एक मशीद पाडण्यावरून चीन सरकार आणि मुस्लीम नागरिकांमध्ये वाढता तणाव

मशीद

फोटो स्रोत, Weibo

धर्मावर नियंत्रण मिळवण्याचा चीननं निश्चयच केला आहे. मात्र चीनमध्ये एका अगदी नियम पाळणाऱ्या शहरात नियोजनबद्ध पद्धतीनं मशीद पाडण्याचं एक प्रकरण चांगलंच अंगलगट येतांना दिसत आहे. अमेरिकेतले संशोधक डेव्हिड स्ट्रॉप याबद्दल अधिक विस्तारानं सांगत आहेत.

फेब्रुवारी 2016ची एक थंड सकाळ होती. सूर्योदयाच्या थोड्या वेळाआधी मी वायझू येथील एका मशिदीच्या आवारात उभा होतो. चीनच्या निगझिआ हुई या स्वायत्त प्रांतात ती मशीद होती. हा एक मुस्लिमबहुल ग्रामीण भाग होता.

माझ्या बाजूला जवळजवळ 150 माणसं उभी होती. त्यातल्या बहुतांश लोकांनी पारंपरिक विणलेल्या टोप्या घातल्या होत्या. काही लोक आपली पांढरी दाढी मिरवत होते. हे लोक दिवसाची पहिली प्रार्थना सलत-अल-फजरसाठी वजुहच्या विधीसाठी प्रसाधगृहात जात होते.

काही अंतरावरच या समाजाच्या इतर मशिदींतून प्रार्थनेसाठी लाऊडस्पीकरवरून आझान सुरू होती. प्रार्थनेसाठी माणसं जमा व्हायला सुरुवात झाली होती.

दोन वर्षांनंतर वायझूमध्ये मुस्लीम नागरिक आणि सरकारमध्ये वाद निर्माण झाला आहे. नुकतीच बांधलेली एक मशीद पाडण्याच्या विरोधात तिथं लोक निदर्शनं करत आहेत.

इमारतीसाठी योग्य ते परवाने न घेतल्यामुळे प्रशासनानं ही इमारत पाडण्याच्या निर्णय घेतला आहे. ही मशीद बेकायदेशीर आहे, असा सरकारचा दावा आहे. त्याला उत्तर म्हणून हुई मुस्लीम नागरिकांनी बांधकाम पाडण्याआधी या इमारतीवरच ताबा मिळवला आहे.

मशीद

फोटो स्रोत, David Stroup

पण आता या वादावर तोडगा निघेनासा झाला आहे. सरकारनं ही मशीद न पाडण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र अरेबस्क प्रकारची मशिदीतील रचना बदलण्यासाठी सरकार ठाम आहे. सरकारनं हे बदल करण्यासाठी समजाची परवानगी घेण्याचं आश्वासन दिलं आहे.

भक्तिभावानं भारलेलं शहर

वायझू शहरातले 90 टक्के लोक हुई वंशाचे आहेत. या लोकांना चीनची प्रसारमाध्यमं चीनी मुस्लीम असं संबोधतात. चीनमध्ये 8व्या शतकात आलेल्या टांग शासकांसोबत आलेल्या मुस्लिमांचे ते वंशज असल्याचं मानलं जातं.

आपापसांतील लग्न आणि चीनच्या मुख्य समजात रुळल्यानंतर हुई आणि चीनमधील बहुसंख्य हान यांच्यात आता फारसा फरक राहिलेला नाही. तरीही हुईंची श्रद्धा इस्लामवर आहे.

18व्या आणि 19व्या शतकात क्विंग घराण्याशी हिंसक संघर्ष झाल्यानंतरही हुई चीनमधले आदर्श अल्पसंख्याक मानले जातात.

निंगशिया प्रांतात एका हान व्यक्तीची मी मुलाखत घेतली. त्याने हुईंच 'हानकरण' झालं आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती.

मी माझ्या संशोधनासाठी या शहरात फिरत होतो. तेव्हा लोक हिजाब आणि नमाजची टोपी याबद्दल अभिमानी असल्याचं दिसून आलं. इथं एकाही गावात दारू विकली जात नाही. शिवाय लोक हलाल मटणच खातात.

मुस्लीम

फोटो स्रोत, Getty Images

पण या प्रांताची राजधानी इंचुआन शहरात मात्र लोक अधिक धर्मनिरपेक्ष शब्दशः सांगायचं तर श्रद्धा पातळ झालेले दिसतात. या उलट वायझू शहरात मात्र लोक त्यांच्या श्रद्धांना चिटकून आहेत.

या समाजासाठी ही मशीद अभिमानाचं केंद्र बनली आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ही मशीद निंगशियामधील सर्वांत मोठी मशीद असेल. शुक्रवारच्या नमाजसाठी येणारे सर्व भाविक या मंदिरात सामावू शकतात. या मशिदीचं बांधकाम अरबी पद्धतीचं आहे.

धार्मिक प्रथांवर कुऱ्हाड

आता ही मशीद एका सिनिसाईज या अभियानात अडकली आहे. याचा अर्थ असा की याचं अधिक चिनीकरण करणं होय. हा सत्ता बळकट करण्याचा प्रयत्न आहे. असं करणं सुरक्षेच्या दृष्टीनम आणि धार्मिक कट्टरतावादाशी लढण्यासाठी आवश्यक असल्याचं सरकारचं मत आहे.

चायनिज कम्युनिस्ट पार्टीच्या ऑक्टबर 2017मध्ये झालेल्या 19व्या काँग्रेसमध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले होते, "चीनमधील धर्मांचा झुकाव हा चिनी असला पाहिजे या तत्त्वाचं पक्षानं पालन केलं पाहिजे. धर्मांनी समाजवादी चीननुसार बदलण्यासाठी पक्षानं मार्गदर्शन केलं पाहिजे."

जिनपिगं यांच्या या घोषणेनंतर चीनच्या अधिकाऱ्यांनी चीनमध्ये विविध धार्मिक प्रथांविरोधात मोहीम सुरू केली. याचा सर्वांत जास्त फटका चिनी मुस्लिमांना बसला.

याचा सर्वांत जास्त परिणाम वायव्येकडील शिंजियांग उइघूर या स्वायत्त प्रांतावर दिसून आला. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवलानुसार उइघूर वंशांच्या जवळपास 10 लाख नागरिकांना पुनर्शिक्षण छावण्यांत ताब्यात ठेवण्यात आलं आहे.

हिजाब वापरणं, परदेशी प्रवास करणं, कुराणमधील संदेश सोशल मीडियावर शेअर करणे, अशा लहानसहान कारणांसाठी कट्टरवादी ठरवून ही कारवाई करण्यात आली आहे.

मुस्लीम

फोटो स्रोत, Getty Images

चीननं ही कारवाई बंद करावी असं परदेशांतून दबाव आल्यानंतर चीननं इतर देशांना परिस्थिती पूर्ण माहिती नाही, असा खुलासा केला आहे. चीनच्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रानं परदेशी माध्यमांनी चीनवर टीका करण्यापूर्वी परिस्थिती पाहावी, असं 13 ऑगस्टला म्हटलं आहे.

शिंजियांग प्रांतावर याचा सर्वांत जास्त परिणाम झाला असला तरी हुई समाजालाही याची झळ बसू लागली आहे. गेल्या वर्षी मशिदींवरील अरबी पद्धतीचे घुमट हटवून अ-इस्लामीकरण अभियानाचं वृत्त आलं होतं.

वायझू प्रांतातील द ग्रॅड मशिदीवरील अरबीपद्धतीचं बांधकाम या मोहिमेचं लक्ष ठरणं सहाजिक आहे.

पण वायझूमधील कारवाईमुळे समाजाच्या रोषाला सरकारला सामोर जावं लागेल असं दिसत आहे. हा समाज एक प्रगतीशील समाज आहे, हा मुद्दा लक्षात घेतला तर ही बाब किती महत्त्वाची आहे, हे लक्षात येतं.

सर्वसाधारण पश्चिम चीनमधल्या शहरांच्या तुलनेत पूर्व चीनमधली शहरं मागास आहेत. 1990मध्ये वायझू प्रांताला गरिबी आणि अंमली पदार्थांचा विळखा पडला होता. आजही या शहरात व्यसनाविरोधात लावलेले फलक दिसतात.

2000मध्ये सुरू झालेल्या The Great Western Development Campaign च्या माध्यमातून वायझूसारखी शहरं आणि हुईंनी स्वतःला गरिबीतून बाहेर काढलं आणि इस्लामच्या हेरिटेजशी स्वतःला पुन्हा जोडून घेतलं.

मुस्लीम

फोटो स्रोत, Getty Images

स्थानिक नागरिकांनी स्वतःला उद्योजकतेशी जोडून घेतलं आणि त्यांच्याकडे बऱ्यापैकी सुबत्ता आली. गरीब मुलांना कुराण शिकता यावं म्हणून लोकांनी इथं शाळा सुरू केल्या.

मला एका व्यक्तीनं सांगितलं, "नागरिकांचं आयुष्य सुखी आहे. इथं उंच इमारती नाहीत, पण इथले लोक समृद्ध आहेत. जीवन सुखी आहे."

वायझूच्या हुई समाजाचा विकास सरकारच्या विकास कार्यक्रमांमुळे झाला. आर्थिक विकासाबरोबरच लोकांच्या धार्मिक श्रद्धांचा, प्रथा परंपरांचाही विकास होत गेला. इथले लोक त्यांना चिनी देशभक्ती आणि इस्लामच्या श्रद्धावंतांचं आदर्श रूप मानतात.

चायनिज कम्युनिस्ट पक्ष या अशा समाजाला विरोधासाठी चिथावत आहे, ज्यांना गमावणं त्यांना परवडणारं असले.

डेव्हिड स्ट्रॉप हे युनिव्हर्सिटी ऑफ ओक्लाहोमामधील डिपार्टमेंट ऑफ इंटरनॅशनल अँड एरिया स्टडिजमध्ये व्याख्याते आहेत. चीनचे राजकारण, राष्टीयतत्त्व आणि इथिनिक पॉलिटिक्स यात त्यांचा विशेष अभ्यास आहे.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)