अल्गो ट्रेडिंगने तुम्ही शेअर मार्केटमध्ये अब्जावधी रुपयांची कमाई करू शकता का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, कार्तिकेयन फास्तुरा
- Role, अर्थतज्ज्ञ
- Reporting from, बीबीसी तामिळसाठी
(मानवी विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानसंबंधीची नवी माहिती दृष्टीकोन आणि लेख बीबीसी प्रसिद्ध करत असते. या लेखांमधील मते आणि वक्तव्ये ही पूर्णपणे लेखकांची आहेत, बीबीसीची नव्हे. - संपादक)
वेळ ही जगातील अमूल्य वस्तू आहे. वेगवान विमानं, महागडी औषधं आणि तंत्रज्ञान या सर्वांचा शोध केवळ वेळ वाचवण्यासाठीच लावण्यात आलाय.
त्याचप्रमाणं शेअर बाजारातील व्यवहारामध्ये (स्टॉक मार्केट ट्रेडिंग) वेगाला देखील अत्यंत महत्त्व आहे.
योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन जे नफा कमावतात तेच यात विजयी होतात. अल्गो ट्रेडिंग हे अॅटोमॅटिक ट्रेडिंग सॉफ्टवेअर आहे, जे यासाठी लोकांना मदत करतं.
अनेकांच्या मनात हे कुतूहल असतं की शेअर मार्केटमधून कोट्यवधी, अब्जावधी रुपये कमवता येऊ शकतात का? जे लोक हे कमवतात ते नेमकं काय करतात, नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण खूप सारा पैसा कमवू शकतो का?
याच प्रश्नांची उत्तरं या लेखातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
अल्गो ट्रेडिंगची सुरुवात कशी झाली?
शेअर बाजारात गणिताच्या अनेक सुत्रांचा वापर केला जातो. अगदी 1900 च्या काळातही जेव्हा स्टॉक मार्केट ट्रेडिंग नेमकंच प्रचलित झालं होत होतं, तेव्हाही गणिताच्या अनेक सुत्रांचा शोध लागला.
राल्फ नेल्सन एलिट यांनी 1930 मध्ये शोधलेला 'द एलिट वेव्ह' सिद्धांत हा अशाच प्रसिद्ध सिद्धांतापैकी एक आहे.
त्यानुसार जर स्टॉक मार्केटच्या आलेखात लाट असेल, तर मुख्य लाटेमध्येही तीन लाटा असतात. ज्या एका पाठोपाठ एक वर जातात आणि दोन लाटा एका पाठोपाठ खाली जातात. आपण त्याकडं बारकाईनं पाहिलं तर तीन वर आणि दोन खाली असा सारखा क्रम आपल्याला पाहायला मिळतो.
त्याचप्रमाणे स्टॉक मार्केट ट्रेडिंगमध्ये 'फिबोनाची' क्रमदेखील प्रसिद्ध आहे. शेअर बाजार वर किंवा खाली जात असेल तर, तर त्यानंतरचे बदल हे या क्रमानं होतात, असं मानलं जातं.
म्हणजेच आपण जर मागच्या किमतीमध्ये सध्याची किंमत जोडली, तर आपल्याला भविष्यातली किंमत मिळते.

फोटो स्रोत, Getty Images
स्टॉक मार्केटच्या आधीच्या ट्रेंडच्या आधारावर अशी अनेक सुत्रं तयार करण्यात येत आहेत. काही कॉम्प्युटर प्रोग्रामही तयार करण्यात आले आहेत, जे या सुत्रांवर आधारित आहेत.
लोक त्याच्या आधारावर स्टॉक्सची खरेदी किंवा विक्री करत असतात. यावर आधारित असे जलद निर्णय घेतले जातात आणि अॅटोमेटेड ट्रेडिंग (स्वयंचलित व्यवहार) होते.
लोकांनी संगणकाचा वापर सुरू केल्यापासून ही पद्धत वापरली जात आहे. पण स्टॉक मार्केट ट्रेडिंगमध्ये इंटरनेटचा वापर सुरू झाल्यापासून ते पूर्णपणे अॅटोमेटेड (स्वयंचलित) होऊ लागलं आहे.
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या मोठ्या गुंतवणूकदार कंपन्या, म्युच्युअल फंड कंपन्या आणि विमा कंपन्या अल्गो ट्रेडिंगचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहेत. त्याचं कारण म्हणजे, या कंपन्या मोठ्या प्रमाणावर शेअरचे व्यवहार करत असतात.
त्यामुळं या कंपन्या केवळ लोकांच्या निर्णयक्षमतेवर अवलंबून राहू शकत नाहीत. अशा परिस्थितीत अॅटोमेटेड ट्रेडिंग चांगला मोबदला मिळवून देतं.
याचा वापर कोण करू शकतं? त्यासाठीची प्रक्रिया काय आहे?
पूर्वी, अल्गो ट्रेडिंगमध्ये C++ ही संगणकाची भाषा मोठ्या प्रमाणावर वापरली जात होती. आजही तीच भाषा वापरली जाते, कारण बहुतांश बँकिंग सेवा या याच भाषेत तयार करण्यात आल्या आहेत.
पण जेव्हा जावा ही संगणकाची ही भाषा आली, तेव्हा सुरक्षा वैशिष्ट्यांमुळं तिचाच वापर केला जाऊ लागला.
आता लोक प्रोग्रामिंगसाठी MATLAB, Python आणि Stata सारख्या आधुनिक भाषांचा वापर करतात.
अलीकडच्या काळात अल्गो ट्रेडिंग सहजपणे करता यावं म्हणून इंटरनेट ब्राऊजरमध्ये त्याच्या जावास्क्रिप्ट सारख्या मूळ भाषेतच प्रोग्राम रन केले जातात. म्हणजे बहुतांश छोटे व्यावसायिक ते वापरतात.
आजच्या काळात शेअर बाजार अशाप्रकारे चालतो की, कोणीही अल्गो ट्रेडिंग करू शकतं. ब्रोकरेज फर्म मोठ्या प्रमाणावरील व्यवहार सहज शक्य व्हावे म्हणून, स्टॉक मार्केट API प्रदान करतात.
याचा वापर करून अल्गो ट्रेडिंगसाठी कोणीही सॉफ्टवेअर तयार करू शकतो आणि स्टॉक मार्केट API द्वारे लिंक करून त्यांच्या खात्यात अॅटोमेटेड ट्रेडिंगसाठी त्याचा वापर करू शकतो.

एका रिपोर्टनुसार जगातील व्यवहारांपैकी 70% ते 80% व्यवहार हे अशा प्रकारेच होतात. रॉबर्ट किसेल यांनी त्याच्या 'अल्गोरिदम ट्रेडिंग मेथड्स' नावाच्या पुस्तकात मार्केटमधील सुमारे 92 टक्के ट्रेडिंग अल्गो ट्रेडिंगच्या माध्यमातून होत असल्याचं म्हटलंय.
अमेरिकेतही सुमारे 73% स्टॉक मार्केट ट्रेडिंग अल्गो ट्रेडिंगच्या माध्यमातूनच होतं. मात्र, भारतात हे प्रमाण केवळ 50% आहे. त्यापैकी बहुतांश ट्रेडिंग हे हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवार होणारं आहे. या टक्केवारीतही फ्युचर आणि ऑप्शन्समधील ट्रेडिंग अधिक आहे.
जगभरात कुठेही शेअर बाजारांनी किंवा त्यांच्यावर नियंत्रण असलेल्या सरकारांनी अॅटोमेटेड स्टॉक मार्केट ट्रेडिंगवर कोणतीही बंदी घातलेली नाही. भारतातही तशी बंदी नाही. पण सेबीच्या डिसेंबर 2019 ला जाहीर झालेल्या अहवालामध्ये, यावर काही निर्बंध घालण्यात आले आहेत.
फक्त स्टॉक मार्केटध्ये व्यवहार करणाऱ्या ब्रोकरेज एजन्सींनाच अल्गो ट्रेडिंग सॉफ्टवेअर दिलं जाईल.
मोबाईल अॅप आणि API वापर करून थर्ड पार्टी सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या कंपन्यांना मान्यता दिली जाणार नाही, असं सेबीनं अहवालात म्हटलं. पण मोठ्या ब्रोकरेज कंपन्यांनी याला विरोध केला आहे.
अल्गो ट्रेडिंगच्या वापरामुळं, यशाची शक्यता वाढेल का?
शेअर बाजारामध्ये गणितावर आधारित कोणतंही सूत्र 100% योग्य अंदाज बांधू शकत नाही. जोपर्यंत बाजाराच्या ट्रेंडवर परिणाम करणारी बातमी येणार नाही, तोपर्यंत हे सूत्रं योग्य पद्धतीनं काम करतं.
पण जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात, बाजारावर परिणाम करणारी अशी कोणती तरी बातमी दररोज येतच असते.
त्याशिवाय सगळेच सारखं सूत्रदेखील वापरत नाहीत. वेगळ्या काळात वेगळं सूत्रं वापरलं जातं. त्यामुळं अल्गो ट्रेडिंगमुळं शेअर बाजारातील अनिश्चितता बदलू शकत नाही.
म्हणूनच यावर बंदी घालण्याऐवजी याच्या वापराला प्रोत्साहन दिलं जात आहे.
रशिया-युक्रेन संकट आणि शेअर बाजाराचा कल
रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळं शेअर बाजारावर गंभीर परिणाम झाला आहे. कोणत्याही गणितीय सुत्राच्या आधारे अशा परिस्थितीत कल लक्षात येऊ शकत नाही. शेअर बाजारातील कल विविध प्रकारच्या बातम्यांवर आधारित असतात.
यात नाटोचे अहवाल, युक्रेन आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची वक्तव्ये, संघर्षाचं ठिकाण, या भागात उत्पादन होणाऱ्या वस्तूंच्या दरात झालेली वाढ अशा अनेक बाबींचा समावेश असू शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
28 फेब्रुवारी 2022 रोजी शेअर बाजाराची सुरुवात 4.5% घसरणीसह झाली होती. त्याच्या एक दिवस आधी रशियानं अणुहल्ल्याची धमकी दिली होती.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वाटाघाटीसाठी समोर आले, त्यानंतर शेअर बाजारात सुधारणा व्हायला सुरुवात झाली होती.
या हल्ल्यामुळं क्रूड ऑईल, नैसर्गिक गॅस, सोने, चांदी आणि तेलबीया अशा जागतिक पातळीवरील वस्तुंच्या जागतिक दरामध्ये मोठी वाढ झाली.
त्याचा परिणाम प्रत्येक वस्तूवर होऊन त्यांच्या किमती वाढणार आहेत. रशिया-युक्रेन वाद मिटेपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही.
अर्थतज्ज्ञांच्या मते, हे युद्ध आणखी तीव्र बनलं तर, तिसऱ्या जगातील देशांना दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागेल आणि हळू हळू ते लोण सगळ्या देशांपर्यंत पोहोचेल.
काही लोक अशा प्रकारच्या जागतिक पातळीवरील बातम्या समजण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धीमत्ता) वापरून अल्गो ट्रेडिंग करतात. पण त्यातूनही फारसं काही हाती लागत नाही.
आपण उपग्रहांचा वापर करून पृथ्वीची छायाचित्रं काढली आणि त्याद्वारे हवामान बदलाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला, तरीदेखील त्यापासून होणारं नुकसान टाळण्यासाठी आपण निष्कर्षापर्यंत पोहोचू शकणार नाही.
त्याचप्रकारे आपण तंत्रज्ञानाचा वापर केला आणि शेअर बाजाराचा अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न केला, तरी त्यात काहीतरी अडथळा येणारच. त्यामुळं अनिश्चितता ही कायम राहते. शिवाय जोपर्यंत ही अनिश्चितता आहे, तोपर्यंतच शेअर बाजाराचंदेखील अस्तित्व टिकून राहू शकतं.
(कार्तिकेयन फास्तुरा हे मदुराईतील आर्थिक सल्लागार आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांनी 12 वर्ष काम केलं असून, गेल्या 6 वर्षांपासून ते फायनान्शिअल टेक्नॉलॉजी फर्म चालवत आहेत. त्यांना पत्रकारितेचा मोठा अनुभव असून तमिळ वृत्तपत्रांमध्ये त्यांनी अनेक लेख लिहिले आहेत. अनेक स्टार्टअप कंपन्यांसाठी ते सल्लागार म्हणूनही काम करतात. )
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








