'माझा मुलगा कामाला जायला निघाला होता, होर्डिंग पडून त्याचा जागेवरच जीव गेला'

- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"माझा मुलगा कामाला निघाला होता. पाऊस सुरू झाला म्हणून आडोशासाठी ब्रिजखाली थांबला होता. पण त्याच्यावर डोक्यावर होर्डिंग पडली आणि त्याचा जागीच जीव गेला. 24 वर्षांचा आमचा पोरगा आम्हाला सोडून गेला."
मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत जीव गेलेल्या 24 वर्षीय भरत राठोड या तरुणाच्या नातेवाईक नयना विनोद राठोड सांगत होत्या.
प्रत्येक वाक्यागणिक नयना राठोड दु:खाचा आवंढा गिळत होत्या, त्यांना भावना आवरत नव्हत्या आणि एका क्षणी त्यांच्या डोळ्यांवाटे अश्रूही आले. आमच्याशी बोलताना त्यांना रडू आवरलं नाही.
भरत राठोडची आई काही दिवसांपूर्वीच वारली, वडील व्हिलचेअरवर असतात. त्याच्यामागे त्याचा लहान भाऊ आहे.
एकत्र कुटुंब असल्यानं नयना राठोड या भरत आणि त्याचा लहान भावांचा सांभाळ करत होत्या.
घाटकोपरमधल्या गोळीबार रोडला राठोड कुटुंब राहतं. त्यांचा मुलगा घाटकोपरमधल्या मेडिकलमध्ये काम करत होता. तो कामाला जायला निघाला आणि त्याच्या अंगावर होर्डीग्ज पडून त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
नयना सांगतात, "मला सायंकाळी सात वाजता नवऱ्याचा फोन आला आणि आपल्या मुलाच्या अंगावर होर्डिंग पडल्याचं सांगितलं. मी माझ्या आईकडे गेले होते. तिथून लगेच घाटकोपरला पोहोचले, पण तोवर माझा मुलगा हातातून निघून गेला होता."
एवढे मोठमोठे होर्डिंग लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी नयना राठोड यांनी केली.

‘मी तर सुटलो पण ते लोक कार, ट्रकमध्ये अडकले’
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत बचावलेल्या अक्षय वसंत पाटील या 20 वर्षीय तरुणाशीही आम्ही बोललो.
अक्षय बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाला, "माझा फोन वाजला तो उचलायला गेलो, तर होर्डिंग पडत असल्याचं लक्षात आलं. मी पळायचा प्रयत्न केला. पण गाड्यांमध्ये फसलो. माझ्यासह आठ ते नऊ लोकांनी सीएनजीच्या मागच्या बाजूला उड्या मारल्या.
"मला मार लागला. पण, मी या दुर्घटनेतून वाचलो. पेट्रोल पंपावर शंभर गाड्या उभ्या होत्या. ट्रक आणि कारमध्ये बसलेले लोक तर तिथेच अडकले."

अक्षय घाटकोपरमधील कामराजनगरमध्ये राहतो. तो एका ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करतो. तो त्याच कंपनीचं कुरिअर करायला गेला होता. पण, गाडीत पेट्रोल नसल्यानं पेट्रोल पंपावर गेला. आपला नंबर येण्यासाठी तो रांगेत सीएनजीच्या जवळ थांबला होता.
यावेळी जोरदार वादळ सुटलं आणि पाऊस आला. यात होर्डिंग पडल्यामुळे तो पळून जाण्यात यशस्वी तर झाला. पण त्याच्या डोक्याला 10 टाके पडले. हातालाही फ्रॅक्चर झालं आणि पाठीलाही जोरदार मार लागला. तो जखमी झाला तरी रिक्षा पकडून कसातरी हॉस्पीटलमध्ये गेला. त्यामुळे त्याच्यावर वेळीच उपचार झाले.
मुंबईतल्या घाटकोपर इथं होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नातेवाईक त्यांच्या भावना, तर बचावलेले लोक त्यांचा अनुभव बीबीसी मराठीसोबत शेअर करत होते. पण 13 मे रोजी नेमकं काय घडलं होतं, ज्यात 14 लोकांचा मृत्यू झाला.
दुर्घटना नेमकी काय घडली?
सोमवारी (13 मे) दुपारच्या सुमारास मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सायंकाळी चार वाजता धुळीचे लोट पसरले होते.
ताशी 50 ते 60 किमी वेगानं वारे वाहत होते. यामध्ये घाटकोपर पूर्वमधल्या रमाबाई नगर परिसरात पेट्रोल पंपाच्या वर लावलेल्या जाहिरातीचे भलेमोठे होर्डिंग कोसळलं. यात 100 जण अडकले होते. त्यापैकी आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला, तर 43 लोक जखमी झाले आहेत.
त्यांच्यावर मुंबईतल्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. हे होर्डिंग अनधिकृत असून संबंधित जाहिरात कंपनी, रेल्वे प्राधिकरण आणि या अनधिकृत होर्डिंगकडे अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या मुंबई महानगर पालिका विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK
जबाबदारीची टाळाटाळ सुरू
मुंबई महानगरपालिकेच्या नियमानुसार, मुंबईत 40 बाय 40 चौरस फुटापर्यंतच होर्डिंग लावण्याची परवानगी आहे. मात्र, घाटकोपर येथे पेट्रोल पंपाजवळ लावण्यात आलेलं हे होर्डिंग 120 बाय 120 चौरस फुटाचं होतं.
परवानगी नसलेलं हे अधिक क्षमतेचं होर्डिंग लावण्यास कोणी परवानगी दिली आणि याला जबाबदार कोण? यावरून आता नवीन वादाला तोंड फुटलंय.
मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केलंय की, होर्डिंगची परवानगी राज्य रेल्वे पोलिसांनी दिली होती. याच्याशी पालिकेचा संबंध नाही. तसंच महानगरपालिकेकडे याबाबत यापूर्वी तक्रार केल्यानंतर पालिकेने रेल्वे पोलिसांना होर्डिंग काढण्याचे आदेश दिले होते असंही पालिकेचं म्हणणं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ही घटना घडताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनास्थळी भेट दिली. मुंबईतल्या सर्वच होर्डिंगचे ऑडिट करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
तसंच, या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते, तर मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी उद्योजकांवर कारवाई करणार असल्याचं म्हटलं.
काय म्हणाले दीपक केसरकर?
मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकरांनी दुर्घटनास्थी भेट दिली. यावेळी ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, "महापालिकेचे काही नियम आहेत. त्यानुसार 40 बाय 40 चं होर्डिंग लावता येतं.
"त्याची तांत्रिक व्यवहार्यता महापालिका तपासत असते. पण हे होर्डींग्स रेल्वेच्या परिसरात होतं. रेल्वेच्या परिसरात असेल तर होर्डिंग लावायला रेल्वेनं परवानगी द्यायची असते. कोणी परवानगी देणं हे महत्वाचं नाही.
"यात सुरक्षेचे सगळे नियम पाळायला पाहिजे. लोकांच्या जीवाची काळजी न घेणाऱ्या उद्योजकांवर कारवाई केली जायला हवी. इतर ठिकाणी असे होर्डिग असतील तर त्याची चौकशी करू’’











