येत असल्याचं दाखवलं होतं.
त्याच वेळी कोकाटे यांचे वडील कोपरगाव साखर कारखण्यात संचालक होते व जानकारांनुसार ते 100 -200 टन उस कारखान्यात पाठवत होते. शहराच्या मध्यभागातील बॉईज टाऊन शाळेजवळील एका इमारतीमधील सदनिका माणिकराव कोकाटे यांनी बनावट कागदपत्रे सादर करुन मिळवल्या होत्या आणि नंतर इतर दोघांच्या सदनिका स्वतःकडे घेत बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला गेला होता.
ह्याच सदनिकांच्या तळ मजल्यावर वाढीव काम करत कोकाटे यांनी सिन्नर तालुका विभाग दूध प्रक्रिया संघाचे 24 तास मिल्क एटीएम सुरू केले होते, पण सध्या बंद स्थितीत आहे.
माणिकराव कोकाटे कोण आहेत?
नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील सोमाठाणे येथे माणिकराव कोकाटे यांचा जन्म झाला. त्यांच्या राजकारणाची सुरुवात NSUI या विद्यार्थी संघटनेतील प्रवेशापासून झाली.
त्यानंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. जिल्हा परिषद सभापती, सिन्नर पंचायत समिती सभापती, आमदार आणि मंत्री असा प्रवास त्यांनी केला.

फोटो स्रोत, @kokate_manikrao/x
माणिकराव कोकाटे यांनी 1999 मध्ये सिन्नर विधानसभेची जागा पहिल्यांदा लढवली आणि विजय मिळवला. त्यानंतर 2004 , 2009 मध्ये ते आमदार म्हणून पुन्हा निवडून आले.
2014 मध्ये त्यांचा पराभव झाला. 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला.
2024 मध्ये त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत विजय मिळवला. त्यानंतर त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्रिपदाचा कार्यभार सोपवण्यात आला.
विरोधकांची टीका
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावरुन सरकारवर टीका केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
त्यांनी X या समाजमाध्यमावर लिहिलं, "शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. इतके उद्योगी आणि तेजस्वी लोक महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात आहेत की दररोज सरकारची लाज निघत आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आरोपी मंत्र्यांना स्वतः क्लिनचीट देऊन त्यांची पाठराखण करत आहे. आता तरी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











