तामिळ लोकांचा डीएनए वेगळा आहे का? विज्ञानामुळे उकलले गूढ

फोटो स्रोत, Getty Images
- Author, टी.आर. रामकुमार
- Role, बीबीसी तमिळसाठी
(मानवी विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानसंबंधीची नवी माहिती दृष्टीकोन आणि लेख बीबीसी प्रसिद्ध करत असते. या लेखांमधील मते आणि वक्तव्ये ही पूर्णपणे लेखकांची आहेत, बीबीसीची नव्हे. - संपादक)
पृथ्वीवर निर्माण झालेला प्रत्येक जीव हा उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून गेलाय. आपण सध्या ज्या रुपात हे जीवन पाहतोय, ते या उत्क्रांतीच्या दीर्घ काळातील साखळीचे सध्याचे दुवे आहे.
या उत्क्रांतीनुसार चिंपांझी मानवाचा सर्वांत जवळचा नातेवाईक ठरतो. सुमारे 65 दशलक्ष वर्षांपूर्वी मानव आणि चिंपांझी यांच्या उत्क्रांती मार्गाचं विभाजन झालं म्हणजे ते वेगळे झाले. तरीही या दोन जीवांच्या जीनोममध्ये अजूनही 98.8 टक्के साम्य आहे.
मानवाला वैज्ञानिक दृष्टीकोनातून समजून घेण्यासाठी आपण, वंश, प्रजाती आणि कुटुंब या संकल्पना समजून घ्यायला हव्यात.
उदाहरणार्थ सिंह(लिओ), बिबट्या(पार्डस्) आणि वाघ (टायग्रिस) या सर्व प्रजाती एकाच वंशाच्या आहेत. त्यांच्या प्रजातींची नावं कंसात दिलेली आहे. या तिन्ही प्रजाती मांजरीशी (Felidae family) संबंधित आहेत.
त्यामुळं वाघाचं वैज्ञानिक नाव पँथेला टायग्रिस (Panthera tigris) किंवा पी. टायग्रिस (P.tigris) असं आहे. सिंह पी. लिओ (P.leo) आणि बिबट्या पी. पार्डस् (P.pardus)आहे.
मानवाचं वैज्ञानिक नाव हे होमो सेपियन्स (Homo sapiens)असं आहे. यात होमो हा वंश आणि सेपियन्स ही प्रजाती आहे.
जगातील सर्व मानव हे एच. सेपियन्स (H.sapiens) आहेत. पण ही प्रजाती कशी, कुठे आणि केव्हा विकसित झाली? तिचा प्रसार केव्हा आणि कसा झाला?
पूर्वज
सहलॅन्थ्रोपस चाडेन्सी नावाचं वानर (ते प्रायमेट आहे) हे चिंपांझी आणि मानव यांच्यातील समान पूर्वजांचे सर्वांत जवळचे नातेवाईक मानले जाते.
70 लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेच्या पश्चिम भागात ते राहत असे. ते पूर्णपणे उभे नव्हते. कधी कधीच ते सरळ चालायचे.
पॅलेओन्टोलॉजिक (प्राचीन जीवनाचा अभ्यास) दृष्टीनं विचार केला असता मानवी उत्क्रांतीच्या दिशेनं ते पहिलं पाऊल होतं.

फोटो स्रोत, Getty Images
ऑरोरिन ट्युजेनेन्सिस हा पूर्व आफ्रिकेत राहणारा प्रायमेट (वानर) मानवी उत्क्रांतीतील महत्त्वाचं वळण असल्याचं मानलं जातं.
तो जवळपास पूर्ण उभा राहून चालायचा. त्यांना आपले पूर्वज म्हणून शकत नसलो तरी, उत्क्रांतीचा विचार करता ते पूर्वजांचे सर्वांत जवळचे नातेवाईक ठरतात.
ऑस्ट्रालिओपेथिकस वंश
55 लाख वर्षांपूर्वी पूर्व आफ्रिकेत राहणारा अर्डिपिथेकस कडाब्बा नावाचा प्राणी दोन पायांवर सरळ उभा राहून चालू शकत होता. जीवाश्म अवशेषांद्वारे याची पुष्टी होऊ शकते (गिबन्स, 2009).
अर्डिपिथेकस रॅमिडस हा सुमारे 44 लाख वर्षांपूर्वीचा जवळचा नातेवाईकही सरळ उभा चालला होता.
पण, अर्डिपिथेकस वंशातील सदस्यांना हाताचे तळवे होते आणि ते झाडं धरण्यासाठी अधिक उपयुक्त होते. त्यांचा मेंदूदेखील लहान होता (300 ते 350 cc, एक cc म्हणजे एक घन सेंटीमीटर).
अर्डिपिथेकसपासून ऑस्ट्रालिओपेथिकसची उत्क्रांची झाली, मानवजातीच्या उत्क्रांतीमधील तो मैलाचा दगड आहे.
सुमारे 40 लाख वर्षांपूर्वी जीवंत असलेल्या ऑस्ट्रालोपिथिकस अॅनामेन्सिस यांच्या जीवाश्मावरून हे लक्षात येतं की, त्यांचे तळहात आणि तळांची रचना ही झाडं धरण्यासाठीची नव्हती. ही उत्क्रांतीच्या संदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची अशी घटना होती (Leakey et al, 1995).

फोटो स्रोत, Getty Images
35 लाख वर्षांपूर्वी ए. अफारेन्सिस (A. afarensis) आणि ए. बहरेलगझाली ( A. bahrelghazali) यासह ऑस्ट्रालिओपेथिकसच्या प्रजातींची उत्क्रांती झाली.
दक्षिण आफ्रिकेत 30 लाख वर्षांपूर्वी उत्क्रांती झालेली ए. आफ्रिकनस प्रजाती ही उत्क्रांतीसंदर्भात महत्त्वाचा टप्पा समजली जाते. त्यांच्या मेंदूचा आकार वाढून 420 ते 510 cc झाला होता. त्यानंतर ऑस्ट्रालिओपेथिकस यांचं ए. गार्थीसह इतर अनेक प्रजातींमध्ये विभाजन झालं.
तसंच पॅरान्थ्रोपस एथिओपिकस (paranthropus aethiopicus) नावाचा जीवही अस्तित्वात असल्याचं आढळून आलं. त्याच काळात (25 ते 27 लाख वर्षांपूर्वी) दगडी अवजारांचा वापर सुरू झाला असं मानलं जातं. मात्र त्याची पुष्टी झालेली नाही.
होमो वंश
या साखळीच्या अखेरच्या टप्प्यात म्हणजे सुमारे 22 लाख वर्षांपूर्वी होमो हॅबिलिस (Homo habilis) प्रायमेटची उत्क्रांती झाली. होमो सेपियन्स आणि होमो हॅबिलिस हे एकाच वंशाचे आहेत, हे लक्षात घेणं म्हत्त्वाचं आहे.
तर, यापुढं आपण या प्रजातीला मानव म्हणायला सुरुवात करू शकतो. हॅबिलिसनी त्यांच्या वापरासाठी लाकडी काठ्यांपासून अवजारं तयार केली होती, हे जीवाश्मांवरून स्पष्ट झालंय (असाही एक तर्क आहे की, ऑस्ट्रालोथिकस गार्थी, पॅरान्थ्रोपस एथिओपिकस या समकालीन प्रजाती आधीच साधनं वापरत होती). होमो वंशाच्या बाह्य रुपातील बदलाबरोबरच मेंदू आणि बुद्धीमत्ता यात उत्क्रांतीदरम्यान अनेक बदल झाले.

फोटो स्रोत, Getty Images
होमो हॅबिलिस
त्याच्याकडं मानवासारखे बरेच गुण होते, पहिला मानव म्हणण्यासाठी ते पुरेसे होते. सुमारे 23 लाख वर्षांपूर्वी त्यांची उत्क्रांती झाली आणि 16.5 लाख वर्षांपूर्वीपर्यंत ते जगले.
आपण त्यांना 'हँडी मॅन' म्हणू शकतो. कारण ते अवजारं किंवा साधनं कशी बनवायची ते शिकले होते. त्यांनी त्याचं जतन करून त्याचा वारंवार वापरही केला.
(यापूर्वीच्या प्रजातींनी काड्यांचा अवजारांसारखा वापर केला असला तरी, त्यांनी जतन करून त्याचा पुनर्वापर केला नव्हता.). याचा अर्थ असा की, याच काळाच्या दरम्यान भविष्यातील नियोजनाची सुरुवात झाली.
उल्लेखनीय बदल म्हणजे त्यांच्या मेंदूचा आकार 500cc ते 900cc पर्यंत वाढला. मेंदू आणि बुद्धीमत्ता यांच्या उत्क्रांतीचा विचार करता ही एक मोठी झेप मानली जाऊ शकते.
हॅबिलिसमध्ये काही अधिक गुण होते, तर इतर होमो प्रजाती आणि ऑस्ट्रालिओपेथिकस वंशाचा विचार करता (Tobias, 2006) बाह्य स्वरुपदेखील काहीसं एपसारखं होतं.
होमो इरेक्टस
इरेक्टस या शब्दाचा अर्थ सरळ, ताठ उभा असा होतो. त्याला सरळ माणूस असंही म्हटलं जातं. पूर्व आफ्रिकेत 20 लाख वर्षांपूर्वी त्यांची उत्क्रांती झाली. त्यामध्ये मानवी वैशिष्ट्ये होती आणि एच.हॅबिलिस प्रजातीमधील वानरासारखी वैशिष्ट्ये नाहीशी झाली होती.
त्याच्या मेंदूचा आकार 546cc ते 1251cc पर्यंत वाढला होता. त्यानं विविध वापरांसाठी दगडापासून विविध साधनं, अवजारं तयार केली होती.
वेगवेगळ्या कामांसाठी दगडापासून वेगवेगळी साधनं किंवा अवजार तयार करण्यासाठीची बुद्धीमत्ता त्याच्याकडं होती. आग कशी पेटवायची हे त्याला माहिती होतं का, याबाबत साशंकता असली, तरी त्याचा वापर कसा करायचा हे त्याला माहिती होतं.
नैसर्गिक आग टिकवायची कशी आणि त्याचा वापर कसा करायचा हे ते शिकले होते, असं मानलं जातं. बुद्धीमत्ता आणि वर्चस्वाचा वापर करून ते संपूर्ण आफ्रिकेत पसरले.

फोटो स्रोत, Getty Images
आफ्रिकेबाहेर पडणारी ही पहिली प्रजाती होती. मध्य पूर्व भागात ते दोन गटांत विभागले गेले. त्यानंतर त्यांनी युरोप आणि आशियात प्रवेश केला. ते पश्चिम युरोपपर्यंत पसरले तर इतर भारतासह पुढं जात इंडोनेशियापर्यंत गेले.
तराफ्यांचा वापर करून समुद्र ओलांडणारे ते पहिलेच मानव होते, असंही मानलं जातं. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आणि इतर प्रजातींमध्ये शाखाही निर्माण केल्या.
प्रत्येक ठिकाणी मिळवले यश
दक्षिण आफ्रिकेत पसरलेल्या एच. इरेक्टसनं परिस्थितीशी जुळवून घेत इतर प्रजातींमध्ये स्वतःचा विकास केला. त्या प्रजातीला एच.एर्गास्टर म्हणतात.
नष्ट होण्यापूर्वी ही प्रजाती 17 लाख वर्षांपूर्वीपासून ते 14 लाख वर्षांपूर्वीपर्यंत अस्तित्वात होती. या दरम्यानच्या काळात या दोन प्रजातींचं एकमेकांशी मिलन झालं.
पूर्व युरोपातील द इरेक्ट्स गटाची उत्क्रांती एच.अँटेसेसरमध्ये झाली. ते 12 लाख वर्षांपूर्वीपासून ते 8 लाख वर्षांपूर्वीपर्यंत टिकले आणि नंतर नष्ट झाले.
आफ्रिकेहून पूर्वेकडं वळालेला इरेक्टस गट चीन आणि भारतात पोहोचला. भारतात पोहोचलेला इरेक्टस प्रजातीचा गट संपूर्ण देशासह जमिनीवरून प्रवास करून पूर्ण आशियामध्ये पोहोचला. तर समुद्रमार्गे तो इंडोनेशियाच्या बेटांवरही पोहोचला.

फोटो स्रोत, Getty Images
संशोधकांना दक्षिण भारतात चेन्नईजवळ अधिरमपक्कम इथं दगडी अवजारं सापडली आहेत. त्यांचा कालावधी सुमारे 3,85,000 वर्षांपूर्वीचा असू शकतो.
ही अवजारं एच. इरेक्टस प्रजातीनं तयार करून वापरली असावी असं संशोधक मानतात. मात्र, ही अवजारं आणि सध्याचे तमिळ किंवा भारतीय यांच्यात ऐतिहासिक संबंध नाही.
इंडोनेशियापर्यंत गेलेल्या इरेक्टस गटाची उत्क्रांती होऊन फ्लोरन्स बेटावर एच. फ्लोरन्स प्रजाती निर्माण झाली. ते बुटके मानव होते.
बेटावरील परिस्थितीमुळं त्यांचा विकास तसा झाला. हे बुटके लोक त्या बेटावर बुटक्या हत्तींची शिकार करायचे. या लोकांना 'हॉबिट' आणि 'फ्लोर्स' असंही म्हटलं गेलं. 1,90,000 वर्षांपूर्वीपासून ते सुमारे 12,000 वर्षांपूर्वीपर्यंत या बेटावर त्यांचं अस्तित्व होतं.
होमो हेडलबर्गेन्सिस
पश्चिम आफ्रिकेतील इरेक्टस गट हळूहळू विकसित झाला. कधीतरी एच. एर्गेस्टरशी त्याचा संबंध आला आणि एच. हेडलबर्गेन्सिस प्रजाती निर्माण झाली. हे आपले थेट पूर्वज आहेत.
हा गट पुन्हा आफ्रिकेच्या बाहेर पडत युरोप, चीन, भारत आणि इंडोनेशियात गेला. 6 लाख वर्षांपूर्वीपासून ते 2 लाख वर्षांपूर्वीपर्यंत ते होते.
सुमारे 4 लाख वर्षांपूर्वी या गटानं आग पेटवण्याची कला पूर्णपणे अवगत केली होती. मृतांचा सन्मान करण्याचा विधीही याच गटानं सुरू केला.
चीन आणि पूर्व आशियामध्ये स्थलांतरीत झालेल्या गटाच्या उत्क्रांतीतून एच. डेनिसोव्हा प्रजाती तयार झाली. त्यांना सर्वसाधारणपणे डेनिसोव्हन्स म्हटलं जातं. ते 2 लाख वर्षांपूर्वीपासून ते 50 हजार वर्षांपूर्वीपर्यंत अस्तित्वात होते.
होमो निअॅडरथॅलेन्सिस
युरोपात पोहोचलेल्या एच हेडलबर्गेन्सिस गटापासून एच. निअंडरथॅलेन्सिस प्रजाती तयार झाली. त्यांना निअँडरथॅल मॅन म्हटलं जाऊ लागलं.
त्यांची त्वचा श्वेत आणि केस लाल होते. ते दिसायला काहीसे लठ्ठही होते. त्यांना भाषेचं ज्ञान अवगत होतं, असं मानलं जातं. बाह्यरुपाचा विचार करता, या मानवी प्रजातीला दुसरे मानवच म्हटलं जाऊ शकतं. कारण आपल्या प्रजातीशी त्यांचं खूप साम्य होतं.
निअँडरथॅल्सचा काळ हा चार लाख वर्षांपूर्वीपासूनचा असून 1,30,000 वर्षांपूर्वी ही प्रजाती उच्चांकावर होती. 35,000 वर्षांपूर्वी एच. सेपिन्स समोर आले तेव्हा निअँडरथॅल्स नामशेष झाले.
निअँडरथॅल्स आणि एच. सेपियन्स यांचं मिलन हा इतिहासातील मैलाचा दगड आहे. शिवाय निअँडरथॅल्स यांना कला आणि संस्कृती अवगत होती, हादेखील उत्क्रांतीतील मोठा टप्पा आहे.
होमो सेपियन्स
उत्तर आफ्रिकेतील एच. हेडलबर्गेन्सिस गटाची हळूहळू उत्क्रांती होत तीन ते दोन लाख वर्षांपूर्वी होमो सेपियन प्रजाती निर्माण झाली. आपण याच प्रजातीचे वंशज आहोत. या प्रजातीला आधुनिक मानव म्हटलं जात होतं. त्यांनीच भाषांची रचनाही केली.
जगाचा ताबा घेतला
सेपियन्स मानव पुन्हा 2 लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेहून स्थलांतरीत झाले आणि मध्य पूर्व आशिया आणि युरोपात निअँडरथॅल्समध्ये मिसळले.
निअँडरथॅल्स मानव आधुनिक मानवामध्ये मिसळल्यानंतर सुमारे 35 हजार वर्षांपूर्वी इतिहासातून पूर्णपणे नामशेष झाले.
आधुनिक मानव आशियात आल्यानंतर भारतात राहणाऱ्या इरेक्टस गटाला त्यांच्याबरोबर स्पर्धा करणं अशक्य असल्याचं जाणवलं. त्यामुळं ते हळूहळू नामशेष झाले. या दोन गटाचं एकमेकांबरोबर मिलन झालं अशी काही गृहितकं आहेत, पण त्याचे पुरेसे पुरावे नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
पूर्व आशियात पोहोचलेल्या सेपियन्स गटाचं डेनिसोव्हन्सबरोबर मिलन झालं आणि हळूहळू डेनिसोव्हन्सदेखील नामशेष झाले.
सुमारे 40 हजार वर्षांपूर्वी हे आधुनिक मानव समुद्रामार्गे ऑस्ट्रेलियात पोहोचले. जमिनीवर पूर्व रशियामार्गे ते 20 हजार वर्षांपूर्वी अलास्काला पोहोचले.
त्यांनी उत्तर अमेरिका ओलांडली आणि 12 हजार वर्षांपूर्वी ते दक्षिण अमेरिकेत पोहोचले. आधुनिक मानवानं सगळीकडं एकमेव मानवी प्रजाती म्हणून राहायला सुरुवात केली. अंटार्क्टिका वगळता सर्व खंडांमध्ये ते राहू लागले.
तमिळ अद्वितीय आहेत का?
अनुवांशिकदृष्ट्या तमिळ अद्वितीय नाहीत. असं मानलं जातं की, मानवाच्या जास्तीत जास्त 10 हजार जोड्याच आफ्रिका सोडून बाहेर पडल्या होत्या. म्हणजे या 10 हजार जोड्याच आफ्रिकेबाहेरील सर्व मानवांचे पूर्वज आहेत.
सगळे आफ्रिकन आपल्याला दिसायला सारखे दिसत असले तरी अनुवांशिकदृष्ट्या ते वेगळे आहेत. तर दुसरीकडं, एक कॉकॅशियन श्वेत युरोपीय व्यक्ती, एक गव्हाळ भारतीय, पिवळा चिनी आणि कृष्णवर्णीय ऑस्ट्रेलियन व्यक्ती हे वेगळे दिसत असले तरी, अनुवांशिकदृष्ट्या ते सारखेच आहेत. त्याचं कारण म्हणजे, जनुकीय फरक निर्माण होण्यासाठी लाखो वर्षांचा काळ लोटावा लागतो.
आपली उत्क्रांती केवळ 3 लाख वर्षांपूर्वी झाली. फक्त 10 हजार मानवी जोडप्यांनी आफ्रिका सोडली आणि या उत्क्रांतीच्या मार्गावर 2 लाख वर्षे त्यांनी मार्गक्रमण केलं. पण, अनुवांशिकदृष्ट्या वैविध्य असलेल्या लोकसंख्येच्या निर्मितीसाठी लाखो वर्षांचा भौगोलिक वेगळेपणा किंवा विलगीकरण गरजेचं असतं.
आधुनिक मानव आणि आपल्यापासून सुमारे 65 लाख वर्षांपूर्वी वेगळे झालेले चिंपांझी यांच्यातील अनुवांशिक फरक केवळ 1.2% एवढाच आहे. तर मग भौगेलिक विलगीकरणाशिवाय आणि केवळ दोन लाख वर्षांच्या उत्क्रांतीच्या कालावधीत एवढा अनुवांशिक बदल कसा शक्य आहे? पण यासाठी आपल्याकडे वेळ आणि संधी नाही.
केवळ तमिळच नव्हे, तर पृथ्वीवरील कोणत्याही वंशातील मानवी गटात वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध होतील असे अनुवांशिक फरक आढळणार नाहीत. त्यांच्यात सांस्कृतिक आणि भाषेचा फरक असू शकतो, पण अनुवांशिकदृष्ट्या काहीही फरक नाही.
(रामकुमार 15 वर्षांपासून अनुवांशिक संशोधक आहेत. सध्या ते फ्लोरिडा विद्यापीठात पोस्ट डॉक्टोरल फेलो आणि त्रिची गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये व्हिजिटींग प्रोफेसर आहेत.)











