You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
96व्या वर्षांच्या अभ्यासू आजींना जावयापेक्षा जास्त मार्क्स
शिकण्यासाठी वयाची अट नसते असं म्हटलं जातं. पण या आजींनी मात्र हे वाक्य खरं करून दाखवलं आहे. 96व्या वर्षी या आजी हातात वही आणि पेन घेऊन गणितं सोडवतात.
इतकंच नाही तर नुकतीच त्यांनी परीक्षाही दिली आणि त्यात त्यांना त्यांच्या जावयापेक्षा जास्त मार्क्सही मिळाले.
केरळमधील अलपुजा भागातील चेप्पादू येथे राहणाऱ्या 96वर्षीय कार्तियानी अम्मा या आजींनी अक्षरलक्ष्यम साक्षरता कार्यक्रमांतर्गत झालेल्या परीक्षेत 98 टक्के मार्क मिळवले. केरळाच्या प्रौढ साक्षरता मिशननं ही परीक्षा घेतली होती.
प्रौढ साक्षरतेच्या बाबतीत केरळाचा देशात पहिला क्रमांक आहे. त्याच केरळामध्ये प्रौढ शिक्षणाचा आणखी प्रसार व्हावा म्हणून एक कार्यक्रम राबवण्यात येत आहे.
"माझं शिक्षण एवढ्यावरच थांबणार नाही. माझं चौथीचं शिक्षण पूर्ण होईल. मग मी आठवी, दहावी असं शिक्षण पूर्ण करणार आहे. शंभर वर्ष पूर्ण होण्याआधी मला माझी दहावी पूर्ण करायची आहे. त्यांनतर मला वाटतं की मला सरकारी नोकरी मिळावी," असं त्यांनी बीबीसीच्या प्रतिनिधी प्रमिला कृष्णन यांना सांगितलं.
आजींना कम्प्युटरदेखील शिकायचं आहे.
या परीक्षेत त्यांच्या घरातून त्या एकट्या नव्हत्या. त्यांचे जावई देखील त्यांच्यासोबत होते.
"माझे जावई आणि मी सोबतच अभ्यास केला. पण परीक्षेमध्ये ते प्रश्नांची उत्तरं विसरले. मला मात्र सगळं लक्षात होतं," आजी आनंदानं सांगतात.
त्यांच्या जावयाला त्यांच्यापेक्षा दहा टक्के कमी म्हणजे 88 टक्के मिळाले.
ही परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पिनरयी विजय यांच्याकडून प्रमाणपत्र मिळालं आहे.
या वर्षी राज्यात एकूण 43,000 प्रौढांनी परीक्षा दिली होती. कार्तियानी या सर्व परीक्षार्थींपैकी सर्वांत ज्येष्ठ आहेत. त्यांना गणित आणि लेखन कौशल्यात पैकीच्या पैकी मार्क्स पडले. पण प्रशिक्षण या विषयात त्यांना दोन गुण कमी मिळाले.
त्या सांगतात, लहानपणी त्यांची परिस्थिती बेताची होती त्यामुळे त्यांना शिक्षण घेता आलं नाही.
मुलं, नातवंडं असा त्यांचा परिवार आहे.
त्या सांगतात, "लहान मुलांना शिकताना पाहून मला देखील शिकावंसं वाटलं. जर माझं लहानपणी शिक्षण पूर्ण झालं असतं तर मी सरकारी अधिकारी झाले असते."
कार्तियानी आजींची मुलगी अम्मीनी यांनीच त्यांना शिकण्याबद्दल सूचवलं. अम्मीनी यांनी वयाच्या 62व्या वर्षी दहावीची परीक्षेत यश मिळवलं.
अक्षरलक्ष्यम साक्षरता कार्यक्रमाचे संचालक पी. एस. श्रीकला सांगतात, "आता कार्तियानी हजारो लोकांसाठी रोल मॉडल आहेत. सध्या राज्यातल्या दोन हजार वॉर्डात हा कार्यक्रम सुरू आहे. पुढच्या टप्प्यात आणखी जास्त लोकांपर्यंत हा कार्यक्रम घेऊन जाण्यात येईल."
2011च्या जनगणनेनुसार केरळमध्ये 18 लाख निरक्षर आहेत. एका वृत्तानुसार, अम्मा त्यांच्या उशीजवळच वही आणि पुस्तक ठेवतात. त्यांची शिक्षिका सांगते की अम्मांना चौथीच्या वर्गात प्रवेश दिला आहे. लवकरच त्या चौथीची परीक्षा पास होतील.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)