कुंभमेळा 2019 : तृतीयपंथी आखाड्यासाठी यंदाचा कुंभ का आहे महत्त्वाचा?

किन्नर आखाड्याकडून आशीर्वाद घेताना भक्त
फोटो कॅप्शन, तृतियपंथी साधूकडून आशिर्वाद घेताना भक्त.
    • Author, अंकित श्रीनिवास
    • Role, फोटो जर्नलिस्ट

15 जानेवारी ते 4 मार्च या काळात अलाहाबादमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्याआधी तृतीयपंथीय साधूंनी शहरात मिरवणूक काढली. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी हजारो लोकांनी रस्त्यांवर गर्दी केली होती.

जगातला सर्वांत मोठा धार्मिक मेळा म्हणून ओळख असलेला कुंभमेळा हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो.

गेली अनेक शतकं हा मेळा आयोजित केला जातोय. देशात चार वेगवेगळ्या शहरांमध्ये आलटूनपालटून हा मेळा आयोजित केला जातो. या काळामध्ये गंगेत स्नान केल्यामुळे सर्व पापं धुतली जातात, अशी हिंदू धर्मियांची श्रद्धा आहे. त्यामुळे लक्षावधी लोक पवित्र स्नानासाठी एकत्र येतात.

या कुंभमेळ्यासाठी हिंदू धर्मातील 13 अधिकृत आखाड्यांपैकी दररोज एक आखाडा मिरवणुकीसह शहरात प्रवेश करत आहे.

कुंभामध्ये असा रथातून प्रवेश केला जातो.
फोटो कॅप्शन, कुंभमेळ्यामध्ये असा रथातून प्रवेश केला जातो.

सजवलेल्या रथांमधून येणाऱ्या साधूंचं स्वागत रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या लोकांकडून केलं जात आहे.

मात्र या रविवारची मिरवणूक वेगळी होती. नेहमीप्रमाणे सजवलेले रथ, घोडे, उंट, म्युझिक बँडही होते. मात्र साधू तृतीयपंथी होते.

भारतामध्ये साधारण 20 लाख तृतीयपंथी आहेत असा अंदाज आहे. 2014 साली सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निर्णयात तृतीयपंथीयांना थर्ड जेंडर म्हणून मान्यता दिली.

तसंच 2018 साली सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी संबंधांना मान्यता दिली.

अलाहाबादमध्ये सर्वात मोठा कुंभ मेळा भरतो.
फोटो कॅप्शन, अलाहाबादमध्ये सर्वांत मोठा कुंभमेळा भरतो.

"हे निर्णय म्हणजे आमच्या दृष्टीने मोठे विजय आहेत. आम्हाला समाजमान्यता मिळावी, यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. कुंभ मेळा हे त्या दृष्टीने उचललेलं एक पाऊल आहे," असे किन्नर आखाड्याच्या प्रमुख लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी सांगितलं.

तृतीयपंथीयांचे हिंदू पुराणं आणि प्राचीन ग्रंथांमध्ये अनेक उल्लेख आहेत. तसंच काही देव-देवतांची तृतीयपंथी रूपंही आहेत. मात्र लैंगिकतेवरून अजूनही मोठा भेदभाव केला जात असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

अशा मिरवणुकांमध्ये अग्रस्थानी राहाण्यासाठी किन्नर आखाड्याचा इतर आखाड्यांशी लढा सुरू आहे. अधिकृत परवानगी मिळाली नसूनही त्यांनी मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला.

मिरवणुकीत सामील झालेले वादक
फोटो कॅप्शन, मिरवणुकीत सामील झालेले वादक.

"हिंदू पुराणामध्ये सर्वत्र तृतीयपंथीयांचे उल्लेख आहेत, पण आम्ही आसपास असलेलं त्यांना नको आहे," असं किन्नर आखाड्याचे सदस्य अर्थव यांनी सांगितलं.

"पुरुष आणि महिलांसाठी 13 आखाडे आहेत, मग तृतीयपंथीयांसाठी एक का नसावा?"

काही आखाडे आपले आखाडे शेकडो वर्षं जुने असल्याचं मानतात, पण हा नवा आखाडा समाविष्ट करून घेण्यास ते नकार देतात.

"कुंभ मेळ्यात सर्वांचं स्वागत असतं. आम्ही इथं तृतीयपंथीयांचंही स्वागत करतो. पण त्यांच्या आखाड्याला परवानगी नाही," असं जुना आखाडा या एकूण 13 आखाड्यांमधील सर्वांत मोठ्या आखाड्याचे प्रवक्ते विद्यानंद सरस्वती यांनी सांगितलं.

तृतीयपंथीयांची मिरवणूक पाहायला जमलेले लोक
फोटो कॅप्शन, तृतीयपंथीयांची मिरवणूक पाहायला जमलेले लोक.

"जर कोणाला अध्यात्म आणि धर्माचा प्रसार करायचा असेल तर आम्ही विरोध करणार नाही. पण काही गोष्टी आमच्यावर सोपवा," अशा शब्दांमध्ये ते प्रतिक्रिया देतात.

मात्र काही धर्मिक नेते किन्नर आखाड्याला परवानगी देतात.

"हिंदू धर्माने तृतीयपंथियांना नेहमीच मान्यता दिली आहे, स्वीकारलं आहे. ते फक्त त्यांचे हक्क मागत आहेत, तर मग आपण ते देणं का नाकारावेत?" असं मत एका प्रमुख मंदिराचे पुजारी आत्मानंद महाराज व्यक्त करतात.

तृतीयपंथियांची मिरवणूक होण्याची ही पहिली वेळ नाही. 2016मध्ये उज्जैनमध्ये झालेल्या कुंभमेळ्यातही अशी मिरवणूक झाली होती.

मिरवणूक पाहाण्यासाठी हजारो लोक जमले होते
फोटो कॅप्शन, मिरवणूक पाहाण्यासाठी हजारो लोक जमले होते.

"अलाहाबादमधील कुंभ मेळा अधिक महत्त्वाचा आणि इतरांपेक्षा मोठा असल्यामुळे तिथल्या मिरवणुकीला विशेष महत्त्व आहे," असं अथर्व म्हणतात.

मात्र किन्नर आखाड्याला स्वतंत्र जागा मिळवण्यास दोन वर्षं पाठपुरावा करावा लागला. सर्व आखाड्यांना कुंभमेळ्यात स्वतंत्र जागा वितरित केली जाते.

"आम्हाला विरोध करणाऱ्या आखाड्यांचा आम्ही सन्मान करतो. हिंदू धर्म तृतीयपंथियांसह सर्वांचा आदर करतो याची जाणिव त्यांना कधीतरी होईल. आता आमच्या लढाईला केवळ आखाड्याला मान्यतेसाठी चाललेली लढाई म्हणून न पाहाता लोकांना आमची धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक ओळख होण्यासाठीची लढाई म्हणून पाहावं. आमचं स्वागत करणाऱ्या लोकांकडे पाहिल्यावर आम्ही योग्य असल्याची जाणिव झाली," असं अथर्व सांगतात.

भवानी माँ
फोटो कॅप्शन, इतक्या भक्तांनी दर्शन घेण्याला वेगळंच महत्त्व आहे, असं भवानी माँ म्हणतात.

मिरवणुकीतील साधूंकडून आशीर्वाद घेण्यासाठी तसंच त्यांचे फोटो, व्हीडिओ काढण्यासाठी लोक गर्दी करत होते.

"आम्ही नेहमीच मुलांचे जन्म तसंच विवाहाच्यावेळेस तृतीयपंथीयांचे आशीर्वाद घेतो", असं अभय शुक्ला हे अलाहाबादचे रहिवासी सांगतात.

"पण त्यांची कधी साधूच्या जागी कल्पना केली नव्हती. आमच्यासाठी हा वेगळा अनुभव आहे."

ही मिरवणूक म्हणजे तृतीयपंथियांच्या भारतातील अधिकारांसाठी असलेल्या लढाईतील मैलाचा दगड असल्याचं किन्नर आखाडा मानतो.

लक्ष्मी नारायण त्रिपाठी
फोटो कॅप्शन, अलाहाबाद येथे काढलेल्या मिरवणुकीत लक्ष्मी नारायण त्रिपाठी.

"आज जमलेल्या गर्दीकडे पाहून बदल शक्य आहे हे जाणवल्याचं" भवानी माँ सांगतात.

"इतका मोठा प्रतिसाद मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. पुढील आयुष्यात आमच्यासाठी चांगलं भविष्य असल्याचं या कुंभात दिसतं. आजवर हेटाळणी, अत्याचार, बाजूला फेकलं जाणं यचा त्रास आम्ही भोगलेला आहे. त्यामुळंच हे लोक आम्हाला आता पाहायला आले आहेत," असं त्या म्हणतात.

या भावनेला अभय शुक्लाही दुजोरा देतात. ते म्हणतात, "माझ्यादृष्टीने अध्यात्माला महत्त्व आहे. माझा गुरु पुरुष आहे, स्त्री की तृतीयपंथी याच्याशी माझा संबंध नाही. अनेक लोक अशा पद्धतीने विचार करत नाहीत हे मला माहिती आहे. ते कुंभ मेळा आणि किन्नर आखाडा पाहायला येतील तेव्हा त्यांच्या विचारात बदल होईल."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)