You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एक गाव जिथे आठवड्यात 7 जणांचा मृत्यू झाला आणि अनेकांना मृतांचे भास व्हायला लागले...
- Author, लक्कोजू श्रीनिवास
- Role, बीबीसी तेलुगुसाठी
आंध्रप्रदेशातील पेडबायालू या दुर्गम भागातील किंडलम गावात चित्रविचित्र घटना घडल्या होत्या. त्याचं असं झालेलं की, या गावात एकाच आठवड्यात सुमारे सात जणांचा मृत्यू झाला.
आता या मृत्यूनंतर काही गावकऱ्यांना मेलेले लोक त्यांना बोलावत असल्याचे भास होऊ लागल्याचं स्थानिकांकडून सांगितलं गेलं.
पण खरंच असं होतं का? या गावात नेमकं काय चाललेलं?
हे बघण्यासाठी बीबीसीच्या प्रतिनिधीने 4 एप्रिल रोजी हे गाव गाठलं.
बीबीसीने भेट दिली तेव्हा या गावातील लोक मृत्यूमुखी पडून दहा दिवस उलटले होते. त्यावेळी या गावात आरोग्य शिबिर लागलं होतं आणि या शिबिरात आजारी लोकांवर उपचार सुरू होते. यातल्याच एका सावित्री नामक महिलेची स्थिती थोडी आणखीनच खालावली होती.
सगळ्यांकडे रागाने बघत सावित्री ओरडली, "मला कोणीच काही विचारत नाही."
याआधी दोन तास "मला मेलेले लोक बोलावत आहेत" असं म्हणत ती गावभर ओरडत पळत होती. तिचा पती नागराजू बीबीसीशी बोलताना सांगतो की, काल देखील तिने असंच केलं होतं.
सावित्री तिच्या घराच्या अंगणात बसली होती. बीबीसीने सावित्रीशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती म्हणाली की, "माझं हृदय आणि डोकं फुटत असल्यासारखं वाटतंय. मला बाकी काहीच कळत नाहीये."
किंडलममध्ये नेमकं घडलंय तरी काय ?
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात या गावात लागोपाठ सात जणांचा मृत्यू झाला. पण यातल्या प्रत्येकाने छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. यातल्या काही जणांनी घरीच जीव सोडला तर काहीजण हॉस्पिटल मध्ये नेल्यानंतर दगावल्याचं गावकरी सांगतात.
लागोपाठ सात जणांच्या मृत्यूने गावात काहीतरी अघटीत घडत असल्याचं म्हणत काहींनी गाव सोडलं. तर काहींनी आपल्या मुलाबाळांना शेजारच्या गावात राहणाऱ्या नातेवाईकांकडे सोडलं.
आज गावातील अनेकजण अस्वस्थ दिसतात. या गावाची लोकसंख्या 244 इतकी आहे. गावात एक सरकारी प्राथमिक शाळा देखील आहे.
किंडलम गावाच्या रहिवासी राणी सांगतात, "पहिल्यांदा गावातील एका वृद्धेचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी 7 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. त्यानंतर 40 ते 50 वर्षांच्या वयोगटातील 5 लोक दगावले. या घटनेनंतर सगळ्यांचीच पाचवर धारण बसली. किरलमकोटा या शेजारच्या गावात माझे नातेवाईक राहतात, मी माझ्या मुलांना तिकडे सोडलं आणि घरी परतले."
राणी पुढे सांगतात, "गावात जे लोक आजारी आहेत ते मानसिक स्थिती बिघडल्यासारखे इकडून तिकडे फिरतायत. आम्ही गावात एक मांत्रिक (शमन) देखील आणला. पण तरीही काही फरक पडला नाही. आता गावाचं कसं होणार, या विचारानेच आम्हाला काळजी वाटते."
याआधी, पेडाबायलू भागातील रुदाकोटा गावात आणि पडेरू भागातील गुर्रागरुवू गावात लहान मुलांचा मृत्यू झाला होता.
'मूर्ख आणि विचित्र वर्तन'
बीबीसीने किंडलम गावातील सावित्री आणि विजयालक्ष्मी यांची भेट घेतली. या दोघींची मानसिक स्थिती ठीक नसून या कोणाशीही बोलायला तयार नाहीत.
सावित्रीचे पती गंगाराजू यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "आमच्या शेजारी राहणाऱ्या डोराची पत्नी वारल्यामुळे आम्ही त्याला भेटायला गेलो. त्या दिवसापासून सावित्री आजारी आहे. ती देखील विचित्र वागू लागली. तिच्या छातीत दुखतं आहे, ती गावातून वेड्यासारखी पळते."
आमच्या गावातील परंपरांचं नीट पालन होतंय की नाही हे बघण्यासाठी आम्ही एक मांत्रिक देखील आणला होता, पण काही उपयोग झाला नसल्याचं गंगाराजू सांगतात.
आता तर शाळेत जाणाऱ्या मुलांचं बाहेर पडणं देखील कठीण झालंय, त्यामुळे गावातील सरकारी शाळा ओस पडलीय. जोपर्यंत गावातील परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवणार नसल्याची भूमिका गावातील पालकांनी घेतली आहे. गावात एखादं लहान मुलं नजरेस पडेल, पण शाळेत जाणारी मुलं दिसत नाहीत.
'आम्हाला भूतांनी झपाटलंय'
किंडलम येथील मृत्यूची बातमी समजताच पेडाबायलू येथील आरोग्य अधिकारी गावात पोहोचले. त्यांनी गावात वैद्यकीय शिबिर लावलं. ग्रामस्थांनी देखील काही टेस्ट करून घेतल्या.
गावातील आजारी लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी तीन वैद्यकीय कर्मचारी नेमले आहेत. गावातील वैद्यकीय शिबिराचे आयोजक व्यंकटा लक्ष्मी सांगतात, गावात अचानकच गोंधळ सुरू होतो.
"ग्रामस्थ सांगतात की, आम्हाला भूतांनी झपाटलंय. हे लोक बडबडत अख्या गावभर फिरत असतात. यातले काहीजण तर म्हणतात की, आम्हाला मेलेले लोक बोलवत आहेत. अशा लोकांची आम्ही तात्काळ टेस्ट करत आहोत. पण हाय ब्लड प्रेशर सोडलं तर आम्हाला इतर कोणत्याही गोष्टी आढळलेल्या नाहीत."
किंडलमच्या सरकारी शाळेचे मुख्याध्यापक कोटेश्वर राव म्हणतात की, आपलं गाव शापित आहे असं म्हणत कित्येकांनी आपली मुलं नातेवाईकांच्या गावी पाठवून दिली. त्यामुळे आता शाळेत केवळ शिक्षकच उरलेत.
डॉक्टर म्हणतात, सर्वजण ठीक आहेत
गावात गेल्या दोन आठवड्यांपासून वैद्यकीय शिबिर सुरू आहे. पेडाबायालू येथून आलेलं आरोग्य पथक गावात वास्तव्यास आहे.
जे लोक आजारी पडलेत त्यांच्यावर देखरेख ठेवली जाते आहे.
प्रत्येकाच्या घरी जाऊन आरोग्य तपशील घेतले जात आहेत. तसेच आरोग्य शिबिरात टेस्ट घेण्यात येत आहेत.
विशाखापट्टणम आणि विजयवाडा येथील वरिष्ठ डॉक्टरांनीही गावात येऊन लोकांच्या टेस्ट केल्या. डॉक्टर त्यांच्या रिपोर्ट मध्ये म्हणतात की, सर्वजण ठीक आहेत. कोणाच्याही रिपोर्ट मध्ये वावगं आढळलेलं नाही.
हा रिपोर्ट सरकार दरबारी जमा करणार असल्याची माहिती पडेरूच्या एकात्मिक आदिवासी विकास प्राधिकरण अधिकाऱ्यांनी बीबीसीशी बोलताना दिली.
किंडलमचे रहिवासी संतोष कुमार म्हणतात की, "लोकांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने होतोय याची आम्हाला देखील काहीच माहिती नाही. जर कोणी आजारी असेल तर आम्ही त्यांना रुग्णालयात नेतो. तिथं रुग्णाच्या टेस्ट केल्या जातात. या टेस्ट नॉर्मल आल्या की, मात्र आमचं डोकं चालत नाही. नेमकं काय घडतंय आम्हाला समजत नाहिये, त्यामुळे गावात राहायची भीती वाटू लागली आहे."
पझेसिव्ह सिंड्रोम
किंडलम मध्ये ज्या घटना सुरू आहेत त्याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी बीबीसीने विशाखापट्टणम येथील मानसोपचारतज्ज्ञ राधाराणी यांच्याशी संपर्क साधला. राधाराणी या विशाखापट्टणम येथील गव्हर्नमेंट हॉस्पिटल फॉर मेंटल केअरमध्ये सुप्रीटेंडेंट म्हणून कार्यरत होत्या.
डॉ. राधाराणी सांगतात की, "गावात लागोपाठ झालेल्या मृत्यूमुळे गावकरी चिंतेत असतील आणि आपलाही यात मृत्यू होईल अशी भीती त्यांना वाटत असावी. सुरुवातीला वाटणारी भीती प्राथमिक टप्प्यात असते, पण नंतर मात्र ही भीती आणखीन दृढ व्हायला लागते. याला 'पझेसिव्ह सिंड्रोम' म्हणतात आणि किंडलममध्ये हाच प्रकार घडत असल्याचं दिसतंय."
"हा सिंड्रोम झालेल्या लोकांना मृतांशी बोलत असल्याचा भास होतो. ते मृतांसारखेच वागू लागतात. त्याचवेळी मृत लोक त्यांच्या जवळ येऊन त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत असल्याचं त्यांना वाटू लागतं. जेव्हा एखादा व्यक्ती असं वागू लागतो, त्याचा परिणाम दुसऱ्यावरही होऊन तो व्यक्ती देखील तसाच वागू लागतो. याला मास हिस्टेरिया असं देखील म्हणतात."
हा मानसिक रोग नाही..
राधाराणी पुढे सांगतात की, "मृत व्यक्ती आपल्याशी बोलत आहेत याचा भास होत राहतो, ज्याला हॅल्यूसिनेशन असं देखील म्हटलं जातं. ज्या लोकांना मृत व्यक्ती दिसत आहेत ते या कॅटेगरी मध्ये येतात. हा मानसिक रोग नाहीये. त्यांच्या शरीरात खरं तर रासायनिक बदल होत असतात यामुळे ते भावनिक होतात. आणि बऱ्याचदा यातून मृत्यू ओढवण्याची शक्यता असते."
राधाराणी सांगतात, "जर एखाद्याला मानसिक रोग असेल तर त्यात त्याचा मृत्यू होतोच असं नाही. किंडलममध्ये घडणारे विचित्र प्रकार हिस्टेरिया कॅटेगरी मध्ये येऊ शकतात. लोकांमध्ये दिवसातून एकदा किंवा दोनदा ही लक्षणे दिसून येतात ही लक्षणे फार काळ टिकत नाहीत. काही काळानंतर ते नॉर्मल होतात. कुटुंब आणि मित्र सोबत आल्यावर त्यांना नॉर्मल करणं शक्य असतं."
बीबीसीने या मुद्द्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
यावर अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्याचे वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी जमाल बाशा सांगतात, "आमच्या रिपोर्टप्रमाणे, 7 मृतांपैकी एकाचा अपघाती मृत्यू झाला असून इतर लोक हृदय आणि फुफ्फुसाच्या आजारामुळे दगावले आहेत. यातल्या काहींना तंबाखू, खैनी, काजूची दारू याचं व्यसन होतं. त्यांच्या आरोग्यावर याचा देखील परिणाम झाला होता.
आम्ही विचित्र वर्तन करणाऱ्या रुग्णांची टेस्ट केली असून मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञांना किंडलम मध्ये पाठवणार आहोत. आम्ही गावातील परिस्थितीचा अहवाल वैद्यकीय आरोग्य संचालकांना पाठवला आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)