बीबीसीला मिळाले आणखी दोन ठिकाणी चेंगराचेंगरीचे पुरावे, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम

- Author, दिलनवाज पाशा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
(महत्त्वाची सूचना : बातमीत काही माहिती विचलित करणारी आहे.)
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील कुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या दुर्दैवी घटनेत अनेकांचा मृत्यू झाला होता.
जखमींचीही संख्या मोठी होती. परंतु, त्यादिवशी संगमावर झालेल्या चेंगराचेंगरी व्यतिरिक्त आणखी काही ठिकाणी अशीच परिस्थिती होती का?
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आणखी दोन ठिकाणीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.
दरम्यान, संगमावर चेंगराचेंगरी होऊन अनेक दिवस उलटले असले तरी, आपल्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी लोक अजूनही प्रयागराजमधील शवागाराचे दार ठोठावत आहेत.
मध्य प्रदेशमधून आलेले सत्यम प्रयागराजमध्ये आपल्या बेपत्ता वडिलांच्या शोधात भटकत आहेत. त्यांच्याकडे एक बॅग आहे. त्यात पाण्याच्या दोन रिकाम्या बाटल्या होत्या.


सत्यम संतापलेले होते. स्वरूप राणी नेहरू हॉस्पिटलच्या शवागारातून बाहेर पडताना त्यांनी बीबीसी हिंदीला म्हटलं, "आत अनेक मृतदेह आहेत. तुम्ही मला सांगा, की आमचं कुटुंब इथं आहे? आम्ही त्यांना घेऊन जाऊ भाऊ. मला तुमचे पैसे नकोत. मला काहीही नको आहे."
मोतीलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या शवागाराबाहेर उभ्या असलेल्या आमोद कुमार यांचीही कथा सत्यम यांच्यासारखीच आहे. त्यांनी प्रयागराजमधील सर्व शवागारांमध्ये शोध घेतला, सरकारी कार्यालयांच्या खेटा मारल्या.
29 जानेवारी म्हणजे मौनी अमावस्येच्या दिवशी बेपत्ता झालेल्या त्यांच्या नातेवाईक रितादेवी यांच्याबाबत आत्तापर्यंत काहीच माहिती मिळालेली नाही.
दुसरीकडे, कुंभमेळ्याला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
प्रशासनाच्या मते, मौनी अमावस्येच्या दिवशी कोट्यवधी लोकांनी इथं स्नान केलं. त्याचदिवशी संगमाजवळ चेंगराचेंगरी झाली होती. उत्तर प्रदेश सरकारनं यात 30 भाविकांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केलं होतं.
"दुर्दैवाने या चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू झाला आहे," असं कुंभमेळ्याचे डीआयजी वैभव कृष्णा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.
'खाली पडलो असतो तर कदाचित जगलोही नसतो'
संगमाजवळ झालेली चेंगराचेंगरी प्रशासनानं मान्य केली आहे. परंतु, अनेक लोकांनी त्या दिवशी कुंभमेळ्यात किमान इतर दोन ठिकाणीही परिस्थिती हाताबाहेर गेली होती, असा दावा केला आहे.
बीबीसीनं कुंभ सेक्टर-21 मध्ये समुद्रकूप मार्गाजवळ झालेली चेंगराचेंगरी पाहिलेल्या अनेक प्रत्यक्षदर्शींशी चर्चा केली. हा परिसर प्रयागराजच्या झुंसी परिसराला लागून आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, त्या दिवशी तिथं इतकी गर्दी होती की, भाविकांना जागेवरुन हलताही येत नव्हतं. भाविक एकाच ठिकाणी अडकून पडले होते. त्यांना पुढंही जाता येत नव्हतं आणि मागंही येता येत नव्हतं.

एका आश्रमात उतरलेले पवन मध्यरात्री अडीचच्या सुमारास गंगा स्नान करुन परतत होते. त्यावेळी ते या गर्दीत अडकले होते. धडपड करत मी स्वतःला वाचवलं आणि तिथून निघू शकलो, असं पवन म्हणाले.
ते म्हणाले, "जर मी त्यावेळी खाली पडलो असतो तर कदाचित आज जिवंत नसलो असतो. इथं खूप गुदमरल्यासारखं वाटत होतं. लोक एकमेकांना खेटून उभा राहिले होते. श्वास घेण्यासही त्रास होत होता."
'लोक पाण्यासाठी तडपत होते'
धर्मगुरु अर्पित महाराज हे उलटा किल्ला चौकाजवळील दास धर्म शिबिरात राहतात.
29 जानेवारीचा तो दिवस आठवत ते म्हणाले की, "सकाळी सहाच्या सुमारास माझ्या सहकाऱ्यांनी मला उठवलं. मी उशिरापर्यंत झोपलो होतो. कारण आखाड्याच्या स्नानानंतर गंगा स्नान करायला मी जाणार होतो. त्यावेळी बाहेरचं दृश्य भयावह होतं."

"लोक पाण्याविना तडफडत होते. पाणी द्या...एक घोट पाणी द्या, अशी विनंती करत होते. चोहोबाजूनी लोक आले. झुंसीकडून, शास्त्री पुलावरुन, मागून लोक आले. अचानक गर्दी वाढली," असं अर्पित महाराज सांगत होते.
अनियंत्रित गर्दी पाहून जेव्हा दास धर्म शिबिर उघडण्यात आले, तेव्हा काही क्षणातच हजारो लोक तिथं घुसले.
अर्पित महाराज म्हणाले, "एका महिलेनं तिचं मुल माझ्याकडे फेकत- गुरुजी, माझ्या मुलाला वाचवा, असं म्हटलं. त्या कठीण परिस्थितीत आम्ही शेकडो लोकांची मदत केली."
'खुल्या जागेतही श्वास घेता येत नव्हता'
निशाणसिंग हे या शिबिरात राहतात. कुंभमेळ्यासाठी येत असलेल्या भाविकांची ते सेवा करतात.
त्या रात्री ते स्वतःही गर्दीत अडकले होते. ते म्हणाले, "महिलांचा आक्रोश सुरू होता- वाचवा, वाचवा अशी मदतीची याचना त्या करत होत्या. काहीही करुन आम्हाला बाहेर काढा, म्हणत होत्या. त्यावेळी आमचे गुरू संत त्रिलोचन दर्शन दास यांनी भाविकांना आत येऊ द्या, काळजी करु नका, असं म्हटलं."

दास शिबिरात सेवा करत असलेले अशोक त्यागी म्हणतात, "खुल्या जागेतही लोकांना श्वास घेता येत नव्हता, हे मी पहिल्यांदाच पाहिलं.
लोकांनी बूट, चप्पल, बॅगा, जे सामान होतं ते तिथंच सोडून दिलं. जीव वाचवणं कठीण झालं होतं. लोक पाण्यासाठी तडफडत होते."

या बातम्याही वाचा:

ते दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले
सेक्टर-21 चे हे कचरा ट्रान्सफर केंद्र आहे. हे केंद्र आता कचऱ्यामध्ये आलेले चपला, बूट आणि कपड्यांनी भरुन गेले आहे. शिवनाथ कचरा वाहून नेणारा ट्रक चालवतात. 29 जानेवारीच्या सकाळचं दृश्य आठवल्यावर त्यांना अश्रू अनावर होतात.
शिवनाथ सांगतात की, "परिस्थिती खूपच बिकट होती. इथं उपस्थित असलेले कुटुंबीय ढसाढसा रडत होते. कोणी म्हणतं, इथं माझे काका होते. इथं माझे आई-वडील होते. माझी पत्नी होती, भाऊ होता...कोणीच सापडले नाहीत सर."
बीबीसी हिंदीशी बोलताना अनेक प्रत्यक्षदर्शींनी इथं अनेक मृतदेह पाहिल्याचा दावा केला. "एकाच जागेवर किमान चार मृतदेह पाहिल्याचं," एका प्रत्यक्षदर्शीनं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं.
कचरा गाडी चालवणारे चंद्रभान यांनी कचऱ्यात एक मृतदेह पाहिल्याचा दावा करताना बीबीसी हिंदीला सांगितलं की, "मृतदेह...मी त्या चौकात (उलटा किल्ला चौक) पाहिला. बारा वाजता तिथं एक मृतदेह पाहिला. तो मृतदेह वयस्कर व्यक्तीचा होता."
चंद्रभान म्हणाले, पुढचे तीन दिवस ते लोकांनी कचऱ्यात टाकून दिलेले सामानच घेऊन जात होते.
भाविकांपर्यंत मदतच पोहोचली नाही
या ठिकाणापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर नगीना मिश्र यांचं घर आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्या पहाटे चारच्या सुमारास तिथं अडकल्या होत्या. दुर्देवानं त्या पुन्हा जिवंत आपल्या घरी येऊ शकल्या नाहीत. त्यांचे दीर गणेशचंद्र मिश्र त्यावेळी त्यांच्याबरोबर होते. तो घटनाक्रम सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात.
गणेशचंद्र मिश्र म्हणाले, "लोक एकमेकांच्या अंगावर चढत होते. जो खाली पडला त्याला उठून उभा राहता येत नव्हतं. माझ्या वहिनी पडल्या. त्यांना उठताच आलं नाही. मी त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु, गर्दीनं मलाही खाली पाडलं. मी 100 नंबर आणि 112 नंबर वर फोन करत राहिलो. ते सातत्यानं माझं लोकेशन विचारत होते. परंतु, मदतीसाठी कोणीच आलं नाही."
गणेशचंद्र मिश्र यांनी सकाळी सहाच्या सुमारास कसंबंस आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यांचा मुलगा आणि त्याचे मित्र त्यांना घ्यायला आले. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास कसंतरी त्यांना आपल्या वहिनीचा मृतदेह घेऊन तेथून निघता आलं.

गणेश मिश्र म्हणतात, "जर मी मृतदेहाजवळ नसलो असतो तर मला मृतदेह मिळाला नसता किंवा तो ओळखता येईल अशा परिस्थितीतही राहिला नसता.
या लोकांचा तिथंच मृत्यू झाला आहे, याची खात्रीही सरकारकडून केली जात नाहीये. आमच्याकडे पुरावे आहेत. सर्व काही आहे. परंतु, सरकार फक्त एकाच ठिकाणाला महत्त्व देत आहे, ते म्हणजे संगमस्थळ."
गणेश मिश्र यांचे पूत्र आशुतोष आपल्या काकूंचा मृतदेह उचलण्यासाठी मित्रांसह तिथे आले होते. ते म्हणाले, इथं कुठलीच सरकारी मदत पोहोचली नाही. ना रुग्णवाहिका ना कोणती मदत.
जर सरकारकडून अद्ययावत मेडिकल सुविधा पुरवल्या जात असतील तर त्या लोकांपर्यंत पोहोचल्या का नाहीत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
गर्दीत अडकल्या रुग्णवाहिका, पोलिसांची वाहनं
एक महिला पोलीस कर्मचारी वारंवार आपल्या वरिष्ठांना आणि नियंत्रण कक्षाला फोन करुन इथल्या बिकट परिस्थितीची माहिती देत होत्या. परंतु, समोरच्या बाजूने ना उत्तर आलं, ना मदत मिळाली, असा दावा गणेश मिश्र यांनी केला.
कारवर उभं राहून मदतीची याचना करणाऱ्या या महिला कर्मचारीचे अनेक व्हिडिओ आता समोर आले आहेत. इथं कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नसल्याचे, अनेक प्रत्यक्षदर्शींनी बीबीसी हिंदीला सांगितलं.
दरम्यान, बीबीसी हिंदीनं त्या दिवशी सकाळी साडेअकरा वाजता घेतलेले अनेक ड्रोन फुटेज तपासून पाहिले. यामध्ये रुग्णवाहिका आणि पोलिसांची वाहनं गर्दीत अडकलेली दिसत आहेत.
ऐरावत मार्गावर त्या दिवशी काय झालं?
मौनी अमावस्येच्या दिवशी समुद्रकुप चौकापासून (उलटा किला चौक) सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ऐरावत रस्त्यावर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती झाली होती. बीबीसी हिंदीनं याचे अनेक व्हिडिओ पाहिले आहेत. याठिकाणीही अनेकांचा मृत्यू झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शी करत आहेत.
"इथं अनेकांचा मृत्यू झाला होता. आम्ही थोडक्यात बचावलो," असं एका प्रत्यक्षदर्शी महिलेनं बीबीसीला सांगितलं.

बीबीसी हिंदीनं ऐरावत गेटजवळ रेकॉर्ड करण्यात आलेला एक व्हीडिओ पाहिला आहे. यात किमान चार मृतदेह दिसतात. हा व्हीडिओ त्या दिवशी सकाळी 7.15 वाजता रेकॉर्ड करण्यात आला होता.
त्या दिवशी तिथं उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीनं रात्री आणि मौनी अमावस्येच्या सकाळची परिस्थिती बीबीसीला सांगितली.
ते म्हणाले, "इथं खूप गर्दी होती. क्षमतेपेक्षा जास्त लोक तिथं जमा झाले होते. तुम्ही इथल्या सीमारेषेवर बांधलेल्या पत्र्यांची स्थिती पाहा. लोक ते तोडून आत घुसले होते. रात्री हे लक्षात आलं नाही. सकाळी अनेक लोक जखमी झाल्याचं समजलं."
प्रशासन काय म्हणतंय?
29 जानेवारी म्हणजेच मौनी अमावस्येच्या दिवशी संगमाशिवाय ज्या इतर ठिकाणी अपघात किंवा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे, त्याचा तपास केला जात असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.
बीबीसी हिंदीशी फोनवर बोलताना कुंभमेळ्याचे अधिकारी विजय किरण आनंद म्हणाले की, "कुंभमेळ्याच्या ठिकाणी संगम परिसरात जी घटना घडली होती. त्याबाबत आधीच आम्ही प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे.
इतर ठिकाणी झालेल्या सर्व मृत्यूंची नोंद वैद्यकीय महाविद्यालयात झाली आहे. त्यांची पुष्टी केली जात आहे. त्यांची कारणं काय होती याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना भेटून घेतली जात आहे."
त्यानंतर आम्ही विजय किरण आनंद यांना प्रत्यक्ष भेटून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यास नकार दिला. मला जे काही सांगायचं आहे ते बीबीसीला मी आधीच फोनवर सांगितलं आहे, असं ते म्हणाले.
मौनी अमावस्येच्या दिवशी अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी आली होती का, असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी याबाबतही काहीच माहिती दिली नाही.

उत्तर प्रदेश सरकारनं मौनी अमावस्येच्या दिवशी 10 कोटी भाविक येण्याचा अंदाज वर्तवला होता.
कुंभ प्रशासनानं मौनी अमावस्येच्या दिवशी सायंकाळी चार वाजेपर्यंत सुमारे 6 कोटी लोकांनी स्नान केल्याचा आकडा जाहीर केला होता.
उत्तर प्रदेश सरकारनं कुंभमेळ्याच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपये भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
मौनी अमावस्येच्या दिवशी जीव गमवावा लागलेल्या अनेकांवर अंत्यसंस्कार झालेले आहेत. परंतु, अनेक नातेवाईकांना आपल्या प्रियजनांसोबत तिथं काय झालं होतं, याचं उत्तर मिळू शकलेले नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











