कुंभमेळा चेंगराचेंगरी : प्रशासनानं मौन सोडलं, मृतांचा आकडा आणि घटनेचं कारणही सांगितलं

फोटो स्रोत, ANI
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू आहे. या कुंभमेळ्यात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घडली. यात किमान 30 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत.
महाकुंभचे पोलीस उपमहानिरीक्षक वैभव कृष्ण यांनी माध्यमांना सांगितलं, "महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीत 30 लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी 25 व्यक्तींची ओळख पटली आहे."
या घटनेचं कारण सांगताना ते म्हणाले, "आखाडा परिसरात बॅरिकेड्स लावलेले होते. त्यापैकी काही बॅरिकेड तुटले. अनेक भाविक ब्रम्ह मुहूर्ताची वाट बघत घाटावरच झोपले होते आणि त्याचवेळी इतर भाविक मोठ्या संख्येने त्याठिकाणी पोहोचले. पायाखाली कोण झोपलं आहे हे ते बघू शकले नाहीत आणि अशापद्धतीने ही घटना घडली."
सरकारने कसलाही व्हीआयपी प्रोटोकॉल राहणार नाही अशा सक्त सूचना दिलेल्या होत्या आणि बुधवारी कसलाच व्हीआयपी प्रोटोकॉल लागू केलेला नव्हता.
प्रयागराजमधील एका डॉक्टरांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितलं की, या घटनेत किमान 15 लोक मृत्युमुखी आणि अनेक लोक जखमी झाले आहेत. या डॉक्टरांनी एएफपी या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली.
कुंभमेळ्यादरम्यान त्रिवेणी संगमाजवळ पवित्र स्नानाच्या ठिकाणी मौनी अमावस्येमुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगण्यात येतंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करून या घटनेबाबत भावना व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान मोदींनी लिहिलंय की, "प्रयागराज येथील महाकुंभात झालेला अपघात दुःखद आहे. यामध्ये ज्या भाविकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रती माझी मनापासून सहानुभूती आहे. यासोबतच, सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी मी प्रार्थना करतो."
"स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे. या संदर्भात मी मुख्यमंत्री योगीजींशी बोललो आहे आणि मी सतत राज्य सरकारच्या संपर्कात आहे," अशीही माहिती मोदींनी 'एक्स'वरून दिली.

फोटो स्रोत, Getty Images
बीबीसीचे प्रतिनिधी विकास पांडे हे कुंभमेळ्याचं वृत्तांकन करण्यासाठी प्रयागराजमध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या माहितीनुसार, घटनास्थळावरुन काही लोकांना स्ट्रेचरवरुन नेलं जात होतं.
विकास पांडे सांगतात की, "मी घटनास्थळावरुन 15 मिनिटांत 20 रुग्णवाहिका गेल्याच्या पाहिल्या. अजूनही लाखो लोक या ठिकाणी येत आहेत. काही लोकांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत आहे."
पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार अरैलच्या रुग्णालयात जखमींना नेण्यात येत आहे.
अखिल भारतीय परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांनी आज बुधवारी सकाळी माध्यमांशी बोलताना या घटनेमुळे मौनी अमावस्या स्नान रद्द केल्याचं सांगितलं,
रवींद्र पुरी म्हणाले, "पहाटे झालेली गोष्ट तुम्ही पाहिली असेल. ती पाहाता मौनी अमावस्येचं स्नान होणार नाही, असा निर्णय घेण्यात आलेला आहे. मौनी अमावस्येच्या स्नानासाठी सर्व साधूसंत तयार होते. मात्र झालेल्या घटनेकडे पाहाता आता स्नान रद्द करण्याचा निर्णय जनहितासाठी घेण्यात आला आहे."

फोटो स्रोत, Getty Images
प्रयागराजमध्ये 13 जानेवारी 2025 पासून महाकुंभमेळ्याची सुरूवात झाली आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातून आणि परदेशातून लाखो भाविक प्रयागराजला गंगा, यमुना आणि 'अदृश्य सरस्वती' नदीच्या संगमावर येत आहेत.
सरकारचा अंदाज आहे की, यावर्षीच्या महाकुंभमेळ्याला 40 कोटीहून अधिक लोक भेट देणार आहेत.
सध्या प्रयागराजमधील त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी फक्त गंगा आणि यमुना नद्याच दिसतात. या दोन नद्यांचं पाणी तिथं एकत्र होतं.
संगमाच्या ठिकाणी यमुना नदी पश्चिमेकडून वाहत येते तर गंगा नदी उत्तर दिशेकडून वाहत येते. त्रिवेणी संगमावर या दोन्ही नद्या एकत्र होतात. तिथून पुढे ती गंगा नदी म्हणूनच ओळखली जाते.
प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
या चेंगराचेंगरीत अडकलेल्या एका महिलेने आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना असा दावा केला आहे की, "त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना मदतीची विनंती केली, पण त्यापैकी कुणीही त्यांना वाचवण्यासाठी आलं नाही."
दुसऱ्या एका महिलेने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, अचानक ही घटना घडली आणि तिथून बाहेर पडण्याचा रस्ताच मिळत नव्हता.

फोटो स्रोत, ANI
त्यांनी सांगितलं की, अधिकाऱ्यांना मदत करण्याची विनंती केली होती पण प्रशासनाचे लोक त्यावेळी 'हसत होते.'
मध्य प्रदेशच्या छतरपूरहुन आलेल्या आणखीन एका व्यक्तीने या घटनेचं वर्णन करताना सांगितलं की, 'तिथे कुठल्याही प्रकारची पोलीस व्यवस्था नव्हती, कुणीही मदतीला आलं नाही आणि अनेक लोक जखमी झाले आहेत.'
बॅरिअर्स तुटले
मात्र यात किती लोक जखमी झाले किंवा कोणाचा मृत्यू झाला आहे का याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.
येथील मेळ्याच्या अधिकारी आकांक्षा राणा यांनी वार्ताहरांना सांगितले की, "त्रिवेणी संगमाजवळ चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. काही बॅरिअर्स तुटले. काही लोक जखमी झाले आहेत. कोणाचीही स्थिती गंभीर नसून त्यांना योग्य ते उपचार देण्यात येत आहेत."
दिल्लीहून आलेले यात्रेकरू उमेश अग्रवाल घाटाजवळ त्यांनी काय पाहिलं ते सांगतात.
"आम्ही गंगा घाटाकडे जात होतो. स्नानासाठी मोठी गर्दी झाली होती. लोक भराभर चालत होते. बॅरिकेडिंगजवळ काही लोक झोपले होते. त्यांच्या पायात भराभर चालणारे काहीजण अडकले. त्यामुळे दोन तीन लोक खाली पडले. मागून जी गर्दी येत होती, ते लोक मग एकमेकांवर पडत गेले."

फोटो स्रोत, Getty Images
बीबीसीचे वार्ताहर विकास पांडे यांनी सांगितले, मी घटनास्थळावरुन 15 मिनिटांत 20 रुग्णवाहिका गेल्याचं पाहिलं. अजूनही लाखो लोक या जागेवर येत आहेत काही लोकांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत आहे.
या घटनेनंतरही शाही स्नान ठरल्याप्रमाणे होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
प्रयागराजमध्ये दर 12 वर्षांनी महा कुंभमेळा भरतो. तिथल्या त्रिवेणी संगमावर हा कुंभमेळा होतो.
अलीकडेच उत्तर प्रदेश सरकारनं कुंभमेळ्यासाठी त्रिवेणी संगमावर एक विशेष घाट बांधला. या घाटावर आता बोटी देखील उपलब्ध आहेत.
गंगा आणि यमुना या नद्यांचा प्रवाह जेव्हा कमी होतो, तेव्हा भाविक बोटीतून संगमावर जातात आणि आंघोळ करतात.
पूजेबरोबर भाविक तिथे इतर विधी देखील करतात. ते त्यांच्या नातेवाईकांच्या अस्थी देखील घेऊन येतात.
काही भाविक म्हणतात की या सर्व गोष्टींमुळे नदीमध्ये कचराच कचरा दिसतो.
वेगवेगळ्या आखाड्यांनी शेकडोंच्या संख्येनं आपले मोठमोठे तंबू उभारले आहेत. काही तंबू तर अनेक एकरांमध्ये पसरलेले आहेत. तिथे साधू-संतांनीही तंबू उभारले आहेत. तिथे बसूनच ते पुजा-पाठ करत आहेत.

फोटो स्रोत, x
कुंभमधील आखाड्यांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पंच दशनाम जुन्या आखाड्यात नागा साधू शरीरावर भस्म आणि गळ्यात रुद्राक्षाची माळा घालून बसले आहेत.
कडाक्याच्या थंडीत काही नागा साधू आखाड्याच्या बाहेर रस्त्यावर आपाआपल्या तंबूबाहेर शेकोटी पेटवून बसले आहेत. तिथे मोठ्या संख्येनं लोक त्यांचा आशीर्वाद घेत आहेत. अनेक जण त्यांचे फोटोही काढत आहेत.
शहराचे एडीजी भानू भास्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध दिशांनी येणाऱ्या एकूण 7 मुख्य मार्गांनी मेळा परिसरात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुंभमेळा परिसरानजीक या मार्गांवर वाहनांसाठी 100 हून अधिक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
यामध्ये जौनपूर, वाराणसी, मिर्झापूर, रिवा-चित्रकूट, कानपूर-फतेहपूर-कौशांबी, कौशांबी आणि लखनऊ-प्रतापगढ मार्गाचा समावेश आहे.
याशिवाय भाविकांची गर्दी हाताळण्यासाठी प्रयागराजला दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता यांसारख्या मोठ्या शहरांशी जोडण्यासाठी शेकडो रेल्वे गाड्या चालवण्यात आल्या आहेत. मोठ्यासंख्येनं विशेष रेल्वेही चालवल्या जात आहेत.
उत्तर प्रदेश परिवहन महामंडळही सुमारे 7 हजार बसेसची सुविधा पुरवत आहे.
गंगा नदीच्या एका काठाला दुसऱ्या काठाशी जोडण्यासाठी पीपा पूल, म्हणजेच पोंटून पूल बनवले गेले आहेत. यावेळी त्यांची संख्या वाढवून 30 केली आहे. प्रत्येक पुलाला वेगळे नाव देण्यात आले आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)












