धर्मांचं चिनीकरण: इस्लाम, बौद्ध, ख्रिश्चन धर्मांवर चीनमध्ये असेही निर्बंध

देशात धार्मिक स्वातंत्र्याचं रक्षण केलं जातं, अशी चीनची भूमिका असली तरीही देशात नेहमी धार्मिक स्वातंत्र्य दाबलं जात असल्याची टीका होत असते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, देशात धार्मिक स्वातंत्र्याचं रक्षण केलं जातं, अशी चीनची भूमिका असली तरीही देशात नेहमी धार्मिक स्वातंत्र्य दाबलं जात असल्याची टीका होत असते.
    • Author, प्रतीक जाखड
    • Role, पूर्व आशिया तज्ज्ञ, बीबीसी मॉनिटरिंग

गेल्या काही महिन्यांत चीनमध्ये धार्मिक उपक्रमांवर निर्बंध आणले जात आहेत. यामुळे चीनमधील धार्मिक स्वातंत्र्याच्या स्थितीवर देशाबाहेरील संस्थांनी काळजी व्यक्त केली आहे.

चीनमध्ये स्थानिक मुस्लिमांच्या हालचाली आणि बायबलच्या प्रतींची ऑनलाईन विक्री, यावर निर्बंध आणि नियंत्रणाद्वारे धार्मिक गटांवर निर्बंध आणले जात आहेत, असं वृत्त आहे.

देशात धार्मिक स्वातंत्र्याचं रक्षण केलं जातं, अशी चीनची भूमिका असली तरीही देशात नेहमी धार्मिक स्वातंत्र्य दाबलं जात असल्याची टीका होत असते.

चीनमध्ये सध्या 'अध्यात्मिक पुनरुत्थान' सुरू आहे, त्यामुळे कम्युनिस्ट पक्ष अस्वस्थ आहे, असं काही परदेशस्थित भाष्यकारांना वाटतं.

चीनमध्ये इस्लाम, बौद्ध, कॅथलिक आणि प्रोटेस्टंट ख्रिश्चन आणि टाओइज्म या पाच धर्मांना मान्यता आहे. तर बहुतांश चिनी लोक निरीश्वरवादी आहेत.

समाजवादी विचार केंद्रस्थानी असलेलं इस्लामी आचरण

चीनमध्ये वीगर मुस्लीम, वायव्य शीनजिआंग प्रांतातील आणि तिबेटमधील बौद्ध यांच्या धर्माचरणांवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध आणल्याचं परदेशस्थित संस्थांनी गेल्या काही वर्षांत म्हटलं आहे.

चीन

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या काही महिन्यांत चीनच्या प्रशासनाने धर्माचरणाचं नेतृत्व हाती घेतल्याचं चित्र आहे.

देशातील सर्व मशिदींवर राष्ट्रध्वज फडकवण्यात यावा, समाजवादी मूल्यांचा अभ्यास करावा, देशभक्तीचा विचार पुढं न्यावा, अशी घोषणा अधिकृत माध्यमांतून करण्यात आली आहे.

वांशिक अभ्यासांचे तज्ज्ञ क्षाँग कुक्षिन यांनी सरकारी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की या प्रयत्नांमुळे इस्लामचं चिनीकरण होऊन धार्मिक शिकवण चीनच्या संस्कृतीमध्ये अंतर्भूत होईल.

वीगर मुस्लिमांच्या परदेशस्थित माध्यमांनी मात्र वायव्य प्रांतातील मुस्लिमांच्या धर्माचरणावर निर्बंध आणले जात असल्याची टीका केली आहे. टर्की येथील The Istiqlal या वीगर भाषेतील वेबसाईटने म्हटलं आहे की रमझान महिन्यात क्षिनजिआंग प्रांतात जी निर्बंध घातली जात आहेत ती अधिकाधिक कठोर होत आहेत.

ख्रिस्ती आणि बौद्धांवरही निर्बंध

पण सरकारचे हे निर्बंध फक्त मुस्लिमांसाठी मर्यादित नाहीत.

एप्रिल महिन्यात हाँगकाँगमधील एका स्वतंत्र माध्यमाने म्हटलं होत की चीनमधील इंटरनेट वापरणाऱ्यांना मेनलँड चीनमध्ये बायबल आणि इतर धर्मग्रंथ ऑनलाइन मिळणं कठीण झालं आहे.

व्हीडिओ कॅप्शन, विगर मुस्लिमांना कट्टरतावाद विरोधी प्रशिक्षण देत आहोत - चीन

चीनमध्ये बायबलचा समावेश "अंतर्गत वितरणांसाठी"च्या पुस्तकांत करण्यात आला आहे. म्हणजे बायबलची विक्री फक्त सरकारमान्य संस्थांद्वारेच होऊ शकते. हाँगकाँगमधील उदारमतवादी 'ओरिंएटल डेली'नं या नियमांचं कडक पालन होत असून ख्रिस्ती धर्माच्या "नियोजनासाठी" सरकारच्या कार्यक्रमाचा एक भाग असल्याचं म्हटलं आहे.

काही महिन्यांपूर्वी शांक्षी प्रांतात 'अवैधरीत्या बांधलेलं चर्च' प्रशासनाने पाडलं होतं. तर पूर्व झेजिंग प्रांतात चर्चवरील 'बेकायदेशीर क्रॉस' हटवण्यात आल्याच्या बातम्या माध्यमांत आल्या होत्या.

चीनमधील राष्ट्रीय वृत्तपत्र असलेल्या 'ग्लोबल टाइम्स'ने मे महिन्यात बातमी दिली होती. यामध्ये भारतात 'चुकीच्या पद्धतीने' बौद्ध धर्माचे धडे घेतलेल्या बौद्ध धर्मगुरूंना चीनमध्ये बौद्ध धर्मावर मार्गदर्शन करण्यास बंदी घालण्यात आली आहे, असं म्हटलं होतं.

निवृत्त वरिष्ठ सरकारी अधिकारी झू वैकून यांनी स्थानिक बौद्ध धर्मीयांच्या सहकार्याने फुटीरतावादी हालचालींनी पायबंद घालण्यासाठी हे प्रयत्न आवश्यक आहेत, अशी प्रतिक्रिया यावर दिली होती.

कम्युनिस्ट पार्टीच्या सेंट्रल युनायटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंटने बौद्ध आणि टाओइज्मचं व्यावसायीकरण रोखण्यासाठी धार्मिक पुतळ्यांच्या उभारणीवर निर्बंध घालावेत, असे आदेश दिले होते.

धर्मांचं चिनीकरण

हे निर्बंध असताना दुसरीकडे सरकारची धर्मांचं चिनीकरण होण्यासाठी नवे नियमही अंमलात येत आहेत.

फेब्रुवारी महिन्यात चीनमध्ये धार्मिक घडामोडी नियमन कायद्यात सुधारणा करण्यात आली. यावर परेदशातील मानवी हक्कांवर काम करणाऱ्या संस्थांनी चिंता व्यक्त केली होती.

चीन

फोटो स्रोत, Getty Images

बेकायदेशीर धार्मिक हालचालींमध्ये धार्मिक घडमोडींवर ऑनलाईन चर्चा करण्याचाही समावेश आहे. परदेशी नागरिकांच्या धार्मिक हालचालींबद्दलचा कायदाही पुढील महिन्यात अस्तित्वात येत आहे.

झू वैकून यांनी या मार्गदर्शक तत्त्वांमुळे काही परदेशी गट धर्माच्या आधारे चीनमधील धार्मिक गटांवर नियंत्रण आणून राजकीय हालाचाली करू पाहतात, त्यांच्यावर नियंत्रण येईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

चीनने एप्रिलमध्ये धर्मांवर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये धर्मांचा कल हा चिनी असलं पाहिजे, तसेच धर्माचरण करणाऱ्यांनी देश आणि कम्युनिस्ट पक्षाच्या कनिष्ठ सहकाऱ्याची भूमिका पार पाडावी असं म्हटलं आहे.

सरकारने सामाजिक स्थिरता आणि सुसंवाद यासाठी नवे नियम आवश्यक आहेत, असं समर्थन केलं आहे. तसेच चीनचं अंतर्गत धोके आणि परदेशी घुसखोरी यांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक आहे, असं ही सरकारने म्हटलं होतं.

धर्माचरणात वाढती रुची

निर्बंध आणि अडथळे असतानाही चीनमध्ये धर्मांत रुची घेणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे, असं काही संस्थांचं मत आहे.

अमेरिकेतील फ्रीडम हाऊस या संस्थेने 2017मध्ये म्हटलं होतं की चीनमध्ये धार्मांवरील नियंत्रणं वाढत असली तरी विविध श्रद्धांच्या अनुषंगाने अध्यात्माचं पुनरुत्थान होत आहे, असा अनुभव आहे.

चीन

फोटो स्रोत, Getty Images

सरकारी दृष्टीने अनिधिकृत असलेले भूमिगत चर्च, बंदी घातलेले धार्मिक गट आणि इतर काही धर्म यांच्या माध्यमातून हे होत आहे, असं या संस्थेनं म्हटलं आहे.

तर 'कोरिया टाइम्स'ने चीनमध्ये ख्रिश्चन धर्माबद्दलची रुची वाढत असून जगात ख्रिश्चन धर्माचा प्रसार कुठल्याही भागापेक्षा जास्त वेगाने चीनमध्ये होत आहे, असं म्हटलं होतं.

व्हीडिओ कॅप्शन, चीनमध्ये उईघर मुस्लिमांना का कोंडल जात आहे?

2016मध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने एका अहवालात चीनमध्ये जवळपास 65 कोटी लोक धर्मांवर विश्वास ठेवणारे आहेत. त्यात ख्रिस्ती धर्मांचं पालन करणाऱ्यांची संख्या वाढत आहे, असं म्हटलं आहे.

(बीबीसी मॉनिटरिंग जगभरातल्या टीव्ही, रेडिओ, प्रिंट आणि वेब माध्यमांतून प्रकाशित होणाऱ्या बातम्या आणि घटनांचे विश्लेषण देण्याचं काम करतं. बीबीसी मॉनिटरिंगच्या बातम्या तुम्ही ट्विटर आणि फेसबुकवरदेखील वाचू शकता.)

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)