ज्याच्यासमोर पेलेही फिका पडायचा असा फुटबॉलपटू, पण दारूच्या व्यसनाने घात केला आणि

    • Author, प्रदीप कुमार,
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

फुटबॉलच्या चाहत्यांना ड्रिब्लिंगचा अर्थ चांगलाच माहितेय. फुटबॉलचं सौंदर्य म्हणजे ड्रिब्लिंग. म्हणजे काय तर पायात बॉल घेऊन फुरशासारखा (अंतू बर्वाची क्षमा मागून) असा वळवत वळवत राहायचा की प्रतिस्पर्धी खेळाडूला कळूच नये काय घडतंय. याला कळस्तोवर तो पार गोलपोस्टवर पोचला की बॉल घेऊन.

फुटबॉल खेळातला हा सगळ्यात अवघड डाव.

याच ड्रिब्लिंगचा एक बेताज बादशाह होता. असा फुटबॉलर ज्याच्यापुढे फुटबॉलचा जादूगार समजला जाणारा पेलेही फिका होता.

पेलेची आणि या खेळाडूची तुलना त्या काळात अनेकदा व्हायची. त्यांचं नाव होतं गरिंचा.

हे नाव कसं पडलं याचीही एक रंजक गोष्ट आहे. गरिंचा त्यांच्या वयाच्या मुलांच्या तुलनेत चणीने लहान होते आणि अशक्तही होते. त्यामुळे त्यांच्या बहिणींनी त्यांचं नाव एक स्थानिक छोटासा पक्षी गरिंचाच्या नावावरून त्यांचं नाव ठेवलं.

‘सर्वात जबरदस्त ड्रिब्लर’

28 ऑक्टोबर 1933 मध्ये ब्राझीलच्या रिओ-दी-जानेरो या शहरातल्या झोपडपट्टीत गरिंचा यांचा जन्म झाला. जन्मतः त्यांच्या पायात दोष होता. त्यांचा उजवा पाय डाव्या पायाच्या तुलनेत सहा सेंटीमीटर लहान होता आणि त्यांचा डावा पाय आतल्या बाजूला वळलेला होता.

म्हणजे त्यांना सरळ उभं राहता यायचं नाही पण आपल्या पायातल्या या दोषालाच गरिंचा यांनी आपली सगळी मोठी ताकद बनवलं. ड्रिब्लिंगचं कसब अंगी बाणवलं. जेव्हा ते विचित्र प्रकारे पळून प्रतिस्पर्धी संघाच्या डिफेंडर्सला चकवायचे तेव्हा संपूर्ण स्टेडियम हास्यात बुडायचं.

म्हणूनच कदाचित फुटबॉलची जनता त्यांना 'पीपल्स जॉय' या टोपणनावाने ओळखायचे. त्यांना फुटबॉलमधले चार्ली चॅप्लिनही म्हटलं जायचं. पण इथपर्यंत पोहचण्याचा गरिंचा यांचा मार्ग काट्यांनी भरलेला होता.

त्यांचे वडील दारूडे होते आणि वडिलांकडून वारसा कसला मिळाला म्हणाल तर व्यसनाचाच. त्याशिवाय काहीही नाही. 14 व्या वर्षीच पोट भरण्यासाठी गरिंचा मजुरी करायला लागले. त्यांना खरं एक आळशी कर्मचारी म्हणूनच ओळखलं जायचं पण ते ज्या कारखान्यात मजुरी करायचे तिथल्या फुटबॉल टीमचे स्टार होते. त्यामुळे त्यांची नोकरी गेली नाही.

गरिंचा यांचा संघर्ष कदाचित जगासमोर आलाही नसता जर ब्राझीलचे पत्रकार रॉय कॅस्ट्रो यांनी गरिंचा यांच्या जीवनावर आधारित ‘गरिंचा – द ट्रायंफ अँड ट्रॅजेडी ऑफ ब्राझील्स फरगॉटन फुटबॉलिंग हिरो’ या नावाने पुस्तक लिहिलं नसतं.

यात गरिंचा यांची गरिबीतून संघर्ष करत पुढे येण्याची, फुटबॉल स्टार बनण्याची आणि नंतर दारू आणि सेक्सच्या व्यसनापायी सगळं गमवण्याची कथा समोर येते.

गरिंचा फुटबॉल कमालीचा खेळत असले तरी त्यांना फार उशीरा क्लबकडून खेळण्याची संधी मिळाली. इतर खेळाडू, विशेशतः पेले जेव्हा क्लबकडून खेळायला लागून कित्येक वर्षं उलटली होती तेव्हा गरिंचा यांना पहिली संधी मिळाली.

ब्राझीलच्या सर्वोत्तम फुटबॉलर्सपैकी एक निल्टन सँटोस यांनी 19 वर्षांच्या गरिंचांना हेरलं आणि त्यांना बोटोफोगो क्लबात पहिली संधी मिळाली.

पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी हॅट्रिक ठोकली. सँटोसचा विश्वास त्यांनी सार्थ ठरवला होता.

पण 1954 सालच्या वर्ल्डकपसाठी त्यांना राष्ट्रीय संघात संधी मिळाली नाही. गरिंचा क्लबसाठी सतत उत्तम खेळत होते. 1957 साली त्यांनी क्लबसाठी 20 गोल करून राष्ट्रीय पातळीवर निवड होण्यासाठी पुन्हा धडका दिल्या. राईट विंगर म्हणून त्यांना संघात घेतलं गेलं.

पेले यांनी आपलं आत्मचरित्र ‘व्हाय सॉकर मॅटर्स’मध्ये गरिंच्या यांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आहे. पेले आणि गरिंचा काय किमया करू शकतात हे फुटबॉलच्या चाहत्यांनी 1958 च्या वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदा पाहिलं.

गरिंचा यांच्या शारीरिक क्षमतेविषयी संघाच्या व्यवस्थापनाला शंका तर होतीच पण मानसिक चाचणीतही ते नापास झाले.

पेले यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे, “गरिंचाने तर आपल्या खेळाचं स्पेलिंगही चुकीचं लिहिलं होतं. अर्थात संघात समावेश होण्यासाठी योग्य स्पेलिंग लिहावं लागेल अशी अट असेल तर टीमचा कोणताही खेळाडू वर्ल्डकपमध्ये सहभागी होऊ शकला नसता.”

जेव्हा ब्राझील पहिल्यांदा चँपियन बनला

गरिंचासोडून आणखी एक खेळाडू मानसिक चाचणीत नापास झाला होता. पेले. डॉक्टरांचं म्हणणं होतं की, वय कमी असल्यामुळे ते वर्ल्ड कपसारख्या स्पर्धेतलं दडपण सहन करू शकणार नाहीत. अर्थात, नंतर गरिंचा आणि पेलेमुळेच ब्राझीलने आपला पहिलावहिला वर्ल्डकप जिंकला होता.

मानसोपचार तज्ज्ञ आणि डॉक्टरांनी गरिंचा आणि पेले यांना वर्ल्डकप टीममध्ये घ्यायला नकार दिला असला तरी प्रशिक्षकांनी या दोघांनाही संघात जागा द्यायची ठरवली.

1958 च्या वर्ल्डकपच्या आठवणी ताज्या करताना पेले यांनी लिहिलं होतं, “स्वीडनच्या विरोधात सामना चालू होता. मी हेडरने (डोक्याने बॉल मारून) पाचवा गोल केला. पण डोळ्यासमोर अंधारी आली आणि मी गोलपोस्टच्या समोरच आडवा पडलो. माझी काहीच हालचाल होत नव्हती.”

“गरिंचा सर्वात आधी माझ्याकडे धावत आले. ते संवेदनशील मनाचे होते. मला मदत करण्यासाठी ते पळत आले होते. त्यांनी माझे पाय उचलले, काहीतरी करून त्यांना माझ्या डोक्यात पुन्हा रक्तप्रवाह सुरू करायचा होता. काही क्षणांनी मी शुद्धीवर आलो तर पाहिलं आमचा संघ आनंदोत्सव साजरा करत होता.”

या दोन खेळाडूंमध्ये सुरेख ताळमेळ होता. ते दोघेही एकत्र ज्या सामन्यात खेळले, तो कोणताही सामना ब्राझील हरलं नाही. दोन्ही खेळाडूंनी एकत्र 40 सामने खेळले, त्यातले 36 ब्राझील जिंकला आणि 4 सामने अनिर्णित राहिले.

1958 नंतर गरिंचा आणि पेले ब्राझीलमध्ये सुपरस्टार ठरले होते. बीबीसी फोर चॅनेलने 'गॉड्स ऑफ ब्राझील – पेले अँड गरिंचा' या नावाने एक डॉक्युमेंट्री बनवली होती. दोन भागांच्या या सीरिजमध्ये पेले आणि गरिंचासाठी ब्राझीलचे लोक किती वेडे होते याचा अंदाज येतो.

पण पेले आणि गरिंचा यांची समकालीन कहाणी एक वेगळा पैलूही दर्शवते. तुमच्या अवतीभोवती असणारं वातावरण तुम्हाला काय देऊ शकतं आणि काय हिरावू शकतं हेही दाखवते.

रॉय कॅस्ट्रो यांनी गरिंचावर लिहिलेल्या पुस्तकात लिहिलं आहे की, 1958 नंतर पेले यांनी आपल्यासाठी एका अनुभवी मॅनेजरची नेमणूक केली. त्या मॅनेजरने पेलेकडून सँटोस क्लबबरोबर प्रतिमहिना 500 डॉलर्सचा करार केला. या कराराअंतर्गत दरवर्षी कराराची रक्कम वाढणार होती.

पण बोटोफोगो क्लबच्या मॅनेजरने गरिंचाच्या करारातला पैशांचा रकाना कोरा सोडला होता. गरिंचाकडे असा कोणी मॅनेजर नव्हता जो त्यांना नीट सांभाळू शकेल, त्यांच्यावतीने फायदेशीर असे करार करू शकेल. त्यामुळे गरिंचा यांनीही कोऱ्या रकान्याच्या करारावरच सही केली. त्यामुळे त्यांना पुढची तीन वर्षं प्रतिमहिना 300 डॉलर्सच मिळत राहिले.

या उदाहरणावरून कळतं की जेव्हा तुम्ही मोठे होता, प्रसिद्ध होता तेव्हा तुमच्या आसपास असणाऱ्या लोकांची भूमिका तुमच्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे. एकीकडे पेले आपल्या करियरसाठी कटीबद्ध होते, गंभीर झाले होते तर गरिंचा आपल्या आसपासच्या लोकांच्या दुनियेत हरवून गेले.

स्वतःच्या बळावर मिळवून दिला 1962 वर्ल्ड कप

गरिबी आणि अभावाच्या गर्तेत वाढलेल्या गरिंचांची पावलं इथे भरकटली. त्यांनी स्वतःला दारूच्या नशेत बुडवून घेतलं. त्यांचं वजन वाढत गेलं आणि अनेक महिलांसोबत असलेल्या त्यांच्या सेक्ससंबंधांच्या कहाण्या सगळीकडे चर्चिल्या जाऊ लागल्या.

पण गरिंचांना अजून इतिहास रचायचा होता. जगाने अजून गरिंचांची सर्वोत्तम कामगिरी बघायची होती. चार वर्षं अशीच निघून गेली. 1962 चा वर्ल्ड कप आला. चिलीत होणाऱ्या स्पर्धेसाठी गरिंचांनी कशीबशी जागा मिळवली.

स्पर्धेच्या दुसऱ्याच मॅचच्या वेळेस पेलेंना दुखापत झाली आणि ते स्पर्धेतून बाहेर झाले. आता संघाची जबाबदारी गरिंचांकडे आली. त्यावेळी चिली फुटबॉल प्रशिक्षक संघाचे अध्यक्ष अल्बर्टो कासोरला यांनी म्हटलं होतं, “ब्राझीलचे दोन संघ आहेत. एक संघ, ज्यात पेले आहेत आणि दुसरा संघ ज्यात पेले नाहीत. दुसरा संघ वर्ल्डकप जिंकण्यायोग्य नाहीये.”

कासोरला यांना स्वप्नातही वाटलं नसेल की त्यांचे स्वतःचेच शब्द त्यांना तोंडावर पाडतील, पण हे शक्य करून दाखवलं गरिंचा यांनी.

गरिंचा यांनी इंग्लंड आणि चिलीच्या विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये चार गोल केले. या दोन्ही मॅचेस महत्त्वाच्या होत्या. चिलीच्या विरोधात झालेल्या उपांत्य फेरीत ब्राझील 4-2 असा जिंकला.

या सामन्यांमध्ये गरिंचा यांनी दोन केले आणि तिसरा गोल करण्यासाठी मदत केली. गरिंचा यांचे दोन गोल आजही उत्तम समजले जातात. पहिला गोल त्यांनी अतिप्रचंड चपळाईने डाव्या पायाने 20 मीटर अंतरावरून एक तडाखेबंद शॉट मारून केला होता तर दुसरा गोल एक विस्मयकारक हेडर होता.

चिलीचे खेळाडू त्यांना सतत अडवायचा प्रयत्न करत होते. यामुळे गरिंचाही भडकले होते. त्यांचं वागणं आक्रमक झालं तेव्हा सामन्याच्या 83 व्या मिनिटाला रेफरीने त्यांना लाल कार्ड दाखवलं, त्यामुळे ते अंतिम सामन्यातून बाहेर झाले.

जादूई प्रतिभेचे खेळाडू

रेफरीच्या या निर्णयामुळे गदारोळ झाला. ब्राझीलने फीफाच्या (जागतिक फुटबॉल महासंघ) डिसिप्लिनरी कमिटीकडे या निर्णयाबद्दल असंतोष व्यक्त केला. रॉय कॅस्ट्रो आपल्या पुस्तकात लिहितात की ब्राझीलच्या पंतप्रधानांनी हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला.

यानंतर रेफरी म्हणाले की गरिंचाचा फाऊल त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला नाही आणि लाईन्समनच्या सांगण्यावरून त्यांनी हा निर्णय दिला.

एका रात्रीत लाईन्समन हटवले गेले आणि दुसरे आले, निर्णय मागे घेतला गेला आणि गरिंचा यांचा अंतिम सामन्यात खेळण्याचा मार्ग सुकर झाला.

फार कमी लोकां माहीत असेल की गरिंचा झेकोस्लोव्हाकियाच्या विरोधात झालेल्या अंतिम सामन्यात 102 डिग्रीचा ताप अंगात असताना खेळायला उतरले होते. पण त्यांच्या नुसत्या संघातमध्ये असण्याने संघात एक नवचैतन्य फुंकलं गेलं आणि ब्राझीलने सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकला.

एकाप्रकारे गरिंचांनी स्वतःच्या बळावर आपल्या देशाला हा वर्ल्डकप जिंकवून दिला होता. फुटबॉलमध्ये अशी जादू पुन्हा पहायला मिळाली ती 1986 साली जेव्हा दिएगो मॅरोडोना यांनी आपल्या देशाला, अर्जेंटिनाला वर्ल्डकप मिळवून दिला होता.

गरिंचा यांच्या खेळाबद्दल लिहिताना उरुग्वेचे प्रसिद्ध खेळ पत्रकार इडुआर्डो गॅलिनो लिहितात, “गरिंचा जेव्हा फॉर्ममध्ये असायचे तेव्हा फुटबॉलचं मैदान एक सर्कस बनायचं. फुटबॉल म्हणजे या सर्कशीतले प्राणी आणि खेळ म्हणजे चित्तवेधक कसरती. हे प्राणी आणि चित्तवेधक कसरतींनीने गरिंचा अशी काही जादू आपल्या डोळ्यापुढे उभी करायचे की पाहाणारे थक्क व्हायचे.”

पण या खेळाडूचा आणखी एक पैलू होता. ते टोकाचे दारूडे होते. सकाळी सकाळीच ते दारूच्या नशेत बुडायचे. रॉय कॅस्ट्रो लिहितात की एकदा ते इतके नशेत होते की त्यांनी रस्त्यावरून जाताना स्वतःच्याच वडिलांवर गाडी घातली. लोकांच्या गर्दीने त्यांना पकडलं तेव्हा त्यांना आसपास काय घडतंय याचंही भान नव्हतं. त्यांचे वडील जखमी झाले होते.

अजून एका वेळेस त्यांच्या नशेने त्यांच्या सासूचा घात केला. त्यांनी नशेत असताना कारने आपल्या सासूला उडवलं. यातच त्यांच्या सासूचा मृत्यू झाला.

आयुष्यातले चढ-उतार

दारूच्या व्यसनाखेरीज महिलांसोबत असलेल्या सेक्स संबंधांनीही त्यांच्या खेळावर खूप परिणाक केला. गरिंचांना पाच महिलांकडून 14 मुलं होती. अर्थात हे ते संबंध होते जे त्यांनी जगासमोर स्वीकारले होते. त्यांनी दोन लग्नं केली होती. एक कारखान्यात काम करताना त्यांच्या महिला सहकाऱ्याशी आणि दुसरं लग्न केलं होतं ब्राझीलच्या प्रसिद्ध सांबा गायिका एलेझा सुआरेसशी. दोन्ही लग्नांमध्ये घटस्फोट घेण्याची वेळ आली होती.

दारूचं व्यसन, वैवाहिक संबंध मोडकळीस आलेले यामुळे गरिंचांच्या खेळावर परिणाम झाला. 1966 च्या वर्ल्डकपमध्ये ते आपली जादू दाखवू शकले नाहीत. ब्राझील तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकू शकलं नाही याचं एक कारण त्यांचा वाईट खेळ हेही होतं.

पण तरीही एक प्रश्न उरतोच. गरिंचा पेलेसारखे फुटबॉलचे महान खेळाडू का बनू शकले नाहीत? रॉय कॅस्ट्रो यांनी या प्रश्नाचं उत्तर शोधलं आहे. ते लिहितात, “त्यांनी कधी कामासाठी विमानाने प्रवास केला नाही. आपल्या आयुष्यात कधी सुटबूट घातला नाही, राजकारण्यांना भेटले नाही, कॉर्पोरेट घराण्यांच्या मालकांना भेटले नाहीत.”

गरिंचा आयुष्यभर ब्राझिली जीवनशैलीचं प्रतीक बनून राहिले. फुटबॉल, सांबा संगीत, दारू आणि बायका... यापेक्षा त्यांनी आयुष्यात दुसऱ्या कशाचीच अपेक्षा केली नाही, काही मिळवलं नाही.

त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचं आयुष्य खडतर बनलं. त्यांची अखेर पैशांची चणचण असताना झाली. जानेवारी 1983 साली, फक्त 49 वर्षांचे असताना त्यांचा लिव्हर सोरायसिसमुळे (अति दारूसेवनाने होणारा आजार) मृत्यू झाला.

गरिंचा यांचा मृत्यू रिओतल्या एका हॉस्पिटलमध्ये झाला होता पण त्यांची शेवटची इच्छा होती की त्यांचे अंत्यसंस्कार आपल्या मुळ गावी व्हावेत. रिओच्या मरकाना स्टेडिअममधून त्यांचं पार्थिव शरीर जेव्हा पाऊ ग्रेनेड या त्यांच्या गावाकडे निघालं तेव्हा ब्राझीलची जनता रस्त्यावर उतरली.

रॉय कॅस्ट्रो यांनी लिहिलं आहे की 65 किलोमीटरच्या त्या प्रवासात हजारो लोकांनी आपल्या ताऱ्याला शेवटचा निरोप दिला. शव जेव्हा त्यांच्या गावी पोहचलं तेव्हा चर्चमध्ये फक्त 500 लोकांच्या बसण्याची व्यवस्था होती, पण त्या चर्चमध्ये 3000 लोक उभे होते.

एवढी गर्दी पाहून पाद्र्याने शेवटची प्रार्थना काही मिनिटांमध्येच संपवली. जेव्हा गरिंचा यांना दफन करण्यासाठी दफनभुमीत आणलं तेव्हा तिथे आधीच 8000 लोक उपस्थित होते.

 एवढी गर्दी होती की गरिंचा यांचे नातेवाईकही त्यांचं शेवटचं दर्शन घेऊ शकले नाहीत.

गरिंचा जसा फुटबॉल खेळत होते, तसाच त्यांचा शेवट झाला. रंगतदार, जोशपूर्ण आणि नाट्य-मनोरंजनाने ठासून भरलेला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)