कसं असतं महिला नागा साधूंचे जीवन? दीक्षा घेतल्यानंतर काय करता येतं, काय नाही?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, विनायक होगाडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Reporting from, प्रयागराज
कुंभमेळा म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती नागा साधूंची गर्दी... शाही स्नानासाठी धावणारे असंख्य साधू... अर्थातच 'पुरुष साधू'...
कुंभमेळ्यामध्ये महिला साध्वीही असतात. मात्र, त्यांचं प्रमाण कितपत आहे? कुंभमेळ्याच्या एकूण आयोजनामध्ये त्यांचं स्थान नक्की काय आहे? असे बरेचसे प्रश्न माझ्या मनात होते.
कुंभमेळ्यामध्ये नागा साधू कसे तयार होतात, याचा शोध घेण्याचा प्रयत्न मी करत होतोच. पण त्यासमवेतच महिला साध्वींविषयीही असंख्य प्रश्न माझ्या मनात घोंघावत होते.
कुंभमेळ्यात कुठेही नजर मारली तर ठळकपणे पुरुष साधूच दिसतात. ते आपापल्या कुटीत बसलेले असतात, आखाड्यांमध्ये वावरत असतात वा बाहेर फिरत असतात.
सोशल मीडियावर मात्र एक नागा साध्वीचा व्हीडिओ व्हायरल झाल्याने माझी उत्सुकता आणखी ताणली गेली, की खरंच अशा नागा साध्वी अस्तित्वात आहेत का?
महिला नागा साध्वी असतात का?
प्रयागराजच्या कुंभमेळ्यात महिला साध्वींसंदर्भातील सर्व प्रश्नांचा शोध घेता घेता माझी पावलं संन्यासिनी आखाडा या साध्वींसाठी तयार करण्यात आलेल्या आखाड्यापाशी थांबली. त्याला 'माईवाडा' असंही संबोधलं जातं.
तिथं माझी ओळख साध्वी राधेनंद भारती यांच्याशी झाली. साध्वी राधेनंद भारती यांनी वयाच्या 12 व्या वर्षीच संन्यास घेतला आहे. पण पण त्यांनी आपलं शिक्षण थांबवलेलं नाही. सध्या त्या पीएचडी करत आहेत.
त्यांच्या बोलण्यात बरेचसे इंग्रजी शब्द सहजपणे येत होते. शिक्षण घेण्यावर महिला आखाड्यात कुठलाच बंधन नसल्याचं त्या सांगतात.


पण महिला नागा साध्वी असतात का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, "आम्ही नागा साधू होण्याचीच दीक्षा घेतली आहे. आता सर्व लोक आम्हाला भेटायला येतात त्यामुळे आम्ही असे भगवे वस्त्र परिधान करतो. मात्र, जेव्हा आम्ही धुनी रमवण्यासाठी बसतो तेव्हा जसे पुरुष भस्म लावतात, त्याच प्रमाणे आम्हालाही भस्माने स्नान करावं लागतं. संसारिक कपडे त्याग करुन ज्याप्रमाणे पुरुषांना लंगोटी दिली जाते, त्याच पद्धतीने महिलांसाठी संपूर्ण अंग झाकणारे वेगळे वस्त्र असतात, ते आम्ही परिधान करतो, जेणेकरुन मन आणि इंद्रिये संयमी रहावेत."
नागा असूनसुद्धा महिला साधूंना विवस्त्र फिरण्याची अनुमती नसल्याचं माईवाड्यातील साध्वींचं म्हणणं आहे. दशनामी संन्यासिनी जुना आखाड्याच्या अध्यक्ष श्रीमहंत आराधना गिरी म्हणाल्या की, "महिलांना 'दिगंबर' (नग्न) स्वरुपात राहण्याची आज्ञा नाहीये. आमच्यातील कुणीही माई (साध्वी) नग्न राहू शकत नाही. त्यांना वस्त्र परिधान करावंच लागतं."

'भारत में कुंभ' या पुस्तकाचे लेखक धनंजय चोप्रा यांच्याशी आम्ही महिला साध्वींसंदर्भात चर्चा केली. ते अलाहाबाद युनिव्हर्सिटीमध्ये सेंटर ऑफ मीडिया स्टडीज विभागात अभ्यासक्रम समन्वयक आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून ते कुंभमेळ्यावर अभ्यास करत असून आजवर अनेक कुंभमेळ्यांचा त्यांनी जवळून अभ्यास केला आहे.
ते सांगतात की, "माईवाड्यातील साध्वींना शैव संन्यासिनी, अवधुतीनी, नागा साधू वा साध्वी या नावांनी संबोधलं जातं. त्या पुरुष नागा साधूंप्रमाणे नग्न नसतात. तसेच, प्रत्येक नागा साधू नग्न असतोच, असंही काही नाही. महिला 'अवधुतीनी' होऊ शकतात. त्या दिगंबर (नग्न) होऊ शकत नाहीत."
महिलांसाठी स्वतंत्र आखाडा आहे का?
कुंभमेळ्यात जे साधू दिसतात ते कोणत्या ना कोणत्या आखाड्यांशी संलग्न असतात. अधिकृतपणे सध्या 13 आखाडे अस्तित्वात आहेत.
हिंदू धर्मातील वैष्णव आणि शैव या दोन संप्रदायामध्ये प्रामुख्याने एकूण अध्यात्मिक जगत विभागल्याचं दिसून येतं. जे विष्णू या देवतेला मानतात ते वैष्णव तर जे शंकर देवतेला मानतात ते शैव होय.

13 आखाडेदेखील याच प्रकारांमध्ये विभागले गेले आहेत. शैव आखाडे, वैष्णव आखाडे आणि शीख धर्माने प्रभावित असलेले उदासीन आखाडे होय.
कुंभमेळ्याच्या शाही स्नानात कुणी आधी अंघोळ करावी इत्यादी कारणांवरुन या आखाड्यांमध्ये आजवर बराच संघर्ष झालेला दिसून येतो.
सध्या संघर्ष होऊ नये यासाठी या 13 आखाड्यांचं तसेच कुंभमेळ्याचं नियमन 'अखिल भारतीय आखाडा परिषदे'कडून केलं जातं. यासंदर्भात माहिती देताना प्राध्यापक धनंजय चोप्रा म्हणाले की, "1954 मध्ये या अखिल भारतीय आखाडा परिषदेची स्थापना झाली होती. आखाड्यांमध्ये संघर्ष होऊ नयेत, यासाठी हे आखाडा परिषद नावाचं समन्वय करणारं व्यासपीठ तयार केलं गेलं."

मात्र, या आखाड्यांमध्ये स्वतंत्रपणे स्त्रियांसाठी एकही आखाडा अस्तित्वात नाही. सध्या किन्नर अर्थात तृतीयपंथीयांसाठी एक आखाडा कुंभमेळ्यात दिसून येतो, मात्र त्या आखाड्याला अधिकृत मान्यताही नाही आणि त्या आखाड्याला तसं गृहीतही धरलं जात नाही. मात्र, माध्यमांमध्ये हा आखाडा चर्चेत असतो. सध्या अभिनेत्री ममता कुलकर्णीने याच आखाड्याचं महामंडलेश्वर पद स्वीकारल्याने तो चर्चेत आहे.
महिलांसाठीचा हा संन्यासिनी आखाडा नक्की कधी अस्तित्वात आला, याविषयी नीटशी माहिती कुठल्याच साध्वीला देता आली नाही. अगदी सध्याच्या अध्यक्ष श्रीमहंत आराधना गिरी यांनाही ते सांगता आलं नाही. त्यांनी बाहेर लावलेल्या एका बॅनरकडे बोट दाखवत म्हटलं की, या जुन्या माई (साध्वी) आहेत. यांच्यापासूनच माईवाडा हळूहळू आकारास आला.
त्यामध्ये अनेक साध्वींचे फोटो आणि त्यांची नावे होती. ब्रह्मलीन श्री 1008 महंत ब्रह्मगिरी जी, ब्रह्मगिरी श्री महंत बुधगिरीजी, ब्रह्मलीन श्री महंत प्रयाग गिरी, ब्रह्मलीन श्री महंत भरत गिरी, श्रीमहंत विजय गिरी या काही जुन्या महत्त्वाच्या साध्वी होत्या, असं त्यांनी सांगितलं.
स्वतंत्र तरीही स्वायत्तता नसलेला आखाडा
माईवाड्याचा इतिहास नक्की काय आहे, याविषयीची माहिती पत्रकार दीप्ती राऊत यांनी 'कुंभमेळा: एक दृष्टिक्षेप' या पुस्तकात दिली आहे.
आपल्या पुस्तकात त्या सांगतात की, "त्रिकाल भवन्ता यांनी महिलांसाठी स्वतंत्र आखाड्याची मागणी करणारं आंदोलन छेडलं होतं. हजारो साध्वी आपल्या पाठीशी असल्याचा दावा करीत त्रिकाल भवन्ता यांनी महिलांसाठी स्वतंत्र आखाड्याची मागणी केली. त्यांनी स्वतःलाच 'परी आखाड्या'चा जगद्गुरू म्हणून घोषित करून टाकलं. महिलांसाठी स्वतंत्र आखाड्याची परंपरा नाही, असे आखाडा परिषदेचे आणि साधूचे म्हणणे आहे. सर्व शंकराचार्यांनीही महिलांच्या विरोधात भूमिका घेतली. त्रिकाल भवन्ताची ही मागणी पुढे येऊ लागल्यानंतर 2013 च्या प्रयागच्या कुंभमेळ्यात शैवपंथीय श्री पंचदशनाम जूना आखाड्यानं साध्वींसाठी 'माईवाडा' या अंतर्गत रचनेची व्यवस्था केली."

फोटो स्रोत, Getty Images
यासंदर्भात माहिती देताना प्राध्यापक धनंजय चोप्रा म्हणाले की, "नव्या आखाड्याला मान्यता देण्याचा अधिकार फक्त आखाडा परिषदेकडे आहे. त्रिकाल भवन्ता यांनी 'परी आखाडा' नावाचा स्त्रियांसाठी नवा आखाडा स्थापन केला होता. त्याला स्वतंत्रपणे मान्यता मिळावी, अशी त्यांची मागणी होती. मात्र, हळूहळू सर्वच आखाड्यांमध्ये महिलांनाही स्थान दिलं जात आहे, त्यामुळे स्वतंत्र आखाड्याची गरज नाही, असं म्हणत अखिल भारतीय आखाडा परिषदेने त्रिकाल भवन्तांची मागणी फेटाळून लावली. 13 आखाड्यांपैकी काही आखाड्यांमध्ये महिलांचं अस्तित्वच नाहीये तर उर्वरित काही आखाड्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात स्थान आहे. मात्र, स्वतंत्रपणे महिलांसाठी म्हणून अशा कोणत्याही आखाड्याला आजवर मान्यता देण्यात आलेली नाहीये. "
दीप्ती राऊत आपल्या सांगतात की, "त्रिकाल भवन्तांमुळे स्वतंत्र महिला आखाड्याच्या मागणीस जोर मिळेल म्हणून 2013 साली माईवाड्याला 'दशनाम संन्यासिनी आखाडा' म्हणून स्वतंत्र नाव आणि स्वतंत्र ध्वजाही दिली. उद्देश एकच, की महिलांच्या आखाड्याची वेगळी ओरड होऊ नये."

फोटो स्रोत, Facebook/Shankaracharya Trikal Bhawanta
याहून काहीसं वेगळं मत प्राध्यापक धनंजय चोप्रा मांडतात. ते सांगतात की, "जुन्या आखाड्याचं सुरुवातीपासून सर्वसमावेशक भूमिका राहिली आहे. त्यांनी माईवाडा बनवला. किन्नर आखाड्याला सोबत घेतलं. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर नागा साधूही आहेत. त्यामुळे, त्रिकाल भवन्तांची मागणी जोर धरु नये म्हणून माईवाडा आकारास आला असावा, असं मला वाटत नाही. मात्र, महिलांच्या स्वतंत्र आखाड्याची मागणी आखाडा परिषदेनं फेटाळून लावली, हे खरं आहे."

कुंभमेळ्याविषयीच्या या बातम्याही वाचा:
- अघोरी संप्रदाय काय आहे? त्यांचं अध्यात्म खरंच मांसाहार, प्रेतांशी संभोग यांच्याशी निगडित आहे?
- कुंभमेळ्याची सुरुवात सम्राट हर्षवर्धन यांनी केली? देशातील चारच ठिकाणी का होतो कुंभमेळा? संपूर्ण इतिहास
- कुंभमेळा : त्रिवेणी संगमात गंगा आणि यमुना या दोनच नद्या, मग तिसऱ्या सरस्वती नदीचं काय झालं?
- कुंभमेळा : मुघलकालीन दस्ताऐवजात कुंभमेळ्याचा पहिला उल्लेख

महिला साध्वींना कशी दीक्षा दिली जाते?
महिला आणि पुरुष साधूंना दीक्षा देण्याची पद्धत एकसारखीच आहे. पण ज्या पुरुष साधूंना नागा साधू व्हायचं असतं, त्यांच्यामध्ये कामवासना जागृत होऊ नये म्हणून त्यांचं लिंग टांगतोड प्रथेनुसार निकामी केलं जातं. नागा साधूंवर ही 'टांगतोड' प्रक्रिया कशी केली जाते, याविषयी तुम्ही सविस्तरपणे इथे वाचू शकता.

संन्यासिनी आखाड्याच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्रीमहंत 1008 उमा भारती महाराज यांच्याशी बोलण्याच्या आम्ही प्रयत्न केला.
मात्र, 'मला असं मुलाखतींमध्ये बोलता येत नाही', असं कारण त्यांनी दिलं. नुकतीच संन्यस्यत्वाची दीक्षा घेतलेल्या राधेनंद भारती या माहिती देऊ शकतील, असंही त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Facebook/Swami Avdheshanand Giri
महिलांना कशाप्रकारे दीक्षा दिली जाते, याविषयी माहिती देताना राधेनंद भारती म्हणाल्या की, "पुरुष आणि महिला या दोघांनाही दीक्षा देण्याची पद्धत सारखीच आहे. ज्याला या जगाशी नातं तोडून ईश्वराची प्राप्ती करायची असेल त्याला गुरु महाराजांकडे जावं लागतं. त्यानंतर त्या शिष्याची आखाड्यामध्ये भरती केली जाते. त्याला धर्म, अर्थ, काम, मोक्ष आणि इतर सर्व गोष्टी शिकवल्या जातात."

फोटो स्रोत, Facebook/Swami Avdheshanand Giri
"त्यानंतर शिष्याची योग्यता तपासल्यानंतर आगामी कुंभमेळ्यात त्याला दीक्षा देण्याचं ठरवलं जातं. त्यानुसार, सर्वांत आधी पंचसंस्कार केले जातात. त्यामध्ये मंत्र गुरू, विभुती गुरू, लंगोटी गुरू, रुद्राक्ष गुरू आणि जनेऊ गुरू असे पाच गुरू एकेक प्रक्रिया पार पाडतात. यामध्ये मुंडण केलं जातं. या प्रक्रियेत महिला साध्वींना लंगोटीऐवजी बाघंबरी वस्त्र दिलं जातं. दीक्षा देण्याच्या या दिवसात कडक उपवासाचं व्रत असतं. सरतेशेवटी आई-वडिलांचं तसेच स्वत:चंही पिंडदान करावं लागतं."
मासिक पाळीच्या काळात साध्वींना नेमकं कसं वागवलं जातं?
पुरुष साधूंमध्ये ज्यांनी नागा साधू होण्याची दीक्षा घेतली आहे, त्यांच्यावर 'टांगतोड संस्कार' केले जातात. त्यानुसार, 'दिगंबर गुरु' एका विशेष मुद्रेमध्ये नागा साधूच्या लिंगाला पकडतात, एक विशिष्ट मंत्र म्हणतात आणि तीनवेळा जोरदार झटका देऊन त्याचं लिंग निकामी करतात.
यामागचा उद्देश एकच की नागा साधूंमध्ये कामवासना जागृत होऊ नये. मात्र, महिलांमध्ये कामवासना जागृत होऊ नये, म्हणून कोणती प्रक्रिया केली जात असावी असा साहजिक प्रश्न मला पडला.
यासंदर्भात मी अनेक साध्वींना प्रश्न विचारला. आंतरराष्ट्रीय श्रीमहंत माता प्रेमगिरी म्हणाल्या की, "कामवासनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी साध्वींमध्ये अशी कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. असं नियंत्रण मिळण्यासाठी ध्यानधारणेच्या माध्यमातूनच आपल्या कामवासनेला तसेच तृष्णेला मारायचं असतं. जेवढं त्या तप करतील, तेवढा त्याचा फायदा होईल. जितकं त्या साधना करतील, तेवढं त्या संसारिक आयुष्यापासून दूर होऊ शकतील."

राधेनंद भारती म्हणाल्या की, "अनेक दिवंगत वयस्कर माता साध्वींनी आम्हाला असं सांगितलं होतं साध्वींचं गर्भाशय काढून टाकलं जातं तर पुरुष साधूंचं लिंग निकामी केलं जातं, जेणेकरुन त्यांच्या मनात वासना निर्माण होणार नाही."
गर्भाशय काढून टाकलं जात असल्याचा मुद्दा नव्याने दीक्षा घेतलेल्या राधेनंद भारती यांनी सांगितला असला तरीही या विषयावर इतर साध्वींनी बोलणं टाळलं. राधेनंद भारतींसारख्या अनेक साध्वींनी ऐन तारुण्यात दीक्षा घेतली आहे. काही काही तर बालसाध्वीदेखील आहेत. मासिक पाळीच्या काळात या साध्वींना नेमकं कसं वागवलं जातं, हा असाच एक प्रश्न.

माईवाड्यातील श्री महंत माई ओमा गिरी या ज्येष्ठ साध्वी या प्रश्नावर भडकल्या. मात्र, राधेनंद भारती यांनी मोकळेपणाने उत्तर दिलं. त्या म्हणाल्या की, "आता 2025 साल सुरू आहे. फ्रीडम हा देखील एक मुद्दा आहे. तरीही काही नियम पाळावे लागतात. जसे की, भंडाऱ्यामध्ये जाता येत नाही. देवी-देवता तसेच गुरू महाराजांजवळ जाऊ दिलं जात नाही."
एखाद्या साध्वीकडून जाणते वा अजाणतेपणी संन्यसत्वाची अथवा ब्रह्मचर्याची दीक्षा भंग झालीच तर नेमकं काय केलं जातं, या प्रश्नावर श्री महंत आराधना गिरी म्हणाल्या की, "त्यांच्यावर आखाड्याकडून कारवाई केली जाते तसेच त्यांना आखाड्यातून बरखास्तही केलं जाऊ शकतं. संन्यस्त जीवन सोडून पुन्हा नेहमीच्या आयुष्याकडेही जाणाऱ्याही काही साध्वी आहेत. अशांना पुन्हा संन्यास दिला जात नाही."
महिलांच्या दुय्यम स्थानाविषयी माईवाड्यातील साध्वी काय म्हणाल्या?
माईवाड्यातील श्रीमहंत माई ओमा गिरी या ज्येष्ठ साध्वी आहेत. कॅमेऱ्यावर बोलण्याआधी त्यांनी डोक्यावर फेटा बांधला.
डोक्यावर फेटा बांधणं हे पुरुषी वर्चस्वाचं प्रतीक आहे, असं तुम्हाला वाटतं का, या प्रश्नावर त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. काही क्षणानंतर फेटा बांधून पूर्ण झाल्यावर "ये तो महंत पद की शान है" असं त्या म्हणाल्या. महिलांच्या दुय्यम स्थानाविषयी प्रश्न विचारल्यावरही त्यांनी मोघम उत्तरे दिली.
'इतर क्षेत्रांप्रमाणेच अध्यात्मिक क्षेत्रातही महिलांना दुय्यम स्थान आहे, असं तुम्हाला वाटतं का?' या प्रश्नावर संन्यासिनी आखाड्यातील कोणत्याच साध्वीने फार स्पष्टपणे भाष्य केलं नाही.

श्री महंत आराधना गिरी या सध्या दशनामी संन्यासिनी जुना आखाड्याच्या अध्यक्ष आहेत. कुंभमेळा ते कुंभमेळा असे तीन वर्षे एखाद्या साध्वीचा अध्यक्षपदाचा कालावधी असतो, असं त्यांनी सांगितलं.
त्या म्हणाल्या की, "गुरु महाराज मंडळी आम्हाला त्यांच्या बरोबरचेच समजतात म्हणून तर आम्हाला इतकं पद वगैरे देतात. जर ते आम्हाला बरोबरचे समजतच नसते तर कदाचित त्यांनी माईंना पदेही दिली नसती."
तुम्हाला पदे मिळाली असली तरीही एकूण निर्णय प्रक्रियेत कितपत स्थान मिळतं, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, "जे आमचे मोठे पदाधिकारी आहेत, तेच यासंदर्भातील निर्णय घेतात. ते ज्याप्रमाणे आदेश देतात, त्याचेच आम्ही पालन करतो."
यासंदर्भात प्राध्यापक धनंजय चोप्रा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "वैष्णव आणि उदासीन आखाड्यांमध्ये कुठेच माईवाड्यासारखी शाखा असल्याचं अद्याप तरी दिसून आलेलं नाही. मात्र, काही आखाड्यांमध्ये संन्यासिनी नक्कीच आहेत, तर अलीकडे काही आखाड्यांनी महिलांना स्थान देणं सुरू केलं आहे. काहींमध्ये तर महिलांना पहिल्यापासूनच प्रवेश वर्ज्य आहे."

महिलांना दिल्या जाणाऱ्या स्थानाविषयी ते सांगतात की, "महिलांना आतापर्यंत श्रीमहंत पदापर्यंत जाऊ देण्यात आलं आहे. त्यांना महामंडलेश्वर, मंडलेश्वर अथवा आचार्य या मोठ्या पदापर्यंत अद्याप तरी जाऊ देण्यात आलेलं नाही. जुना आखाड्यामध्येच महिलांना किमान 'श्रीमहंत' पदापर्यंत स्थान देण्यात आलं आहे. इतर कोणत्याही आखाड्याने महिलांना या पदापर्यंत जाऊ दिल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही."
पुढे ते सांगतात की, "आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, अध्यक्ष वा सचिव अशी सगळी पदे व्यवस्थात्मक पदे आहेत. महंत, श्रीमहंत, अष्टकौशल महंत, मंडलेश्वर, महामंडलेश्वर यांसारखी पदे ही संन्यासी वा अध्यात्मिक पदे आहेत. त्यांचं महत्त्व अधिक असतं. श्रीमहंत पदाला थोडा अधिकार आहे. जुन्या आखाड्याची जी मुख्यपरिषद असते, त्यामध्ये माईवाड्यातील श्रीमहंतही उपस्थित असतात. हे खरं आहे की, निर्णय प्रक्रियेत जेवढं स्थान पुरुषांना आहे, तेवढं स्त्रियांना नाहीये. कारण, 2013 साली स्थापन झालेल्या या माईवाड्याला निर्णय प्रक्रियेत तेवढं स्थान असणार नाही, हे उघडच आहे."
महिलांना दुय्यम स्थान देण्याविषयी आखाडा परिषदेचं म्हणणं काय आहे, हेदेखील आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
आखाडा परिषदेचे सचिव आणि आवाहन आखाड्याचे राष्ट्रीय महामंत्री सत्यगिरी महाराज यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, "केवळ 13 आखाड्यांनाच मान्यता आहे. अशा प्रकारच्या स्वतंत्र आखाड्यासाठीच्या मागण्या होत राहतात. कुणी मध्येच उठून मागणी केली म्हणजे त्याला लगेच मान्यता द्यावी, असं होत नाही. जे परंपरेनुसार सुरु आहे, तेच पुढे नेलं जाईल. माईवाडा असो वा किन्नर आखाडा, हे स्वतंत्र आखाडे नाहीत. ते जुना आखाड्याचंच अनुसरण करतात. याहून अधिक आखाडे वाढवले जाणार नाहीत."

कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या भाविकांमध्ये महिलांची संख्या अधिक असते; मात्र, पुरुष साधूंच्या तुलनेत महिला साधूंची संख्या अगदीच नगण्य आहे. फक्त साध्वीच नाही तर महंत, महामंडलेश्वर, आचार्य अशा महत्त्वाच्या पदावर पोहोचलेल्या महिलाही अगदी तुरळक आहेत.
माईवाड्यात ज्या साध्वी आम्हाला भेटल्या त्या सनातन परंपरेतील लग्न आणि कुटुंब या संस्थांमधून बाहेर पडलेल्या होत्या. कुणी बालसाध्वी, कुणी अविवाहित कुणी विधवा तर कुणी परित्यक्ता होत्या. बहुतांश सगळ्या एकल स्त्रियाच होत्या.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











