'महापुरुषही आधी देश फिरले', राहुल गांधींच्या 'भारत जोडो'चं भाजप नेत्या सुमित्रा महाजनांकडून कौतुक

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1) महापुरुषही आधी देश फिरले, राहुल गांधींच्या 'भारत जोडो'चं भाजप नेत्या सुमित्रा महाजनांकडून कौतुक

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातल्या ‘भारत जोडो’ यात्रेचं भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कौतुक केलंय. सकाळ वृत्तपत्रानं ही बातमी दिलीय.

येत्या 20 नोव्हेंबरला राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्र महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात प्रवेश करेल. या पार्श्वभूमीवर सुमित्रा महाजनांच्या कौतुकपर वक्तव्याला महत्त्वं आलंय.

सुमित्रा महाजन म्हणाल्या की, “राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण भारत समजून घेतील. आपण लोकशाहीत आहोत आणि लोकशाहीत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वपूर्ण असते.

विरोधी पक्षही मजबूत असला पाहिजे, जो संपूर्ण भारताला डोळ्यासमोर ठेवून बोलला पाहिजे. आम्ही जेव्हा विरोधात होतो, तेव्हा अटलजी, अडवाणी देशासाठी बोलत होते. त्यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव होती.”

“मी जेव्हा प्रवचन करायचे तेव्हा महापुरुषांचे उदाहरण देत होते. जेवढ्या महापुरुषांनी देशासाठी काम केलं, ते आधी देश फिरले. त्यानंतर कामाला सुरुवात केली. राहुल गांधींची देश फिरायची इच्छा झाली, ही खूप चांगली गोष्ट आहे,” असंही सुमित्रा महाजन म्हणाल्या.

2) ‘...तर ते तिसरे अस्त्र काढतील, तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील’

शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर सुषमा अंधारेंनी फेसबुकवर भावनिक पोस्ट शेअर केलीय. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

लेकीला उद्देशून लिहिलेल्या या पोस्टमध्ये सुषमा अंधारे म्हणतात की, ‘बाळा, तुझ्या आईने जुन्या मळवाटेने जायचं नाकारले आणि नवीन पायवाट घडवायची ठरवली आहे. यात बऱ्याचदा पाय रक्ताळणार आहेत.. बेहत्तर.. पण तुझ्या आईने या बलाढ्य साम्राज्याशी लढायचं ठरवलंय..!’

या पोस्टच्या शेवटी सुषमा अंधारेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं एक वक्तव्य नमूद केलंय. त्यातून त्या विभक्त पतीच्या शिंदे गटातील प्रवेशावर भाष्य करताना दिसतात.

अंधारेंनी म्हटलंय की, ‘कुठल्याच शस्त्रानं पराभूत करता आलं नाही तर ते तिसरे शस्त्र काढतील आणि तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील. भय, भ्रम, चरित्र हत्या ही मनुवादी अस्त्रं आहेत, यांच्यापासून सावध राहा.’

तर माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारेंनी विभक्त पती वैजनाथ वाघमारेंना राजकीय प्रवासासाठी सदिच्छाही दिल्या.

3) पवारांच्या घराण्यातच फूट पडण्यासारखं वातावरण – गोपीचंद पडळकर

“सत्तेत असताना राष्ट्रवादीला भाजपाचा एकही आमदार फोडता आला नाही. भाजपा हा विचारांवर प्रेरित होऊन काम करणारा पक्ष आहे. मात्र, सरकार गेल्यावर इतकी चुळबूळ झाली की, पवार घराण्यातच फूट पडते, असं वातावरण निर्माण झालं. तुम्ही राज्यातली एवढी घर फोडली आहे, त्यामुळे जे पेरलं तेच उगवणार आहे,” असं भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला.

पडळकर पुढे म्हणाले की, “राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सांगली जिल्ह्यातील संघटनेची परिस्थिती वाईट आहे. राष्ट्रवादीला तर शाखेपासून सुरुवात करण्याची वेळ आली आहे. एखाद्या रुग्णाला संधिवात झाल्यावर सूज येते. तशी सूज राष्ट्रवादील गेल्या अडीच वर्षांत आली होती. पण सरकार गेल्यानंतर ती सूज आता एका झटक्यात ओसरून गेली आहे.”

गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.

“सांगली हा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचा जिल्हा असून, ते स्वत:च निवडून येऊ शकतात. तासगावमध्ये सुमन पाटील आणि शिराळ्यात मानसिंगराव नाईक हे त्यांच्या हिंमतीवर निवडून येतात. जयंत पाटील यांच्या पाठीमागे फक्त प्राजक्त तनपुरे आहे, बाकी कोण नाही,” असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.

4) EWS विरुद्ध तामिळनाडू सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार

सुप्रीम कोर्टानं गेल्या आठवड्यात संसदेनं केलेली 103 वी घटनादुरुस्ती वैध ठरवली आणि त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (EWS) 10 आरक्षण लागू करण्यास मान्यता दिली आहे.

मात्र, तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विधिमंडळ पक्षांच्या बैठकीत संबंधित निर्णय फेटाळून लावण्यात आला आहे. तामिळनाडू राज्यात ईडब्ल्यूएसचं आरक्षण लागू केलं जाणार नसल्याची घोषणा सरकारने केली आहे. द हिंदूनं ही बातमी दिलीय.

तामिळनाडू विधीमंडळाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (EWS) 10 टक्के आरक्षण लागू करण्याबाबतची 103 वी घटनादुरुस्ती नाकारण्याचा ठराव घेण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

या आरक्षणामुळे गरिबांमध्ये जातीय भेदभाव निर्माण होईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं. सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष AIADMK आणि भाजपाने या बैठकीवर बहिष्कार टाकला.

सर्वपक्षीय बैठकीनंतर राज्याचे उच्च शिक्षण मंत्री के पोनमुडी यांनी सांगितलं की, “राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10 टक्के आरक्षण लागू करणार नाही. पण राज्यात सध्या सुरू असलेलं 69 टक्के आरक्षणाचं कायम सुरू ठेवलं जाणार आहे. EWS आरक्षण सर्व राज्यांमध्ये लागू करावं, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटले नाही. त्यामुळे आम्हाला वाटतं की, राज्यांनी आरक्षणाबाबत स्वतःचे नियम बनवले पाहिजेत.”

5) 1857 चा उठाव हातात कमळ घेऊनच झाला – राजनाथ सिंह

भारताच्या जी-20 प्रेसिडेन्सीच्या लोगोमध्ये कमळाच्या फुलाचा वापर करण्यावरून देशात वाद सुरू झाला आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “कमळ हे आपले राष्ट्रीय फूल असून भारताच्या संस्कृतीचे प्रतीक आहे.” जनसत्तानं ही बातमी दिलीय.

राजनाथ सिंह म्हणाले की, “आरोप करण्यासही मर्यादा आहे. कमळाच्या फुलाला भारत सरकारने 1950 मध्ये आपले राष्ट्रीय फूल घोषित केले होते. त्याचे कारण म्हणजे कमळाचे फूल या देशाच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक आहे.

“1857 मध्ये जेव्हा पहिले स्वातंत्र्ययुद्ध लढले गेले, तेव्हा स्वातंत्र्यसैनिकांनी एका हातात भाकरी आणि एका हातात कमळाचे फूल घेऊन स्वातंत्र्यासाठी लढा दिला.”

जी-20 लोगोमधील कमळाच्या फुलावरून काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे. जी-20 लोगोमध्ये भाजपचे चिन्ह वापरण्यात आले आहे, हे धक्कादायक असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.