कोणत्या ढगांपासून पाऊस पडतो? कोणते ढग अधिक धोकादायक असतात? वाचा

पाऊस, ढग, हवामान, वातावरण

फोटो स्रोत, Getty Images

पावसाळ्यात जेव्हा आपण आभाळाकडे बघतो तेव्हा ढगांचे वेगवेगळे आकार आपल्या नजरेला पडतात. घोड्याच्या शेपटीच्या आकाराचे ढग, डीप फ्रीजमध्ये साठलेला रवाळ बर्फ, दूध सांडल्यावर तयार होणारा आकार... असे आणखीन बरेचसे प्रकार.

आता हे असे ढग पाहिले की मनात शंका येते ती 'आता पावसाची सुरुवात होईल का? कदाचित पाऊस सुरू होण्यापूर्वी मी ऑफिसला पोहोचू शकेन.' 'आज ढगाळ वातावरण झालंय, मी शेतात जावं का?' 'आभाळ आता थोडं मोकळं होईल असं वाटतंय' अशा अनेक शंका असतात.

विशाखापट्टणमच्या आंध्र विद्यापीठातील हवामानशास्त्र आणि समुद्रशास्त्र विभागाच्या प्राध्यापक पी. सुनिता यांनी बीबीसीशी बोलताना अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

ढग नेमके तयार कसे होतात?

हवा बाष्पाने (पाण्याची वाफ) भरलेली असते. जेव्हा तापमान वाढतं तेव्हा बाष्पातील अणू वजनाने हलके होतात वरवर जातात. ते जसजसे उंचीवर जातात तसे थंड होऊ लागतात. त्यात साठलेलं पाणी मग हळूहळू स्थायूत रूपांतरित होतं. अर्थात त्याचा बर्फ होतो. हे पाण्याचे थेंब आपल्याला बर्फाच्या स्फटिकासारखे दिसतात. हे थेंब येऊन एकत्र येऊन ढग तयार होतात.

अशा प्रकारे तयार झालेल्या ढगांवर विविध गोष्टींचा परिणाम होतो. त्यांचा रंग, उंची, आकार, वजन यानुसार त्यांची विविध श्रेणींत वर्गवारी केली जाते. त्यापैकी, ढगाचा आकार कसा तयार होतो ? ते लंबाकार का वाढतात? निम्न पातळीवरील ढग, मध्यम स्तरावरील ढग आणि उच्च पातळीवरील ढग असं वर्गीकरण केलं जातं.

पाऊस, ढग, हवामान, वातावरण

पृथ्वीपासून सुमारे 2 किमी (निम्न स्तरावर) उंचीवर असणाऱ्या ढगांना स्ट्रॅटस ढग म्हटलं जातं. यामध्ये निम्बोस्ट्रॅटस, स्ट्रॅटोक्युम्युलस, स्ट्रॅटा अशी विविध नावं आहेत.

पृथ्वीपासून सुमारे 6 किमी उंचीवर असणाऱ्या ढगांना 'अल्टो ढग' म्हटलं जातं. हे ढग मध्यम स्तरावरील ढग असतात. यामध्ये हाय स्ट्रॅटस, अल्टोक्यूम्युलस ढग असतात. तर तिथून पुढे 12 किमी अंतरावर तयार होणारे ढग सिरस ढग म्हणून ओळखले जातात. यामध्ये सिरस, सिरोक्यूमुलस, सिरोस्ट्रॅटस ढग असतात.

त्याचप्रमाणे आकाशातही ढग उभे राहतात. हे टॉवरिंग क्लाउड्स किंवा क्युम्युलोनिम्बस ढग म्हणून ओळखले जातात.

जर ढग बर्फाच्या स्फटिकांसारखे दिसले तर?

पृथ्वीपासून 6500 फूट म्हणजे 2 किमी उंचीवर असलेले ढग स्ट्रॅटस ढग म्हणून ओळखले जातात. त्यात फक्त पाण्याचे थेंब असतात. स्ट्रॅटस ढग सामान्यतः करड्या रंगाचे असतात. जेव्हा आपण त्यांच्याकडे पाहतो तेव्हा ते आपल्याला वेगवेगळ्या लेयर्स मध्ये दिसतात. या ढगांपासून बारीक बारीक असा रिमझिम पाऊस पडतो.

पाऊस, ढग, हवामान, वातावरण

फोटो स्रोत, GARY MCARTHUR

त्यांच्यावर म्हणजेच पृथ्वीपासून 6,500 ते 20,000 फुटांवर म्हणजेच 2 ते 6 किमी अंतरावर हे ढग असतात त्यांना 'अल्टो ढग' म्हणतात. त्यात पाण्याच्या थेंबांसोबत बर्फाचे स्फटिक असतात. म्हणजे आपण डीप फ्रीझर उघडल्यावर जसे स्फटिक दिसतात अगदी तसेच ते दिसतात.

त्यांच्यावरचे म्हणजेच पृथ्वीपासून 20,000 फुटांवर असलेले सर्व ढग 'सिरस ढग' असतात. हे ढग पृथ्वीपासून साधारणपणे 7 ते 12 किमी उंचीच्या अंतरावर असतात. या ढगांमध्ये फक्त बर्फाचे स्फटिक असतात. हे स्फटिक त्यांच्या सभोवताली असणाऱ्या थेंबांना आणि बर्फाच्या इतर स्फटिकांना आकर्षित करतात. त्यानंतर त्यांचा आकार षटकोनी होत जातो.

उच्च पातळीवरील सर्व ढग बरसतात तेव्हा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस येतो. हे ढग एका तासात 10 सेंटीमीटर इतका पाऊस देतात. हे शक्तिशाली असे ढग आहेत. हे ढग उभ्या आकाराचे असतात ज्यामुळे आपल्याला ते आकाशाला स्पर्श करतायत असं वाटतं. त्यांना टॉवरिंग क्लाउड्स किंवा क्युम्युलोनिम्बस ढग असंही म्हणतात.

धोकादायक असणारे ढग

हवामानात जर अचानक बदल झाले तर अवघ्या दोन तीन तासांत 'क्युम्युलोनिम्बस ढग' तयार होतात. हे ढग गडगडाट, विजांचा कडकडाट, गारपिटीसह बरसतात. पाऊस अचानक सुरू होतो आणि 15-20 किमीच्या परिघात 2-3 तास कोसळतो.

पाऊस, ढग, हवामान, वातावरण

क्युम्युलोनिम्बस ढग हे उभट आकाराचे असतात. ते हवामानातील अस्थिरतेमुळे तयार होतात. याचा अर्थ सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी हवामानात जे बदल होतात त्यामुळे ते तयार होतात. साधारणपणे उन्हाळ्यात अशा प्रकारचे ढग तयार होतात. या ढगांमुळे वीजा कडकडतात, झाडे आणि विजेचे खांब कोसळतात. त्यामुळेच या ढगांना धोकादायक ढग म्हटलं जातं.

कोणत्या ढगांमुळे पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो?

निंबस स्ट्रॅटस ढगांमुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. निम्न स्तरावरील स्ट्रॅटस ढग आणि मध्यम स्तरावरील अल्टो ढग एकत्र आले की, हे निंबस स्ट्रॅटस ढग तयार होतात. हे ढग पावसाळ्यात तयार होतात.

पाऊस, ढग, हवामान, वातावरण

साधारणपणे, ढग सूर्यापासून निघणारे पांढरे किरण शोषून घेतात. मग आपल्याला ढगांचा रंग पांढरा दिसतो. पण पावसाळ्यात ढगांची जाडी जास्त असते. त्यामुळे त्यातून सूर्याचे किरण खूप कमी प्रमाणात जातात त्यामुळे हे ढग करड्या रंगाचे दिसतात. हे निंबस स्ट्रॅटस क्लाउड म्हणूनही ओळखले जातात.

निंबस स्ट्रॅटस ढगांमुळे आठवडाभर पाऊस पडतो. हे ढग मधल्या काळात थांबतात आणि पुन्हा सक्रिय होतात. अशा पावसाला ऍक्टिव्ह ब्रेक स्पेल रेन्स असं म्हणतात. काहीवेळा अचानक तयार झालेल्या ढगांमुळे मुसळधार पाऊस पडतो त्याला क्यूम्युलोनिम्बस ढग म्हणतात.

ढगांना वजन असतं का?

'ढग हे कापसासारखे हलके असतात'. अशी वाक्य बऱ्याचदा आपल्या कानावर पडतात. यावरून तरी ढग हलके असतात त्यांना वजन नसतं असं वाटेल. पण ढग आकाशात तरंगत जरी असले तरी त्यांना वजन असतं. जसं हवेलाही वजन असतं अगदी तसंच.

पण, ढग हवेपेक्षा हलके असतात म्हणून तर आकाशात तरंगताना दिसतात. ढगांना मोजायचं कसं ? तर त्यांच्या सावल्यांद्वारे. ढगांच्या या सावल्या मोजण्यासाठी लेमोन ओडोमीटरचा वापर केला जातो.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)