ह्युमन कम्पोस्टिंग म्हणजे काय? मानवी मृतदेहापासून खताची निर्मिती कशी होते?

ह्युमन कम्पोस्टिंग म्हणजे काय?

फोटो स्रोत, UNIVERSALIMAGESGROUP

फोटो कॅप्शन, ह्युमन कम्पोस्टिंग
व्हीडिओ कॅप्शन, मानवी मृतदेहापासून खताची निर्मिती शक्य आहे का?

माणूस गेल्यानंतर वेगवेगळ्या समाजात वेगवेगळे रिवाज आहेत. दहन, दफन आणि इतर बरंच काही. पण अमेरिकेतली एक कंपनी मानवी शरीराचं कंपोस्ट करण्याची सुविधा देते.

अमेरिकेत वॉशिंग्टन, न्यूयॉर्कसह सहा राज्यांनी ह्युमन कम्पोस्टिंगला मान्यता दिली आहे. टाकाऊ पदार्थांचं कंपोस्ट खत आपण ऐकलं असेल पण ‘ह्युमन कंपोस्टिंग’ म्हणजे काय? यासाठीची प्रक्रिया काय आहे? ते पर्यावरणपूरक असल्याचा दावा का केला जातोय? हे जाणून घेऊया...

ह्युमन कंपोस्टिंग काय आहे

अमेरिकेत पारंपरिक अंत्यविधीला पर्याय म्हणून ह्युमन कंपोस्टिंग ही पद्धत नावारुपाला येत आहे. 2019 मध्ये पहिल्यांदा वॉशिंग्टन राज्याने यासाठी मान्यता दिली होती.

आतापर्यंत अमेरिकेच्या सहा राज्यांनी ह्युमन कंपोस्टिंगसाठी परवानगी दिली आहे. यामुळे मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीला आपल्या शवाचं रुपांतर मातीमध्ये किंवा खतामध्ये करण्याचा निर्णय घेता येऊ शकतो.

एका कलाकाराने साकरलेली भविष्यातील 'ह्युमन कम्पोस्टिंग' सुविधा

फोटो स्रोत, RECOMPOSE/MOLT STUDIOS

फोटो कॅप्शन, एका कलाकाराने साकरलेली भविष्यातील 'ह्युमन कम्पोस्टिंग' सुविधा

‘ह्युमन कंपोस्टिंग’मध्ये नैसर्गिक आणि सुरक्षित प्रक्रिया वापरून मृतदेहाचं रुपांतर मातीमध्ये करता येऊ शकतं असा दावा आहे. या प्रक्रियेला नॅचरल ऑरगॅनिक रिडक्शन असंही म्हटलं जातं.

ह्युमन कंपोस्टिंगसाठी लाकडाचे तुकडे, अल्फाल्फा आणि सुकलेल्या पेंढ्यानी (straw) भरलेल्या कंटेनरमध्ये मानवी मृतदेह ठेवला जातो. यानंतर पुढील प्रक्रियेसाठी 30 दिवसांचा कालावधी लागतो.

महिन्याभराच्या या प्रक्रियेनंतर आणि त्यानंतर वापरल्या जाणाऱ्या उष्णतेमुळे संसर्गाचा धोकाही कमी होतो आणि त्यानंतर तयार झालेली माती कुटुंबीयांकडे सोपवली जाते. ही माती फुलं, फळं आणि भाज्यांसाठीही खत म्हणून वापरली जाऊ शकते.

ही प्रक्रिया सोपी वाटत असली तरी अंतिम प्रक्रिया ठरवण्यासाठी आणि याच्या संशोधनासाठी चार वर्षांचा कालावधी लागला. याच्या प्रायोगिक अभ्यासासाठी सहा स्वयंसेवकांनी मदत केली.

ह्युमन कंपोस्टिंग पर्यावरणपूरक आहे का ?

ह्युमन कंपोस्टिंगवर काम आणि संशोधन केलेल्या रिकम्पोज या अमेरिकन संस्थेने दावा केला आहे की ह्युमन कंपोस्टिंगमुळे पारंपरिक अंत्यविधीच्या तुलनेत एक टनपेक्षा अधिक कार्बन वाचवलं जाऊ शकतं.

सध्याच्या काळात तापमान बदलामागे मोठ्या प्रमाणावर होणारं कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन हे एक प्रमुख कारण आहे.

ह्युमन कम्पोस्टिंग अधिक पर्यावरणपूरक असल्याचा दावा केला जात आहे.

फोटो स्रोत, BOSTON GLOBE VIA GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, ह्युमन कम्पोस्टिंग अधिक पर्यावरणपूरक असल्याचा दावा केला जात आहे.

रिकम्पोजच्या संस्थापक कटरिना स्पेड यांनी या प्रयोगाबद्दल 2020 मध्ये बीबीसीशी बोलताना म्हटलं होतं की, पर्यावरण बदलासाठी जागरूकता वाढल्याने अनेक जण या नवीन पर्यायाबाबत उत्सुक आहेत.

पर्यावरणाची चिंता वाढल्याने या पर्यायचा सरकारी पातळीवरही वेगाने विचार करण्यात आला.

पारंपरिक दफन किंवा दहनविधीसाठी लाकूड आणि जमीन यांसारख्या नैसर्गिक साधनांचा वापर करावा लागतो.

या तुलनेत ह्युमन कंपोस्टिंग हा पर्याय अधिक पर्यावरणपूरक आहे, असंही जाणकार सांगतात. तसंच जमिनी मर्यादित असल्याने हा पर्याय अधिक प्रॅक्टिकल असल्याचंही काहींना वाटतं.

कंपोस्ट आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्यात पदार्थांचं विघटन होतं म्हणजे आपल्या डोक्यात डिकम्पोजिशन येतं. 2020 मध्ये बीबीसीशी बोलताना कटरीना स्पेड यांनी डिकम्पोजिंग आणि रिकम्पोजिंग यातला फरक सांगितला.

मृतदेह जमिनीवर राहिला तर त्याचं जे होतं ते डिकम्पोजिशन म्हणजे विघटन पण recomposition मध्ये तो देह मातीशी एकरूप केला जातो असं त्या म्हणाल्या. 

खर्च आणि विरोध

ह्युमन कंपोस्टिंग काहींच्या मते अधिक पर्यावरणपूरक असलं तरी त्याबद्दल अनेकांनी प्रश्नही उपस्थित केले आहेत.

न्यूयॉर्कमध्ये कॅथलिक धर्मगुरूंनी या निर्णयाला विरोध केल्याचं वृत्त आहे. मानवी शरीराला घरातल्या कचऱ्याप्रमाणे वागणूक देणं योग्य नाही असा त्यांचा युक्तिवाद असल्याचं वृत्त आहे.

अमेरिकेत ही सेवा पुरवणाऱ्या रिकम्पोज नावाच्या कंपनीने यासाठी येणाऱ्या खर्चाची तुलना अंत्यविधींच्या इतर पद्धतींशी केली.

दहन तसंच दफन या दोन्ही पद्धतींना येणाऱ्या खर्चाइतकाच साधारण खर्च ह्युमन कंपोस्टिंगसाठीही येतो असं कंपनीने म्हटलं आहे.

स्वीडन देशात या पद्धतीला कायदेशीर मान्यता आहे. युकेमध्येही शवपेटीशिवाय देहाचं दफन करण्यासाठी परवानगी मिळते. पण कायदेशीर मान्यता मिळाली तरी भावनिक पातळीवर लोक हे स्वीकारू शकतील का या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच देऊ शकतो.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)