कुंभमेळा : मुघलकालीन दस्ताऐवजात कुंभमेळ्याचा पहिला उल्लेख

कुंभमेळा

फोटो स्रोत, Reuters

    • Author, धनंजय चोपडा
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

हरिद्वारमध्ये सध्या कुंभ मेळा सुरू आहे. कोरोनाचं संकट असलं तरी लाखो भाविक कुंभला हजेरी लावत आहेत.

कुठल्याही आमंत्रणाशिवाय कोट्यवधी लोक या मेळ्याला येतात. त्यामुळे युनेस्कोने कुंभ मेळ्याला जागतिक सांस्कृतिक वारसा घोषित केलं आहे.

दोन वर्षांपूर्वी प्रयागराज (पूर्वींचं नाव अलाहाबाद) इथे भरलेल्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने कुंभ मेळ्याचा ऐतिहासिक मागोवा घेणारा हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

मत्स्य पुराणाशी संबंध

मत्स्य पुराणात कुंभमेळ्याचे वर्णन आहे. समुद्रमंथनातून बाहेर आलेला अमृत कलश मिळवण्यासाठी देव आणि दानव यांच्यात बारा वर्षं संघर्ष सुरू होता. याच संघर्षात भारतातील चार ठिकाणी या अमृत कलशातील काही थेंब पडले.

याच चार ठिकाणी म्हणजे प्रयागराज (अलाहबाद), हरिद्वार, नाशिक आणि उज्जैनमधील नदीतीरी दर 12 वर्षात तीन तीन वर्षांच्या अंतराने कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते.

ज्योतिषशास्त्रानुसार कुंभच्या आयोजनात बृहस्पती म्हणजेच गुरू ग्रहाची स्थिती खूप महत्त्वाची असते.

हा ग्रह मेष राशीत असतो तेव्हा प्रयागमध्ये पूर्णकुंभ आणि जेव्हा वृश्चिक राशीत असतो तेव्हा अर्धकुंभाचे आयोजन करण्यात येते. त्याच आधारावर यंदाचा कुंभमेळा हा अर्धकुंभ आहे.

कुंभाविषयी लिखित प्रमाण

अर्धकुंभ आणि कल्पवासची परंपरा केवळ प्रयागराज आणि हरिद्वार या दोनच ठिकाणी आहे, हे विशेष. इतिहासकारांच्या मते कुंभमेळ्याचा पहिला उल्लेख मुघल काळात 1665 साली लिहिण्यात आलेल्या खुलासातु-त-तारिखमध्ये आढळतो.

कुंभमेळा

फोटो स्रोत, Reuters

मात्र काही इतिहासकारांना हे मान्य नाही. त्यांच्या मते पुराण आणि वेदांमध्ये याचा उल्लेख असल्याने कुंभ शेकडो वर्ष जुनी परंपरा आहे.

पुराणाच्या जाणकारांच्या मते पुराणांमध्ये कुंभ शब्दाचा उल्लेख तर आहे. मात्र कुंभमेळा असा उल्लेख कुठेच नाही.

मात्र एकोणीसाव्या शतकात बारा वर्षांच्या अंतराने भेटणाऱ्या धर्माचाऱ्यांना वाटले की त्यांनी मध्येदेखील एकदा एकत्र यायला हवे, त्यानंतर सहा वर्षांनंतर अर्धकुंभाची परंपरा सुरू झाल्याचेही काही इतिहासकारांचे म्हणणे आहे.

या सर्व समज-गैरसमजांना बाजूला सारत उत्तर प्रदेश सरकारने अर्ध कुंभाचे कुंभ आणि पूर्ण कुंभाचे महाकुंभ असे नामांतर केले आहे.

मात्र काही दिवसांपूर्वी याच संगमावरून जनतेला संबोधित करताना पंतप्रधानांनी स्वतः या मेळ्याला अर्धकुंभ म्हटले होते.

कुंभमेळ्यात आखाड्यांचे महत्त्व

प्रयागराजच्या संगम तटावर कुंभमेळा सुरू झालेला आहे. या मेळ्याचे मुख्य आकर्षण असणारे सर्व आखाडे आपापल्या शिबिरांमध्ये डेरेदाखल झाले आहेत.

साधू, संत आणि धर्माचार्यांच्या या आखाड्यांच्या केंद्रस्थानी नागा साधू असतात. सनातन धर्माच्या रक्षणासाठी या साधूंची परंपरा सुरू झाल्याचे मानले जाते.

कुंभमेळा

फोटो स्रोत, AFP

अनेक वर्षांपूर्वी ही आखाड्यांची परंपरा सुरू झाली. त्यावेळी केवळ दहा आखाडे होते. मात्र हळूहळू संख्या वाढत गेली आणि आज घडीला 15 आखाडे अस्तित्वात आहेत.

सनातन धर्मातील शैव, वैष्णव आणि उदासीन पंथातील आखाड्यांसाठी शिखांचाही आखाडा आहे. हा आखाडा 1855 सालापासून कुंभमेळ्यात भाग घेत आहे.

परी आखाडा आणि किन्नर आखाडा

स्त्रियांचा परी आखाडा आणि तृतीयपंथीयांचा किन्नर आखाडा सर्वांत नवीन आहेत.

बऱ्याच संघर्षानंतर या आखाड्यांना कुंभमेळ्यात स्थान मिळाले आहे.

परी आखाड्याला प्रयागराजमध्ये 2013 साली भरलेल्या कुंभमेळ्यात मान्यता मिळाली होती. मात्र किन्नर आखाड्यासाठी हा पहिला कुंभमेळा आहे.

हा आखाडा लोकांना आकर्षित करेल, हे पहिल्याच दिवशी दिसून आले.

कल्पवास

प्रयागराजमधील कुंभमेळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट म्हणजे इथे होणारा कल्पवास.

लाईफ मॅनेजमेंट आणि टाईम मॅनेजमेंटचे फंडे शिकवणाऱ्या या कल्पवासात सहभागी होण्यासाठी लाखो लोक देशभरातून येतात.

कुंभमेळा

फोटो स्रोत, Getty Images

आता तर परदेशी लोकांनाही या कल्पवासाची भुरळ पडली आहे.

सरकार, अनेक बाबा यासोबतच इतरही संस्था आणि संघटनांनी कल्पवासाच्या वेगवेगळ्या सोयी केल्या आहेत.

गवताच्या झोपडीपासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंत सर्वच सुखसोयी असलेल्या खोल्याही इथे उपलब्ध आहेत. कुंभमेळ्याला गर्दीचा पर्याय बनवणाऱ्या धर्म आणि आस्था यांच्या बंधनात अडकलेल्या खऱ्या कल्पवासींकडे नेहमीच सोयीस्कर दुर्लक्ष होते.

दरम्यान, कोट्यवधी लोकांना सामावून घेण्याची ताकद असलेल्या या कुंभमेळ्यावर सरकारी व्यवस्थापाने ताबा मिळवल्याचे दिसते.

आपण धार्मिक यात्रेत नव्हे तर एखाद्या प्रायोजित मेगा शोमध्ये असल्याचा भास इथे होतो. त्यामुळे अनेक आव्हानांचा सामना करूनही क्षणोक्षणी त्याचाच सामना करण्यासाठी इथे येणाऱ्यांचा हा 'शो' होऊ शकेल का, हे तर काळच ठरवेल.

(धनंजय चोपडा लाहाबाद विद्यापीठातील सेंटर ऑफ मीडिया स्टडिजचे प्रभारी आहेत)

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)