"मी ओरडून ओरडून सांगत होतो, पण कुणीच ऐकलं नाही," दिल्लीतील चेंगराचेंगरीवेळी उपस्थित वायुसेना अधिकाऱ्यानं सांगितला घटनाक्रम

फोटो स्रोत, Sonu Mehta/Hindustan Times via Getty Images and ANI
- Author, दिलनवाज पाशा आणि अभिनव गोयल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनातर्फे सर्व 18 मृतांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. रेल्वेने मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देखील जाहीर केली आहे.
गंभीर जखमींना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमींना एक लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली आहे.
अचानक गर्दी उसळल्यामुळे ही घटना घडल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे. तसेच, खरी कारणे शोधण्यासाठी तपास करण्यासंदर्भातही चर्चा झाली आहे.

या घटनेच्या वेळी रेल्वे स्टेशनवर उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी घडलेल्या घटनेचं वर्णन सांगितलं आहे. त्यांच्या मते, प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी ज्या पादचारी पुलाचा वापर केला जातो तिथे गर्दी झाली होती आणि तिथेच चेंगराचेंगरीची घटना घडली.
या घटनेमागे प्रशासनाने कोणती कारणे दिली आहेत आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शी आणि बीबीसी प्रतिनिधींनी काय पाहिले ते आपण जाणून घेऊया.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आभा देवी, पिंकी देवी, शीला देवी, व्योम, पूनम देवी, ललिता देवी, सुरुची, कृष्णा देवी, विजय साहा, नीरज, शांती देवी, पूजा कुमार, संगीता मलिक, पूनम, ममता झा, रिया सिंग, बेबी कुमारी आणि मनोज यांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव म्हणाले की, नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी काय बघितलं?
या घटनेच्या वेळी रेल्वे स्टेशनवर उपस्थित असलेल्या मनोरंजन झा यांनी बीबीसीला सांगितलं, "मी रात्री 9.15 वाजेच्या सुमारास नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर आलो होतो. मी आलो तेव्हा इथे खूप गर्दी होती. माझी आई मरता मरता वाचली आहे. आम्ही थोडक्यात बचावलो."
"खूप गर्दी होती. जिथून बाहेर पडायचा रस्ता (एक्झिट) होता तिथून लोक आत घुसत होते. एक ट्रेन निघून गेल्यानंतर तिथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती तयार झाली. माझ्यासमोर एका ज्येष्ठ महिलेची शुद्ध हरपली."
या घटनेच्या आणखी एक साक्षीदार असलेल्या रुबी देवी यांनी सांगितलं, "आम्ही 13 नंबर प्लॅटफॉर्मवर उभे होतो. एवढी गर्दी होती की आम्हाला मध्ये जाता आलं नाही. खूप गर्दी होती. आम्ही थोडक्यात बचावलो, चेंगराचेंगरीची परिस्थिती होती."
आणखी एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं, "पोलीस त्यांचं काम करत होते, पण गर्दी खूप झाली होती."
रेल्वे स्टेशनवर त्यावेळी उभ्या असलेल्या काजलनं सांगितलं, "खूप गर्दी होती. लोक एकमेकांना धक्का देत होते. आम्ही 13 नंबर प्लॅटफॉर्मवर होतो, सगळे लोक एकेमकांना ढकलत होते. गोंधळ उडाला होता."

दिल्लीच्या एलएनजेपी हॉस्पिटल बाहेर बीबीसीचे प्रतिनिधी अभिनव गोयल यांनी मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांशी संवाद साधला.
यातल्या शोभा यांच्या जावेचा मृत्यू झाला आहे.
त्या म्हणाल्या, "दवाखान्यात एका बेडवर चार चार बॉडीज ठेवण्यात आल्या आहेत. हॉस्पिटलमधले सर्व डॉक्टर उपचार करत आहेत. तिथे खूप मृतदेह पडले आहेत, ते बघू वाटत नाहीये."
"माझ्या जावेचा यात मृत्यू झाला आहे. यात माझ्या दीराचा पाय तुटला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत महिलांचा, लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. मी जिथे बघितलं तिथे चार पाच बेडवर मृतदेह ठेवलेले होते."

बिहारच्या पटना येथील रहिवासी असणाऱ्या ललिता देवी त्यांचा पुतण्या गिरधारीसोबत नवी दिल्लीहून पानिपतला जात होत्या. रात्रीचे साधारण नऊ वाजले होते.
गिरधारी म्हणाला, "आम्ही दोघेही आधी पाटण्याहून आनंद विहार ट्रेनने आलो आणि नंतर नवी दिल्लीहून पानिपतला जाण्यासाठी ट्रेन पकडत होतो, पण प्लॅटफॉर्म 14 वर चेंगराचेंगरी झाली आणि त्यात माझ्या काकूचा मृत्यू झाला."
गिरधारी म्हणाला, "आम्ही स्टेशनमध्ये प्रवेश करताच प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. पायऱ्यांवरील धक्क्यामुळे आम्ही वेगळे झालो."
तो म्हणाला, "थोड्या वेळाने मी काकूला भेटायला गेलो तेव्हा मला दोन-तीन लोक मदतीसाठी ओरडताना ऐकू आले. मी अंगावर ओढलेल्या चादरीमुळे माझ्या काकूंना ओळखू शकलो, मी चादर काढून काकूंना तपासलं, तर त्यांचा हलका श्वास सुरू होता."

या घटनेत, दिल्लीतील किराडी येथे राहणाऱ्या उमेश गिरी यांच्या 45 वर्षीय पत्नीचा मृत्यू झाला आहे.
उमेश गिरी म्हणाले, "आम्ही महाकुंभमेळ्याला जात होतो. आम्ही अजमेरी गेटवरून स्टेशनमध्ये गेलो, माझी ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरून होती. आम्हाला प्रयागराज एक्सप्रेसमध्ये बसायचं होतं, आम्ही एसीचं तिकीट काढलं होतं. वर चढल्यानंतर गर्दी बरीच अनियंत्रित झाली. जास्त गर्दीमुळे ही घटना घडली."
उमेश गिरी यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी सांगितल्या, "माझ्या समोर, अनेक लोकांचे मृतदेह आधीच पडलेले होते. त्यानंतर, ते लोक एकमेकांवर आदळले आणि खाली पडलेल्या लोकांवरून चालायला लागले."
ते म्हणाले, "त्यावेळी ते मृतदेह पुलाच्या समोर ठेवले होते. त्यावेळी तेथे प्रशासनही उपस्थित नव्हते आणि माध्यमंही उपस्थित नव्हती."
मदतीबद्दल उमेश म्हणाले, "मला कोणतीही मदत मिळाली नाही. नंतर खूप उशीर झाला होता. मी अनेक पोलिसांना आणि आरपीएफच्या लोकांना सांगितले, पण कोणीही ऐकायला तयार नव्हतं."
पोलीस आणि प्रशासन काय म्हणाले?
उत्तर रेल्वेचे प्रवक्ते हिमांशू उपाध्याय म्हणाले की, "ज्या वेळी ही दुर्दैवी घटना घडली, त्यावेळी पाटण्याकडे जाणारी मगध एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर आणि जम्मूकडे जाणारी उत्तर संक्रांती एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 15 वर उभी होती."
"यादरम्यान, काही प्रवासी पादचारी पुलावरून प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 15वर जाणाऱ्या पायऱ्यांवरून घसरले आणि त्यांच्या मागे उभे असलेले अनेक प्रवासी त्यात अडकले आणि ही दुःखद घटना घडली."
उत्तर रेल्वेचे प्रवक्ते हिमांशू उपाध्याय म्हणाले, "एक उच्चस्तरीय समिती या अपघाताची चौकशी करत आहे."
वरिष्ठ रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनेची सविस्तर माहिती दिली आहे.

फोटो स्रोत, NORTHERN RAILWAY
रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीबाबत बोलताना रेल्वेचे पोलीस उपायुक्त के.पी.एस. मल्होत्रा म्हणाले, "चंगराचेंगरीमागील कारण तपासानंतर कळेल. हे काम रेल्वे करेल."
ते म्हणाले, "आम्हाला गर्दीचा अंदाज आला होता. पण, दोन गाड्यांना उशीर झाल्यामुळे आणि तिथे मोठ्या संख्येनं लोक जमल्यामुळं अशी परिस्थिती उद्भवली. नेमकं काय घडलं हे शोधण्याचं काम रेल्वे करेल."
मल्होत्रा म्हणाले, "9 वाजण्याच्या सुमारास एक ट्रेन सुटणार होती. त्यावेळी तिथे गर्दी वाढली. जेव्हा एकाच ठिकाणी बरेच लोक ट्रेनची वाट पाहत असतात आणि कोणतीही चुकीची माहिती पसरते, तेव्हा चेंगराचेंगरी देखील होते. "

फोटो स्रोत, ANI
पोलीस उपायुक्त के.पी.एस. मल्होत्रा पुढे म्हणाले, "आम्हाला गर्दीचा अंदाज आला होता. पण, दोन गाड्यांना उशिरा आल्याने आणि तिथे जास्त लोक जमल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवली. हे का घडलं हे शोधण्याचं काम रेल्वे करेल."
प्रवाशांना प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वर येण्यास सांगण्यात आले. आणि यामुळे चेंगराचेंगरी झाली का?
या प्रश्नाचं उत्तर देताना मल्होत्रा म्हणाले, "नाही, असं काही नव्हतं. रेल्वेकडून एक विशेष ट्रेन चालवली जाणार होती, त्याची घोषणा निश्चितच झाली. पण ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलण्यासारख्या कोणत्याही गोष्टीची मला माहिती नाही."

संध्याकाळी सहा वाजल्यापासूनच या स्टेशनवर लाखो लोक येऊ लागले होते, अशावेळी त्यांना थांबवण्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत का? यावर बोलताना मल्होत्रा म्हणाले, "नाही, सहा वाजल्यापासून तिथे लाखो लोक नव्हते. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ज्या गाड्या सुटणार होत्या, त्यावेळी गर्दी वाढली. सहा वाजता इथे सामान्य परिस्थिती होती."
दरम्यान, एनडीआरएफचे कमांडंट दौलत राम चौधरी म्हणाले, "आम्हाला पोलीस नियंत्रण कक्षाकडून प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळाली."
'मी ओरडून ओरडून लोकांना सांगत होतो, पण कुणीच माझं ऐकलं नाही'
चेंगराचेंगरी झाली तेव्हा वायुसेनेचे अधिकारी असलेले अजित रेल्वे स्टेशनवर उपस्थित होते. ते म्हणाले, "मी तिथे एका व्हीआयपी मूव्हमेंटसाठी आलो होतो. माझं काम झाल्यानंतर मी परत जात होतो, पण मला तिथून बाहेर पडता आलं नाही."
ते म्हणाले, "मला संध्याकाळीच असं काही घडू शकतं अशी शंका होती. कारण मी दिल्लीतल्या लोक कल्याण मार्गावरून नवी दिल्लीकडे येत होतो. तेव्हा मला मेट्रो स्टेशनमधून बाहेर पडण्यास एक तास लागला. सामान्यतः तिथून बाहेर पडायला दोन मिनिटं लागतात."

फोटो स्रोत, ANI
अजित यांनी सांगितलं, "माझं काम झाल्यानंतर मी परत जात होतो तेव्हा मला बाहेर पडायला रस्ताच मिळत नव्हता. यानंतर मी स्वतः प्लॅटफॉर्म 13 आणि 14 वर जाऊन एक घोषणा केली की, भारतीय सेना आणि प्रशासन प्रवाशांना 3-4 दिवस थांबण्याची विनंती करत आहे."
"मी लोकांना म्हणालो की, एका गाडीतून एकाच वेळी पाच ते दहा हजार लोक प्रवास करू शकत नाहीत. मात्र लोक ऐकायला तयार नव्हते, यामुळेच चेंगराचेंगरी झाली."
अजित पुढे म्हणाले, "एकाच जागी अचानक पाच ते दहा हजार लोक एकत्र जमल्यानंतर तिथे प्रशासन काय करू शकतं? एवढ्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि ते करतही होते, मी बघत होतो."
" मी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत होतो की, कुंभमेळा 26 तारखेपर्यंत आहे, दोन-चार दिवस इथेच थांबा. पण कुणीच ऐकायला तयार नव्हतं."
पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि गृहमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं की, "नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने दुःख झालं आहे. या घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या व्यक्तींबाबत मला सहानुभूती आहे. जखमी लोक लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. चेंगराचेंगरीत अडकलेल्या लोकांचा प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे."
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक्सवर लिहून त्यांच्या संवेदना व्यक्त केल्या. या घटनेमुळे त्यांना दुःख झाल्याचं ते म्हणाले.

फोटो स्रोत, X
राजनाथ सिंह यांनी लिहिलं की, 'रेल्वे प्लॅटफॉर्मवर झालेल्या चेंगराचेंगरीत जीवितहानी झाल्याचे पाहून त्यांना धक्का बसला आहे. या दुःखाच्या वेळी त्यांच्या शोकसंवेदना शोकग्रस्त कुटुंबांसोबत आहेत. जखमींनी लवकर बरे व्हावे म्हणून ते प्रार्थना करत आहेत.'
देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणाले, "नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीबाबत रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याशी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. दिल्लीचे उपराज्यपाल आणि पोलीस आयुक्तांशी बोलून शक्य ती मदत पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत. या अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींच्या प्रति संवेदना व्यक्त करतो. जखमींवर आवश्यक ते उपचार केले जात आहेत. ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो."
रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं, "नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने धक्का बसला आहे. या घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं, त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. आमची संपूर्ण टीम या घटनेत बाधित झालेल्यांना मदत करत आहे."
मोदी सरकार सत्य लपवण्याचा प्रयत्न करतंय - मल्लिकार्जुन खर्गे
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहून त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.
या पोस्टमध्ये खर्गे म्हणाले, "नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. स्टेशनवरून येणारे व्हिडिओ अत्यंत हृदयद्रावक आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील मृत्यू प्रकरणात सत्य लपवण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा प्रयत्न अत्यंत लज्जास्पद आणि निषेधार्ह आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
आम्ही मागणी करतो की मृतांची आणि जखमींची संख्या लवकरात लवकर जाहीर करावी आणि बेपत्ता लोकांची ओळख पटवावी. पीडितांच्या कुटुंबियांना आमच्या मनापासून संवेदना. जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात."

फोटो स्रोत, X/AtishiAAP
दिल्लीच्या काळजीवाहू मुख्यमंत्री आतिशी यांनी या घटनेनंतर एलएनजेपी हॉस्पिटलला भेट दिली. या भेटीनंतर एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं, "नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातात महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांचा झालेला दुर्दैवी मृत्यू अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे."
"एलएनजेपी रुग्णालयात पोहोचून मी पीडित व्यक्तींच्या कुटुंबीयांना भेटले. अनेक लोक जखमीही झाले आहेत, ज्यांवर उपचार सुरू आहेत. आमचे दोन आमदार पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी रुग्णालयात उपस्थित आहेत."
आतिशी म्हणाल्या, "महाकुंभासाठी जाणाऱ्या भाविकांसोबत अशी घटना घडणे अत्यंत दुःखद आहे. केंद्र सरकार किंवा उत्तर प्रदेश सरकार दोघांनाही लोकांच्या सुरक्षेची काळजी नाही. प्रयागराजमध्ये देशातील विविध राज्यांमधून येणाऱ्या भाविकांसाठी कोणतीही व्यवस्था नाही किंवा कोणतीही ठोस वाहतूक व्यवस्था नाही."

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. राहुल गांधी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं, "नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. मी शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमी व्यक्ती लवकर बरे होतील अशी आशा करतो.
राहुल गांधी म्हणाले, "या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वेचे अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता अधोरेखित होते. प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता, स्थानकावर चांगली व्यवस्था करायला हवी होती. गैरव्यवस्थापन आणि निष्काळजीपणामुळे कोणालाही आपला जीव गमवावा लागू नये याची काळजी सरकार आणि प्रशासनाने घ्यावी."
रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - प्रकाश आंबेडकर
या अपघातात मृत पावलेल्या नागरिकांबद्दल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दुःख व्यक्त केलं. तसेच अजून किती निष्पाप लोकांना अशा पद्धतीनं मरावं लागणार आहे, याचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी द्यावं, असं आंबेडकर यांनी म्हटलं.
तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वेमंत्री वैष्णव यांनी राजीनामा देण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, "बुलेट ट्रेन ही जनतेची प्राथमिकता नाही, तर सुरक्षित प्रवास करण्यासाठी पुरेशा सुविधा देऊन ज्या ट्रेन आपल्याकडे आहेत, त्यातच सुधारणा करावी. हा अपघात म्हणजे रेल्वेची अतिशय बेजबदार आणि सामान्य प्रवाशांबाबत असलेली गैरव्यवस्था आहे."
"चेंगराचेंगरीत ज्यांचा मृत्यू झाला, त्यात महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. त्यांच्या नातेवाईकांना मोदी आणि रेल्वेमंत्री काय उत्तर देणार आहेत?" असा प्रश्न आंबेडकरांनी विचारला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











