नागा साधूंची शस्त्रधारी 'आर्मी', ज्यांनी बेसावध मराठ्यांना युद्धात गाठलं होतं

नागा साधू

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, विनायक होगाडे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
    • Reporting from, प्रयागराज

कडाक्याच्या थंडीत चिलीम ओढत बसलेले नग्न साधू...

संपूर्ण अंगाला भस्म आणि कडाक्याच्या थंडीत अंगावर एकही कपडा नाही. कधी कंबरेला आणि डोक्याला झेंडूच्या माळा तर कधी हातात डमरू...

यंदाच्या प्रयागराजच्या कुंभमेळ्यातील अनेक साधू सोशल मीडियावर व्हायरल झाले.

नागा साधू आपल्या चित्र-विचित्र तपस्यांमुळे तसेच वर्तनामुळे चर्चेत येतात. यंदाचे काही साधू त्यांच्या आक्रमक होण्यामुळे तसेच पत्रकारांना मारहाण करण्यामुळेही चर्चेत आले. मात्र, हेच साधू कधीकाळी लढवय्ये साधू होते, अशी इतिहासाची पाने सांगतात.

अठराव्या शतकातील पानिपतची लढाई असो, अहमद शाह अब्दालीशी दोन हात करणं असो वा अनेक राजपूत राजांना लष्करी मदत पुरवणं असो, नागा साधूंनी त्यामध्ये महत्त्वाची भूमिका वठवली आहे.

नागा साधू कोण असतात?

हिंदू धर्मातील वैष्णव आणि शैव या दोन संप्रदायामध्ये प्रामुख्याने बहुतांश अध्यात्मिक विश्व व्यापलेलं आहे.

भगवान विष्णू अथवा विष्णूचे अवतार असलेल्या राम आणि कृष्ण या दोन देवांना जे मानतात ते वैष्णव म्हणवले जातात; तर जे भगवान शंकराला मानतात, त्यांना शैव म्हटलं जातं.

नागा साधू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वैष्णव आखाड्यांमधील साधूंना वैरागी म्हटलं जातं तर शैव आखाड्यांमधील साधूंना दशनामी वा संन्यासी म्हटलं जातं.

एकूण 13 आखाडे शैव, वैष्णव आणि शीख धर्माने प्रभावित असलेल्या उदासीन आखाड्यांमध्ये विभागले गेले आहेत.

वैष्णव आखाड्यांमधील साधूंना वैरागी म्हटलं जातं तर शैव आखाड्यांमधील साधूंना दशनामी वा संन्यासी म्हटलं जातं. त्यामुळे, नागा संन्यासी आढळतात ते फक्त शैव आखाड्यांमध्येच.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

कुंभमेळ्यात दिसणारे नागा साधू नेमके कुठून येतात, ते कसे बनतात, एरव्ही ते कुठे असतात आणि त्यांना दीक्षा कशाप्रकारे दिली जाते, यासंदर्भातील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे वाचता येतील.

नागा साधूंबाबतच्या विविध प्रश्नांची उत्तरे शोधतानाच अनेक नागा साधूंनी आपले पूर्वज नागा साधू हे लढवय्ये असल्याचा दावा केला.

नागा साधू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रयागराज महाकुंभ मेळ्यात घेतलेले नागा साधूचे छायाचित्र ( फेब्रुवारी, 2025)

पत्रकार दीप्ती राऊत यांनी आपल्या 'कुंभमेळा: एक दृष्टिक्षेप' या पुस्तकात यासंदर्भात माहिती दिली आहे.

"देशात परकीय सत्तांनी धुमाकूळ माजवत असताना साधूंचा एक गट शंकराचार्यांकडे गेला आणि त्यांनी धर्मरक्षणासाठी शस्त्र हातात घेण्याची परवानगी त्यांच्याकडे मागितली. शंकराचार्यांनी त्यास विरोध केला.

"धर्माच्या रक्षणासाठी शस्त्राची गरज नसून त्यासाठी शास्त्रच सक्षम असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. सरतेशेवटी साधूंचा एक गट वेगळा झाला आणि त्यांनी हातात शस्त्र घेतलं. शास्त्रासोबतच त्यांनी शस्त्राचाही सरावा केला. ते परकीयांविरोधात लढले आणि त्यांनी हिंदू धर्माचं रक्षण केलं," असं सांगितलं जातं.

नागा साधूंची प्रशिक्षित राखीव पलटण

थानापती महंत प्रशांत गिरी हे जुना आखाड्याशी संबंधित असलेले नागा साधू आहेत. त्यांच्याशी बोलताना त्यांनी असाच दावा केला.

ते म्हणाले की, "आपले पूर्वज सनातन धर्माच्या संरक्षणासाठी लढले, त्यासाठीच त्यांनी शास्त्रासोबतच शस्त्रेही हाती घेतली."

थानापती महंत प्रशांत गिरी
फोटो कॅप्शन, थानापती महंत प्रशांत गिरी

कमी-अधिक फरकाने आताच्या सर्वच नागा साधूंचा असा दावा असला तरीही इतिहासातील वास्तव वेगळं असल्याचं अभ्यासक नमूद करतात.

दीप्ती राऊत आपल्या 'कुंभमेळा: एक दृष्टिक्षेप' या पुस्तकात सांगतात की, "या साधूंच्या हातात नेमकी शस्त्रं कधी आली, याचा ठोस उल्लेख इतिहासात सापडत नाही. मात्र, हाती आलेल्या शस्त्रांचा आधार घेऊन साधूंनी कशाप्रकारे राजकीय सत्तेशी संधान साधले आणि आर्थिक सत्तेवर नियंत्रण मिळवले, याचे बरेच पुरावे सापडतात."

नागा साधू हे एखाद्या प्रशिक्षित राखीव पलटणीप्रमाणे काम करायचे, असे इतरही अनेक इतिहास अभ्यासक सांगतात.

काही गिरी, गोसावी आपल्या प्रशिक्षित पलटणी घेऊन अवधचा नवाब, भरतपूरचा जाट राजा, बनारसचा राजा, बुंदेलखंडचे राजे, मराठा राजे माधवजी सिंधिया, जयपूर, जैसलमेरचे महाराज यांच्यासाठी लढले आहेत. मात्र, सोबतच ते मुघलांसाठीही लढल्याचे अनेक दाखले इतिहासात उपलब्ध आहेत.

दीप्ती राऊत लिखित 'कुंभमेळा: एक दृष्टिक्षेप'

फोटो स्रोत, Shabd Publication

फोटो कॅप्शन, दीप्ती राऊत लिखित 'कुंभमेळा: एक दृष्टिक्षेप'

या बदल्यात त्यांना तत्कालीन राजांकडून वार्षिक तनखा तसेच जमिनीही मिळायच्या.

पत्रकार दीप्ती राऊत यांनी इतिहास अभ्यासक आनंद भट्टाचार्य यांच्या 'द दशनामी संन्यासी अ‍ॅज असेटीक्स अँड वॉरियर इन द एटीन्थ आणि नायटीन्थ सेंच्यूरीज्' या पुस्तकाचा हवाला देत म्हटलं आहे की, "पुरेशा पुराव्यांअभावी दशनामी नागा साधूंचा उदय आणि प्रसार नेमका केव्हा झाला हे सांगणं अवघड आहे. मात्र, मुघल साम्राज्याच्या उतरत्या काळात त्यांचं अस्तित्व उजेडात आले असे दिसते. केंद्रीय अधिपत्याचा ऱ्हास आणि प्रादेशिक राजसत्तांचा उदय या काळात दशनामी स्वतंत्रपणे कामकाज करू लागले. त्यानंतर ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा विरोध होईपर्यंत त्यांचा झपाट्याने प्रसार झाला. भारतभर विखुरलेल्या स्वरुपातील निमलष्करी पलटणी म्हणून ते राहू लागले."

18 व्या शतकात कार्यरत होती नागा साधूंची मोठी फौज

भारतीय इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांनी आपल्या 'अ हिस्ट्री ऑफ दशनामी नागा संन्यासीज्' या आपल्या पुस्तकामध्ये नागा साधू आणि त्यांनी केलेल्या अनेक लढायांबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

ते कोणत्या राजांसाठी कधी लढले, या विषयीचा सविस्तर इतिहास त्यांनी आपल्या पुस्तकात नमूद केला आहे.

आपल्या पुस्तकात ते अठराव्या शतकातील तीन महत्त्वाच्या दशनामी नागा साधूंविषयी विस्ताराने माहिती देतात. या दशनामी नागा साधूंमध्ये राजेंद्र गिरी गोसावी आणि त्यांचे शिष्य असलेले दोन भाऊ म्हणजेच अनुपगिरी गोसावी आणि उमरावगिरी गोसावी यांच्याविषयीचा इतिहास सांगतात.

'अ हिस्ट्री ऑफ दशनामी नागा संन्यासीज्'

फोटो स्रोत, Gyan Publishing House

फोटो कॅप्शन, सर जदुनाथ सरकार लिखित 'अ हिस्ट्री ऑफ दशनामी नागा संन्यासीज्'

अनुपगिरी आणि उमरावगिरी हे दोन नागा साधू लढवय्ये म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावताना दिसतात. आपल्या कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असताना ते पायदळ तसेच घोडदळाने सुसज्ज असलेल्या तब्बल 40 हजार नागा साधूंचं नेतृत्व करत होते, असंही सर जदूनाथ सरकार आपल्या अभ्यासात नमूद करतात.

1751 ते 1753 या काळात राजेंद्र गिरी हे मुघल शासक अहमद शाहचे वजीर (पंतप्रधान) असलेल्या सफदर जंगसाठी काम करत होते. तेव्हा अवधचा शासक असलेल्या सफदर जंग यांच्या सर्व लष्करी मोहिमांमध्ये राजेंद्र गिरी हे प्रमुख योद्धा होते.

1753 मध्ये राजेंद्र गिरी यांचं निधन झाल्यानंतर, त्यांचे अनुयायी असलेले अनुपगिरी आणि उमरावगिरी यांनी सफदर जंग आणि नंतर त्यांचा मुलगा शुजा-उद-दौला यांना पाठिंबा देणं आणि त्यांच्यासाठी काम करणं सुरुच ठेवलं.

अहमद शाह अब्दालीविरोधात नागा साधूंनी दिला होता लढा

1756 साली अफगाणी आक्रमक अहमद शाह अब्दालीने भारतावर आक्रमण केलं होतं. तेव्हा अनुपगिरींच्या नेतृत्वाखाली अब्दालीच्या विरोधात अनेक लढे देण्यात आल्याचं इतिहासात नमूद आहे.

सर जदुनाथ सरकार यांनी आपल्या 'अ हिस्ट्री ऑफ दशनामी नागा संन्यासीज्' या आपल्या पुस्तकामध्ये नागा साधूंनी दिलेल्या या लढ्याबाबत माहिती दिली आहे.

सर जदुनाथ सरकार

फोटो स्रोत, Jadunath Bhavan Museum and Resource Centre

फोटो कॅप्शन, सर जदुनाथ सरकार

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मथुरामध्ये नागा साधूंचा थेट सामना अहमदशाह अब्दालीविरोधात झाला. अब्दालीने माजवलेला उत्पात रोखण्यासाठी नागा साधू पुढे आले आणि त्यांनी लढा दिला.

"अब्दालीच्या या लुटीविरोधात जवळपास 4 हजार नागा साधूंनी लढा दिला. त्यापैकी या लढाईत जवळपास 2 हजार नागा साधू मृत्यूमुखी पडले. मात्र, त्यांनी गोकुळमधील कृष्णाचं मंदिर विटाळण्यापासून वाचवलं," असं सर जदूनाथ सरकार सांगतात.

मराठा सत्तेशी कसे राहिले नागा साधूंचे संबंध?

1750 साली उत्तर भारतात राजकीय अस्थैर्याची परिस्थिती होती. अशा काळात पेशवा बाळाजी बाजीरावच्या नेतृत्वाखालील मराठ्यांना आपलं वर्चस्व उत्तर भारतात अधिक विस्तारायचं होतं. 1759 मध्ये, मराठ्यांनी नजीब-उद-दौलाचा ताब्यातील प्रदेश जिंकण्यासाठी रणनिती आखली होती. मराठ्यांनी त्याच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रदेशाच्या दिशेने कूच केली होती.

एकीकडं मराठ्यांचं बलाढ्य सैन्य आक्रमण करत असताना दुसऱ्या बाजूला नजीब-उद-दौलाच्या मदतीसाठी नागा साधूंची मोठी पलटण पुढे सरसावली. अनुपगिरी आणि उमरावगिरी यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई झाली.

नागा साधूंनी मराठ्यांना रोखण्यात निर्णायक भूमिका बजावली. मराठ्यांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी नजीब-उद-दौलाने शुक्रतालच्या मजबूत किल्ल्यामध्ये आसरा घेतला होता.

नागा योद्ध्यांनी मराठ्यांशी दोन हात करण्यासाठी त्यांच्यावर रात्री अचानक हल्ला केला.

फोटो स्रोत, British Library

फोटो कॅप्शन, नागा योद्ध्यांनी मराठ्यांशी दोन हात करण्यासाठी त्यांच्यावर रात्री अचानक हल्ला केला.

त्यावेळी मराठा सेनापती गोविंद बल्लाळने त्याला कोंडित पकडण्यासाठी आपल्या 10 हजार घोडदळासह नजीबाबादकडे कूच केलं.

या निर्णायक क्षणी नागा योद्ध्यांनी मराठ्यांशी दोन हात करण्यासाठी त्यांच्यावर रात्री अचानक हल्ला केला. मराठे विश्रांती घेत असताना त्यांनी हा हल्ला केला होता. त्यामुळे, बेसावध क्षणी केलेल्या या हल्ल्यात मराठ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांचे 200-300 सैनिक मारले गेले, अनेक जणांना कैद केलं गेलं तसेच त्यांचं बरंचसं शस्त्र आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं.

नागा साधूंनी मराठ्यांवर केलेल्या या हल्ल्यामुळे नजीब-उद-दौला बचावला.

त्यानंतर नजीब-उद-दौलाच्या मदतीसाठी शुजा-उद-दौलाचे सैन्य आलं. सरतेशेवटी मराठ्यांना माघार घ्यावी लागली. थोडक्यात, या लढाईत मराठ्यांना माघारी धाडण्यामध्ये नागा साधूंची भूमिका महत्त्वाची ठरली होती, अशी माहिती सर जदुनाथ सरकार देतात.

पानिपतच्या लढाईत नागा साधूंची भूमिका काय होती?

पानितपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये देखील (1761) अनुपगिरी यांच्या नेतृत्वातील नागा साधूंनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. या लढाईत त्यांनी मुघल सम्राट आणि अफगाण आक्रमकांच्या बाजूने मराठ्यांच्या विरोधात लढा दिला.

खरं तर त्यांचं नग्न असणं अफगाण शासकांना खटकलं होतं. "काफिरांना मुस्लिमांसमोर त्यांचं गुप्तांग आणि नितंब उघडं ठेवून राहण्याचं इतकं स्वातंत्र्य कसं काय असू शकतं?" असा सवालही अफगाण शासकांकडून करण्यात आला.

त्यांच्या नग्नतेमुळे त्रासलेल्या अफगाण शासकांनी त्यांना आपल्या छावणीपासून दूर राहण्याचा आदेश दिला होता.

असं असूनही नागा साधू या युद्धात त्यांच्या बाजूने एकनिष्ठ राहिले. या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला तसेच विश्वासराव आणि सदाशिवराव भाऊ हे मराठा योद्धे धारातीर्थी पडले.

खरं तर त्यांचं नग्न असणं अफगाण शासकांना खटकलं होतं.

फोटो स्रोत, British Library

फोटो कॅप्शन, खरं तर त्यांचं नग्न असणं अफगाण शासकांना खटकलं होतं.

त्यावेळी, नागा संन्यासी अनुपगिरी आणि त्यांच्या अनुयायांनी गंगेचं पवित्र मानलं जाणारं पाणी आणि चंदन वापरून विश्वासराव आणि सदाशिवराव भाऊ यांच्यावर अंत्यसंस्कार केले, असे जदुनाथ सरकार यांच्या पुस्तकात नमूद आहे.

यासंदर्भात 'कुंभमेळा: एक दृष्टिक्षेप' या पुस्तकात पत्रकार दीप्ती राऊत यांनी माहिती देताना शबीना काझमी यांच्या शोधनिबंधाचा हवाला दिला आहे.

'फ्रॉम रिलिजिअस रॅडिकॅलिझम टू आर्मी बटालियन्स - नागाज अँड गोसावीज इन द आर्मी ऑफ द नवाब - वझीर्स ऑफ अवध टिल द 1770' या शोधनिबंधात शबीना काझमी सांगतात की, "1761 मध्ये पानिपतच्या युद्धानंतर नवाबाच्या सांगण्यावरुन नागा सैनिकांनी युद्धात कामी आलेल्या मराठा सैनिकांवर हिंदू धर्मानुसार अंत्यसंस्कार केले.

अफगाण रोहिल्ला आणि अवधच्या सैन्याने मराठा फौजेचा पराभव केला. त्या वेळी मराठा सैनापती विश्वासराव आणि सदाशिवराव यांच्यासह 28 हजार मराठा सैनिकांचे मृतदेह बऱ्याच तडजोडींनंतर सुजा-उल-दौलाच्या हाती आले. ते त्याने अनुपगिरी गोसावींकडे अंत्यसंस्कारासाठी सोपवले."

ब्रिटिशांच्या बाजूने लढले नागा साधू

अनुपगिरी यांनी अनेक युद्ध केली. त्यांना 'हिंमत बहादूर' असंही म्हटलं जायचं.

1761 मध्ये पानिपतच्या युद्धात ते मुघलांसोबत मराठ्यांच्या विरोधात अफगाणांच्या बाजूने लढले.

तीन वर्षानंतर बक्सारच्या लढाईत ते ब्रिटिशांच्या विरोधात मुघलांच्या बाजूने उभे होते. नंतरच्या काळात अनुपगिरी यांनी ब्रिटिशांशी हातमिळवणी केली.

त्यामुळेच, ब्रिटिशांना भारतात सत्ता स्थापन करणं सोयीचं झालं, असं ब्रिटीश लेखक विल्यम पिंच यांचं मत आहे. त्यांनी 'Warrior Ascetics and Indian Empires' हे पुस्तक लिहिलं आहे.

नागा साधू

फोटो स्रोत, Getty Images

"मुघल आणि मराठा यांच्या अस्ताचा घटनाक्रम आणि ब्रिटिशांच्या उदयाची गाथा काळजीपूर्वक पाहिली तर अनुपगिरी गोसावी यांचं इतिहासातील महत्त्व लक्षात येतं," असं पिंच आपल्या पुस्तकात नमूद करतात.

1803 मध्ये मराठ्यांचा पराभव करून दिल्ली ताब्यात घेण्यामध्ये इंग्रजांना मदत करण्यात अनुपगिरी गोसावी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या विजयानंतरच खऱ्या अर्थाने ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात भारतातील सत्तेची सूत्रे गेली आणि ते जगातील एक मोठी सत्ता म्हणून उदयास आले, असंही ते आपल्या पुस्तकात सांगतात.

विविध राजपूत राजांसाठीही लढले नागा साधू

अठराव्या शतकाच्या मध्यात उत्तर भारतात सुरजमल यांच्या नेतृत्वाखाली जाट शासकांची सत्ता प्रभावी होती. राजपुताना, जोधपूर, जैसलमेर, बडोदा, कच्छ, मेवाड, अजमेर, झाशी या भागातील विविध राजांसाठी नागा साधूंनी लढाया केल्या आहेत.

मात्र, राजेंद्र गिरी आणि त्यांचे शिष्य असलेले उमरावगिरी आणि अनुपगिरी यांचे उल्लेख इतिहासात अधिक आढळून येतात.

कुंभमेळ्यातील नागा साधू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कुंभमेळ्यातील नागा साधू

त्यांचं महत्त्व अवधचा नवाब, दिल्लीचा मुघल सम्राट आणि मराठा राजांनी ओळखलं. दशनामींमधील इतर कुणीही नागा साधू इतक्या उच्च पदावर पोहोचू शकलेलं नाही.

मात्र, त्यांच्याव्यतिरिक्त इतरही अनेक नागा संन्यासी हे राजपुताना, गुजरात आणि इतर राज्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यकर्त्यांसाठी धैर्याने लढल्याचे दाखले इतिहासात उपलब्ध आहेत.

ते उमरावगिरींप्रमाणे फार मोठे लढवय्ये झालेले नसले तरीही त्यांची निष्ठा आणि त्यांनी दाखवलेलं धैर्य उल्लेखनीय होतं.

दुर्दैवाने, त्यांचा इतिहास वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विखुरलेला असून त्याबाबतच्या तपशीलवार नोंदींचा अभाव आहे. त्यामुळे इतिहासकारांना त्यांचं पूर्ण दस्तऐवजीकरण करणं कठीण झालं आहे.

नागा साधू

फोटो स्रोत, Getty Images

दशनामी नागांव्यतिरिक्त, वैरागी, रामानंदी आणि विष्णू-स्वामी यांच्यासह इतर हिंदू योद्धा साधूंनीही राजपुताना आणि मालव्यातील विविध लढायांमध्ये भाग घेतला.

या योद्ध्यांना महापुरुष किंवा गोसावी म्हणून संबोधलं जातं. नागा साधू विविध भारतीय राजांच्या संरक्षणासाठी लढले. त्याशिवाय, काही नागा साधू मुघल आणि अफगाणांच्याही मदतीला गेल्याचं दिसून येतं.

त्याबदल्यात तनखा आणि जमीन ज्या सत्ताधाऱ्याकडून मिळते, त्याच्याकडे राखीव पलटण म्हणून त्यांनी काम केल्याचं दिसून येतं.

फारसी, मराठी आणि हिंदी भाषेतील जुन्या हस्तलिखितांमध्ये त्यांचा उल्लेख आहे. परंतु त्यांच्या शीर्ष नेतृत्वाबद्दल आणि त्यांच्या संख्येबद्दल अचूक तपशील उपलब्ध नाहीत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)