बंगळुरूत RCB च्या विजयी जल्लोषावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 लोकांचा मृत्यू, 33 जखमी

बंगळुरूत RCB च्या विजयी जल्लोषावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 लोकांचा मृत्यू, 33 जखमी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बंगळुरूत RCB च्या विजयी जल्लोषावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 लोकांचा मृत्यू, 33 जखमी
    • Author, इम्रान कुरेशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी मैदानाबाहेर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या घटनेत 11 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे.

33 लोक जखमी झाल्याचं देखील ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.

18 वर्षांनंतर आयपीएल विजेतेपद मिळवलेल्या संघाचं स्वागत करण्यासाठी लाखो लोक बंगळुरूच्या रस्त्यावर जमले होते.

चप्पल

फोटो स्रोत, Getty Images

नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना एका पोलीस अधिकाऱ्यानं बीबीसी हिंदीला सांगितलं की, जवळपास एक लाख लोक येतील असा अंदाज होता, पण ही संख्या दोन ते तीन लाख असावी असं त्यांनी सांगितलं."

चप्पल

फोटो स्रोत, NDRANIL MUKHERJEE/AFP VIA GETTY IMAGES

अधिकाऱ्याने सांगितले की, "जेव्हा ही घटना घडली तेव्हा स्टेडियमचे गेट उघडे नव्हते आणि मोठ्या संख्येने लोक एका लहान गेटला ढकलून तोडण्याचा प्रयत्न करत होते आणि या दरम्यान चेंगराचेंगरी झाली."

पीएमओने एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, "बंगळुरूमधील अपघात खूप दुःखद आहे. या दुःखाच्या वेळी, ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो."

बंगळुरूत RCB च्या विजयी जल्लोषावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 लोकांचा मृत्यू, 33 जखमी

फोटो स्रोत, Getty Images

बुधवारी (4 जून) संध्याकाळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पहिला आयपीएल विजय साजरा करण्यासाठी एक कार्यक्रम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता.

18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्सने आयपीएल जिंकला आहे. विराट कोहलीसह बंगळुरू संघाचे खेळाडू आज दुपारी (4 जून) ट्रॉफीसह बंगळुरूमध्ये पोहोचले. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले.

त्यानंतर, विधानसभेच्या पायऱ्यांवर स्वागतासाठी बंगळूरचे खेळाडू आलेले होते. तिथे कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतर मंत्र्यांनी संघाचे स्वागत केले.

त्यानंतर रॉयल चॅलेंजर्सच्या संघाची मिरवणूक निघणार होती आणि ते स्टेडियमकडे जाणार होते. पण पाऊस सुरू झाला आणि त्याच वेळी चेंगराचेंगरी झाली. त्यानंतर संघ हॉटेलमध्ये परतला.

शहराच्या विविध भागातून लोक मिळेल ते वाहन पकडून स्टेडियमकडे निघाले. यापैकी अनेकांनी 18 नंबरची जर्सी घातलेली होती. स्टेडियमकडे जाणाऱ्या मेट्रो ट्रेन्स भरल्यामुळे आमच्या प्रतिनिधींना देखील त्या मेट्रोमध्ये बसता आलं नाही.

बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी मैदानाबाहेर जमलेली गर्दी

फोटो स्रोत, IDREES MOHAMMED/AFP VIA GETTY IMAGES

स्टेडियमच्या आसपास जाऊ इच्छिणाऱ्या लोकांना रिक्षा किंवा टॅक्सी देखील मिळत नव्हत्या. ड्रायव्हर तिथे जाण्यास नकार देत होते. जे ऑटोचालक तयार झाले त्यांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारले. आणि तरीही स्टेडियमपासून तीन किलोमीटर दूरपर्यंतच जात येत होतं.

चेंगराचेंगरीत लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या पसरल्यानंतर, लोकांनी मेट्रो स्टेशनकडे गर्दी करण्यास सुरुवात केली. प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी जमल्याने मेट्रो अधिकाऱ्यांनी स्टेडियमभोवतीची स्टेशन्स बंद केली.

गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या आयपीएल फायनलमध्ये बंगळुरूने पंजाब किंग्सचा पराभव करून पहिल्या आयपीएल विजेतेपदाचा गवसणी घातली होती.

हाच विजय साजरा करण्यासाठी आज बंगळुरूमध्ये उघड्या बसमधून एक मिरवणूक निघणार होती पण पोलिसांनी रहदारीमुळे याला परवानगी नाकारली.

त्यानंतर बंगळुरूच्या संघाचे लाल झेंडे घेऊन हजारोंची गर्दी चिन्नास्वामी मैदानाकडे येत असल्याचं दिसलं आणि त्यातच ही चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.

व्हीडिओ कॅप्शन, बंगळुरूत 11 मृत्यू, चेंगराचेंगरी नेमकी कशी झाली?

आज दुपारी 4 वाजता बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कर्नाटक सरकारच्या वतीने आरसीबी च्या खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी एक समारंभ आयोजित करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती.

यानंतर, दुपारपासूनच चाहते तिथे जमू लागले होते.

उपमुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केलं

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी बंगळुरुच्या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे.

त्यांनी सोशल मीडिया एक्सवर आपल्या भावना व्यक्त करताना लिहिलं, "आरसीबीच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी जमलेल्या ठिकाणी चेंगराचेंगरीची दु:खद घटना घडली आहे. या घटनेतील मृतांप्रती माझ्या सहवेदना आहेत.जल्लोष महत्वाचा आहेच पण तो जीवापेक्षा महत्वाचा नाही, कृपया सर्वांनी काळजी घ्या"

जखमींवरील उपचारांमध्ये अडचणी येऊ नये यासाठी मी हॉस्पिटलमध्ये जाणार नसल्याचं ते म्हणाले.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील एक्सवर पोस्ट करून दुःख व्यक्त केलं आहे. या पोस्टमध्ये ते म्हणाले, "बंगळुरूत झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत लोकांचा मृत्यू झाल्याने मला प्रचंड दुःख झालं आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. ज्यांच्या प्रियजनांचा या घटनेत मृत्यू झाला आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. बंगळुरूच्या नागरिकांसोबत काँग्रेस पक्ष उभा आहे आणि त्यांना लागेल ती मदत आम्ही देणार आहोत. कर्नाटक सरकार या घटनेमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबांना शक्य ती सर्व मदत करेल."

खर्गे यांनी पुढे लिहिलं आहे की, "अशा दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्य सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी अशा घटनांसाठी सुरक्षा प्रोटोकॉलचा तात्काळ आढावा घेतला पाहिजे आणि ते मजबूत केले पाहिजेत. विजयाचा आनंद कधीही जीव गमावून घेतला जाऊ नये."

बंगळुरू

फोटो स्रोत, Getty Images

एएनआय या वृत्तसंस्थेने स्टेडियमबाहेर उसळलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा व्हीडिओ शेअर केला आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका आरसीबी फॅनने एएनआयशी बोलताना सांगितलं की, "स्टेडियमच्या आतील सर्व खुर्च्या भरल्या होत्या त्यामुळे आम्हाला आत जाण्याची परवानगी मिळत नाहीये. आम्हाला परत जायचे आहे परंतु, परतही जाण्याची परवानगी नाही. बाहेर गेटवर प्रचंड गर्दी आहे, अशावेळेस जर गेट उघडलं तर मोठ्या प्रमाणात लोकं आत येतील आणि आधीच बरेच लोक जखमी झाले आहेत..."

व्हीडिओ कॅप्शन, RCBच्या IPL विजयाच्या जल्लोषादरम्यान बंगळुरूत चेंगरीचेंगरी कशी झाली?

भाजपने राज्य सरकारला जबाबदार धरले

बंगळुरुतील चेंगराचेंगरीच्या घटनेवरुन भाजपने कर्नाटक सरकारला दोष देत धारेवर धरलं आहे.

कर्नाटक भाजपने काँग्रेसवर आरोप लावताना म्हटलं की, "7 जणांचा मृत्यू झालाय. या घटनेला काँग्रेस सरकार दोषी आहे, त्यांच्या हलगर्जीपणामुळेच ही परिस्थिती ओढावली. गर्दी आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत."

बंगळुरू

फोटो स्रोत, ANI

भाजपनं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यावर आरोप करताना लिहिलं की, "निष्पाप लोकांचा बळी जात असताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार क्रिकेटर्ससोबत रील शुट करण्यात मग्न होते. त्यांना लाज वाटायला पाहिजे."

कर्नाटक विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप आमदार नारायणस्वामी म्हणाले, "या दुर्घटनेला काँग्रेस सरकार दोषी आहे. या ठिकाणी किती लोकं येतील आणि त्यानिमित्ताने काय उपाययोजना करायला हव्यात, याची पुरेपुर माहिती घेण्यात ते कमी पडले. ही सुरक्षाव्यवस्थेतील मोठी घोडचूक आहे."

बीसीसीआयने काय म्हटले?

बीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि काँग्रेस खासदार राजीव शुक्ला यांच्या मते, गर्दी अचानक इतकी वाढेल याची कोणालाही कल्पना नव्हती.

या घटनेवर राजकारण करू नये असंही शुक्ला म्हणाले आहेत.

फोटो स्रोत, Abhishek Chinnappa/Getty Images

राजीव शुक्ला म्हणाले, "खूप मोठी गर्दी झाली होती. हा कार्यक्रम अचानक आयोजित करण्यात आला होता. गर्दी अचानक इतकी वाढेल याची कोणालाही कल्पना नव्हती, अगदी फ्रँचायझीलाही कल्पना नव्हती. ही अचानक झालेली दुर्घटना आहे, ज्यामुळे सर्वांनाच दुःख झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना शक्य तितकी मदत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत."

या घटनेवर राजकारण करू नये असंही शुक्ला म्हणाले आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.