कुंभमेळा : पंचतारांकित लक्झरी कँपात एका दिवसाचे भाडे एक लाखाहून अधिक - ग्राऊंड रिपोर्ट

महाकुंभ साधू

फोटो स्रोत, ANI

    • Author, अभिनव गोयल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा अशी ओळख असलेला कुंभ मेळा सोमवारी (13 जानेवारी) प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर सुरू झाला आहे.

या संगमावर तंबूंचे एक पूर्ण शहरच वसले आहे. इथे राहणाऱ्या लोकांची संख्या लवकरच जगातील मोठमोठ्या देशांची लोकसंख्याही मागे टाकेल असं बोललं जात आहे.

आस्थेच्या या संगमात स्नान करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक येत आहेत.

त्रिवेणीपासून नजर हटवल्यास एक बाजूला बोटींची लांबलचक रांग, दुसऱ्या बाजूला तंबूंचं वसलेलं शहर आणि मध्ये-मध्ये जिथे नजर जाते, तिथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी दिसतात.

प्रयागराजमध्ये सोमवारपासून (13 जानेवारी) सुरू झालेला कुंभ, केवळ भक्तिचा संगम नाही, तर उत्तर प्रदेश सरकारच्या प्रशासकीय क्षमतेचीही परीक्षा आहे. कुंभचा समारोप महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे 26 फेब्रुवारीला होणार आहे.

या कुंभ मेळ्याला सुमारे 40 कोटी भाविक येतील, असा दावा उत्तर प्रदेश सरकारनं केला आहे. ज्या योजनांवर गेल्या अनेक महिन्यांपासून काम सुरू होते, त्या योजनांच्या परीक्षेची वेळ आता आली आहे.

कुंभ मेळ्याच्या ठिकाणी वातावरण कसे?

शहरात प्रत्येक ठिकाणी खांद्यावर सामान घेऊन संगमाकडं जात असलेले भाविक, सुरक्षा कर्मचारी आणि सफाई कामगार दिसत आहेत. जागोजागी पोलिसांनी नाकेबंदी केली आहे.

वज्रवाहन, ड्रोन, बॉम्बविरोधी पथकांबरोबरच राष्ट्रीय सुरक्षा गार्डही (एनएसजी) तैनात करण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले 'मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा' असा संदेश देणारे होर्डिंग्ज ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

संपूर्ण कुंभ परिसरात या दोन्ही नेत्यांशिवाय दुसऱ्या कोणत्याही नेत्यांचे छायाचित्र असलेले पोस्टर्स क्वचितच पाहायला मिळत आहेत. याशिवाय विविध साधू-संतांच्या पोस्टर्सनं शहर व्यापलं गेलं आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

विविध आखाड्यातील साधू-संत राजेशाही थाटात महाकुंभात दाखल होत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो भाविक हत्ती, घोडे, उंट घेऊन नाचत-गाणी म्हणत सहभागी झाले आहेत.

साधू-संतांचे दर्शन घेण्यासाठी रस्त्यांवर ठिकठिकाणी लोकांची गर्दी झाल्याचं दिसत आहे. त्यामुळं केवळ एक किलोमीटर रस्ता पार करण्यासाठी वाहनांना अनेक तास लागत आहेत.

शाही स्नानापूर्वी नागा साधू कुंभमध्ये पोहोचत आहेत
फोटो कॅप्शन, शाही स्नानापूर्वी नागा साधू कुंभमध्ये पोहोचत आहेत
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मुंबईत राहणारी गीता काही लोकांबरोबर कुंभमध्ये सहभागी होण्यासाठी आली आहे. ती म्हणाली, "आम्ही पाच दिवसांसाठी आलो आहोत. हा माझा पहिला कुंभ आहे. 14 जानेवारीच्या शाही स्नानानंतर आम्ही घरी जाऊ. सध्या आम्ही महाराजांच्या आश्रमात राहत आहोत."

तिच्याबरोबर आलेल्या जयश्री भरत पुंजानी म्हणाल्या, "12 वर्षांपूर्वी झालेल्या कुंभ मेळ्याला मी आले होते. यावेळी पहिल्यांदा चांगली व्यवस्था दिसत आहे. पाहता पाहता एवढं मोठं जग इथं वसवण्यात आलं, याचं आश्चर्य वाटतं."

त्याचवेळी बिहारमधील भागलपूर येथून आलेली 25 वर्षीय नूतन पॉलिथिनच्या मदतीनं छत बनवून रस्त्याच्या कडेला राहत आहे.

ती म्हणते, "आमच्या गावातून 30 पेक्षा जास्त लोक आले आहेत. इथे राहण्याची काहीच व्यवस्था नाही. जिथे जाल तिथून पोलीस हाकलून देत आहेत. तंबूत राहता येईल इतके पैसे आमच्याकडे नाहीत. कुंभ मेळ्याच्या ठिकाणी आल्यावर चहाचे दुकान सुरू करता येईल, असं वाटलं होतं, पण आता हे खूप कठीण वाटत आहे."

अशीच परिस्थिती बंगालमधून आलेल्या महिलांच्या एका गटाची झाली आहे. संजीता शारदा म्हणाल्या, "आम्ही 20 हून अधिक महिला कुंभ मेळ्यात गंगा स्नानासाठी आलो आहोत. मात्र, इथे राहण्याची काहीच व्यवस्था नाही. गेल्या दोन-तीन दिवसांपासून आम्ही रस्त्यावर राहत आहोत."

आखाड्यांमध्ये वाढू लागली गर्दी

वेगवेगळ्या आखाड्यांनी शेकडोंच्या संख्येनं आपले मोठमोठे तंबू उभारले आहेत. काही तंबू तर अनेक एकरांमध्ये पसरलेले आहेत. तिथे साधू-संतांनीही तंबू उभारले आहेत. तिथे बसूनच ते पुजा-पाठ करत आहेत.

कुंभमधील आखाड्यांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पंच दशनाम जुन्या आखाड्यात नागा साधू शरीरावर भस्म आणि गळ्यात रुद्राक्षाची माळा घालून बसले आहेत.

कडाक्याच्या थंडीत काही नागा साधू आखाड्याच्या बाहेर रस्त्यावर आपाआपल्या तंबूबाहेर शेकोटी पेटवून बसले आहेत. तिथे मोठ्या संख्येनं लोक त्यांचा आशीर्वाद घेत आहेत. अनेक जण त्यांचे फोटोही काढत आहेत.

येथे वेगवेगळ्या आखाड्यांनी आपले भव्य तंबू उभारले आहेत. काही तंबू तर अनेक एकरांवर उभारले आहेत.
फोटो कॅप्शन, येथे वेगवेगळ्या आखाड्यांनी आपले भव्य तंबू उभारले आहेत. काही तंबू तर अनेक एकरांवर उभारले आहेत.

बीबीसीशी बोलताना एक नागा साधू म्हणाले, "तुम्ही साधनेत आल्यावर थंडीचा प्रश्नच निर्माण होत नाही. भक्तीमध्ये खूप शक्ती आहे, मग अशावेळी तुम्हाला थंडी जाणवतही नाही."

ते म्हणतात, "आम्ही अघोरी बाबा आहोत. आम्ही कपड्यांऐवजी शरीरावर भस्म लावतो. यामुळे आम्हाला थंडी कमी वाजते."

तर दुसरे एक नागा साधू म्हणाले, "भस्मच आमचे वस्त्र आहे. सलग 12 तास जेव्हा आम्ही बसतो. तेव्हा शरीराला वेदना होतात. पण हीच साधना आहे."

याशिवाय कुंभात असे अनेक बाबाही आले आहेत, ज्यांनी अनेक वर्षे आपला एक हात वर ठेवल्याचा दावा ते करतात. ते स्वतःला 'उर्ध्वबाहू' म्हणवतात.

असेच एक आसाममधील कामाख्या पीठाचे गंगापुरी महाराज आहेत, ज्यांना भेटण्यासाठी लांबून लोक येत आहेत.

3 फूट 8 इंच उंची असलेल्या या बाबांनी 32 वर्षांपासून स्नान केलं नसल्याचं ते सांगतात. परंतु, जेव्हा आम्ही त्यांना भेटण्यासाठी गेलो, तेव्हा त्यांनी आम्हाला भेटण्यास नकार दिला.

बाजूच्या तंबूत राहणाऱ्या महिलेला जेव्हा आम्ही गंगापुरी महाराज कुठे आहेत, असे विचारले. तेव्हा त्यांनी "महाराज आत्ताच गंगा नदीत स्नान करुन आले असून आपल्या तंबूत बसले असल्याचं सांगितलं."

संगमावर कसं जायचं

14 जानेवारीला (मकर संक्रांती) कुंभ मेळ्याचं पहिलं शाहीस्नान आहे. यासाठी सुमारे 1 कोटी भाविक या दिवशी प्रयागराज येथे येतील असा अंदाज आहे.

शहराचे एडीजी भानू भास्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध दिशांनी येणाऱ्या एकूण 7 मुख्य मार्गांनी मेळा परिसरात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुंभमेळा परिसरानजीक या मार्गांवर वाहनांसाठी 100 हून अधिक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

यामध्ये जौनपूर, वाराणसी, मिर्झापूर, रिवा-चित्रकूट, कानपूर-फतेहपूर-कौशांबी, कौशांबी आणि लखनऊ-प्रतापगढ मार्गाचा समावेश आहे.

याशिवाय भाविकांची गर्दी हाताळण्यासाठी प्रयागराजला दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता यांसारख्या मोठ्या शहरांशी जोडण्यासाठी शेकडो रेल्वे गाड्या चालवण्यात आल्या आहेत. मोठ्यासंख्येनं विशेष रेल्वेही चालवल्या जात आहेत.

14 जानेवारीला कुंभमेळ्यात पहिले शाही स्नान होणार आहे.
फोटो कॅप्शन, 14 जानेवारीला कुंभमेळ्यात पहिले शाही स्नान होणार आहे.

उत्तर प्रदेश परिवहन महामंडळही सुमारे 7 हजार बसेसची सुविधा पुरवत आहे.

गंगा नदीच्या एका काठाला दुसऱ्या काठाशी जोडण्यासाठी पीपा पूल, म्हणजेच पोंटून पूल बनवले गेले आहेत. यावेळी त्यांची संख्या वाढवून 30 केली आहे. प्रत्येक पुलाला वेगळे नाव देण्यात आले आहे.

एका दिवसाचे भाडे एक लाखाहून अधिक

कुंभमेळ्याची विभागणी पाच क्षेत्रांमध्ये करण्यात आली आहे. परेड ग्राऊंड, संगम क्षेत्र, तेलियरगंज, झूसी आणि अरेल. प्रत्येक क्षेत्र अनेक सेक्टर्समध्ये विभागण्यात आले आहे. संपूर्ण कुंभांत एकूण 25 सेक्टर आहेत.

कुंभ मेळ्यात लाखो लोक राहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये मोफत रात्री निवासापासून पंचतारांकित लक्झरी कँपही उभारण्यात आले आहेत. ज्याचे एका रात्रीचे भाडे हे लाख रुपयांपेक्षाही जास्त आहे.

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) सेक्टर 25 मध्ये अरेल परिसरात महाकुंभ ग्राम नावाचे तंबू शहर (टेंट सिटी) उभारले आहे. भाविकांसाठी येथे सुपर डिलक्स रूम आणि व्हिला बांधण्यात आले आहेत.

या खोल्यांचे दिवसाचे भाडे हे 16 हजार ते 20 रुपये इतके आहे. इथे नाश्ता, दोन वेळच्या जेवणाबरोबरच गरम पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

त्याचबरोबर अरेल घाटाच्या जवळ एक डोम सिटी वसवण्यात आली आहे. इथे काचेच्या घुमटासारख्या खोल्या उभारण्यात आले आहेत. याची उंची जमिनीपासून 18 फूट वर आहे.

ही डोम सिटी उभारणारी कंपनी इव्होलाइफचे संचालक भानूप्रसाद सिंग यांनी सांगितले, "एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ज्या सुविधा असतात, त्या सर्व सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. देश-परदेशातून भाविक प्रयागराज येथे येतात. गर्दीमुळे ते घाटापर्यंत पोहोचू शकत नाहीत. म्हणूनच आम्ही हा प्रकल्प डिझाइन केला आहे."

डोम सिटीमध्ये अशा 22 खोल्या तयार करण्यात आल्या आहेत.
फोटो कॅप्शन, डोम सिटीमध्ये अशा 22 खोल्या तयार करण्यात आल्या आहेत.

बीबीसीशी बोलताना सिंह म्हणाले की, आमच्याकडे शाही स्नानाच्या दिवशी एका खोलीचे एका दिवसाचे भाडे हे 1 लाख 11 हजार तर इतर दिवशी ते 81 हजार रुपये इतके आहे. यामध्ये महाराजा बेड बरोबरच टीव्ही आणि अटॅच बाथरुमची सुविधा देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी आम्ही सुमारे 51 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

याच सेक्टरमध्ये संगमाच्या बाजूला जाताना प्रयागराज येथील रहिवासी बृजेशकुमार पांडे यांनी अलर्कपुरी कॅम्प उभारला आहे. तिथे त्यांनी बांबूच्या मदतीने वेगवेगळ्या डिझाइनच्या खोल्या तयार केल्या आहेत.

पांडे म्हणतात, "कुंभ मेळ्यात सात दिवस शाहीस्नान होणार आहे. त्यावेळी आमच्याकडे एक डबल बेड असलेल्या खोलीचे भाडे हे 20 हजार आणि इतर दिवशी या खोलीचे भाडे हे 10 हजार रुपये ठेवण्यात आले आहे."

दुसऱ्या बाजूला शहरात महापालिकेनं विविध ठिकाणी तात्पुरते रात्रीचे निवारे तयार केले आहेत. इथे नि:शुल्क राहण्याची व्यवस्था केली गेली आहे.

प्रयागराज बस स्टँडजवळ उभारलेल्या एका रात्र निवारा कॅम्पच्या सहायक अनुपा देवी सांगतात, "बाहेरून येणारे प्रवासी इथे सात दिवस राहू शकतात. गादी, रजई आणि स्वच्छ पाणी यासोबतच औषधांचीही व्यवस्था प्रशासनानं केली आहे."

त्याचबरोबर शहरात मोठ्या संख्येने लक्झरी हॉटेल्स आहेत. कुंभ मेळ्यामुळं हॉटेल्सचे दर गगनाला भिडले आहेत. ज्या हॉटेल्सच्या रुम पूर्वी दोन हजार रुपयांना मिळत होत्या, त्याचा आजच्या दिवसाचा दर हा 10 हजार रुपयांपेक्षा कमी नाही.

कुंभ मेळ्यातील 'कल्पवासी'

कुंभ मेळ्यात लाखोंच्या संख्येने लोक कल्पवास करतात, त्यांना कल्पवासी म्हणतात. गेल्या अनेक दिवसांपासून अशा लोकांचे प्रयागराजमध्ये येण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हे लोक संपूर्ण माघ महिन्यात तंबू उभारुन पूजा करतात आणि येताना आपल्याबरोबर त्यांना लागणाऱ्या सर्व वस्तू घरुन घेऊन येतात.

ॲपलचे सह-संस्थापक दिवंगत स्टिव जॉब्स यांची पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स याही यावेळी कुंभमेळ्यात कल्पवास करण्यासाठी आल्या आहेत.

ॲपलचे सह-संस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स कल्पवासासाठी निरंजनी आखाड्यात पोहोचल्या आहेत.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, ॲपलचे सह-संस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स कल्पवासासाठी निरंजनी आखाड्यात पोहोचल्या आहेत.

प्रयागराजमध्ये गेल्या 25 वर्षांपासून ज्योतिषशास्त्राबरोबर भाविकांना कल्पवास प्रदान करणाऱ्या रमेश पांडे यांच्या म्हणण्यानुसार कल्पवास हा एक महिना म्हणजे 30 दिवसांचा असतो.

पांडे म्हणाले, "दरवर्षी माघ महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत येतो तेव्हा कल्पवास सुरू होतो. आपण ऐहिक भ्रम आणि भौतिक गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. फक्त अन्न खावे आणि पूजा करावी, थंडी आणि उष्णतेची जाणीव होऊ नये, हाच कल्पवास आहे."

"कल्पवासचे नियम खूप कठीण आहेत. यामध्ये सूर्योदयापूर्वी गंगा स्नान, 24 तासांमध्ये एकदाच लसूण, कांदा नसलेले पदार्थाचे सेवन करणे. त्याचबरोबर ब्रह्मचर्याचे पालन करावे लागते," असेही त्यांनी सांगितले.

कुंभ मेळ्यात कल्पवास करण्यासाठी लाखो भाविक आले आहेत.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, कुंभ मेळ्यात कल्पवास करण्यासाठी लाखो भाविक आले आहेत.

प्रयागराजच्या श्यामली तिवारी मागील 7 वर्षांपासून कल्पवास करत आहेत. 'गंगा माते'चे नाव घेत त्या रडू लागतात.

श्यामली म्हणतात, " गंगा स्नान करायला आलो आहोत, ज्या काही चुका झाल्या असतील, गंगा माता त्या माफ करतील. आता आम्ही महिनाभर इथे राहू. शुद्ध अन्न खाऊ. लसूण, कांदा, मोहरीचे तेल तर लांबच."

याच कॅम्पमध्ये आपल्या कुटुंबासह कल्पवासला आलेल्या संगीता तिवारी सांगतात, "घरी राहिलो तरी वेदना जाणवतात, पण इथे दु:ख आणि त्रासासारखं असं काहीच नाही. महिनाभर कल्पवास केल्यानंतर आम्ही घरी परत जाऊ."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)