वयाच्या 55 व्या वर्षी वडिलांना पहिल्यांदा पाहिलं, तेही मलेशियात स्वतः शोधलेल्या थडग्यावरच्या फोटोत

- Author, प्रभुराव आनंदन
- Role, पत्रकार, तामिळनाडू
तामिळनाडूतील थिरूमारन हे सहा वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. मात्र, वडिलांचं थडगं शोधण्यासाठी थिरूमारन हजारो किलोमीटर दूर पोहोचले. तिथवर पोहोचण्यासाठी त्यांना अनेक प्रयत्न करावे लागले. त्याची ही गोष्ट.
थिरूमारन यांना त्यांच्या बालपणीच्या आठवणींबद्दल विचारलं असताना, त्या आठवणींमध्ये त्यांना वडीलच दिसत नाहीत. वडिलांसोबतच्या फारशा आठवणी त्यांच्यापाशी नाहीत. किंबहुना, वडिलांचा चेहराही नीट आठवत नाहीय.
थिरूमारन यांचे वडील के. रामासुंदरम हे मलेशियात शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. 1967 साली ते न्युमोनियाने के. रामासुंदरम यांचा मृत्यू झाला. म्हणजे, थिरूमारन यांच्या जन्माच्या सहा महिन्यांनी.
मग थिरूमारन आणि त्यांची आई भारतात्या तामिळनाडूत परतल्या.
1987 साली म्हणजे थिरूमारन 22 वर्षांचे असताना त्यांच्या आईचाही मृत्यू झाला.
थिरूमारन यांच्या आईने जपून ठेवलेली काही जुनी पत्रं त्यांना सापडली. ही पत्रं के. रामासुंदरम यांनी थिरूमारन यांच्या आईला लिहिली होती.
त्यांची आई थिरूमारन यांना सांगायची की, तुझे वडील मानवतावादी होते आणि चांगले गायकही होते.
मृत्यूपूर्वी वडिलांबद्दलही काही माहिती तिने मुलासोबत म्हणजे थिरूमारन यांना सांगितली होती. मलेशियातल्या कर्लिंग शहरात, जिथं के. रामासुंदरम यांचा मृत्यू झाला होता, त्या शहरातच त्यांचं थडगं आहे, असंही त्यांनी थिरूमारन यांना सांगून ठेवलं होतं.
थिरूमारन हे आता 55 वर्षांचे आहेत. तामिळनाडूतील तिरुनेवेली जिल्ह्यात ते वेठबिगारीतून मुक्त करण्यात आलेल्या मुलांसाठी शाळा चालवतात.
याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांनी असं ठरवलं की, वडिलांच्या थडग्याचा शोध घ्यायचा.
“खरंतर आजवर अनेकदा माझ्या मनात आलं होतं की, वडिलांचं निधन जिथं झालं आणि जिथं थडगं आहे, तिथं जायचं. पण प्रत्यक्षात गेलो नव्हतो,” असं थिरूमारन सांगतात.
हे सर्व गूगल सर्चपासून सुरू झालं...
थिरूमारन यांनी वडिलांच्या थडग्याच्या शोधाची सुरुवात गूगल सर्चपासून केली.
वडील मलेशियात ज्या शाळेत शिकवत होते, त्या शाळेच्या शोधापासूनच सुरुवात झाली. मात्र, अडचण अशी होती की, शाळेचं नाव वगळता इतर काहीच थिरूमारन यांना माहित नव्हतं.
रामासुंदरम हे कर्लिंग (मलेशिया) मधील थोत्ता थेसिया वकाई तामिळ पल्ली या शाळेत ते शिकवत असत. ही शाळा मलेशियास्थित तामिळ समाजानं सुरू केली होती.
थिरूमारन यांनी त्यांच्या विद्यार्थांना गूगलवर शाळेबाबत सर्च करायला सांगितलं. याबाबत ते म्हणतात की, “कॉम्प्युटर कसा वापरायचा हेच मला माहित नाहीय. मग माझ्या विद्यार्थ्यांनी गूगलवरून शाळेचा फोटो मिळला. मला आश्चर्याचा धक्काच बसला.”
त्यांच्या असं लक्षात आलं की, शाळा दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आलीय. त्यामुळे मग थिरूमारन यांनी शाळेच्या प्राचार्याना ईमेल करून मदतीची अपेक्षा व्यक्त केली.

मग शाळेच्या प्रशासनानं रामासुंदरम यांच्या काही विद्यार्थ्यांचे संपर्क क्रमांक थिरूमारन यांना पाठवले.
या विद्यार्थ्यांचं वय झालं होतं, मात्र ते काही मदत करू शकतात, असंही प्रशासनानं सांगितलं.
मग पुढच्या काही दिवसात थिरूमारन यांनी वडिलांच्या विद्यार्थ्यांशी संपर्क केला. त्यांनी थिरूमारन यांना रामासुंदरम यांचं थडगं शोधून काढण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं.
थिरूमारन हे वडिलांच्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतात.
खरंतर हे विद्यार्थी थिरूमारन यांच्यापेक्षा वयानं खूप मोठे होते. अगदी 70-80 वर्षे वयापर्यंत पोहोचलेले.
“रामासुंदरम यांचा विद्यार्थी असलेल्या एका व्यक्तीने सांगितलं की, त्यांनी म्हणजे रामासुंदरम यांनी कशाप्रकारे शाळा आणि कॉलेजमध्ये जाण्यासाठी सायकल घेऊन दिली होती. आणखी एका व्यक्तीनं सांगितलं की, जेव्हा मी अभ्यासात कमी पडू लागलो, तेव्हा त्यांनीच म्हणजे रामासुंदरम यांनीच मदत केली आणि चांगल्या गुणवत्तेसाठी प्रयत्न केले.”
थिरूमारन यांनी वडिलांच्या विद्यार्थ्यांकडून जेव्हा असे अनुभव ऐकले, तेव्हा त्यांना आणखी तीव्रतेने जाणवलं की, आपण आयुष्यात किती मोठी गोष्ट गमावली.
वडिलांना पहिल्यांदा पाहिलं ते थडग्यावरच्या फोटोत
मग काही दिवसांनी रामासुंदरम यांचं थडगं त्यांच्या मलेशियातील विद्यार्थ्यांनी शोधून काढलं आणि थिरूमारन यांना कळवलं.
8 नोव्हेंबर 2022 रोजी थिरूमारन मलेशियाच्या दिशेनं विमानानं रवाना झाले.
नोव्हेंबरमधील एका शांत सकाळी थिरूमारन कर्लिंगस्थित जुन्या स्मशानभूमीत पोहोचले.
स्मशानभूमी झाडांची आच्छादलेली होती. तिथल्या बारीक सारीक झुडुपांमधून वाट काढत, थिरूमारन तिथं पोहोचले, ज्या ठिकाणाचा कित्येक दिवसांपासून ते शोध घेत होते.
ते रामासुंदरम यांच्या थडग्यापाशी पोहोचले होते.
“ते थडगं थोडं जीर्ण झालं होतं आणि आजूबाजूला झुडुपंही वाढली होती. मात्र, त्या थडग्यावर रामासुंदरम यांचं नाव, फोटो, जन्मतारीख आणि मृत्यूची तारीख अशा गोष्टी होत्या,” असं थिरूमारन सांगतात.

थिरूमारन यांनी वडिलांना पहिल्यांदा पाहिलं त्या थडग्यावरील फोटोतच. तोपर्यंत वडील कसे दिसत होते, हेही त्यांना माहित नव्हतं.
थिरूमारन यांची आई जेव्हा मलेशियातून भारतात परतली होती, तेव्हा तिने वडिलांच्या थडग्यावरून मूठभर माती भारतात नेली होती. पुढे आईचा मृत्यू झाल्यावर तिच्या थडग्यावर तिच माती थिरूमारन यांनी शिंपडली होती.
“यावेळी मलेशियात येताना आईच्या थडग्यावरील मूठभर माती घेऊन आलो होतो, ती माती इथं वडिलांच्या थडग्यावर शिंपडली,” असं काहीसं भावनिक होत थिरूमारन सांगतात.
मृत्यूनंतरही त्यांच्यातील प्रेमाची देवाण-घेवाण झाल्यासारखे मला तिथे वाटले, असंही ते म्हणतात.
माणूस भावनांचा महासागर...
मग पुढचे काही दिवस वडिलांच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन, थिरूमारन यांनी थडग्याच्या आजूबाजूचा भाग स्वच्छ केला. तिथं मेणबत्त्या लावल्या आणि भारतात परतेपर्यंत म्हणजे 16 नोव्हेंबरपर्यंत तिथं रोज प्रार्थनाही त्यांनी म्हटली.
थिरूमारन सांगतात की, “मलेशियात वडिलांच्या थडग्यापाशी जाऊन आल्यानंतर कल्पनाही करू शकत नाही अशा अनमोल आठवणी सापडल्या, असं वाटतंय. सगळ्यात महत्त्वाचं, वडिलांचा फोटो सापडला.”
“त्यांच्या वडिलांच्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की, ते (रामासुंदरम) तुमच्यासारखेच दिसायचे. माझ्यासारखा एखादा मुलगा, ज्याचं आयुष्य वडिलांना न पाहताच गेलंय, त्याच्यासाठी ही गोष्ट शब्दातही व्यक्त करता येऊ शकत नाही,” असं थिरूमारन म्हणतात.
थिरूमारन यांची ही गोष्ट तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यापर्यंत पोहोचली. मग त्यांनीही थिरूमारन यांच्या या सर्व गोष्टींबाबत ट्वीट केलं आणि कौतुक केलं की, ज्यांनी थिरूमारन यांना वडिलांचं थडगं शोधण्यासाठी जशी मदत केली, ते तामिळ लोकांच्या सांस्कृतिक ओळखीचं वेगळेपण सांगणारं आहे.
“माणूस म्हणजे भावनांचा महासागर असतो. वडिलांच्या थडग्याचा शोध हा थिरूमारन यांच्यासाठी आयुष्याचा शोध घेण्यासारखं आहे, असं मला वाटतं,” असं एमके स्टॅलिन यांनी म्हटलं.











