नागा साधू कोण असतात? त्यांची 'टांगतोड' प्रक्रिया काय असते?

कुंभमेळा म्हटलं की सर्वांनाच काहीसा गूढ आणि गहन वाटणारा आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे हेच नागा साधू होय.
फोटो कॅप्शन, कुंभमेळा म्हटलं की सर्वांनाच काहीसा गूढ आणि गहन वाटणारा आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे हेच नागा साधू होय.
    • Author, विनायक होगाडे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
    • Reporting from, प्रयागराज

"नागा संन्यासी असेच बनत नाहीत. त्यासाठी मेहनत करावी लागते. गुरुंची सेवा करावी लागते. त्यानंतर कुठे जाऊन नागा संन्यासी होण्यासाठीची दीक्षा दिली जाते. त्यानंतरही तपस्या करावी लागते, जी मला करावी लागणार आहे," बाप्पा मंडल सांगतो. तो फार सहजपणे बोलत होता.

आवाहन आखाड्यातील बाप्पा मंडल हा 32 वर्षांचा युवक मुळचा पश्चिम बंगालमधल्या अलिपुरद्वारचा आहे.

कुंभमेळ्यातील दुसऱ्या शाही स्नानाच्या आधी म्हणजेच 26 तारखेला त्याला नागा संन्यासी होण्यासाठीची दीक्षा दिली जाणार आहे.

गेल्या सहा वर्षांपासून तो गुरुंची सेवा करतो आहे. त्यांची मर्जी संपादन करण्यासाठी प्रयत्न करतो आहे. आता कुठे त्याला नागा होण्यासाठीची दीक्षा दिली जाणार आहे.

ही दीक्षा घेतल्यानंतर तो 'भुवनेश्वर पुरी' हे नवं नाव धारण करणार आहे. त्याचे वडीलही साधू बनले आहेत. पण 'नागा साधू' होण्याचा निर्णय त्याचा स्वत:चा आहे.

अंगाला भस्म, कपाळाला चंदनाचा लेप, पायात लोखंडी कडं, कंबरेला आणि डोक्याला झेंडूच्या माळा… हातात कधी डमरु, कधी शंख तर कधी कमंडलू…

मात्र बहुतेकदा असते ती गांजानं भरलेली चिलीम. कुंभमेळा म्हटलं की सर्वांनाच काहीसा गूढ आणि गहन वाटणारा आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे हेच नागा साधू होय.

व्हीडिओ कॅप्शन, नागा साधू होण्यासाठीची ‘टांगतोड’ प्रक्रिया नेमकी काय असते?

पण नग्न आणि अत्यंत विचित्र दिसणारे हे साधू नेमकं येतात तरी कुठून? शाही स्नानात दिसणारे हे शेकडो नागा कुंभमेळ्यानंतर कुठे गायब होतात? ते खरंच हिमालयात असतात का? नव्या नागा साधूंची भरती कशी होते? त्याची प्रक्रिया काय असते? त्याचाच हा शोध…

ग्राफिक्स
ग्राफिक्स

नागा संन्यासी बनतात तरी कसे? त्यांना दीक्षा कशी दिली जाते? त्याची प्रक्रिया काय असते, हा खरं तर औत्सुक्याचा विषय आहे. बाप्पा मंडलशी बोलण्याआधी, मी कुंभमेळ्यातील इतर अनेक नागा साधूंशी संवाद साधला होता.

नागा साधू होण्यासाठीची प्रक्रिया काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. काही नागा साधूंनी "ही गुप्त प्रक्रिया असते आणि आम्ही ती माध्यमांसमोर सांगू शकत नाही," असा पवित्रा घेतला तर काहींनी हातचं राखून, तरीही बऱ्यापैकी सहकार्य करत माहिती दिली.

नागा साधू होण्यासाठीची दीक्षा घेणारा बाप्पा मंडल
फोटो कॅप्शन, नागा साधू होण्यासाठीची दीक्षा घेणारा बाप्पा मंडल

नागा साधूंचं आयुष्य समजून घेण्याआधी कुंभमेळ्यातील आखाड्यांची रचना समजून घ्यावी लागते. कारण, नागा साधू हे याच आखाड्यांशी जोडले गेलेले असतात.

जे साधू आखाड्यांना जोडलेले नसतात, त्यांना साधूच मानलं जात नाही. किंबहुना त्यांना 'खडिया पलटन' अर्थात खोटे साधू-संन्यासी मानलं जातं.

कशी असते कुंभमेळ्यातील आखाड्यांची रचना?

हिंदू धर्मातील वैष्णव आणि शैव या दोन संप्रदायामध्ये प्रामुख्याने अधिकतर अध्यात्मिक विश्व व्यापलं गेलंय. भगवान विष्णू अथवा विष्णूचे अवतार असलेल्या राम आणि कृष्ण या दोन देवांना जे मानतात ते वैष्णव म्हणवले जातात; तर जे भगवान शंकराला मानतात, त्यांना शैव म्हटलं जातं.

नागा साधू

कुंभमेळ्यासारख्या प्रचंड मोठ्या आयोजनांमधून आपापली ताकद दाखवण्याची संधीच या संप्रदायांना मिळत असते. या दोन्ही संप्रदायांचे भारतभर विखुरलेले मठ आणि आश्रम जोडले गेलेले असतात ते विविध आखाड्यांना. 'आखाडा' हा शब्द खरं तर कुस्तीशी संबंधित आहे. तो तिथूनच आध्यात्मिक जगतात आला आहे.

सध्या एकूण 13 आखाडे अस्तित्वात आहेत. 'अखिल भारतीय आखाडा परिषद' या 13 आखाड्यांचं नियमन करते तसेच कुंभमेळ्याचंही नियोजन करते. हे 13 आखाडे तीन प्रकारच्या संप्रदायांमध्ये विभागले गेलेले आहेत. शैव आखाडे, वैष्णव आखाडे आणि शीख धर्माने प्रभावित असलेले उदासीन आखाडे होय.

सध्या एकूण 13 आखाडे अस्तित्वात आहेत.
फोटो कॅप्शन, सध्या एकूण 13 आखाडे अस्तित्वात आहेत.

शैवांमध्ये 7 आखाडे मोडतात तर वैष्णव आणि शीखांमध्ये प्रत्येकी तीन! महानिर्वाणी, जुना, निरंजनी, अटल, आनंद, आवाहन, अग्नी है शैव आखाडे आहेत.

तर निर्वाणी, निर्मोही, दिगंबर हे वैष्णव आखाडे आहेत. उदासीनांमध्ये बाबा उदासीन, छोटा उदासीन आणि निर्मल असे तीन आखाडे आहेत. एकूण तेरा आखाडे तीन प्रमुख संप्रदायांमध्ये विभागले गेले असले तरीही यातला प्रत्येक आखाडा कमी-अधिक फरकाने वेगवेगळा आहे.

वैष्णव आखाड्यांमधील साधूंना वैरागी म्हटलं जातं तर शैव आखाड्यांमधील साधूंना दशनामी वा संन्यासी म्हटलं जातं. त्यामुळे, नागा संन्यासी आढळतात ते फक्त शैव आखाड्यांमध्येच! आवाहन आखाडा हा शैव आखाड्यांमधला सर्वांत पहिला आखाडा मानला जातो.

मात्र, यासंदर्भातले कोणतेही लेखी पुरावे नसल्याने त्याबाबतही वाद आहेत. शिवाय, पहिले तेरा आखाडे महत्त्वाचे मानले जात असले तरीही परस्पर मतभेदांमधून त्यांच्याच अनेक शाखा निर्माण झाल्याचं दिसून येतं.

नागा साधू होण्यासाठीची प्रक्रिया नेमकी काय आहे?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बाबा बालक गिरी 2016 साली नागा साधू बनले आहेत. ते सांगतात, "आम्हाला जीवंतपणीच स्वत:चं पिंडदान करावं लागतं. त्यानंतर परिवाराशी आमचं काहीही नातं उरत नाही. आमच्यावर पंचसंस्कार केले जातात.

त्यामध्ये मंत्र गुरू, विभुती गुरू, लंगोटी गुरू, रुद्राक्ष गुरू आणि जनेऊ गुरू असे पाच गुरू एकेक प्रक्रिया पार पाडतात. मंत्र गुरू आमची चोटी (शेंडी) कापतो आणि कानात तीनवेळा मंत्र फुंकतो. विभुती गुरू आम्हाला विभुती देतो. तिसरा गुरू लंगोटी देतो, चौथा रुद्राक्ष गुरू रुद्राक्षमाळा देतो तर पाचवा जनेऊ गुरू आम्हाला जनेऊ (जानवं) देतो. त्यानंतर आमचं लिंग तोडलं जातं."

विविध नागा साधूंशी बोलताना बऱ्याच जणांनी या लिंग तोडण्याच्या प्रक्रियेचा उल्लेख विविध शब्दांमध्ये केला. जसे की, 'हमारा लिंग तोडा जाता है', 'इंद्रिय निस्तेज किया जाता है', 'टांग तोडी जाती है', 'काम भावना नष्ट की जाती है' इत्यादी.

पण, या प्रक्रियेत नेमकं काय केलं जातं, याची सविस्तर माहिती आवाहन आखाड्याचे थानापती विजय पुरी यांनी दिली. आपण सोळाव्या वर्षी नागा संन्यासी होण्यासाठीची दीक्षा घेतल्याचं ते सांगतात. आखाड्याच्या कामकाजामुळे सध्या आपण वस्त्र परिधान केले असून आपण एक दिगंबर साधू आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

आवाहन आखाड्याचे थानापती विजय पुरी
फोटो कॅप्शन, आवाहन आखाड्याचे थानापती विजय पुरी

थानापती विजय पुरी सांगतात की, "ज्याला नागा संन्यासी बनायचं आहे त्याला दुसऱ्या एका संन्यासीकडेच यावं लागतं, ज्याचे सोळा संस्कार झालेले आहेत तसेच विजय हवन झालेला आहे. सर्वांत आधी त्याला ब्रह्मचर्याची दीक्षा दिली जाते. त्याला पांढरं वस्त्र दिलं जातं.

त्यानंतर तीन, पाच, आठ अथवा बारा वर्षे गुरुंची सेवा करावी लागते. त्याची योग्यता तपासल्यानंतर गुरुंकडून त्याला नागा संन्यासी होण्यासाठीची दीक्षा दिली जाते. यामध्ये पंचसंस्कार झाल्यानंतर त्याला 'महापुरुष' म्हटलं जातं. त्यानंतरच्या आगामी कुंभमेळ्यामध्ये त्याच्यावर सोळा संस्कार होतात आणि त्याचं पिंडदान केलं जातं."

कुंभमेळ्यामध्ये साधू होऊ इच्छिणाऱ्यांवर सोळा संस्कार होतात आणि त्याचं पिंडदान केलं जातं.
फोटो कॅप्शन, कुंभमेळ्यामध्ये साधू होऊ इच्छिणाऱ्यांवर सोळा संस्कार होतात आणि त्याचं पिंडदान केलं जातं.

आवाहन आखाड्याचे महंत कैलाश पुरी सांगतात की, "यानंतर त्याही पुढे जाऊन ज्याची नागा साधू बनायची इच्छा आहे, त्याला आणखी एक गुरू धारण करावा लागतो. त्याला 'दिगंबर गुरु' असं म्हणतात. आखाड्याच्या मध्यवर्ती भागातील छावणीमध्ये जो ध्वज उभा केला आहे, तिथे विजय हवन झाल्यानंतर टांगतोड प्रक्रिया केली जाते.

तिथे नागा साधू होऊ इच्छिणाऱ्या साधूचं लक्ष वर ध्वजाकडे केंद्रित करायला सांगितलं जातं. त्यानंतर दिगंबर गुरू एका विशेष मुद्रेमध्ये त्याच्या लिंगाला पकडतात, एक विशिष्ट मंत्र म्हणतात आणि तीनवेळा जोरदार झटका देतात. त्यानंतर त्याची स्थिती वेगळीच बनते, ज्याबाबत आम्ही उघडपणे कुठेही व्यक्त होत नाही."

आवाहन आखाड्याचे महंत कैलाश पुरी
फोटो कॅप्शन, आवाहन आखाड्याचे महंत कैलाश पुरी

नागा संन्यासी होऊ इच्छिणाऱ्या साधूचं लिंग खेचून निकामी केलं जातं. यालाच 'टांगतोंड' असंही म्हटलं जातं. लिंग हाताने खेचल्याने अर्थातच प्रचंड वेदना होणं स्वाभाविक आहे. मात्र, बीबीसीशी बोलताना काही नागा संन्यासींनी ते अमान्य केलं.

टांगतोड प्रक्रियेनंतर वेदना होत नाहीत का, या प्रश्नावर "दर्द-वेदना वगैरा कुछ नहीं होता है. सब गुरू की कृपा होती है," असंही काही नागा साधूंनी म्हटलं. मात्र, टांगतोड प्रक्रियेमुळे होणाऱ्या वेदनेबाबतचं खरंखुरं वर्णन आवाहन आखाड्याचे थानापती महंत विजय पुरी यांनीच केलं.

आखाड्याच्या मध्यवर्ती भागातील छावणीमध्ये जो ध्वज उभा केला आहे, तिथे विजय हवन झाल्यानंतर टांगतोड प्रक्रिया केली जाते.
फोटो कॅप्शन, आखाड्याच्या मध्यवर्ती भागातील छावणीमध्ये जो ध्वज उभा केला आहे, तिथे विजय हवन झाल्यानंतर टांगतोड प्रक्रिया केली जाते.

आपल्याला झालेल्या वेदनांचं वर्णन करताना ते म्हणाले की, "जेव्हा माझ्यावर टांगतोड प्रक्रिया झाली होती, तेव्हा मी कमीतकमी एक महिना माझं नाभीस्थळ पकडून वेदनेनं कळवळत होतो. तेव्हा इतक्या असहनीय अशा वेदना झाल्या होत्या की मी त्या शब्दात सांगू शकत नाही."

नाव न घेण्याच्या अटीवर बीबीसीशी बोलताना एका साधूनं सांगितलं की, "मला जर आधीच कल्पना असती की इतकी वेदना होते, तर कदाचित मी अशी दीक्षा घेतलीच नसती."

'टांगतोड' प्रक्रिया कितपत शास्त्रीय?

इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी चेअरमन तसेच कन्सल्टींग सर्जन अँड ऍनोरेक्टल सर्जन डॉ. रवींद्र वानखेडकर यांनी यासंदर्भात म्हटलं की, "लिंगामध्ये तीन नलिका असतात. त्यातली एक मूत्रवाहिनी असते तर उर्वरित दोन लिंगामध्ये ताठरपणा आणणाऱ्या रक्तवाहिन्या असतात. जेव्हा लिंग अशाप्रकारे जोरदार ताकद लावून खेचलं जातं तेव्हा ते फ्रॅक्चर होतं. म्हणजेच, त्यामध्ये प्रचंड प्रमाणात रक्त जमा होतं. त्याचा दीर्घकालीन परिणाम म्हणजे पुढील आयुष्यात हे लिंग कधीच ताठरपणा अनुभवू शकत नाही."

लाल रेष

कुंभमेळ्याबद्दलच्या या बातम्याही वाचा:

लाल रेष

"नागा साधूंनी आजन्म ब्रह्मचर्य पत्करायचं असतं. मात्र, भविष्यात कधीही तशी कामभावना निर्माण झाली तरीही त्यांचं लिंग कधीच तिष्ठू नये, यासाठीच हा प्रकार त्यांच्यासमवेत केला जात असावा. मात्र, हा प्रचंड अघोरी विधी आहे. यामुळे, भविष्यात लिंगामध्ये कधीच ताठरपणा येऊ शकत नाही अथवा काहींमध्ये ताठर व्हायची वेळ आलीच तर प्रचंड वेदनांना सामोरं जावं लागू शकतं."

विरक्ती की सुखासीनता?

दीक्षेचा हा एकूण विधी फार कठीण समजला जातो. काही दिवस कडक उपवासाचं व्रत असतं. मग फक्त लंगोटीवर म्हणजे एकवस्त्री व्रत असतं. त्यानंतर आई-वडिलांचं श्राद्ध करायचं. मग त्यानंतर स्वत:चंही श्राद्ध घालायचं. थोडक्यात, मागचं संपूर्ण आयुष्य त्यागायचं.

पूर्वायुष्याशी सर्व नातं तोडून नवं जीवन सुरु करायचं. घरदार, मित्रमंडळी सर्वांचा त्याग करायचा. कशाचीच आसक्ती ठेवायची नाही. अगदी कपड्याचीही आसक्ती नाकारायची. सर्व सुखांना नाकारायचं. विरक्तीला आपलंसं करायचं. मग गुरु एक मंत्र देतो. नवं साधूनाम देतो. जुनी ओळख पूर्णपणे पुसली जाते.

सर जदुनाथ सरकार यांनी आपल्या 'अ हिस्ट्री ऑफ दशनामी नागा संन्यासीज्' या आपल्या पुस्तकामध्ये नागा साधूंबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ते सांगतात की, "ज्याने दीक्षा घेतली आहे, त्याने दिवसातून एकच वेळा जेवायचं असतं.

सातहून अधिक घरांमध्ये अन्नासाठी भिक्षा मागू नये. फक्त जमिनीवरच झोपावं. कुणासमोर झुकू नये, कुणाचं कौतुक करु नये, तसेच कुणाविषयी वाईटही बोलू नये. आपल्याहून मोठ्या असलेल्या संन्यासीच्या समोरच ते झुकून वंदन करु शकतात. त्यांनी वस्त्र परिधान करु नये. केल्यास ते फक्त भगवेच असावे."

एका बाजूला विरक्ती हेच जीवनाचं सार आहे, असं सांगणारे हे साधू आता मात्र स्मार्टफोन वापरताना दिसतात.
फोटो कॅप्शन, एका बाजूला विरक्ती हेच जीवनाचं सार आहे, असं सांगणारे हे साधू आता मात्र गॉगल आणि स्मार्टफोन वापरताना दिसतात.

ही दीक्षा घेतल्यानंतर साधू विरक्तीचं आयुष्य पत्करतो. तो सुखापासून, अहंकारापासून अलिप्त होतो, असं म्हणतात. मात्र, वास्तव काहीसं वेगळं आहे.

कुंभमेळ्यातील साधूंचं वर्तन याहून अगदी उलट दिसून येतं. ते सुखासीन झालेले दिसतात. गॉगल घालतात. स्मार्टफोन वापरतात. महागड्या गाड्यांचा वापर करतात. अश्लील शिव्यांचा सर्रास वापर करतात. चिलीम आणि गांजाचं सेवन हे तर त्यांच्यासाठी नित्याचंच आहे. बरेचसे नागा साधू आधी पैशांची मागणी करतात. त्यासाठी दमदाटीही करताना दिसतात.

मोबाईल वापरणारे नागा साधू
फोटो कॅप्शन, मोबाईल वापरणारे नागा साधू

एका बाजूला विरक्ती हेच जीवनाचं सार आहे, असं सांगणारे हे साधू आता मात्र स्मार्टफोन वापरताना दिसतात. ते अनेकदा क्षुल्लक कारणांवरुन संतापतात, हमरीतुमरीवर येतात.

मारझोडही करतात. कुणी आधी स्नान करावं, कुठे करावं, कसं करावं, यावरुनही हे आखाडे आपापसात भांडतात, हुज्जत घालतात आणि प्रसंगी रक्तरंजित संघर्षही करतात. आजवरचा इतिहास हेच सांगतो.

'खडिया पलटन' अर्थात खोटे नागा साधू

थानापती महंत प्रशांत गिरी खोट्या नागा साधूंवर राग व्यक्त करताना दिसतात. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले की, "अनेक जण विभूती लावून डुप्लिकेट बाबा होऊन फिरत आहेत. कुंभमेळ्यात असे अनेक डुप्लीकेट बाबा आहेत. ज्यांनी दिक्षा घेतली आहे, त्यांना आमच्या आखाड्याकडून तसं प्रमाणपत्र दिलं जातं. मात्र, या खोट्या साधूंकडे काहीही नसतं. ते निव्वळ पैशांसाठी इथं आलेले असतात."

पुढे ते सांगतात की, सामान्य लोकांना असली आणि नकली नागा साधूंमधील फरक ओळखता येत नाही. सर्वांची वेषभूषा आणि केषभूषा सारखीच असल्याने हा गोंधळ होतो. अशांना ते 'खडिया पलटन' असं म्हणतात. ज्यांनी रितसर दीक्षा घेतलेली नाही असे साधू म्हणजे ही खडिया पलटन होय. ते कोणत्याही आखाड्याचे सदस्य नसतात.

थानापती महंत प्रशांत गिरी खोट्या नागा साधूंवर राग व्यक्त करताना दिसतात.
फोटो कॅप्शन, थानापती महंत प्रशांत गिरी खोट्या नागा साधूंवर राग व्यक्त करताना दिसतात.

शोध पत्रकार धीरेंद्र झा आपल्या 'असेटीक गेम्स : साधूज्, आखाडाज् अँड द मेकिंग ऑफ द हिंदू व्होट' या आपल्या पुस्तकात अशाच खोट्या नागा साधूंबद्दल वेगळा दावा करतात.

ते सांगतात की, शाही स्नानावेळी आपल्या आखाड्यातील नागा साधूंची संख्या अधिक दाखवण्यासाठी आखाड्यांकडूनच खोट्या नागा साधूंना तात्पुरतं पैसे देऊन आणलं जातं. बरेचदा हे तीर्थस्थळी फिरणारे भिक्षेकरी असतात.

आपल्या पुस्तकात ते लिहितात की, ज्या नागा साधूने दीक्षा घेतली आहे, त्याचं लिंग कधीच तिष्ठत नाही. खरं तर असली आणि नकली नागा साधू ओळखण्याची ही एक अनोखी आणि सर्वसामान्यांना माहिती नसलेली पद्धत असल्याचं ते सांगतात.

इतरवेळी हे नागा साधू कुठे राहतात?

'कुंभमेळा: एक दृष्टीक्षेप' या पुस्तकामध्ये पत्रकार दीप्ती राऊत लिहितात की, "दीक्षा घेणं, संन्यस्त जीवन जगणं फार कठीण आहे, असा जरी नागा साधूंचा दावा असला तरीही आता याबाबतही फार पूर्वीसारखे कडक नियम राहिलेले नाहीत. संसार, घरगृहस्थी नसणारेही बरेचसे साधू त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात असतात."

लवकरच नागा साधू होऊ पाहणाऱ्या बाप्पा मंडलला यासंदर्भात आम्ही प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला की, "मी माझ्या आई-वडिलांकडे जाणार नाही. पण ते स्वत:हून भेटायला आले तर मी भेट घेईन."

इतरवेळी हे नागा साधू कुठे असतात, हा असाच एक गूढ वाटणारा प्रश्न आहे.
फोटो कॅप्शन, इतरवेळी हे नागा साधू कुठे असतात, हा असाच एक गूढ वाटणारा प्रश्न आहे.

इतरवेळी हे नागा साधू कुठे असतात, हा असाच एक गूढ वाटणारा प्रश्न आहे.

"आम्ही इतरवेळी हिमालयात राहतो. तपस्या करतो," अशाच स्वरुपाची उत्तरे अनेक नागा साधूंनी दिली.

आवाहन आखाड्याचे थानापती महंत विजय पुरी म्हणाले की, "कुंभमेळा नसतो तेव्हा अनेक नागा साधू ठिकठिकाणी भ्रमंती करत असतात. शिवाय, काही जण आपापल्या आखाड्यांच्या आश्रमांमध्ये आणि मठांमध्येही वास्तव्यास असतात."

नागा साधू कोण होते?

आपले पूर्वज सनातन धर्माच्या संरक्षणासाठी लढले, असा दावा आताच्या नागा साधूंकडून केला जातो. त्यांचा असा दावा असला तरीही इतिहासातील वास्तव वेगळं असल्याचं अभ्यासक नमूद करतात.

खरं तर या साधूंच्या हातात ही शस्त्र नेमकी कधी आली, याचा ठोस उल्लेख इतिहासात सापडत नाही. मात्र, त्यांनी त्या त्या काळातील राजकीय सत्तेशी संधान बांधून आर्थिक सत्तेवर नेहमीच ताबा राखल्याचे पुरावे बरेच सापडतात.

हे नागा साधू म्हणजेच कधीकाळचे लढवय्ये संन्यासी होय. त्यांनी मुघलांपासून ते राजपुताना राजांपर्यंत… जो त्यांना पोसेल, त्यांच्याकडे त्यांनी चाकरी केली. ते एखाद्या राखीव फौजेसारखं काम करायचे. त्याबदल्यात त्यांना तनख्वा आणि जमिनीही मिळायच्या.

नागा साधू हे एखाद्या प्रशिक्षित राखीव पलटणीप्रमाणे काम करायचे, असे इतिहास अभ्यासक सांगतात.

काही गिरी गोसावी आपल्या प्रशिक्षित पलटणी घेऊन अवधचा नवाब, भरतपूरचा जाट राजा, बनारसचा राजा, बुंदेलखंडचे राजे, मराठा राजे माधवजी सिंधिया, जयपूर, जैसलमेरचे महाराज यांच्यासाठी लढले आहेत, अशी माहिती इतिहास अभ्यासक आनंद भट्टाचार्य आपल्या पुस्तकातून देतात.

खरं तर या साधूंच्या हातात ही शस्त्र नेमकी कधी आली, याचा ठोस उल्लेख इतिहासात सापडत नाही.
फोटो कॅप्शन, खरं तर या साधूंच्या हातात ही शस्त्र नेमकी कधी आली, याचा ठोस उल्लेख इतिहासात सापडत नाही.

दीप्ती राऊत आपल्या पुस्तकात सांगतात की, "नागा साधू म्हणजे आखाड्याला सर्वस्व वाहिलेला, धर्मासाठी लढणारा साधूसैनिक होय. नग्नतेमुळे या साधूंबद्दल समाजात मोठी उत्सुकता असते, पण नागा म्हणजे फक्त नग्न नाही, तर नागा म्हणजे धर्मासाठी लढणारा, लढण्यासाठी सदैव तत्पर असलेला, सर्वसंगपरित्याग केलेला आणि वाहून घेतलेला साधू होय. हातात शस्त्र घेतलेले शस्त्रधारी, चेहऱ्याला आणि शरीराला राख फासलेले भस्मधारी नागा साधू म्हणजे आखाड्याची शारीरिक ताकद असायची. आखाड्यांचं आणि साधूंचं संरक्षण करणं, ही त्यांची जबाबदारी असायची."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)