निवृत्तीनंतरही पैसे मिळवायचे असतील तर अशाप्रकारे गुंतवणूक करा

फोटो स्रोत, Getty Images
आपली पिढी आणि आपल्या आधीच्या एका पिढीत फक्त 'रिटायरमेंट' एवढं अंतर आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. याचा अर्थ काय?
आपल्या आधीच्या एका पिढीपर्यंत तरी पेन्शनची सोय होती. पण आपल्या पिढीला आपल्या पेन्शनची सोय स्वतःच करायची आहे. त्यामुळे रिटायरमेंट नंतरच आयुष्य कसं असेल हे काही सांगता येत नाही.
कदाचित रिटायरमेंट नंतरच आयुष्य थोडंस अस्वस्थ करणार असलं तर? असं होऊ नये म्हणून रिटायरमेंट नंतर सुद्धा आपल्याला महिन्याला पगार यावा अशी काहीतरी गुंतवणूक करावी लागते. फायनान्शिअल गोल्स आणि रिटायरमेंट गोल्स यामध्ये फरक असतो.
रिटायरमेंटच्या काळात एखादी मेडिकल इमर्जन्सी आली किंवा मोठी अडचण आली तर आपल्याला मोठ्या रकमेची गरज भासू शकते. अशावेळी माणूस निवृत्त असल्यावर कोणतीही बँक कर्ज देत नाही. फायनान्शिअल प्लॅन्स आणि रिटायरमेंट प्लॅन्स एकसारखेच असतील असं नाही. पण भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी रिटायरमेंट प्लॅन्स बनवावे लागतात.
अर्थात, व्यक्ती ज्या क्षेत्रात काम करतो त्यानुसार रिटायरमेंट प्लॅन्स बदलतात. केंद्र सरकारच्या बहुतांश कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा संरक्षण असतं. मात्र प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीसाठी अशी सुविधा असेलच असं नाही.
त्यामुळे आपल्या गरजा लक्षात घेऊन रिटायरमेंट प्लॅन्स बनवले पाहिजेत. पण याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होतं. आपल्या आर्थिक उद्दिष्टांचं नियोजन करताना आपल्या रिटायरमेंटच्या प्लॅन्सला सुद्धा आवश्यक प्राधान्य द्यायला हवं. पण यासाठी काय करायला हवं?
पुढच्या पाच ते दहा वर्षात जे निवृत्त होतील त्यांना थोड्या मर्यादा येतील. कारण आर्थिक नियोजनाची घडी बसवणं हे दीर्घकालीन काम असतं. एखादं आर्थिक लक्ष्य गाठायचं असेल तर खूप आधीपासूनच नियोजन करावं लागतं.
जे लोक पुढील पाच वर्षांत निवृत्त होणार आहेत त्यांच्यासाठी हे आर्थिक लक्ष्य गाठणं थोडं जिकिरीचं होऊन जातं. कारण त्यांच्या रिटायरमेंटचा कालावधी जवळ आलेला आहे आणि अशा वेळेस आर्थिक उद्दिष्ट साध्य करताना ओढाताण होऊ शकते.
अशा लोकांनी कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी?
त्यांच्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे का हे बघावं लागेल. जर नसेल तर तो आधी उतरवून घ्यावा. नव्या पॉलिसीमध्ये डायबेटीस, ब्लड प्रेशर यांचा समावेश आहे की नाही हे बघावं. त्या पॉलिसीमध्ये हे आजार नसतील तर या आजारांना कव्हर करणारी टॉप अप किंवा नवी पॉलिसी घ्यावी.
गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये काम करणाऱ्या काहींना अशा प्रकारचे हेल्थ बेनिफिट्स मिळतात. पण सगळयांनाच मिळतील असंही नाही. काहींच्या पॉलिसीमध्ये तर पुरेसं कव्हरेजही नसतं. त्यामुळे पर्सनल हेल्थ पॉलिसी घेणं गरजेचं आहे.
आयुष्यात कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास पहिलं संरक्षण मिळतं ते लाईफ इन्शुरन्स पॉलिसीमधून. जर तुम्ही लाईफ इन्शुरन्स काढला नसेल तर तो सर्वात आधी घ्यायला हवा.
ज्यांनी आपल्या वयाची पन्नाशी गाठली आहे त्यांना लाईफ इन्शुरन्स मिळणं कठीण असतं. इन्शुरन्स कंपन्या बरेच प्रश्न विचारतात आणि शेवटी नकार कळवतात. पण आपण मात्र सातत्याने प्रयत्न केला पाहिजे.

फोटो स्रोत, Getty Images
वर सांगितलेला लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स या दोन्ही पॉलिसी तुमच्या रिटायरमेंट प्लॅनचा एक भाग आहेत. कारण तुमची रिटायरमेंट जसजशी जवळ येते तसतसा तुमचा पॉलिसीचा हफ्ता देखील वाढत जातो. त्यामुळे शक्य तितक्या लवकर तुम्ही या पॉलिसी उतरवून घेणं आवश्यक आहे.
तुम्ही जी गुंतवणूक करत असाल त्याविषयी तुमच्या जोडीदाराला किंवा तुमच्या कुटुंबियांना माहिती असावी. आज आपल्या देशातील अनेक बँकांमध्ये हजारो कोटी रुपये पडीक आहेत. यावर कोणीच दावा करायला आलेलं नाही. कुटुंबाला आपल्या या पॉलिसी विषयी माहिती असेल तर संकटाच्या काळात त्यांना मदत मिळते.
आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा ! तुम्ही जी गुंतवणूक करत आहात त्याला जो नॉमिनी किंवा वारसदार आहे त्याला तुमच्या गुंतवणूकीविषयी माहिती असायला हवी. बऱ्याचदा आपण एखाद्या अल्पवयीन मुलाला नॉमिनी लावतो तेव्हा त्याचे जे पालक असतील त्यांना याबाबत माहिती दयायला हवी. नाहीतर तुम्ही जे पैसे गुंतवता ते त्या व्यक्तीला मिळणार आहेत हे त्याला माहीतच नसेल तर गुंतवणूक व्यर्थ ठरते.
तुमच्या आर्थिक सल्लागाराचा फोन नंबर आमच्या कुटुंबातील सदस्यांकडे असायला हवा. तुम्ही एखाद्या अॅपवरून आर्थिक व्यवहार करत असाल तर त्याचा पासवर्ड तुमच्या कुटुंबातील सदस्यांना माहीत असावा.
कोणती गुंतवणूक करावी लागेल?
रिटायरमेंट जवळ आली असल्याने कोणतीही जोखीम परवडणारी नसेल. त्यामुळे इक्विटीशी संबंधित कोणतीही गुंतवणूक टाळलेली उत्तम. जर इक्विटीमध्ये आधीच काही पैसे लावले असतील तर ते तसेच राहू द्यावे आणि त्यात आणखीन गुंतवणूक करण्याच्या भानगडीत पडू नये.

फोटो स्रोत, Getty Images
म्युच्युअल फंडमध्ये मोठी रिस्क असते त्यामुळे त्यात गुंतवणूक करणं थांबवावं. त्याऐवजी डेबिट किंवा इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करावी. कारण यात रिस्क कमी असते. तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करत असाल तर लक्षात ठेवा तुम्ही रिटायर्ड व्हायच्या आधी किमान तीन वर्षे आधी इक्विटी मार्केटमधून बाहेर पडायला हवं.
कोव्हीडच्या काळात इक्विटी मार्केटमध्ये मंदी निर्माण झाली होती. त्याकाळात जर तुमचे फायनान्शियल टार्गेटस असते तर तुम्हाला या मंदीचा सामना करावा लागला असता.
रिअल इस्टेट, फ्युचर्स अशा इन्व्हेस्टमेंट मध्ये अप्स अँड डाऊन्स असतात त्यामुळे गुंतवणूकीचे असे जोखीमपूर्ण पर्याय टाळलेलेचं बरे. या क्षेत्रात ज्यांना फायदा झालाय त्यांचीच चर्चा होते, पण ज्यांना नुकसान झालंय त्यांचं काय? त्यांच्याबद्दल तर कोणीच बोलत नाही. त्यामुळे जेव्हा रिटायरमेंट महत्वाची असते तेव्हा अशी गुंतवणूक शक्यतो टाळावी.
कमी जोखीम असलेली गुंतवणूक कोणती?
तुम्ही एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. यातून जो फायदा मिळतो त्यावर टॅक्स आकारला जात नाही. त्यामुळे होता होईल तितकी जास्त गुंतवणूक या फंडमध्ये करावी.
नॅशनल पेन्शन स्कीमसारख्या सरकारी योजनेत गुंतवणूक करणं ही फायद्याचं ठरेल. या योजनेत गुंतवणूक केल्यास टॅक्ससाठीचे फायदे मिळतात.

फोटो स्रोत, Getty Images
आपण अशाही इन्शुरन्स स्कीम घेऊ शकतो ज्यांची वर्षाची मुदत असते आणि वर्षाअखेरीस त्यावर परतावा मिळतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, हा परतावा देखील वार्षिक उत्पन्नामध्ये गणला जातो आणि त्यावर करही द्यावा लागतो.
त्यामुळे हे देखील पाहावे लागते की, अशा विमा योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर करकपातीनंतर आपल्या हातात काय शिल्लक राहतं.
आणखी एक गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे की अडचणीच्या वेळी आपण ही गुंतवणूक मोडू शकतो का? निवृत्तीनंतरच्या आयुष्यात आपली गुंतवणूक कशी असावी हे ठरवण्यासाठी हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








