अॅन्युइटी प्लॅन्स म्हणजे काय, त्यातून निवृत्ती वेतन कसं मिळू शकतं?

आर्थिक विकास,

फोटो स्रोत, PTI

फोटो कॅप्शन, आर्थिक विकासाचा दर घटला आहे.
    • Author, कार्तिकेय
    • Role, बीबीसी तेलुगु प्रतिनिधी

फायनान्शियली इंडिपेंडंट म्हणजेच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असण्याचे बरेच सारे अर्थ निघतात. म्हणजे काही अर्थतज्ज्ञांना वाटतं त्याप्रमाणे, आपल्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी पुढच्या दहा वर्षात मोठी रक्कम गुंतवणं म्हणजे आर्थिक स्वावलंबन.

तर काहींच्या मते, भविष्यातील प्रत्येक खर्चाची तरतूद करण्यासाठी योग्य पद्धतीने गुंतवणूक करणं म्हणजे आर्थिक स्वावलंबन. तर इतर काहीजण म्हणतात की, आपल्या भविष्यातील प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी वर्तमानात गुंतवणूक करणं म्हणजे आर्थिक स्वावलंबन होय.

पण यातलं नेमकं कोणतं बरोबर आहे हे निश्चितपणे सांगता येणं तसं अवघडच आहे. कारण प्रत्येक व्यक्ती वेगळ्या पद्धतीने विचार करत असतो, त्याच्या गरजा वेगवेगळ्या असतात. पण मग प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी बाजारात वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स आहेत.

म्हणजे एकवेळ अशी येते की आपल्या हातात महिन्याला येणारा पगार येणार नसतो. थोडक्यात आपण आपल्या निवृत्तीकडे झुकलेले असतो, तेव्हा अॅन्युइटी प्लॅन्स आपल्यासाठी उपयोगाचे ठरतात.

आता अॅन्युइटी प्लॅन्स म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्याआधी अॅन्युइटी प्लॅन्स का सुरू करण्यात आलेत हे समजून घेऊ.

तर म्युच्युअल फंड असो टर्म पॉलिसीज असो किंवा मग अॅन्युइटी प्लॅन्स..

या सगळ्या अलीकडेच सुरू झालेल्या योजना आहेत. पण थोडं इतिहासात डोकावलं तर याची मूळ आपल्याला रोमन साम्राज्यात दिसून येतील.

म्हणजे रोमन सम्राटांच्या काळात सेवानिवृत्तांना त्यांचा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी सरकारी खजिन्यातून ठराविक रक्कम देण्याची पद्धत प्रचलित होती.

आपल्याकडे जीवन विमा योजनांतर्गत फक्त एंडॉवमेंट पॉलिसी होती. सध्या पेन्शन नसलेल्या कर्मचाऱ्यांची संख्याही वाढते आहे. मग पेन्शन नसलेल्यांच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन गुंतवणूकीचा काहीतरी मार्ग असावा या विचारातून अॅन्युइटी प्लॅन्स पुढं आले आणि विशेष म्हणजे त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली.

किंबहुना सरकारदेखील राष्ट्रीय पेन्शन योजनेंतर्गत आयकर सवलत देईन अॅन्युइटी प्लॅन्सना प्रोत्साहन देत आहे.

अॅन्युइटी प्लॅन्स कशापद्धतीने काम करतात?

अॅन्युइटी प्लॅन्स मध्ये लोक मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करतात. आणि निवृत्तीनंतर त्यांना महिन्याला / तीन महिन्याला किंवा वर्षाला एक ठराविक रक्कम मिळत राहते. म्हणजे या प्लॅन्सची ही एक बेसिक आऊटलाईन असते.

गुंतवूक, निवृत्ती, पैसे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गुंतवणुकीचा निर्णय

गुंतवणकीचे देखील अनेक प्रकार असतात. काही प्लॅन्स असे असतात की जेव्हा आपल्याला हा अंदाज असतो की भविष्यात आपले उत्पन्न वाढणार आहे किंवा सुरू होणार आहे. या गुंतवणुकीसाठी एक मोठी रक्कम जरी लागत असेल तरी आपण ती गुंतवणूक करू शकतो.

जर तीन ते पाच वर्षांत उत्पन्नाच्या प्रमाणात वाढ होणार असेल तर तशा प्रकारचे प्लॅन्स आपण घेऊ शकतो.

काही प्लॅन्स असे असतात की एकाचवेळी भरमसाठी रक्कम गुंतवणूक म्हणून करण्याऐवजी त्यात तुम्ही हफ्त्याने पैसे भरू शकतात. जसं की ईएमआयमध्ये आपण एखादी वस्तू किंवा घरासाठी कर्ज घेऊन ते ठराविक कालावधीने परत करतो तसंच आपल्याला गुंतवणुकीसाठी देखील करता येतं आणि वेळेनुसार त्याचा परतावा देखील मिळतो.

अॅन्युइटी प्लॅन्स की फिक्स डिपॉझिट

बऱ्याचदा घडतं असं की, पाच वर्षांच्या अॅन्युइटी प्लॅन्सवर जेवढं व्याज मिळतं तेवढंच किंवा थोडं मागेपुढे व्याज फिक्स डिपॉझिटवर पण मिळतं. त्यामुळे नेमका कोणता पर्याय चांगला याचा प्रश्न गुंतवणूकदारांना पडलेला असतो.

पण अॅन्युइटी स्कीमच्या माध्यमातून आपल्याला आयुष्याच्या शेवटापर्यंत उत्पन्न मिळवता येतं. पण फिक्स डिपॉझिट मध्ये तसं होत नाही. पाच वर्षांनी व्याजदरात कमी जास्त असे बदल होऊ शकतात. अॅन्युइटी स्कीममध्ये जीवन विमा देखील असतो. त्यामुळे अॅन्युइटी प्लॅन्स फायद्याचे असतात.

गुंतवूक, निवृत्ती, पैसे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गुंतवणूक

पण या वाढत्या महागाईच्या काळात फिक्स डिपॉझिट आणि अॅन्युइटी प्लॅन्स मध्ये फारसा फरक राहिलेला नाही. पण अॅन्युइटी मध्ये दर तीन वर्षांनी किंवा पाच वर्षांनी वाढ देण्याची तरतूद असते. त्यामुळे ही गोष्ट तशी दिलासादायक आहे. पण फिक्स डिपॉझिट मध्ये वाढ द्यावीच अशी काही तरतूद नसते.

फिक्स डिपॉझिट आणि अॅन्युइटी प्लॅन्सवर जे काही टॅक्स असतात त्यातही अगदी जास्त फरक नसतो. या दोन्ही स्कीम्सचं उत्पन्न आयकर नियमांद्वारे नियंत्रित केले जाते.

अॅन्युइटी प्लॅन्सचा फायदा

1. पेन्शनसाठी चांगला ऑप्शन

ज्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळणार नाहीये अशांसाठी संधी उपलब्ध करून देणं हा अॅन्युइटी प्लॅन्सचा मुख्य हेतू आहे. जर आपण स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी सारख्या बँकांकडून अॅन्युइटी प्लॅन्स घेतले तर आपल्या देय उत्पन्नामध्ये कोणतीही अडचण येणार नसल्याची हमी मिळते.

2. जोखीम न घेता मिळणार उत्पन्न

निवृत्ती स्वीकारल्यानंतर आर्थिक अडचणी येऊ नयेत यासाठी अॅन्युइटी प्लॅन्स योग्य असतात. कारण निवृत्तीनंतर कर्ज मिळणं किंवा पुन्हा काम करण्याच्या संधी मिळणं कमी होत जातं.

3. गुंतवणुकीची मर्यादा

पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजना असतील किंवा प्रौढ गुंतवणूक योजना असतील, यांमध्ये गुंतवणूकीची मर्यादा असते. म्हणजे उदाहरण म्हणून बघायचं झाल्यास पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत फक्त साडेचार लाखांची गुंतवणूक करता येते. तर प्रौढ गुंतवणूक योजनेत, पंधरा लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते.

पण अॅन्युइटी प्लॅन्समध्ये तुम्हाला गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नसते. तुम्ही कितीही मोठी रक्कम यात गुंतवू शकता.

4. वयोमर्यादा

सेवानिवृत्तीच्या ज्या योजना असतात त्यात वयोमर्यादा निश्चित केलेली असते. पण अॅन्युइटी प्लॅन्समध्ये तुम्ही 75 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. लोक बऱ्याचदा अॅन्युइटी प्लॅन्स घेतात कारण यात वयोमर्यादा वाढवून दिलेली असते.

आता अॅन्युइटी प्लॅन्सचे एवढे फायदे आहेत, जे आपण पाहिले. पण मग यात काही मर्यादा सुद्धा आहेत.

अॅन्युअटीची प्लॅन्सच्या मर्यादा

1. अचानक उद्भवलेल्या अडचणी

यातली पहिली मर्यादा म्हणजे अचानक उद्भवलेल्या अडचणी. म्हणजे आपण अॅन्युइटी योजनेत मोठी रक्कम गुंतवल्यानंतर, जर आपल्याला एखादी अडचण आली तर पैसे काढणं अवघड असतं.

रुपये

फोटो स्रोत, Getty Images

त्यामुळे ज्यांच्या नावे आरोग्य विमा किंवा जीवन विमा आहे त्यांनीच या अॅन्युइटी प्लॅन्स मध्ये गुंतवणूक करावी.

2. वार्षिक व्याज

अॅन्युइटी प्लॅन्समध्ये फक्त वर्षाला व्याज मिळतं. पण जर आपण एखाद्या प्रौढ योजनेमध्ये गुंतवणूक करत असू तर दर तीन महिन्याला आपल्याला व्याज मिळतं. आता हा मुद्दा लहान वाटत असला तरी वीस वर्षांचा कालावधी, खूप मोठा आहे.

3. मध्येच पैसे काढणं शक्य नसतं

पैसे भरण्याचा जो ठरलेला कालावधी असतो त्यातून तुम्हाला बाहेर पडता येत नाही. म्हणजे जर एखादी दुसरी पॉलिसी असेल तर त्यात दंड भरून तुम्ही बाहेर पडू शकता, पण अॅन्युइटी स्कीम्समध्ये अशा प्रकारची कोणतीही तरतूद नसते.

अॅन्युइटी प्लॅन्स - सेवानिवृत्ती योजना

आता सेवानिवृत्तीच्या अंगाने विचार करायचा झाल्यास अॅन्युइटी प्लॅन्स कशाप्रकारे असायला हवेत.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

1. एकतर त्यात पुरेसा आरोग्य विमा आणि जीवन विमा असावा.

2. त्यात पुरेसा इमर्जन्सी फंड असावा. हा फंड किती असावा यासाठी काही गाईडलाईन्स असतात. पण यात महत्वाचं म्हणजे हा फंड तीन वर्षांसाठी पुरेल इतका असावा.

3. अॅन्युइटी प्लॅन्स मधून जे व्याज मिळतं त्यावर आयकर भरावा लागतो. त्यामुळे सर्वच्या सर्व पैसे अॅन्युइटीमध्ये गुंतवण्यापेक्षा 80C अंतर्गत सवलत मिळणाऱ्या योजनांमध्ये गुंतवावे.

4. सोबतच एनपीएसमध्ये गुंतवणूक केल्यानंतर आयकरात सवलत मिळते का हे देखील पाहणं गरजेच आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)