You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
79 व्या वर्षी 12 वी उत्तीर्ण, आजोबा आता म्हणतात 'मी वकील होणारच', आणखी शिकण्याची उमेदही कायम
- Author, शाहिद शेख
- Role, बीबीसी मराठीसाठी
स्वप्नांना वयाचं बंधन नसतं हे आपण कित्येक वेळा ऐकतो. पण एका ठराविक वयानंतर आपल्या तोंडून आपसूकच शब्द येतात 'आता काय वय राहिलं का?'
काही गोष्टी करायचं वय निघून गेलं म्हणून अनेक जण आपल्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. पण खरं तर आपण आपली स्वप्नं कोणत्याही वयात पूर्ण करू शकतं याचं एक मूर्तिमंत उदाहरण मला पाहायला मिळालं.
बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला. निकाल लागल्यानंतर मुलांना पेढे भरवत असलेले पालक तुम्ही पाहिले असतीलच.
दोन वर्ष अथक परिश्रम केल्यानंतर पास झाल्याचा आनंद मुला-मुलींच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतो. पण यावेळी माझं एका वेगळ्या विद्यार्थ्यानं वेधलं. ते म्हणजे वयाच्या 80 वर्षाकडे झुकलेले एक आजोबा. गोरखनाथ मोरे असं त्यांचं नाव
आजोबा बारावी पास झाले असं समजलं आणि मी त्यांचा शोध घेत भाईंदरला पोहोचलो.
लाईट ब्लू कलरच्या सफारीमध्ये प्रसन्न मुद्रेतल्या आजोबांनी माझं स्वागत केलं आणि त्यांनी आपली गोष्ट मला सांगितली.
84 व्या वर्षी होतील वकील
गोरखनाथ मोरे यांनी नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांना 44.50 टक्के गुण मिळाले आहेत. अनेक दिवसांपासून त्यांचं वकील व्हायचं स्वप्न होतं. त्या मार्गातील एक टप्पा पूर्ण झाल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होतं.
आता त्यांनी वकील होण्यासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा दिली आहे. प्रवेश घेतल्यावर पाच वर्षं त्यांना वकिली पूर्ण करण्यासाठी लागतील. म्हणजे वयाच्या 84 व्या वर्षी ते वकील होतील.
आपण नक्कीच वकील होऊ हा आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवत होता. स्वप्नं पूर्ण करण्यासाठी वयाची मर्यादा नसते हेच त्यांच्या देहबोलीतून जाणवत होतं.
साधारणपणे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षण, नोकरी, लग्न, मुलं बाळं असे अनेक टप्पे येतात. पण हे करत असताना एखादी गोष्ट राहून जाते आणि नंतर त्याची आठवण आली तरी त्यासाठी आपण फार झटत नाही.
गोरखनाथ मोरे यांची गोष्टही अशीच सुरू होते.
मोरे 10 वी उत्तीर्ण झाल्यावर नौदलात भरती झाले. त्यांनी मास्टर चीफ पेट्टी ऑफिसर (Master Chief Petty Officer) या पदावर 32 वर्षं सेवा केली. ते करत असताना आपण बारावी झालो नाहीत ही जाणीव त्यांना व्हायची.
मग त्यांनी एकदा परीक्षेसाठी दोन महिन्यांची रजा घेतली. हे वर्षं होतं 1966 चं तेव्हा शिक्षकांचा राज्यव्यापी संप झाला आणि परीक्षा रद्द झाल्यामुळं त्यावर्षी परीक्षाच देता आली नाही, असं ते सांगतात.
त्यानंतर ते सेवेतून निवृत्त झाले आणि एका बिल्डरकडे लिगल विभागात काम करू लागले. त्यानिमित्ताने त्यांना सतत कोर्टात जावं लागायचं. त्यातून आपण पुन्हा बारावीची परीक्षा द्यायला हवी, असा विचार पुन्हा पुन्हा डोकं वर काढायचा.
गोरखनाथ मोरे सध्या ठाण्यात एका नामांकित बिल्डरकडे लीगल विभागात असिस्टंट म्हणून गेली 17 वर्षं काम करत आहेत.
या टीममध्ये 15 ते 20 वकील आहेत आणि मोरे दररोज कोर्टात कामानिमित्त जातात.
"माझं काम बघून अनेक वकील म्हणायचे की, तुम्हाला कायद्याचं चांगलं ज्ञान आहे, मग तुम्ही वकील का नाही झालात? एकदा तर सुप्रीम कोर्टातील एका वरिष्ठ वकिलांनी मला थेट विचारलं की , तुमचं शिक्षण का अर्धवट आहे? तुम्ही आत्तापर्यंत 3 वेळा वकील झाला असता, मी त्यांना सांगितलं की आता वय राहिलं नाही. तेव्हा त्यांनी म्हटलं, शिक्षणाला वय नसतं. हे शब्द मनाला इतके भिडले की मी ठरवलं आता काही झालं तरी 12 वी पूर्ण करायची," असं मोरे यांनी सांगितलं.
मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे, ही गोष्ट मी जेव्हा माझ्या घरी सांगितली. तेव्हा सर्व जण आनंदी झाले. माझी मुलगी डॉक्टर आहे तर मुलगा मेकॅनिकल इंजिनिअर. त्यांनी मला सपोर्ट केला. त्यांनी फॉर्म भरला आणि मी तयारी सुरू केली.
तसेच, मी जेव्हा शिकत आहे म्हटल्यावर माझ्या ऑफिसमधल्या लोकांना आनंद झाला आणि त्यांनीही मला पूर्ण सहकार्य केले.
काम सांभाळून अभ्यास कसा केला?
"मी भाईंदर ते ठाण्याला रोज बसने प्रवास करतो. सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास हा प्रवास माझ्या अभ्यासासाठी उपयोगात आणला," असं मोरे सांगतात.
प्रवासादरम्यान पुस्तकं वाचणं, नोट्स काढणं आणि धडे पाठ करणं हे त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने केलं. घरी आल्यावर जेवण करून रात्री 12 वाजेपर्यंत नियमित अभ्यास करायचा, असा त्यांचा दिनक्रम होता.
ट्युशनला जाण्यासाठी वेळ नव्हता आणि मला तशी गरजही वाटली नाही. मी सेल्फ स्टडी केली असं मोरे सांगतात.
त्यांच्या मुलगा, मुलगी आणि सून यांनीही अभ्यासात मोलाची मदत केली.
79 व्या वर्षी आपली तब्येत खणखणीत असल्याचं ते अभिमानाने सांगतात. माझे दात अजून चांगले आहेत, कानाने स्पष्ट ऐकता येतं आणि डोळ्यांना चष्मा नाही. त्यामुळे अभ्यास करताना शरीरावर कोणताही ताण आला नाही, असं ते आवर्जून सांगतात.
शिक्षण का अपूर्ण राहिलं?
1966 मध्ये 12वीची परीक्षा देण्यासाठी त्यांनी दोन महिन्यांची रजा घेतली होती. पण परीक्षा जवळ येताच शिक्षकांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आणि परीक्षा रद्द झाली.
"त्या वेळी परीक्षा देणं शक्यच झालं नाही आणि मग शिक्षणाकडे दुर्लक्षच झालं," असं ते सांगतात.
79 वर्षांचे आजोबा, जेव्हा परीक्षेला येतात त्यावेळी मुलांची काय प्रतिक्रिया होती असं विचारल्यावर मोरे सांगतात, मी जेव्हा परीक्षेला जात होतो तेव्हा तिथला स्टाफ, पोलीस कर्मचारी आणि इतर विद्यार्थी माझ्याकडे कौतुकाने पाहायचे. काका परीक्षेला आले, असं म्हणायचे.
"मी 12वीचा अभ्यास करत असतानाच एलएलबीसाठी पात्रता परीक्षा (CET) देखील दिली आहे. त्याचा निकाल जुलैमध्ये येणार आहे.
निकाल लागल्यानंतर लगेचच प्रवेश घेईन आणि एलएलबी सुरू करीन. आणि निश्चितपणे मी वकील होईल," असं मोरे सांगतात.
नौदलातील नोकरीतून आपल्या शिस्त, नियमितपणा आणि वेळेच्या नियोजनाचे कौशल्य मिळाले. त्यातूनच मी घर, नोकरी आणि शिक्षण या विविध जबाबदाऱ्या पार पाडू शकतो असं मोरे सांगतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)