इस्रायलने एकाचवेळी शेकडो हल्ले केल्यानंतर आता कशी आहे सिरियामधली परिस्थिती?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ॲलेन बिनले
- Role, बीबीसी न्यूज
सीरियाचे अध्यक्ष परागंदा झाल्याचा फायदा घेत इस्रायलच्या लढाऊ विमानांनी राजधानी दमास्कस आणि इतर शेकडो ठिकाणी हल्ले केले असल्याचं स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीतून समजत आहे.
सीरियातल्या सैन्याच्या ताफ्यांवर हे हल्ले झाले असल्याचं ब्रिटन स्थित सीरियन ऑबझर्वेटरी फॉर ह्युमन राईट्स (एसओएचआर) या संस्थेनं म्हटलंय.
तसेच सीरियाच्या नौदलाच्या तळांवर हल्ले केल्याची कबुली इस्रायलने दिली आहे. त्याचबरोबर इस्रायलच्या लष्कराने हे देखील मान्य केले आहे की सीरियात 350 हून अधिक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे.
सीरियातल्या रासायनिक शस्त्रांच्या निर्मितीशी संबंध असणाऱ्या, काही संशोधन केंद्रावरही हे हल्ले करण्यात आले असल्याचं स्थानिक वृत्तसंस्था सांगतायत.
सीरियाचे अध्यक्ष बशर-अल-असद यांच्या त्रासाला कंटाळून बंडखोरांनी सत्तापालट घडवून आणला. या बंडखोरांच्या हाती, ही रासायनिक शस्त्रे पडू नयेत म्हणून आपण हे पाऊल उचललं असल्याचं इस्रायलने म्हटलंय.
सोमवारी बशर असद परागंदा झाल्यानंतर सीरियातल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठकही भरवण्यात आली होती. सीरियाबद्दलचं त्यांचं अधिकृत वक्तव्य लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचं परिषदेनं म्हटलं.
"सीरियाची भौगोलिक एकात्मता आणि नागरिकांची सुरक्षा जपण्याची आणि गरजूंना मानवहितकारी मदत पोहोचवण्याची गरज असल्याबद्दल परिषदेतील सर्वांचंच थोड्याफार प्रमाणात एकमत झालं," संयुक्त राष्ट्र संघातले रशियाचे प्रतिनिधी वॅसिली नेबेझिया पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
गेल्या दोन दिवसांत सीरियात जवळपास शंभर विमान हल्ले झाले असल्याचं, एसओएचआरने म्हटलंय. इराणी शास्त्रज्ञ रॉकेट बनवत होते, त्या दमास्कसमधल्या एका ठिकाणावरही हल्ला झाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
संयुक्त राष्ट्र संघाच्या रासायनिक शस्त्रांवर लक्ष ठेवणाऱ्या विभागाने सीरियातल्या अधिकाऱ्यांना कोठारातली शस्त्रं सुरक्षित आहेत, याची खात्री करून घ्यायला सांगितल्यानंतर हे हल्ले सुरू झाले.


माणसाला मुद्दाम इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने किंवा मारण्याच्या उद्देशाने रसायनांचा वापर केला जातो तेव्हा त्याला रासायनिक शस्त्र म्हटलं जातं अशी माहिती ऑर्गनायझेशन फॉर प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स (ओपीसीडब्लू) या संयुक्त राष्ट्र संघाच्या विभागाने दिलीय.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यानुसार रासायनिक शस्त्रांचा वापर करण्यावर बंदी आहे. एका विशिष्ट सैन्याला थांबवण्याची गरज असेल तरीही त्याचा वापर करता येत नाही.
सीरियाकडे नेमकी किती रासायनिक शस्त्र आहे आणि ती कुठे ठेवली आहेत हे नक्की माहीत नाही. पण अध्यक्ष बशर-अल-असाद यांनी अनेक कोठारं भरून ही शस्त्र ठेवल्याचं म्हटलं जातंय. त्याबाबत त्यांनी जाहीर केलेली माहितीही अर्धवट आहे.
सीरियाने 2013 मध्ये ओपीसीडब्लूच्या रासायनिक शस्त्र पत्रकावर सही केली होती. त्याच्या एक महिन्याआधीच दमास्कसमधल्या उपनगरांवर नर्व्ह एजंट्स या सर्वात धोकादायक रासायनिक शस्त्राने हल्ले करण्यात आले होते. त्यात 1,400 लोकांचा मृत्यू झाला होता.
वेदनेत तडफडणाऱ्या लोकांचे फोटो पाहून तेव्हा अख्खं जग हादरलं होतं.
हा हल्ला सरकारकडूनच घडवला गेला असेल असं पाश्चिमात्य देशांने म्हटलं. मात्र, असद यांनी त्याचं खापर विरोधकांवर फोडलं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यावेळी ओपीसीडब्लू आणि संयुक्त राष्ट्र संघाने सिरिया सरकारने जाहीररित्या दाखवलेला सगळा 1300 टन साठा बरखास्त केला. तरीही देशात रासायनिक शस्त्रांचे हल्ले सुरूच राहिले.
2018 मध्ये बीबीसीने केलेल्या विश्लेषणानुसार 2014 ते 2018 या काळात सिरियातल्या नागरी युद्धात आपल्याच देशातल्या नागरिकांविरोधात सरकारने 106 वेळा रासायनिक शस्त्रांचा वापर केला.
सोमवारी ओपीसीडब्लूने सिरियाशी संपर्क करून सगळ्या रासायनिक शस्त्रांचं साहित्य आणि त्या ठेवल्यात आहेत त्या जागांच्या सुरक्षेवर भर देण्यास सांगितलं.
त्यानंतर सोमवारीच इस्रायली लष्कराने गोलन हाईट्स ओलांडून संयुक्त राष्ट्रसंघाचे शांतीदूत आहेत त्या सीरियातल्या बफर झोनमध्ये प्रवेश केल्याचे फोटो जाहीर केले.
सीरियात बंडखोरांनी सत्तापालट केल्याने 1974 च्या युद्धानंतर झालेला करारही मोडला आहे असं म्हणत इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांच्या लष्कराने दोन देशांना वेगळं करणाऱ्या भागाचं नियंत्रण घेतलं असल्याचं जाहीर केलं.

फोटो स्रोत, Getty Images
दमास्कसपासून दक्षिण पश्चिम दिशेला 60 किमी अंतरावर असणारं गोलन हाईटस् हे एक खडकाळ पठार आहे.
1967 ला झालेल्या युद्धात इस्रायलने सीरियाकडून हा भाग हिसकावून घेतला होता. पुढे 1981 मध्ये गोलन हाईट्स आपल्याच देशाचा भाग असल्याचं इस्रायलने जाहीर केलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला कोणीही मान्यता दिली नाही. मात्र, 2019 मध्ये अमेरिकेने पहिल्यांदा गोलन हाईट्सवर इस्रायलचं वर्चस्व असल्याचं मान्य केलं.
सध्याची परिस्थिती विचारात घेता सुरक्षेच्या दृष्टीने इस्रायल संरक्षक दल तात्पुरती पावलं उचलत असल्याचं परराष्ट्र मंत्री गिडीओन सार सोमवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
तिथल्या नागरिकांच्या सुरक्षेची काळजी असून सीरियातील अंतर्गत गोष्टींमध्ये पडण्यात इस्रायलला काहीही रस नाही, असंही ते पुढे सांगत होते.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान इस्रायल लष्कराला सिरियामधली मिसाइल आणि लढाऊ विमानांसारखी मोठी शस्त्रास्त्र बरखास्त करायची आहेत, असं संरक्षक मंत्री कॅट्झ यांनी म्हटलं.
सीरियामधल्या बंडखोरीबद्दल चर्चा सुरू असतानाच इस्रायलकडून हा हल्ला करण्यात आला. हयात-ताहीर-अल-शाम या इस्लामिक विरोधी गटाने अध्यक्ष बशर अल असाद यांची सत्ता उलथवण्यासाठी देशात बंड घडवून आणलं.
रविवारी राजधानी दमास्कसमधे प्रवेश करत सरकारी टेलिव्हिजनवर सीरिया स्वतंत्र झाला असल्याची घोषणा त्यांनी केली. त्याआधी जवळपास 50 वर्षं असद आणि त्यांच्या वडिलांनी या देशावर राज्य केलं.
सीरियातल्या लोकांना क्रुरपणे त्रास दिलेल्या लोकांची एक यादी प्रसिद्ध करणार असल्याचं हयात-ताहीर-अल-शाम गटाने म्हटलं आहे.
अशा वरिष्ठ लष्करी आणि संरक्षक विभागातल्या अधिकाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना बक्षिस दिलं जाईल असंही गटाने जाहीर केलंय.

फोटो स्रोत, Getty Images
देशात सुरू असलेल्या नागरी युद्धात असद यांना हिजबुल्लाह या अतिरेकी संघटनेचं आणि रशियाचं भरपूर पाठबळ होतं. हिजबुल्लाह इस्रायल-गाझा युद्धात आणि रशिया युक्रेनवर आक्रमण करण्यात गुंतल्याचा फायदा हयात-ताहीर-अल-शाम गटाने घेतला.
असद यांची सत्ता उलथणं हा मध्यपूर्व भागातला मोठा ऐतिहासिक दिवस असल्याचं म्हणत इस्रायलने सीरियाला मदतीचा हात पुढे करायला हवा असं नेतन्याहू रविवारी म्हणाले.
"सीरियामध्ये नव्याने सत्तेवर येणाऱ्या अधिकाऱ्यांशी शेजारधर्म आणि शांततेचे नातेसंबंध तयार करता आले तर आम्हाला आवडेलच. पण तसं झालं नाही तर इस्रायल देश आणि त्याच्या सीमा वाचवण्यासाठी आम्ही काहीही करू," नेतन्याहू म्हणाले.
हयात-ताहीर-अल-शाम या गटाचे नेते अबू मोहम्मद अल जावलानी यांचं मूळ गोलन हाईट्स भागात असल्याने इस्रायल आणि सीरिया यांच्यात त्यावरून नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.
जवळपास 20,000 सीरियन नागरिक आणि काही इस्रायल नागरिक या भागात राहतात.
इस्रायलने सीरियावर हल्ला करणं ही काही नवी गोष्ट नाही. इराण आणि हिजबुल्लाह सारख्या गटांशी संबंध असलेल्या सीरियामधल्या जागांवर इस्रायलने याआधीही शेकडोवेळा हल्ले केले आहेत.
गाझामध्ये ऑक्टोबर 2023 ला युद्ध सुरू झाल्यानंतर हे हल्ले वाढले. उत्तर इस्रायलवर हिजबुल्लाह हल्ला करायला लागल्यावर इस्रायलनेही लेबनॉन आणि सिरियामधल्या या गटाच्या ठिकाणांवर हल्ले करायला सुरूवात केली.
मागच्याच महिन्यात अशा पालमायरा भागात झालेल्या एका हल्ल्यात इराणचा पाठिंबा असलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांपैकी 68 सीरियन आणि काही विदेशी सैनिक मारले गेले होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)












