प्लास्टिक प्रदूषण : आपण फेकलेल्या मास्कमध्ये जेव्हा पक्षी अडकतात...

फोटो स्रोत, ADRIAN SILAS TAY
- Author, व्हिक्टोरिया गिल
- Role, विज्ञान पत्रकार, बीबीसी न्यूज
मास्कमध्ये अडकलेले पक्षी, काड्याकुड्यांऐवजी रबराच्या वायरी आणि कचऱ्यानं बांधलेली घरटी कदाचित तुम्हीही पाहिली असतील. एक अंटार्क्टिकाचा अपवाद वगळला तर जगातल्या सर्व खंडांमध्ये अशा कचऱ्यात अडकलेल्या पक्ष्यांचे फोटो समोर आले आहेत.
'बर्ड्स अँड डेब्रीज' (पक्षी आणि ढिगारे) या एका ऑनलाईन प्रकल्पाअंतर्गत जगभारतील लोकांनी हे फोटो शेअर केले आहेत.
आपण टाकलेल्या कचऱ्याचा विशेषतः प्लास्टिक प्रदूषणाचा पक्ष्यांवर काय परिणाम होतो आहे, हे पाहण्यासाठी हा प्रकल्प राबवला जात आहे.
यातले जवळपास एक चतुर्थांश फोटो हे मास्कमध्ये अडकलेल्या पक्ष्यांचे आहेत, असं निरीक्षण हा प्रकल्प सुरू करणाऱ्या वैज्ञानिकांनी नोंदवलं आहे. त्याशिवाय पक्ष्यांनी घरट्यासाठी दोरी, मासेमारीसाठी वापरली जाणारी जाळी, रिबीन आणि अगदी रबरी चपलांचा वापर केल्याचं किंवा अशा गोष्टींमध्ये ते अडकले असल्याचं दिसून येतं.

फोटो स्रोत, MARY CAPORAL PRIOR
"जे पक्षी घरट्यासाठी झाडांच्या काट्या, मुळं, समुद्री गवत अशा तंतूमय गोष्टी वापरतात त्यांच्या घरट्यात मानवनिर्मित वस्तूही आढळण्याची शक्यता जास्त आहे," असं या प्रकल्पातले एक संशोधक आणि लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे डॉ. अलेक्स बाँड सांगतात. डॉ. बाँड आणि त्यांचे सहकारी चार वर्षांपासून हा प्रकल्प राबवत आहेत.
"तुम्ही शोधू लागलात तर अशा गोष्टी सगळीकडे दिसू लागतील. जपान, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, युके, उत्तर अमेरिका इथूनही लोकांनी फोटो पाठवले आहेत, ही खरंच एक जागतिक समस्या आहे." त्यात मोठ्या प्रमाणात पक्ष्यांवर मास्कचा परिणाम होत असल्याचंही समोर आलं आहे.
डॉ. बाँड सांगतात, "सर्जिकल मास्कमध्येही वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केलेला असतो. मास्कच्या इलॅस्टिक बँडमध्ये पक्ष्यांचे पाय अडकल्याचं, मास्कचं कापड किंवा तो नाकावर बसवण्यासाठी असलेली धातूची किंवा प्लॅस्टिकची पट्टी यांमुळे पक्ष्यांना दुखापती झाल्याचंही दिसून आलं आहे."

फोटो स्रोत, MATTHEW IRISH
प्रकल्पाच्या मुख्य वैज्ञानिक आणि कॅनडाच्या डलहौसी विद्यापीठाच्या संशोधक जस्टिन अमेन्डोलिया या दृष्यांचं वर्णन 'हृदयद्रावक' असं करतात.
त्या म्हणतात, "एप्रिल 2020 मध्येच झाडावर फेसमास्कला लटकलेल्या पक्ष्याचा फोटो कॅनडामधून नोंदवण्यात आला. त्यानंतर जगभरात अशा घटनांची नोंद वाढतच जाते आहे. माणूस अगदी थोड्या काळातच पर्यावरणाचं किती मोठं नुकसान करू शकतो ते यातून दिसून येतं."

फोटो स्रोत, JAKE KENNY
तर डॉ. बाँड सांगतात, "केवळ प्लॅस्टिकऐवजी बांबू टूथब्रश वापरल्यानं किंवा बाजारात कापडी बॅग नेल्यानं जग वाचणार नाही, कारण बहुतांश प्लॅस्टिक हे औद्योगिक कारणांसाठी तयार होतं आणि त्या वस्तू रोजच्या वापरातही असतात. त्यामुळे इथे सरकारांकडून धोरणात्मक बदलांची गरज आहे आणि लोकांनी त्यासाठी दबाव आणण्याची गरज आहे."

फोटो स्रोत, ROB HUGHES
याआधी माँट्रियल प्रोटोकॉल या कराराची डॉ. बाँड आठवण करून देतात. 1987 सालच्या त्या करारानुसार ओझोनवर परिणाम करणाऱ्या घटकांवर बंदी घालण्यात आली होती. आजवरच्या सर्वांत यशस्वी जागतिक करारांमध्ये माँट्रियाल प्रोटोकॉलचा समावेश केला जातो आणि प्लॅस्टिकच्या समस्येवर तोडगा म्हणून अशाच प्रयत्नांची गरज असल्याचं ते सांगतात.
"आपण त्या दिशेनं प्रवास करतो आहोत, पण खूपच धीम्या गतीनं चाललो आहोत."

फोटो स्रोत, ROB HUGHES
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








