शेवटच्या भेटीत मधुबाला दिलीप कुमारना म्हणाल्या...

मुघल ए आझम

फोटो स्रोत, MUGHL E AZAM

फोटो कॅप्शन, मुघल ए आझम
    • Author, रेहान फ़ज़ल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

मर्लिन ब्रँडो यांच्याबद्दल हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता जॉनी डेप यांनी एकदा वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते, “ब्रँडो येण्यापूर्वी अभिनेते पूर्वी अभिनय करत असत, पण ती आल्यानंतर अभिनेते फक्त काम करत आहेत.”

6 दशकं सिनेसृष्टीत काम करणाऱ्या दिलीपकुमार यांनी आपल्या करिअरमध्ये फक्त 63 सिनेमे केले आहेत. परंतु त्यांनी हिंदी सिनेमात अभिनय कलेला नवी परिभाषा मिळवून दिली.

एकेकाळी दिलीप कुमार भारतातील सर्वोत्तम फुटबॉलपटू होण्याचं स्वप्न पाहात होते.

दिलीप कुमार यांच्याबरोबर खालसा कॉलेजमध्ये राज कपूर शिकत असत. राज कपूर तेव्हा पारशी मुलींशी फ्लर्ट करत असत आणि त्यावेळेस काहीसे लाजाळू दिलीप कुमार टांग्यात एका कोपऱ्यात बसून त्यांना पाहात बसत.

तेव्हा हा माणूस पुढे जाऊन भारतातील सिनेप्रेमींना मौनाची भाषा शिकवेल असं कुणालाही वाटलं नसेल.

दिलीप कुमार, राज कपूर, देवानंद यांना भारतीय सिनेसृष्टीतील त्रिमूर्ती म्हटलं जातं. पण दिलीप कुमार यांच्या अभिनयाला जितके पैलू होते तितके कदाचित उरलेल्या दोघांत नसावेत.

राज कपूर यांनी चार्ली चॅप्लिन यांना आदर्श मानलं तर देवानंद ग्रेगरी पेक यांच्यासारख्या सुसंस्कृत हावभावांच्या व्यक्तीच्या प्रतिमेतून बाहेर येऊ शकले नाहीत.

दिलीप कुमार यांनी गंगा जमनामध्ये अडाणी व्यक्तिची भूमिका जितकी सहजपणे केली तितकाच न्याय त्यांनी मुघल ए आझममधील मुघल राजपुत्राच्या भूमिकेला दिला.

देविका राणी यांच्याशी योगायोगाने झालेल्या भेटीने दिलीप कुमार यांचं आयुष्य बदलून गेलं.

SAIRA BANO

फोटो स्रोत, SAIRA BANO

फोटो कॅप्शन, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याबरोबर

तसं पाहायला गेलं तर देविका राणी हे 1940च्या दशकातलं भारतीय सिनेमासृष्टीतलं फारच मोठं नाव होतं. पण पेशावरच्या एका फळव्यापाऱ्याच्या युसुफ खान नावाच्या मुलाला दिलीप कुमार बनवणं हे त्यांचं सिनेसृष्टीला दिलेलं सर्वांत मोठं योगदान होतं.

देविका राणींनी बॉम्बे टॉकिजमध्ये एका सिनेमाचं शुटिंग पाहायला आलेल्या देखण्या युसुफ खान नावाच्या तरुणाला तुला उर्दू येतं का असं विचारलं.

त्यावर युसुफने हो म्हणताच, तुला अभिनेता व्हायला आवडेल का असं देविका यांनी विचारलं. पुढं जे घडले तो आता एका इतिहासाचा भाग आहे.

युसुफ खान उर्फ दिलीप कुमार

दिलीप कुमार एक रोमँटिक हिरो होण्यापलिकडे जाऊ शकणार नाहीत, असं देविका राणी यांना वाटत होतं.

बॉम्बे टॉकिजमध्ये काम करणाऱ्या आणि नंतर हिंदीत मोठे कवी म्हणून प्रसिद्ध झालेल्या नरेंद्र शर्मा यांनी त्यांना तीन नावं सुचवली. जहाँगीर, वासुदेव आणि दिलीप कुमार.

युसुफ खान यांनी दिलीप कुमार हे नवं नाव घेतलं होतं. नव्या नावामुळे आपल्या जुन्या विचाराच्या वडिलांना आपण कोणत्या पेशात आहोत हे समजणार नाही, असा विचार करून त्यांनी नवं नाव घेतलं होतं.

दिलिपकुमार

फोटो स्रोत, MOHAN CHURIWALA

चित्रपट करणाऱ्यांबद्दल त्यांच्या वडिलांचं मत काही फारसं चांगलं नव्हतं. ही सगळी नाटककंपनी आहे असं म्हणून ते त्यांची चेष्टा करत.

आपल्या सर्व फिल्मी करिअरमध्ये दिलीप कुमार यांनी एकदाच मुस्लीम व्यक्तीची भूमिका केली. ती म्हणजे के. आसिफ यांच्या मुघल ए आझममधली.

सतारवादनाचं प्रशिक्षण

कोहिनूर सिनेमात एका गाण्यात सतार वादनाचं दृश्य होतं त्यासाठी त्यांनी उस्ताद अब्दुल हलिम जाफर खान यांच्याकडून सतार शिकून घेतली.

बीबीसीशी बोलताना दिलीप कुमार म्हणाले होते, सतार कशी धरायची यासाठी मी अनेक वर्षं सतारवादनाचं प्रशिक्षण घेतलं. माझी बोटंही तिच्या तारांमुळे कापली गेली होती.

दिलिपकुमार

फोटो स्रोत, SAIRA BANU

त्याचप्रमाणे नया दौर सिनेमाच्या काळात त्यांनी टांगेवाल्यांकडून टांगा चालवणं शिकून घेतलं. त्यामुळेच सर्वश्रेष्ठ मेथड अभिनेता अशी पदवी सत्यजित रे यांनी त्यांना दिली होती.

त्यांनी अनेक अभिनेत्रींबरोबर काम केलं. पण मधुबाला यांच्याबरोबर त्यांची जोडी अधिक लोकप्रिय झाली. त्यांच्यावर दिलीप कुमारांचं प्रेमही जडलं.

मधुबाला यांच्याशी दुरावा

एक कलाकार आणि एक स्त्री म्हणूनही मधुबालाचं आपल्याला आकर्षण होतं, असं त्यांनी आत्मचरित्रात मान्य केलेलं आहे.

दिलीप कुमार लिहितात, मधुबाला अत्यंत मोकळ्या स्वभावाच्या होत्या, माझ्यासारख्या लाजाळू, संकोची व्यक्तीशी संवाद सुरू करण्यात त्यांना कोणताही अडथळा वाटत नसे.

परंतु मधुबाला यांच्या वडिलांमुळे ही प्रेमकथाही पुढे सरकली नाही.

दिलिप मधुबाला

फोटो स्रोत, Mughal e azam

फोटो कॅप्शन, दिलीप कुमार आणि मधुबाला

मधुबाला यांची लहान बहीण मधुर भूषण सांगतात, “दिलीप तिच्यापेक्षा वयानं फार मोठे आहेत असं वडिलांना वाटायचं. पण खरंतर ते मेड फॉर इच अदर होते. ती अत्यंत सुंदर जोडी होती.

या नादाला लागू नकोस, हा योग्य मार्ग नाही असं ते तिला सांगायचे. पण मी दिलीप कुमारांवर प्रेम करते असं ती सांगायची. परंतु बी. आर. चोप्रा यांच्याशी नया दौर सिनेमामुळे कोर्टकेस झाली आणि माझे वडिल आणि दिलीप साहेब यांच्यात बेदिली झाली.”

मधुर भूषण सांगतात, कोर्टात त्यांच्यामध्ये सलोख्याचा तहही झाला. दिलीप कुमार यांनी मधुबाला यांना आपण लग्न करू असं सांगितलंही.

पण मधुबाला यांनी मी लग्न करेन पण आधी माझ्या वडिलांची माफी मागा असं सांगितलं. त्याला दिलीप यांनी नकार दिला.

घरी त्यांची गळाभेट घ्या असंही मधुबाला यांनी सुचवलं पण दिलीप यांनी नकार दिला आणि तिथंच त्यांचं नातं तुटलं.

दुराव्यामध्येच प्रेमाची दृश्यं

मुघल ए आझमच्या काळात त्यांनी एकमेकांशी बोलणंही टाकलेलं होतं.

मुघल ए आझममध्ये एक क्लासिक समजला जाणारं पंखाचा रोमॅंँटिक दृश्य आहे. पण तोपर्यंत मधुबाला आणि दिलीप कुमार एकमेकांना सार्वजनिक जागी ओळखही दाखवत नव्हते.

सायराबानो यांनी दिलीप कुमारांशी लग्न केल्यावर काही काळानंतर मधुबाला एकदम आजारी पडल्या होत्या. तेव्हा तुम्हाला भेटायचं आहे असा निरोप त्यांनी दिलीप कुमारना पाठवला.

सायरा बानो, दिलीप कुमार

फोटो स्रोत, SAIRA BANO

फोटो कॅप्शन, सायरा बानो, दिलीप कुमार

दिलीप भेटायला गेले तेव्हा मधुबाला अत्यंत अशक्त झाल्या होत्या. दिलीप कुमारांना पाहून त्यांच्या ओठावर एक पुसटसं हास्य आलं.

मधुबाला त्यांच्या डोळ्यात पाहात म्हणाल्या, माझ्या राजपुत्राला युवराज्ञी मिळाली, मी फार आनंदी आहे.

23 फेब्रुवारी 1969 रोजी मधुबाला यांचं वयाच्या 35 व्या वर्षी निधन झालं.

राज कपूर यांची स्तुती

मुघल ए आझमनंतर दिलीप कुमार यांनी सर्वाधिक नाव कमावलं ते गंगा जमना सिनेमात.

आपण अलाहाबादला होतो तेव्हा हा सिनेमा अनेकवेळा पाहिला आहे, असं अमिताभ बच्चनही सांगतात.

एक पठाण माणूस ज्याचं उत्तर प्रदेशाशी दूरवरचा संबंधही नाही तो आपली बोली एवढी चपखल कशी बोलू शकतो हे मला पाहायचं होतं, असं अमिताभ सांगतात.

त्यानंतरच्या काळात या दोघांनी रमेश सिप्पी यांच्या शक्ती सिनेमात एकत्र काम केलं.

सायरा बानो, दिलीप कुमार

त्यांचे समकालीन आणि लहानपणचे मित्र राज कपूर यांनी शक्ती पाहिल्यावर बंगळुरूवरुन फोन केला आणि म्हणाले, लाडे... आज निर्णय झालाच... तूच आतापर्यंतचा सर्वात महान कलाकार आहेस.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)