You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शाळा उघडल्या: 'आई, मला जाऊ दे न व' असा आग्रह आज मुलांनी का केला?
- Author, दिपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
'मला जाऊ दे न व' असा आग्रह आज काही मुलांनी आईकडे खेळण्यासाठी नव्हे तर शाळेत जाण्यासाठी केला.
"कोरोनाची भीती असल्याने सुरुवातीला आई शाळेत पाठवत नव्हती. मी आईला म्हटलं पावणे दोन वर्षांनी शाळेत जाण्याची संधी मिळते आहे तेव्हा नाही म्हणू नकोस," असं सिद्धी घालेकर या दहावीच्या विद्यार्थिनीने बीबीसीशी मराठीशी बोलताना सांगितलं.
ती म्हणाली, "लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाली तेव्हा मी आठवीत होते आता मी दहावीच्या वर्गात आहे. माझ्यासाठी हे शाळेचं शेवटचं वर्ष आहे त्यामुळे मला आता शाळेत जायचं आहे असंच मी घरच्यांना सांगितलं. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून सर्व नियम मी पाळेन, गर्दीत जाणार नाही, मैत्रिणींशी बोलत असताना सुरक्षित अंतर राखेल याची हमी देत मी शाळेत पोहचले."
राज्यभरात आजपासून (4 ऑक्टोबर) शाळा सुरू झाल्या. शहरांमध्ये आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. शाळेच्या इमारती फुलांनी सजलेल्या दिसल्या, काही शाळांनी प्रवेशद्वारावर रांगोळी काढली तर काहींनी फूल, पेन किंवा चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं.
अगदी सकाळी सात वाजल्यापासून शाळांमध्ये शिक्षकांची लगबग सुरू होती. शिपायापासून ते मुख्याध्यापक सर्वांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. रांगेत उभं केलेल्या विद्यार्थ्यांचं तापमान तपासून आणि त्यांना सॅनिटायजर दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपआपल्या वर्गात प्रवेश केला.
'उत्साह आहे पण भीतीही वाटते'
एवढ्या महिन्यांनंतर शिक्षकांना ऑनलाईन नव्हे तर प्रत्यक्षात जवळून पाहता आल्याने, ऐकता आल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसत होता. "ऑनलाईन शिक्षणाचा मोठा फटका आम्हाला बसला. शिकवलेलं कळत नव्हतं, नेटवर्कची समस्या होती, शंकांचं निरसन होत नव्हतं, परीक्षाही झाल्या नाहीत त्यामुळे पुढे आपलं काय होणार? असा विचार मनात येत होता," असं विद्यार्थी कौस्तुभ जाधव सांगतो.
कोरोनाचं सावट असलं तरी शालेय जीवन पूर्ववत होत आहे याचा आम्हाला आनंद आहे असंही अनेक मुलांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
शाळा सुरू झाली असली तरी पहिल्यासारखं काहीच नाही असंही अनेक विद्यार्थ्यांना वाटतं. त्याचं कारण म्हणजे पावलोपावली विद्यार्थ्यांना निर्बंध आहेत.
मास्क घालण्याचं बंधन, एका बेंचवर मित्रासोबत किंवा मैत्रिणीसोबत बसता येणार नाही, एकत्र डबा खाता येणार नाही, शाळेच्या आवारात खेळता येणार नाही, त्यामुळे अशा अनेक नियमांचं पालन विद्यार्थ्यांना करावं लागत आहे.
'हे ही नसे थोडके' असं म्हणत विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केला आणि अनेक महिन्यांनंतर शाळेच्या भीतींनी मुलांचा किलबिलाट अनुभवला.
अथर्व चव्हाण या विद्यार्थ्याने सांगितलं, "पूर्वी सलग सहा-सात तास शाळा होती. एखादा तास रद्द झाला की खूप आनंद व्हायचा. शिक्षक आले नाहीत तर बरं वाटायचं, त्यांचा ओरडा नकोसा होता. पण आता हे सर्वकाही हवेहवेसे वाटते. शिक्षक आमच्या चांगल्यासाठी आम्हाला बोलतात हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. त्यामुळे पुन्हा पहिल्यासारखं सगळं सुरू व्हावं एवढीच इच्छा आहे."
शिक्षण व्यवस्थेसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यापासून ते प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करेपर्यंत सर्व टप्पे आव्हानात्मक आहेत. शाळांमध्ये अनेक विद्यार्थी एकत्र येत असल्याने कोरोनाचा संसर्ग झाला तर कोण जबाबदार? या पालकांच्या प्रश्नाला कसं तोंड द्यायचं? ही सर्वांत मोठी समस्या राज्य सरकारसमोर आहे आणि त्याला तोंड देत शाळा सुरू करण्यात आल्या.
शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेनुसार, केवळ तीन ते चार तास शाळा घेता येणार आहे. तसंच विद्यार्थ्यांना एकत्र डबा खाता येणार नाहीय. शाळेत मैदानी खेळ खेळण्यास मनाई केली आहे.
प्रज्ञा हिरवे सांगते, "शाळेत आल्याने आनंद तर वाटला पण मनात भीती सुद्धा आहे. एवढ्या दिवसांनी आम्ही शाळेत आलो, बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. कोरोनाची भीती सुद्धा अजून गेलेली नाही. आमचं दहावीचं वर्ष असल्याने काळजी वाटते."
ऑनलाईन-ऑफलाईन शिक्षण एकत्र
विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याची सक्ती पालकांवर नाही. पालकांची सहमती नसल्यास शाळेऐवजी विद्यार्थी ऑनलाईन शिकू शकतात असंही सरकारने स्पष्ट केलंय.
यापार्श्वभूमीवर शाळा आता एकाचवेळी ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण देत आहेत. वर्ग सुरू असताना शिक्षक मोबाईल किंवा लॅपटॉपवर शाळेत गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.
त्यामुळे घरी असलेल्या विद्यार्थ्यांना थेट शाळेच्या वर्गात काय सुरू आहे? कोणता विषय शिकवला जातोय? हे शिकता येत आहे.
अनेक शाळांमध्ये आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती फारशी नव्हती. तर बहुतांश ग्रामीण भागात मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
मुंबईतील एका शाळेतील शिक्षकांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "70 टक्के पालकांनी सहमती पत्र दिलं होतं परंतु शाळेत केवळ 30-35 टक्के विद्यार्थीच उपस्थित राहिले."
येत्या काही दिवसांत विद्यार्थी संख्या वाढेल अशी अपेक्षा शिक्षकांना आहे. पण असं झालं नाही तर एकाच वेळी ऑनलाईन-ऑफलाईन शिक्षण देणं कठीण असल्याचंही काही शिक्षक सांगतात.
प्रवास कसा करायचा?
काही पालकांनी आज विद्यार्थ्यांना आपल्या खासगी वाहनातून शाळेत सोडलं. सर्व पालकांकडे खासगी वाहन नसल्याने अशा विद्यार्थ्यांनी शाळेत कसं पोहचायचं असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विशेषत: मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या शहरात विद्यार्थी शाळेपासून लांब राहतात. पायी येणं त्यांच्यासाठी सोयीचं नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने मुलं स्कूल बस किंवा रिक्षातून प्रवास करतात. पण नियमानुसार एकाच गाडीतून अनेक विद्यार्थ्यांना एकत्र प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे.
स्कूल बसमध्ये एका सीटवर एकाच विद्यार्थ्याला परवानगी देण्यात आलीय. हा पर्याय स्कूल बस चालक तसंच पालकांसाठीही आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याचं दिसतं.
स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "सरकारने यासंदर्भात आम्हाला कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. यासाठी कोणीही पुढाकार घेत नाहीय. शाळांनीही याची जबाबदारी घेतलेली नाही. त्यामुळे सध्यातरी आम्ही स्कूल बस सुरू करत नाहीये."
मुंबईत लोकल रेल्वेतून प्रवास करण्यासाठी विद्यार्थ्यांना मुभा द्यावी अशी मागणी आता केली जात आहे. यासंदर्भात सरकार लवकर निर्णय घेईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
'माझे विद्यार्थी माझी जबाबदारी'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरू झाल्यानंतर आज विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला. ते म्हणाले, "मला माझे शाळेतले दिवस आठवले. सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. पूर्वीचा दिवस वेगळेच असायचे. मित्रांना भेटण्याची उत्सुकता, नवीन वह्या पुस्तके, गणवेश मिळायचे. पण आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात हा आव्हानात्मक काळ सुरू आहे."
शाळा सुरू करण्याचा निर्णय कठीण आणि आव्हानात्मक असल्याचंही त्यांनी मान्य केलं. 'मुलं नाजूक असतात, त्यांचे वय घडण्याचे असते. आज आपण मुलांच्या विकासाचे , प्रगतीचे दार मुलांसाठी उघडतो आहोत. त्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे." असं आवाहन त्यांनी केलं.
विद्यार्थ्यांची जबाबदारी केवळ सरकार आणि शाळेची नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तर पालकांचीही जबाबदारी आहे असं ते म्हणाले.
शाळांच्या खोल्यांची दारे उघडी ठेवा, हवा खेळती हवी, निर्जंतुकीकरण करून घ्या अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या. शाळा पुन्हा बंद करण्याचा विचार नाही असेही संकेत त्यांनी दिले. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील सायन येथील डीएस शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
आता आगामी काळात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढतो की कमी होतो यावर शाळेचे पुढील टप्पे सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाकडून ऑफलाईन शिक्षणाकडे पूर्ववत करण्याचं आव्हान शिक्षकांसमोर आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)