पुनर्जन्म खरंच शक्य आहे का, विज्ञान काय सांगतं?

पुनर्जन्म

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सुधाकर सुब्रमण्यम
    • Role, संशोधक, बीबीसी तामिळसाठी

(मानवी विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानसंबंधीची नवी माहिती दृष्टीकोन आणि लेख बीबीसी प्रसिद्ध करत असते. या लेखांमधील मते आणि वक्तव्ये ही पूर्णपणे लेखकांची आहेत, बीबीसीची नव्हे. - संपादक)

तामिळनाडूच्या थुथुक्कुडी जिल्ह्याच्या आदिचनाल्लुरमध्ये दफनविधीचे प्राचीन कलश आहेत. आपल्या पूर्वजांनी अंदाजे 3500 वर्षांपूर्वी त्यांच्या आजी-आजोबांना अत्यंत सुरक्षितपणे या कलशांमध्ये दफन केलं होतं. जमिनीत दफन करण्यापेक्षा हे अधिक सुरक्षित होतं, असं आपण म्हणू शकतो.

प्राचीन इजिप्तमध्ये 4500 वर्षांपूर्वी मृतदेहांचे ममी तयार करून त्यांना अत्यंत भक्कम बांधकाम केलेल्या पिरॅमिडमध्ये दफन करण्यात आलं होतं. या पिरॅमिड किंवा दफन कलशांमध्ये मृतदेहांबरोबर त्या मृत लोकांच्या वस्तूदेखील जतन करण्यात आल्या होत्या.

पण प्राचीन काळात लोकांनी मृतदेह जतन का केले जात असत? सोबत त्यांनी त्यांच्या वस्तूदेखील का जतन केल्या? यामागचं कारण अत्यंत रंजक आहे. कारण, त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास होता.

मृत झालेले लोक पुन्हा जन्म घेतील आणि त्यांच्या आत्मा त्यांच्या शरिरासह जतन केलेल्या वस्तूंचा वापर करतील, असा विश्वास प्राचीन काळातील लोकांना होता.

या जन्मातील पाप आणि पुण्य तुमच्या पुढच्या जन्मातही तुमचा कसा पाठलाग करत असतं, याचा उल्लेख 2000 वर्षांपूर्वी लिहिलेल्या 'सिलप्पाधिकारम'मध्ये करण्यात आलाय.

श्याम सिंघा रॉय, शैतान, अनेगन, अरुंधती, सदुगुडू वंडी आणि नेंजाम मरप्पाधिल्लई अशा चित्रपटांना लोकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. त्यावरून आजही लोकांना पुनर्जन्मावर विश्वास असल्याचं दिसून येतं.

इयान स्टिव्हनसन हे मानसोपचारतज्ज्ञ होते. व्हर्जिनिया विद्यापीठात 1957 मध्ये ते मानसोपचार विभागाचे प्रमुख होते. पॅरासायकॉलॉजीवर (असामान्य मानसिकता) त्यांचा विश्वास होता. स्पर्श न करता वस्तू हलवणे, मृत्यूच्या अगदी जवळचा अनुभव, पुनर्जन्म, भूत आणि अशा इतर असामान्य गोष्टींवर विश्वास ठेवणारी ही संकल्पना आहे.

अनेक ठिकाणी लहान मुलं मागच्या जन्माबद्दल बोलत असल्याचं इयान स्टिव्हनसन यांना समजलं. त्यांनी त्याबाबत माहिती मिळवण्यास सुरुवात केली. त्यांनी जगभरातील अशा 3000 लोकांचा शोध घेतला. त्यांनी भारत, बर्मा, श्रीलंका आणि फ्रान्स अशा अनेक देशांमध्ये पुनर्जन्मावर संशोधन केलं.

पुनर्जन्म
फोटो कॅप्शन, तामिळनाडूच्या थुथुक्कुडी जिल्ह्याच्या आदिचनाल्लुरमध्ये असे दफनविधीचे प्राचीन कलश आहेत.

या 3000 लोकांपैकी 2 ते 6 वयोगटातील मुलं हे त्यांच्या मागच्या जन्मातील अनुभवांबाबत बोलत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या सर्व मुलांचा बुद्ध्यांक हा सरासरीपेक्षा जास्त असल्याचंही त्यांच्या लक्षात आलं.

मोठे लोक कुणीही मागच्या जन्माबद्दल बोलली नाहीत. लहान मुलांपैकी 70% मुलांनी मागच्या जन्मी अगदी कमी वयात त्यांचा मृत्यू झाला होता असं सांगितलं. यापैकी 90% मुलं पूर्वीच्या जन्मात होते, त्याच लिंगात (पुरुष किंवा स्त्री) जन्माला आले होते.

त्याचबरोबर या मुलांच्या शरीरावर मागच्या जन्माच्या जन्मखुणा किंवा इतर खुणा असल्याचंही स्टिव्हनसन यांना समजलं. ही बाबदेखील अत्यंत आकर्षक होती.

या मुलांपैकी 60% मुलं अशा धर्मांमध्ये जन्माला आली होती, ज्या धर्मात पुनर्जन्मावर विश्वास ठेवला जातो. तर उर्वरित मुलं पुनर्जन्मावर विश्वास नसलेल्या धर्मांमध्ये जन्माला आली होती.

पुनर्जन्म

फोटो स्रोत, Getty Images

पुनर्जन्मावर विश्वास असलेले धर्म कोणते?

हिंदू आणि बौद्ध हे पुनर्जन्मावर विश्वास असलेले धर्म आहेत तर बहुतांश ख्रिश्चन आणि मुस्लीम संस्था ही संकल्पना नाकारतात.

स्टिव्हनसन यांनी 34 वर्ष यासंबंधी संशोधन करून 225 पुनर्जन्मांचे दस्तऐवज तयार केले. त्यांनी 'रिइन्कार्नेशन बायोलॉजी' नावाची 2268 पानांची दोन पुस्तकं लिहिली. या पुनर्जन्मांपैकी एका घटनेची आपण तपशीलवार माहिती घेऊ.

श्रीलंकेतील एका तीन वर्षीय चिमुकलीनं आईकडून 'कटारागामा' हे नाव ऐकलं आणि ती त्यानंतर बरंच काही बोलू लागली.

मागच्या जन्मात ती कटारागामा नावाच्या ठिकाणी जन्माला आली होती, असं ती म्हणाली. तिच्या मानसिकदृष्ट्या रुग्ण असलेल्या भावानं नदीत ढकलून दिल्यामुळं मागच्या जन्मात तिचा मृत्यू झाला होता.

पुनर्जन्म

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मागच्या जन्मी तिचे वडील केरात हे कटारागामाच्या बौद्ध मंदिरात फुलांचा व्यवसाय करत होते आणि त्यांना केस नव्हते, असंही या मुलीनं सांगितलं. मागच्या जन्मी तिच्या घराला काचेचं छत होतं आणि घराच्या मागच्या बाजूला एक कुत्रा बांधलेला असायचा आणि त्याला रोज मांस खाऊ घातलं जायचं, असंही ती म्हणाली.

घराजवळच एक हिंदू मंदिर होतं आणि लोक तिथं खूप नारळ फोडायचे असंही तिनं सांगितलं. स्टिव्हनसन यांनी भाषांतरकाराची मदत घेत ही सर्व माहिती गोळा केली. त्यानंतर स्टिव्हनसन कटारागामाला गेले आणि त्यांनी त्याठिकाणी चौकशी केली. तिथं बौद्ध मंदिरात एक फुल विक्रेता होता, पण त्याच्या डोक्यावर केस होते. त्याच्या वडिलांना मात्र टक्कल होतं. पण त्यांचं नाव केरात नव्हतं. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याचं नाव मात्र केरात होतं. त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीचा नदीत वाहून गेल्यामुळं मृत्यू झाला होता, असं त्यांनी मान्य केलं.

पण ती पाण्यात कशी पडली हे त्यांना माहिती नव्हतं. त्यांच्याकडं कुत्रा नव्हता पण शेजाऱ्यांकडं कुत्रा होता आणि ते रोज त्यांना मांस खायला देत होते.

फुल विक्रेत्यांचं कुटुंब कधीही या मुलीच्या कुटुंबाला भेटलेले नव्हते. मग या मुलीला एवढी सगळी माहिती कशी होती? स्टिव्हनसन यांच्या मते, ही मुलगी त्या दोन वर्षांच्या मुलीच्या रुपात पुनर्जन्म घेऊन आली होती.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 1

भारतात काय मान्यता आहेत?

स्टिव्हनसन यांच्या संशोधनानुसार दोन जन्मांच्यामध्ये 16 महिन्यांचं अंतर असतं.

तर बौद्ध धर्मियांच्या मान्यतेनुसार मृत व्यक्तीचा आत्मा मोक्ष मिळण्यासाठी किंवा पुनर्जन्मासाठी 46 दिवस वाट पाहत असते.

या काळामध्ये धार्मिक विधी केले जातात. तमिळनाडूमध्येही 41 दिवस विधी केले जातात.

पुनर्जन्म

फोटो स्रोत, Getty Images

तमिळनाडूतील लोकांच्या मते मृत व्यक्तीचा आत्मा सतत त्या भागामध्ये फिरत असतो. 16 व्या दिवसाला ते 'करुमधी' किंवा 'क्रेक्कियम' म्हणतात. तर आता 13 व्या दिवसाला ते क्रेक्कियम आणि 30 व्या दिवसाला मसियम म्हणतात. मृत आत्म्यासाठी दरवर्षीदेखील विधी केले जातात. लोकांचा विश्वास आणि स्टिव्हनसन यांचे संशोधन यात बरंच साम्य आहे. तामिळ लोक जाणून-बुजून हे पाळतात का? असं यामुळं वाटतं. पण आपण याचा अधिक खोलवर विचार करू.

प्राण्यांना स्मृती असते का?

नवजात वासराला आईचे स्तन कसे ओळखू येतात किंवा समजतात?

"आईच्या स्तनातून दूध मिळेल हे वासरांना कसं कळतं? तर त्यासाठी ते गेल्या जन्मातील अनुभवांचा वापर करतात," असंही काही लोक म्हणतात. मात्र, जैवरसायनशास्त्र ते पूर्णपणे फेटाळतं. वासराच्या नाकात प्रोटिन्स असतात आणि त्यामुळं त्यांना दुधाचा गंध येतो. ते गंध कुठून येतो हे ओळखतात आणि मेंदूला सिग्नल देतात. त्याचा वापर करून गंधाच्या दिशेनं वासरू पुढं सरकतं, हे जीवरसायनशास्त्राद्वारे सिद्ध झालं आहे.

पुनर्जन्म

फोटो स्रोत, Getty Images

जर गुगलवर आपण सर्च केलं तर आपल्या लक्षात येईल, पेशी 7 ते 10 वर्षं जगतात हे समजल्यानंतर स्मृती कशी काम करते याची उत्सुकता त्याला निर्माण झाली.

वयाच्या 70 व्या वर्षीही व्यक्तीला बालपणातील गोष्टी कशा लक्षात राहतात? आत्म्यानं एका पेशीतून दुसऱ्या पेशीत प्रवास केला तरच हे शक्य आहे, असं देखील एखाद्याला वाटू शकतं.

पेशीचं आयुर्मान हे खरं आहे. आपल्या तोंडातील पेशी केवळ एकदिवस जगतात. त्वचेतील पेशी 30 दिवस आणि हाडांतील पेशी 30 वर्षांपर्यंत जगतात.

तर आपल्या मेंदूच्या पेशी 70 वर्षे जगू शकतात. त्यामुळं या शेकडो पेशींचं सरासरी आयुर्मान हे 7 ते 10 वर्षे असल्याचं समोर आलं आहे.

पण मेंदूच्या पेशी 70 वर्षांपेक्षा अधिक काळ जगू शकतात हे आपण लक्षात ठेवायला हवं. आपल्या मेंदूमध्ये आठवणी या पेशींच्या गुच्छादरम्यान होणाऱ्या संवादाच्या माध्यमातून जतन केल्या जातात.

त्यामुळं बालपणाच्या आठवणी, घटना वृद्धत्वानंतरही झाल्यानंतरही लक्षात राहतात. त्यामुळं पेशींशी संबंधित जीवशास्त्र आत्मा एका पेशीतून दुसऱ्या पेशीत प्रवास करतो, ही संकल्पना नाकारते.

पुनर्जन्म

फोटो स्रोत, Getty Images

आपल्या भावना आणि विचार हे मेंदूमध्ये साठवलेले असतात. पुनर्जन्मावर विश्वास असलेल्यांना ठाम विश्वास असतो की, या विचारांमध्ये शरिराच्या बाहेर आत्म्यातही राहण्याची शक्ती असते.

आपण हे उदाहरणाद्वारे समाजावून देऊ शकतो हे पाहू.

मानवी जीवनाला आपण आत्मा समजत असू तर मग, सर्व प्राण्यांना आत्मा आहे हे आपण नाकारू शकत नाही. मी गेल्या 14 वर्षांपासून गांडुळांवर संशोधन करत आहे. तुम्ही त्याचे डोके कापले तरी ते मरत नाही. उलट 8 दिवसांत त्याचा मेंदू पुन्हा तयार करू शकते.

आम्ही काही गांडुळं पाण्यात टाकली. त्या सर्वांनी एकमेकांना चिटकून चेंडूसारखा आकार घ्यायला सुरुवात केली. त्यांना भीती वाटली असावी, असं वाटत होतं. पण डोकं नसलेली गांडुळं तसं करत नव्हती. ते एकटेच होती. गांडुळांना मेंदूचा भाग तयार करण्यासाठी जवळपास 8 दिवस लागतात. पण पुन्हा नवा मेंदू तयार केलेली गांडुळं पाण्यात टाकली तर ती एमेकांना चिटकून चेंडूचा आकार घेऊ लागतात.

मी आकृत्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हे समाजावले. त्यापैकी विद्यार्थ्याने उत्सुकतेनं मला विचारले की, नवीन मेंदू असलेल्या गांडुळाच्या जुन्या स्मृती कायम होत्या का? हा अवघड किंवा अडचणीत टाकणारा प्रश्न होता. त्या गांडुळांबरोबर काय घडतं? त्यांच्या स्मृती नव्या मेंदूमध्ये कशा येतात? मेंदूच्या बाहेरही विचार प्रबळपणे राहू शकतात का?

पुनर्जन्म

फोटो स्रोत, Getty Images

पुनरुत्पादन जीवशास्त्राचा वापर करून याचं उत्तर समजावून घेऊ. डोकं नसलेली गांडुळं 7 दिवस काहीही करू शकत नाहीत, 8 व्या दिवशी करतात.

कारण एकत्र राहण्यासाठी मेंदू गरजेचा असतो आणि त्यातून स्त्राव होणारं रसायन हे आठव्या दिवशीच उपलब्ध होत असतं. सर्वांनी एकत्र येऊन चेंडूचा आकार घेणं हे याच सामुदायिक रासायनिक प्रक्रियेमुळं घडत असतं, दुसरं काहीही नसतं.

या संशोधनाचं आणखी चांगल्या प्रकारेदेखील स्पष्टीकरण देता येऊ शकतं. आपण या गांडुळांना एखादं काम करण्याचं प्रशिक्षण देऊन त्यानंतर त्यांचे शीर कापू शकतो.

मेंदू पुन्हा तयार केल्यानंतर त्यांना आधीचं काम लक्षात राहतं की नाही, हे आपण तपासू शकतो. त्यासाठी त्यांना काय काम दिलं जाऊ शकतं? यासाठी आपल्याला खूप विचार करावा लागेल, कदाचित भविष्यात आपण तसं काही करू शकतो.

पुनर्जन्म

फोटो स्रोत, Getty Images

त्याचवेळी जगभरातील इतर अनेक शास्त्रज्ञ स्टिव्हनसन यांच्या या संशोधनाला विरोध करतात. स्टिव्हनसन यांचं संशोधन हे प्रमाणित नाही आणि संशोधन पद्धतशीर झालं नसल्याचं इतरं संशोधकांचं म्हणणंय.

एखाद्या मुलानं काही कथा सांगितली तर, जगभरात कुणीतरी असं असेल ज्याचं वर्णन त्याच्याशी तंतोतंत जुळू शकतं, हा योगायोग असू शकतो.

शास्त्रज्ञ म्हणतात की, अशा कथा म्हणजे, योगायोगच समजायला हव्या. त्या कथा गोल गोल फिरवून त्याचा पुनर्जन्माशी संबंध जोडणं योग्य नाही.

या सर्व मुलांचा पुनर्जन्माशी संबंध जोडण्याऐवजी, त्यांच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करायला हवा.

लहान मुलं खोटं बोलत नाही, असं आपल्या समाजात मानलं जातं. पण त्याचबरोबर लहान मुलं अत्यंत कल्पक असतात आणि अगदी खऱ्या वाटतील अशा गोष्टीही ते सांगू शकतात, हेही आपण मान्य करायला हवं.

ऑडिओ कॅप्शन, भूतकाळात किंवा भविष्यात जाणं शक्य आहे का? ऐका गोष्ट दुनियेची

पुनर्जन्माची संकल्पना सिद्ध करता येऊ शकते का?

पुनर्जन्माची संकल्पना खरी आहे हे सिद्ध करण्याचा एक मार्ग आहे. आपण स्टिव्हनसन यांचं संशोधन सुरू ठेवू शकतो आणि पुनर्जन्म कसा होतो हे शोधू शकतो. अन्यथा या संकल्पनेला होणारा विरोध अधिक तीव्र होईल.

ऊर्जा संवर्धनाचा नियम सांगतो की, ऊर्जा निर्माण केली जाऊ शकत नाही, किंवा नष्टही केली जाऊ शकत नाही.

केवळ ऊर्जेचं एका रूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतर केलं जाऊ शकतं. पुनर्जन्माची संकल्पना सत्य असेल तर आत्म्यानं ऊर्जेसारखं वर्तन करायला हवं.

तसं झाल्यास जगातील आत्म्यांची संख्याही कायम समान राहील आणि ते आत्मे केवळ वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या शरिरांत प्रवेश करतील. शैव सिद्धांत तत्वज्ञानातही अशीच संकल्पना मांडण्यात आलीय.

पुनर्जन्म

फोटो स्रोत, Getty Images

जेव्हा पृथ्वी तयार झाली होती, तेवहा तो फक्त आगीचा गोळा होता. त्यानंतर हा गोळा थंड झाला आणि नंतर त्यावर जीवसृष्टी निर्माण झाली. जीवसृष्टीच्या या एका कणापासूनच सर्वप्रकारच्या प्रजाती विकसित झाल्या.

विज्ञान असं सांगतं की, जीवनाची सुरुवात एकापासून झाली आणि त्यानंतर लाखो, कोट्यवधी प्रजाती तयार झाल्या. पृथ्वीवर असलेल्या आत्म्यांची संख्या ही कायम समान असते, ही शैव संकल्पना मात्र खरी नाही. समकालीन जगतामध्ये आतम्यावर संशोधन होण्याची काहीही शक्यता नाही.

फेब्रुवारी 2007 मध्ये स्टिव्हनसन यांचं निधन झालं. त्यानंतर व्हर्जिनिटी युनिव्हर्सिटीतील मानसिक आरोग्य विभागातील मेडिकल सेंटरचे सहायक प्राध्यापक डॉक्टर जिम टकर यांनी हे संशोधन सुरू ठेवलं आहे.

त्यामुळं मुलांच्या कथांवर विश्वास ठेवून पुनर्जन्माची संकल्पना मान्य करण्याऐवजी आपण संशोधनातून ही संकल्पना सिद्ध होण्याची वाट पाहुयात. तोपर्यंत केवळ अख्यायिकांवर आधारित पुनर्जन्मावर शास्त्रज्ञ विश्वास ठेवणार नाहीत. मीही नाही.

(सुधाकर सुब्रमण्यम यांनी त्यांच्या संशोधन कारकिर्दीची सुरुवात मदुराईमध्ये कामराज विद्यापीठातून सुरू केली होती. त्यांना 1999 मध्ये डॉक्टरेट पदवी मिळाली. त्यांनी अमेरिकेतील विद्यापीठांत दहा वर्षे काम काम केलं आहे. सध्या ते मनोमनयम सुंदरनार विद्यापीठात प्राध्यापक आहेत. तसंच विद्यापीठातील पुरातत्व केंद्राचे ते संचालकही आहेत. गांडुळांचा वापर करून अवयवांचे पुनरुत्पादन आणि वृद्धत्व यावर ते संशोधन करत आहेत. त्यांनी गांडुळांचं जीनोम सिक्वेन्सिंगही केलं आहे.)

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)