You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सलग दोन दिवस 18 महिलांवर बलात्कार आणि 30 वर्षं चाललेला एक खटला
- Author, प्रमिला कृष्णन
- Role, बीबीसी तामिळ प्रतिनिधी
“मी फक्त 13 वर्षांची होते. मी त्यांना सांगितलं की, मी एक लहान मुलगी आहे. तरीही त्यांनी मला सोडलं नाही. मला माहिती नाही त्यांना भाऊ बहिणी आहेत की नाही किंवा घरात लहान मुली आहेत की नाही ते. त्यांनी आमच्यावर बलात्कार केला. आम्हाला बेदम मारहाण केली. आम्हाला पूर्ण गावातून रडण्याचा आणि भेकण्याचा आवाज येत होता.”
20 जून 1992 ला झालेल्या घटनेतली पीडिता आम्हाला सांगत होती.
वचाती हल्ला आणि बलात्कार खटला हा एक दीर्घकाळ चालणारा खटला आहे. तो गेले तीस वर्षं सुरू आहे. वचाती या गावातल्या 18 स्त्रियांवर बलात्कार करण्यात आला आणि खेड्यातील इतर नागरिकांना अधिकाऱ्यांनी मारहाण केली. पोलीस आणि वन अधिकाऱ्यांनी ही धाड टाकली होती. त्यादरम्यान त्यांनी लोकांना मारहाण केली.
गावातील काही लोक चंदनाच्या तस्करीत सामील आहे या संशयावरून पोलीस आणि वन अधिकाऱ्यांनी या गावात धाड टाकली होती.
वचाती हे तामिळनाडूतील सिथेरी टेकडीवर धर्मापुरी जिल्ह्यात वसलेलं गाव आहे. सिथेरी टेकड्या या चंदनाच्या झाडांसाठी ओळखल्या जातात.
20 जून 1992 ला सलग दोन दिवस 18 बायकांवर बलात्कार करण्यात आला, या गावातील 100 आदिवासी लोकांना जे बहुतांश दलित समाजातील आहे त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यांची गुरं लुटण्यात आली.
215 आरोपींची शिक्षा कायम
शुक्रवारी (29 सप्टेंबर) मद्रास उच्च न्यायालयाने या प्रकरणात धर्मपुरी जिल्हा न्यायालयाने 215 जणांची शिक्षा कायम ठेवली आहे.
तसेच लैंगिक अत्याचारातील 18 पीडितांना 10 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
"पीडितांचा मृत्यू झाला असेल तर त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी. गुन्हेगारांकडून 5 लाख रुपये वसूल केले जावेत" असं न्यायमूर्ती वेलमुरुगन यांनी आपल्या निकालात म्हटलं.
तत्कालीन जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा वन अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असंही या निकलात नमूद करण्यात आले आहे.
सरकारने पीडितांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे आदेशही देण्यात आले आहेत.
2011 मध्ये धर्मपुरी जिल्हा न्यायालयाने 269 आरोपींना दोषी ठरवले आणि त्यापैकी 215 अजूनही जिवंत आहेत.
12 जणांना 10 वर्षांचा कारावास, 5 जणांना 7 वर्षांचा कारावास आणि इतरांना 1 ते 3 वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला आहे.
दोषी आरोपींची अपील मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती वेलमुरुगन यांनी फेटाळून लावली आहे. तसंच त्यांनी कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवला.
2011 मध्ये आरोपी ठरवलेल्या अधिकाऱ्यांनी या शिक्षेच्या विरोधात अपील केलं होतं.
2011 विशेष कोर्टाने दिलेल्या एका निर्णयानुसार 215 अधिकाऱ्यांना ज्यात पोलीस आणि वन अधिकाऱ्यांचा समावेश होता त्यांना दलितांच्या विरुद्ध जातीभेदाच्या आरोपाखाली दोषी ठरववण्यात आलं.
वचाती गावातील लोक दलित आदिवासी आहेत. या खटल्याच्या काळात 54 आरोपींचा मृत्यू झाला.
'आम्ही दीर्घकाळ लढा दिला आणि आम्हाला न्याय मिळाला'
1992 सालच्या वचाती गावकऱ्यांवरील हिंसाचार आणि लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात धर्मपुरी जिल्हा न्यायालयाने 215 जणांना सुनावलेली शिक्षा मद्रास उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.
न्यायालयाच्या निकालानंतर वचाती येथील बलात्कार पीडितांनी बीबीसी तमिळशी संवाद साधला.
"सरकारी अधिकार्यांकडून आम्ही अनेकदा लैंगिक छळाचा आणि त्यांच्या क्रूर हल्ल्यांचा सामना केला. अखेर 30 वर्षांच्या संघर्षानंतर आम्हाला हा न्याय मिळाला आहे," असे वचाती हिंसाचारातील पीडितांनी बीबीसीला सांगितले.
निकाल खूप उशिरा आला असला तरी आमच्या प्रामाणिक संघर्षाला न्याय मिळाला आहे.
"बलात्कार पीडित 18 महिलांना 10 लाख रुपयांची भरपाई देण्याच्या आजच्या घोषणेचे आम्ही स्वागत करतो. तथापि, या 18 लोकांव्यतिरिक्त 80 महिला 3 महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात आहेत. त्यांनाही दिलासा मिळाला पाहिजे," असे ते म्हणाले.
1992 मध्ये या प्रकरणाचा योग्य तपास न करणारे तत्कालीन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, वन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आज मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी दिले आहेत. या निर्णयाचे हे स्वागतार्ह पाऊल असल्याचे पीडित महिलांनी बीबीसीला सांगितले.
'नवी आशा आहे!'
"वचाती अत्याचार प्रकरणातील निकाल हे भारतासाठी एक उदाहरण आहे. आपल्या मर्जीप्रमाणे जनतेच्या विरोधात सत्तेचा वापर करण्याची मानसिकता असलेल्या अधिकाऱ्यांना हा इशारा आहे", असं तामिळनाडू आदिवासी लोक संघटनेचे अध्यक्ष दिल्लीबाबू म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "या निकालामुळे तामिळनाडूतील आदिवासीं नवी उमेद बाळगून आहेत. त्यांच्यावर कितीही अन्याय झाला तरी त्यांना न्याय मिळेल, अशी आशा आदिवासींना आहे."
वचातीची घटना हा एक पारिपाक...
“आमच्यावर बलात्कार करण्यात आला, आणि आमचा छळ करण्यात आला. हा खटला सलग 30 वर्षं चालला मात्र त्या दिवशीच्या जखमा आजही आमच्या उरात ताज्या आहेत,” असं एका पीडितेने सांगितलं. हे पीडित वचाती गावात एका मोठ्या वडाच्या झाडाखाली बसून आमच्याशी बोलत होते.
इथे बसलेल्या बायकांना हा हल्ला अगदी काल झाल्यासारखा आठवतो. त्या दिवशी जे झालं ते आठवलं की आजही त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. जेव्हा केव्हा या घटनेचा उल्लेख होतो तेव्हा त्यांच्या अंगावर काटा येतो आणि त्या दिवसभर काहीही खाऊ शकत नाहीत असं त्या सांगतात.
1990 च्या दशकात तामिळनाडू सरकारने सिथेरी टेकड्या आणि सत्यमंगलम जंगलात अनेक धाडी टाकल्या. चंदन तस्कर वीरप्पनला अटक करण्याचा हा एक प्रयत्न होता. वचातीच्या सीमेवर या टेकड्या आणि जंगलं आहेत.
या धाडीच्या वेळी पोलीस आणि अनेकदा त्यांचा शारीरिक छळ केला.
20 जून 1992 ची धाड अशीच एक धाड होती. त्यांना चंदन तस्करीबद्दल विचारण्यात आलं. या चौकशीत नंतर वन विभाग आणि गावातील लोकांमध्ये चकमक उडाली.आपण निरपराध असल्याचं ते वारंवार सांगत होते.
एका क्षणी या वादविवादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीच्या काही तासानंतर शेकडो पोलीस, वनाधिकारी आणि काही महसूल अधिकारी गावात आले, त्यांनी सगळीकडे तोडफोड केली आणि 18 तरुण बायकांवर बलात्कार केला.
त्यातली एक पीडिता तेव्हा शालेय विद्यार्थिनी होती. या प्रसंगामुळे तिचं बालपण हिरावलं आणि या प्रसंगामुळे तिला शाळा सोडावी लागली.
“आमच्यावर तलावाजवळ बलात्कार करण्यात आला. जेव्हा हे सगळं झालं तेव्हा आम्ही शुद्धीत नव्हतो. आम्हाला वन विभागाच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. त्या रात्री आम्हाला झोपू दिलं नाही. जेव्हा मी सांगितलं की मी शाळेत जाते माझं वय आणि शिक्षण पाहता मला सोडून द्या अशी विनवणी मी त्यांना केली.
एका वनाधिकाऱ्याने मला अर्वाच्च भाषेत शिव्या दिल्या. मी शाळेत शिकून काय करणार असा प्रश्न त्याने मला केला. माझी बहीण, काका, काकू, आई आणि मला सालेम येथील तुरुंगात नेण्यात आलं,” असं एका बलात्कार पीडितेने सांगितलं.
खटल्याला उशीर का झाला?
या गावातला प्रत्येकजण या घटनेत पोळला गेला होता. त्यांचं आयुष्य रुळावर यायला किमान एक दशक लागलं असं पी.षण्मुगम सांगतात. ष्ण्मुगम मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहेत.
ते या गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात आघाडीवर आहेत.
अनेक बायका बलात्काराबद्दल बोलायला घाबरतात. “जेव्हा त्यांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं तेव्हा त्यांना काहीही तोंड बंद ठेवण्यास सांगितलं होतं. त्यांना धमकी दिली होती की ते कायम तुरुंगात राहतील. आम्ही याबद्दल आंदोलन केलं तेव्हा आदिवासी बायकांना आत्मविश्वास आला आणि त्यांनी आमच्याशी बोलायला सुरुवात केली.
जेव्हा आम्ही मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली तेव्हा ती सरळ खारिज कऱण्यात आली. शेकडो सरकारी अधिकारी असे वागू शकत नाही असं त्यामागे कारण देण्यात आलं."
जेव्हा आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो तेव्हा त्यांनी मद्रास हायकोर्टाला सुनावणी घेण्याचे आदेश देण्यात आले, तेव्हा या खटल्याने आकार घेतला. सीबीआयने 269 अधिकाऱ्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आणि एका विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली. 20 वर्ष चाललेल्या खटल्यात 54 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला.
जेव्हा 2011 मध्ये निर्णय आला तेव्हा 215 अधिकाऱ्यांना शिक्षा सुनावण्यात आली. त्यापैकी 12 अधिकाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. पाच अधिकाऱ्यांना सात वर्षांची शिक्षा झाली आणि इतर 198 अधिकाऱ्यांना 2 ते 10 वर्षांची शिक्षा झाली.” असं ते पुढे म्हणाले.
शिक्षेला आव्हान देणारं अपील
वचाती प्रकरणात दोषी ठरलेल्या 215 अधिकाऱ्यांपैकी काहींनी आपण निर्दोष असल्याचा दावा केलाय. निर्दोष असल्याचा दावा करणारे अधिकारी म्हणतात की, वीरप्पनच्या टोळीचा भाग होऊ नये म्हणून आम्ही गावकऱ्यांना रोखलं. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडल्यामुळे आमच्यावर हे आरोप करण्यात आले.
यातल्या 43 आरोपींनी मद्रास हायकोर्ट मध्ये अपील केलं होतं. या आरोपींच्या वतीने वकील गांधीकुमार केस लढत आहेत.
ट्रायल कोर्टचा 110 पानी आदेश बघता आमचे अशील यातून सहीसलामत बाहेर पडतील असं वकील गांधीकुमार सांगतात.
वकील गांधीकुमार म्हणतात, "घटना घडली तेव्हा कर्तव्यावर नसलेल्या अनेक अधिकाऱ्यांवरही सीबीआयने आरोपपत्र दाखल केलं आहे. आमचे एक अशील त्यादिवशी वैद्यकीय रजेवर होते. तरीही त्यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आलंय. शिवाय त्यांना दोन वर्षांची शिक्षाही झाली. बलात्कार पीडितांना ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्यातील अनेक घटना अतिशय संशयास्पद वाटतात."
न्यायाच्या प्रतीक्षेत असणारं वचाती
1992 च्या जून महिन्यात ही दुर्दैवी घटना घडली होती. वचाती गावाने ही गोष्ट आता मागे सोडली आहे.
गवताने शाकारलेल्या झोपड्यांच्या ठिकाणी आता विटा सिमेंटची पक्की घरं आली आहेत. आज गावातील जवळपास सर्वच मुलं शिकू लागली आहेत.
गावात काही किराणा मालाची दुकानं आहेत. गावातले तरुण नव्या बाइकवरून फिरताना दिसतात. लोकांकडे आता मोबाईल फोन आलेत. शिवाय अर्ध्याअधिक घरांमध्ये टिव्ही आलेत.
घर बांधण्याचं स्वप्न उराशी बाळगून अनेक तरुण-तरुणी आजूबाजूच्या गावांमध्ये सूत गिरण्यांमध्ये काम करायला जातात.
वचाती गावातील तरुणांनी पोलिस भरतीची परीक्षा दिली होती. त्यातले पाच तरुण आज पोलिस दलातील कनिष्ठ श्रेणीत रुजू झालेत.
गावात उभा असलेला वटवृक्ष त्या दुर्दैवी घटनेची साक्ष देतो. मात्र आजही या वटवृक्षाखाली आदिवासी वस्तीतील महिला, पुरुष, नव्याने भरती झालेले तरुण पोलिस एकत्र जमतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)