मुंबईत वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, जखमींचा आकडा 9 वर

मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर रविवारी पहाटे चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.
वांद्रे इथून उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरला जाणारी अंत्योदय एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर आली, तेव्हा गाडीत चढण्यासाठी मोठी गर्दी उसळली. यावेळी चेंगराचेंगरीची घटना घडली.
या चेंगराचेंगरीत 9 जण जखमी झाले असून वांद्रे इथल्या भाभा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सर्व जखमींची स्थिती आता स्थिर आहे.
सण-उत्सवाच्यावेळी मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या गावाकडे परततात. यावेळी रेल्वे स्थानक, बस स्थानकावर प्रचंड गर्दी होते. आरक्षण फुल्ल असल्याने वेटींगची यादीही मोठी पाहायला मिळते. या गर्दीच्या नियंत्रणाचं नियोजन न झाल्यास मोठी घटना उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नेमकं काय घडलं?
दिवाळी आणि छट पूजेसाठी या काळात मोठ्या संख्येनं लोक उत्तर भारतात जातात. त्यासाठी विशेष व्यवस्था केल्याची माहिती कालच पश्चिम रेल्वेनं दिली होती.
मुंबई डिव्हिजन, वेस्टर्न रेल्वेच्या मुंबई विभागाचे SDCM अभय सिंग चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे इथे प्रवाशांनी चालती गाडी पकडण्याचा प्रयत्न केल्यामुळे दोनजण पडले आणि ही दुर्घटना घडली.
तसंच, अभय सिंग चौहान यांनी आाहन केलंय की, प्रवाशांनी चालती गाडी पकडण्याचा प्रयत्न करू नये.
भारतीय रेल्वेच्या प्रवक्त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, एक रेल्वे गोरखपूरसाठी यार्डातून प्लॅटफॉर्मवर लावली जात होती. त्याचवेळी काही लोकांनी रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबण्यापूर्वीच त्यात बसण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याचवेळी ही दुर्घटना घडली.
पश्चिम रेल्वेचे प्रवक्ते विनित अभिषेक म्हणाले की, “ही रेल्वे पहाटे 5.15 वाजता गोरखपूरसाठी रवाना होते. पण सणांचा काळ असल्यानं लोकांना बसायला वेळ मिळावा, म्हणून तीन तास आधीच रेल्वे प्लॅटफॉर्मवर लावली जाते.”
वांद्रे-गोरखपूर ही अंत्योदय एक्सप्रेस असून, पूर्णपणे विनाआरक्षित आहे. म्हणजे यात सर्व डबे जनरल असतात.
दरम्यान, सर्व जखमींना वांद्र्यातील भाभा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.
शबीर अब्दुल रेहमान(40), परमेश्वर सुखदर गुप्ता(28), रवींद्र हरिहर चुमा(30), रामसेवक रवींद्रप्रसाद प्रजापती (29), संजय तिलकराम कंगाय (27), दिव्यांशू योगेंद्र यादव (18), मोहम्मद शरीफ शेख (25) या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
तर इंद्रजित साहनी (19 )आणि नूर मोहम्मद शेख (18) ही दोघं गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.
शिवसेनेचं केंद्र सरकारवर टीकास्त्र
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "मोदींचं तिसरं सरकार आल्यानंतर देशभरात 25 हून अधिक मोठे रेल्वे अपघात झाले. यात शेकडो लोक मृत्युमुखी पडलेत, शेकडो जखमी झालेत. सर्वाधिक रेल्वे प्रवास मुंबईत आहेत.
"तुम्ही हायस्पीड ट्रेनच्या गोष्टी करतात, हवेत बस चालवण्याची गोष्ट करता, पण जमिनीवरच्या गोष्टींकडे कोण लक्ष देणार? रविवारी गर्दीत लोक जखमी होत आहेत. मुंबईतून सर्वाधिक महसूल मिळतो, पण सुविधांचं काय? मात्र मुंबई लुटण्याचं काम सुरू आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
तर शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी रेल्वे प्रशासन आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर टीका केलीय.
आनंद दुबे म्हणाले की, "राज्यातील गरीब लोकांच्या जीवाचं महत्त्वं या सरकारला नाहीय. कुणी गरीब, मजूर त्याच्या गावी दिवाळी किंवा छट पूजेसाठी जात असेल, तर ट्रेनमध्ये चढू शकत नाही, चेंगराचेंगरीचा बळी ठरतो."
दुबे पुढे म्हणाले की, "आता वांद्रे टर्मिनलवर झालेल्या चेंगराचेंगरीत 9 हून अधिक लोक जखमी झाले. हे लोक गोरखपूरला निघाले होते. याचा अर्थ, रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलीस आणि रेल्वे मंत्री यांची कुणाची जबाबदारी आहे की नाही? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव महाराष्ट्र भाजपचे प्रभारी आहेत, ते इथे निवडणुकीनिमित्त इथे येतात, मात्र त्यांना लोकांच्या जीवाची पर्वा नाहीय."
काय उपाय करता येईल?
सण-उत्सवाच्या काळात प्रवास करत असल्यास त्यासाठी दोन महिन्यांआधीच रेल्वेच आरक्षण करता येईल. काही दिवसांपूर्वी अॅडव्हांस रिझर्वेशनचा कालावधी चार महिन्यांवरून दोन महिन्यांचा करण्यात आलाय.
साधारणपणे रेल्वे विभागाकडून दरवर्षी सण-उत्सवाच्या काळात विशेष रेल्वे सुरू करण्यात येते. परंतु सामान्यतः असं दिसून येतं की लोकांना विशेष रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणं फारसं आवडत नाही किंवा अशा गाड्यांना प्राधान्य मिळत नसते.
विशेष रेल्वेबाबत आणखी एक समस्या अशी की, दरवर्षी अशा गाड्यांची घोषणा उशिरा केली जाते. त्यामुळेही अशा गाड्यांबाबत प्रवाशांत संभ्रम असतो.
पश्चिम रेल्वेच्या वेबसाईटनुसार विशेष रेल्वेबाबतची माहिती सप्टेंबर महिन्यात देण्यात आली. अगदी शेवटच्या क्षणी माहिती मिळत असल्याने लोकांना वेळेनुसार तिकीटांच आरक्षण करता येत नाही. त्यामुळे नियमित धावणाऱ्या रेल्वेमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येते.

फोटो स्रोत, ANI
याविषयी बोलताना रेल्वे बोर्डाचे माजी सदस्य (वाहतूक) श्रीप्रकाश म्हणतात, “एकतर विशेष रेल्वेची भाडेवाढ करण्यात आली आहे. आणि दुसरं म्हणजे या रेल्वेगाड्या वेळापत्रकानुसार धावतील का? निर्धारित वेळेत स्थानकापर्यंत पोहोचतील का असा संभ्रम लोकांपुढे असतो. त्यामुळेच प्रवाशी विशेष रेल्वेपेक्षा नियमित गाड्यांना प्राधान्य देतात.”
रविवारी (27 ऑक्टोबर) सकाळी ज्या रेल्वेत चेंगराचेंगरी झाली ती अंत्योदय एक्सप्रेस नियमित रेल्वे आहे. वांद्रे-गोरखपूर ही अंत्योदय एक्सप्रेस पूर्णपणे विनाआरक्षित आहे. म्हणजे यात सर्व डबे जनरल असतात. जनरल डब्यात स्लीपिंग बर्थ नसल्यानं प्रवाशांना हजारो किलोमीटरचा प्रवास बैठ्या स्थितीत करावा लागतो.
श्रीप्रकाश या मुद्द्यावर एक सल्ला देतात, “लोकांना ज्या रेल्वेतून प्रवास करायचा आहे, त्यांना त्या रेल्वेचं कन्फर्म तिकीट देण्यात यावं आणि प्रवासाच्या दिवशी नियमित रेल्वेपाठोपाठ विशेष रेल्वे चालवण्यात यायला हवी. यातून गर्दीचं नियंत्रण करता येऊ शकतं.”
विशेष रेल्वे किती प्रभावी आहेत?
सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची वाढती मागणी पाहता दरवर्षी मोठ्या प्रमाणात विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येतात.
पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हंगामातही पश्चिम रेल्वेने देशातील विविध भागांसाठी विशेष गाड्यांच्या 2500 हून अधिक फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेकडूनही जवळपास तेवढ्याच विशेष गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. रेल्वेच्या या दोन्ही झोनचे मुख्यालय मुंबई येथे आहे.
भारतात सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी पाहता उत्तर रेल्वेकडून गाड्या वाढवल्या येतात. यावर्षी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान उत्तर रेल्वेने विशेष गाड्यांच्या 3150 फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे.
याशिवाय, नियमित गाड्यांमध्ये सुमारे 60 अतिरिक्त डब्यांची सोय करण्यात आली आहे. यामुळे सुमारे 2 लाख अतिरिक्त प्रवाशांना सणासुदीच्या काळात प्रवास करता येईल.

फोटो स्रोत, ANI
गेल्यावर्षी उत्तर रेल्वेकडून विशेष रेल्वेगाड्यांच्या 1086 फेऱ्या चालवण्यात आल्या होत्या, अशी माहिती उत्तर रेल्वेचे प्रवक्ते कुलतार सिंग यांनी बीबीसीशी बोलताना दिली.
कुलतार सिंह म्हणाले, “यावेळी रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार विशेष गाड्यांच्या जास्तीत जास्त फेऱ्या चालवण्यात येत आहेत. वाढत्या मागणीनुसार एखाद्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी पाहता त्यानुसार तत्काळ विशेष रेल्वेची सोय केली जाते.”
मात्र या सुविधा असतानाही रेल्वेगाड्यांमध्ये जागा मिळविण्यासाठी गर्दी उसळते आणि चेंगराचेंगरीसारख्या घटना घडतात.
अतिरिक्त उपाययोजना
सणांच्या काळात रेल्वे स्थानकांवरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी व्हावी म्हणून अनेक स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री सहसा बंद केली जाते.
याशिवाय स्टेशन परिसरात रेल्वेची वाट पाहणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष व्यवस्था केली जाते. सणसुदीच्या काळात स्थानकावरील गर्दीच्या नियोजनासाठी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा दावाही केला जातो.
मात्र, तरीही स्थानकांवर चेंगराचेंगरी झाल्याच्या अनेक घटना आजवर घडल्या असून त्याच्याशी संबंधित अनेक लहान-मोठ्या घटना वारंवार समोर येत असतात.

फोटो स्रोत, ANI
मुंबईत आज (27 ऑक्टोबर) घडलेली चेंगराचेंगरी घटना हीदेखील सणासुदीच्या वेळी घडणाऱ्या घटनांपैकीच एक म्हणता येईल. गेल्या वर्षी गुजरातमधील सुरत रेल्वे स्थानकावर सणासुदीच्या वेळी चेंगराचेंगरी झाली होती. स्थानिक वृत्तानुसार, या घटनेत एकाचा मृत्यू तर काहीजण जखमी झाले होते.
काही वर्षांपूर्वी दिवाळीच्या सणादरम्यान दिल्लीच्या रेल्वे स्थानकावरही मोठी दुर्घटना घडली होती.
2013 मध्ये अलाहाबाद (आताचे प्रयागराज) रेल्वे स्थानकावर कुंभमेळ्यादरम्यान गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीत 36 जणांचा मृत्यू झाला होता.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन












