You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तीन मुलींची गळा दाबून हत्या, एका मृतदेहाची डीएनए चाचणी; 30 वर्षांनी सापडला गुन्हेगार
- Author, गिल्बर्ट जॉन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
16 वर्षांच्या तीन मुलींची गळा दाबून हत्या झाली होती. यूकेतली तेव्हा सर्वात गाजलेली केस, आणि या हत्यांचा छडा लावताना पहिल्यांदा एका नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. ही त्याचीच गोष्ट...बीबीसीची नवीन सीरिज येतेय ‘स्टीलडाऊन मर्डर्स’ त्यानिमित्ताने.
त्या खुन्याला ‘सॅटरडे नाईट स्ट्रँगलर’ असं नाव दिलं होतं म्हणजे ‘शनिवारी रात्री गळा दाबणारा’.
या सगळ्याची सुरुवात झाली 1973 च्या उन्हाळ्यात. जुलै महिन्यात 16 वर्षांची सँड्रा न्यूटन ब्रिटन फेरीच्या भागात फिरायल गेली होती. तिथून घरी येताना रात्री 1 च्या सुमारास अचानक गायब झाली.
त्या भागापासून तिचं घर 10 किलोमीटर लांब होतं, पोलिसांचं मत होतं की येताना तिने कोणाकडून तरी लिफ्ट घेतलेली असावी.
तिचा मृतदेह दोन दिवसांनी कलव्हर्ट भागात सापडला. तिच्या डोक्यावर प्रहार केला होता आणि तिच्याच स्कर्टने तिचा गळा आवळला होता.
त्यानंतरच्या सप्टेंबर महिन्यात जेराल्डिन ह्यूज आणि पॉलिन फ्लॉईड या दोघी वूडलँड भागात मृत आढळल्या. त्या स्वानसी या भागात पार्टी करून घरी येत होत्या.
या दोघी 16 वर्षांच्या होत्या, दोघी बेस्ट फ्रेंड्स होत्या. त्या दोघींना मारहाण झाली होती, त्यांच्यावर बलात्कार झाला होता आणि त्यांचा गळा आवळून खून झाला होता. त्यांचे मृतहेद सँड्रा सापडली त्या भागापासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर टाकून देण्यात आले होते.
या दोन मुलींच्या मृत्यूमुळे यूकेच्या वेल्स भागात खळबळ माजली होती. त्यासाठी 150 पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्यांची खास टीम तयार केली गेली. पोलिसांनी जवळपास 35,000 लोकांची चौकशी केली. यातून पोलिसांना जेराल्डिन आणि पॉलिनसोबत सर्वात शेवटी दिसलेल्या पुरुषाचं वर्णन कळलं.
कुरळे केस, मिशी आणि साधारण पस्तिशीचा माणूस असावा तो. तो चालवत असलेल्या कारचंही वर्णन पोलिसांना मिळालं होतं. पण हे सोडून त्यांच्याकडे कोणतीच माहिती नव्हती ज्यामुळे गुन्हेगारांपर्यंत पोचता येईल.
काही प्रमुख साक्षीदारांनी सांगितलं होतं की त्यांनी जेराल्डिन आणि पॉलिनला स्वानसी भागातून रात्री निघताना पाहिलं होतं. त्या दोघी एका फिकट रंगाच्या मॉरिस 1100 गाडीत बसताना दिसल्या. ही गाडी एक पुरुष चालवत होता.
बीबीसी रिपोर्टर म्हणून मी 1973 साली या खूनांचा तपास कव्हर केला होता.
तरूण मुली मजा करायला बाहेर जातात आणि घरी परत कधीच येत नाहीत या घटनेने लोकांच्या मनात भीती निर्माण केली होती. तो माणूस अजूनही मोकाट फिरत होता.
लोकांच्या मनात चीड आणि दुःख होतं. तिथे राहाणाऱ्या लोकांची वाटत होतं की तातडीने गुन्हेगार पकडला जावा पण कोणालाच अटक झाली नव्हती आणि नवे, विश्वसनीय पुरावेही मिळत नव्हते.
सँड्रा आणि जेराल्डिन-पॉलिनच्या खुनांचा संबंध आहे हे पोलिसांना कधी कळलं?
खुनी कोणत्याही भागातला असू शकत होता. कॉम्प्युटर्स नसताना पोलिसांना प्रचंड मोठी संशयितांची यादी चाळण्याचं काम करावं लागत होतं.
पोलिसांना वाटत होतं की सँड्रा आणि जेराल्डिन-पॉलिन यांच्या खुनाचा काही संबंध आहे पण सँड्राच्या खुनासाठी आधी संशयाची सुई एका व्यक्तीकडे वळली होती.
या व्यक्तीने सँड्राला शेवटचं पाहिलं होतं. तो व्यक्ती म्हणजे तिचा बॉयफ्रेंड. पण त्याने म्हटलं की तो निर्दोष आहे आणि त्याच्यावर कधी गुन्हा दाखल झाला नाही.
सँड्रा आणि जेराल्डिन-पॉलिनच्या खूनात साम्य होतं तरीही पोलिसांनी पुढची अनेक वर्षं दोन्ही प्रकरणांची स्वतंत्र चौकशी केली. जवळपास 30 वर्षं ही दोन्ही प्रकरणं स्वतंत्र हाताळली गेली.
पण या दोन्ही गुन्ह्यांचा संबंध जोडला गेला तो 2000 च्या दशकात नव्याने उदयाला येत असलेल्या एका गुन्हेसंशोधन तंत्रज्ञानामुळे. डीएनए टेस्टिंग. साऊथ वेल्स पोलिसांनी थंड बस्त्यात गेलेल्या केसेस नव्याने उघडायला सुरुवात केली. या नव्या तंत्रज्ञानामुळे तपासाला नवी दिशा मिळेल अशी त्यांना आशा होती.
आधी जेराल्डिन आणि पॉलिनच्या कपड्यांवरचे वीर्यांचे डाग वेगळे केले गेले आणि त्यांची चाचणी केली. या दोन्ही मुलींनी वर एकाच व्यक्तीने बलात्कार केला हे सिद्ध करण्यासाठी हे केलं गेलं, पण या व्यक्तीचा डीएनए मॅच नव्या डेटाबेसमध्ये नव्हता.
एका वर्षांनी सँड्राच्या अंतर्वस्त्रांवर केलेल्या चाचणीमधून पहिला मोठा धागा हाती आला.
त्यावर एका अनोळखी पुरुषाचा डीएनए आढळून आला.
“मला तो डीएनए लगेच लक्षात आला. लँडार्सी खुन्याचा तो डीएनए होता. त्यानेच जेराल्डिन आणि पॉलिनचा खून केला होता,” फोरेन्सिक संशोधक डॉ कॉलिन डार्क म्हणतात.
“हा खूप मोठा खुलासा होता. याचा अर्थ 1973 च्या सुमारास दक्षिण वेल्समध्ये एक सीरियल किलर होता आणि तो तरुण मुलींचे खून करत होता.”
या नव्या पुराव्यामुळे सँड्राचा जुना बॉयफ्रेंड निर्दोष होता हे निःसंशय सिद्ध झालं.
“30 वर्षांत पहिल्यांदा कळलं होतं की या तिन्ही मुलींचा खून एकाच पुरुषाने केला होता,” नव्या तपासाचे मुख्याधिकारी डिटेक्टिव्ह इन्स्पेक्टर पॉल बेथेल म्हणतात.
डीएनएचा शोध – भाग एक
डीएनएच्या राष्ट्रीय डेटाबेसमध्ये या अनोळखी पुरुषाचा डीएनए नव्हता त्यामुळे त्याची ओळख सिद्ध होऊ शकली नव्हती. त्यामुळे तपासाधिकाऱ्यांनी बीबीसी क्राईमवॉचकडे मदत मागितली.
पण शास्त्रज्ञांनी आणखी एक मार्ग शोधून काढला.
डॉ डार्क म्हणतात, “आम्हाला वाटत होतं की गुन्हेगारी कुटुंबात पसरलेली असू शकते. तुम्हाला डीएनए तुमच्या पालकांकडून मिळतो आणि तुम्ही तो डीएनए तुमच्या मुलांना देता. मग आम्ही ठरवलं की गुन्हेगाराच्या मुलांचा डीएनए मिळवता आला तर? ही एक ठोस शक्यता होती.”
याचा अर्थ डॉ डार्क आणि त्यांच्या टीमला साऊथ वेल्समधल्या हजारो पुरुषांचे डीएनए काढून बसावं लागलं आणि ज्यांचे डीएनए मॅच होत नाहीत त्यांची नाव एकेक करून खोडावी लागली.
“या प्रक्रियेत कित्येक तास घालवल्यानंतर आमच्याकडे 100 नावं शिल्लक राहिली. या सगळ्यांचे डीएनए प्रोफाईल गुन्हेगाराच्या डीएनए प्रोफाईलशी बरोबर अर्धे जुळत होते. याचा अर्थ ती गुन्हेगाराची मुलं असण्याची शक्यता होता,” डॉ डार्क बीबीसीच्या स्टीलटाऊन मर्डर्स या डॉक्युमेंट्रीमध्ये सांगतात.
“हे पहिल्यांदाच घडत होतं. यूकेत आणि कदाचित जगातही. इथूनच कौटुंबिक डीएनए चाचणी ही नवी शोधपद्धती जन्माला आली.”
तोवर पोलिसांनी 35 हजार संशयितांच्या यादीतून 500 प्रमुख संशयित शोधून काढले.
“आमची शॉर्टलिस्ट प्रत्यक्षदर्शींनी केलेल्या वर्णनावर अवलंबून होती. त्या संशयिताकडे 1100 मॉडेलची कार होती का आणि त्याला या आधी लैगिंक गुन्ह्यांसाठी शिक्षा झाली होती का?” डिटेक्टिव्ह इन्स्पेक्टर बेथेल म्हणतात.
जो कॅपन हे नाव कसं पुढे आलं ?
सगळ्या याद्या एकमेकींशी ताडून पाहिल्यानंतर एक आडनाव पुढे आलं – कॅपेन.
स्थानिक कार चोर पॉल कॅपनचा डीएनए डेटाबेसमध्ये होता. त्याने छोटेमोठे गुन्हे केले होते. पण अडचण एकच होती – खून झाले त्यावेळी जो कॅपनचं वय फक्त 7 होतं.
त्याच्या वडिलांची जोसेफची मात्र 1973 मध्ये चौकशी झाली होती कारण त्या माणसाचं वर्णन संशयिताशी मेळ खाणारं होतं. त्याच्याकडे पण फिकट रंगाची मॉरिस 1100 गाडी होती.
त्याच वर्षी पोलिसांनी जोसेफ कॅपनचं घर गाठलं. जोसेफ नाईटक्लब बाऊन्सर आणि पार्ट-टाईम बसचालक होता.
पण त्याच्या बायकोने 30 वर्षापूर्वी झालेल्या चौकशीत सांगितलं होतं की तो तिच्याबरोबर होता आणि ज्या रात्री खून झाले तेव्हा त्याची गाडी बंद पडली होती.
“तो त्या भागात गुंड म्हणूनच प्रसिद्ध होता,” डिटेक्टिव्ह इन्स्पेक्टर बेथेल म्हणतात.
“त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचे गुन्हे दाखल होते आणि तो अनेकदा तुरुंगाची हवा खाऊन आला होता.”
आता त्याच्या मुलाचा डीएनए घटनास्थळी सापडलेल्या डीएनएला 50 टक्के मॅच होता. यामुळे जोसेफ कॅपन आमचा प्रमुख संशयित बनला.
खून घडून गेल्यानंतर तीन दशकं उलटल्यानंतर एक प्रमुख संशयित मिळाला होता.
पण त्याचा डीएनए स्वॅब मिळवण्यात अडचण आली.
जेव्हा पोलिसांनी त्याच्या घरचा दरवाजा ठोठावला तेव्हा कळलं की जोसेफ फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे 1990 साली मरण पावला होता.
पण आपला होरा बरोबर आहे हे तपासण्यासाठी संशोधकांनी कॅपनची पूर्वाश्रमीची पत्नी आणि मुलीचा डीएनए स्वॅब घेतला. त्यांचे स्वॅब खून्याच्या सँपलशी ताडून पाहिले तर दोन तृतीयांश मॅच झाले.
“पण तरी आम्हाला संपूर्ण डीएनए प्रोफाईल मॅच होणं आवश्यक होतं तरच खुन्याची ओळख पटली असती,” डॉ डार्क म्हणतात.
डीएनएचा शोध – भाग दोन
पोलिसांना जोसेफ कॅपनच खूनी आहे याची 100 टक्के खात्री करायची होती. एकदा ती खात्री पटली की त्या तिन्ही मुलींच्या घरच्यांना कळवता आलं असतं. आपल्या मुलींचं नक्की काय झालं याबद्दल सत्य कळणं त्यांचा हक्क होता.
आता यासाठी जोसेफचं दफन केलेलं शरीर पुन्हा खोदून वर काढणं आवश्यक होतं. यूकेत एखाद्या संशयिताचा मृतदेह खोदून काढून त्याची तपासणी करणं हे पहिल्यांदाच घडणार होतं.
यासाठी सगळ्या वरिष्ठांच्या परवानग्या लागणार होत्या आणि गृहमंत्र्यांचीही परवानगी लागणार होती.
“माझी सर्वात मोठी काळजी होती की आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत की नाही. कारण आम्ही मोठं पाऊल उचलत होतो, आणि आम्ही चुकलो असतो तर यात अनेक कुटुंबांना त्रास झाला असता,” 2001 ते 2004 या काळात यूकेचे गृहमंत्री असलेले लॉर्ड ब्लंकेट म्हणतात.
“पण सत्य कळणंही गरजेचं होतं. मी जोसेफ कॅपनचा मृतदेह कबरीतून खणून काढायला आणि त्याची एकदा डीएनए चाचणी करायला परवानगी दिली. त्या मुलींच्या कुटुंबाला इतक्या वर्षांनी काही दिलासा मिळणं आवश्यक होतं,” ते पुढे म्हणतात.
मे 2002 साली यूकेत इतिहास घडला. तीन व्यक्तींच्या दलाने जोसेफ कॅपनचा मृतदेह खणून काढायला सुरूवात केली.
“ती भयानक रात्र होती आणि जसं आम्ही कॅपनच्या शवपेटीजवळ पोचलो, आकाशात वीज कडाडली. जणूकाही एका सैतानी गोष्टीची ओळख पटली होती. माझ्या शरीरातून भीतीची शिरशिरी वाहात गेली,” डॉ डार्क त्या रात्रीची आठवण सांगतात.
फोरेन्सिक डीएनए तपासणीतून कळलं की जोसेफच या तिन्ही मुलींचा खुनी होता. तीन दशकांनंतर त्या मुलींच्या खुनाला वाचा फुटली होती.
“आम्हाला तेव्हा काय वाटलं हे शब्दात सांगता येत नाही,” जेराल्डिनची मामेबहीण ज्युली बेगली म्हणतात.
“आम्हाला कायम आशा होती की एकदिवस खऱ्या गुन्हेगाराचा शोध लागेल. भले आम्ही आमच्या आयुष्यात पुढे निघालो असलो तरी ती जखम कायम होती.”
ज्युली म्हणतात, “जेराल्डिन खूप छान मुलगी होती, उत्साहाने खळखळती, आनंदाने भरलेली. या तपासातून फक्त जेराल्डिनच नाही, पॉलिन आणि सँड्राच्या घरच्यांनाही दिलासा मिळाला.”
“मी गेली 49 वर्षं तिच्या कबरीला भेट देतेय. ती तिथे आहे यावर विश्वास बसत नाही,” सँड्राची मैत्रिण थेरेसा मे म्हणतात.
“माझी सुंदर मैत्रिण. कोणीतरी तिचं आयुष्य, तिचं भविष्य तिच्यापासून हिरावून घेतलं. माझ्या मनात आजही तिचा विचार येतो. आम्ही सोबत काय केलं असतं आणि काय करायला हवं होतं आठवत राहातं. पण आता इतक्या वर्षांनी खऱ्या अर्थाने तिच्या आत्म्याला शांती मिळाली असेल.”
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)