You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वडिलांच्या आत्महत्येचा बदला, मुलीनं 20 दिवसात सासरच्या 5 जणांना ‘असं’ संपवलं
- Author, नितेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
गडचिरोली जिल्ह्यातील हत्याकांडाचं गूढ अखेर उलगडलं आहे. महागाव येथील एकाच कुटुंबातील पाच जणांची अन्न-पाण्यात विष मिसळून हत्या करण्यात आली आणि या हत्येतले गुन्हेगार याच कुटुंबातील सून आणि मामी या दोघीजणी आहेत.
महिन्याभराच्या अवधीत, म्हणजे अगदी 20 दिवस विषप्रयोग करून हे हत्याकांड या सून आणि मामीनं तडीस नेलं.
गडचिरोलीतल्या अहेरी पोलिसांनी संघमित्रा कुंभारे (सून) आणि रोझा रामटेके (मामी) या दोघींनाही अटक केलीय. दोघींनाही न्यायालयात हजर करण्यात आलं असता, न्यायालयानं 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
संघमित्रा आणि रोझा यांनी रोशन कुंभारे, शंकर कुंभारे, विजया कुंभारे, कोमल दहागावकर आणि आनंदा उराडे या पाच जणांची हत्या केली.
रोशन कुंभारे हा संघमित्राचा पती होता, तर शंकर (वय 52 वर्षे) आणि विजया हे सासू-सासरे, तर कोमल दहागावकर ही संघमित्राची नणंद होती. तसंच, आनंदा उराडे या संघमित्राच्या पतीची म्हणजे रोशनची मावशी होती.
आधी पती-पत्नी, नंतर विवाहित मुलगी, त्यानंतर मावशी आणि नंतर मुलगा अशा पद्धतीने 20 दिवसांत लागोपाठ पाच जणांच्या रहस्यमय मृत्यूने अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) हादरुन गेलं होतं. अखेर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं असून यामागे थंड डोक्याने केलेल्या हत्येचा कट पुढे आला.
20 दिवस विषप्रयोग, ‘अशी’ केली 5 जणांची हत्या
हे हत्याकांड सून आणि मामी या गुन्हेगार जोडीनं कसं तडीस नेलं, याबाबत गडचिरोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी माहिती दिली.
यतिश देशमुख यांनी सांगितलं की,
"महागाव इथं एकाच कुटुंबातील पाच जणांचा गेल्या 20 दिवसात रहस्यमयरित्या मृत्यू झाल्याची माहिती अहेरी पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानंतर आम्ही तातडीनं तपास सुरू केला.
गेल्या 20 दिवसात वेगवेगळ्या दिवशी कुटुंबातील सदस्यांना विष देण्यात आलं. विषबाधा झाल्यानंतर यातल्या पाचही जणांन त्या त्या वेळेस हॉस्पिटलमध्येही नेण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दोघांचा चंद्रपुरातील हॉस्पिटलमध्ये, तर तिघांचा नागपुरातल्या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला."
"या कुटुंबाचा वाहनचालक राकेश मडावी, विजया कुंभारेंचा मोठा मुलगा सागर आणि बहिणीचा मुलगा बंटी हे अजूनही उपचार घेत आहेत आणि त्यांची प्रकृती तुलनेनं स्थिर आहे.
सर्व पीडितांमध्ये एकसारखीच लक्षणं दिसत होती. जसं की, उलट्या, अंगदुखी, पोटदुखी आणि केसगळती यांसारखी लक्षणं दिसत होती.
त्यामुळे या रुग्णांचा मृत्यू नेमका कुठल्या कारणानं होतोय, हे डॉक्टरांनाही नीट कळत नव्हतं. मात्र, चौथ्या आणि पाचव्या मृत्यूनंतर डॉक्टरांना लक्षात आलं की, या पाचही जणांमध्ये एकसारखीच लक्षणं असून, विषप्रयोगाचा प्रकार दिसतोय."
"कुंभारे कुटुंबातील सून संघमित्रा कुंभारे हिचा जबाब नोंदवल्यानंतर लक्षात आलं की, संघमित्राचा जबाब संशयास्पद आहे. शिवाय, कुटुंबातील केवळ संघमित्राला कुठल्याच त्रासाची लक्षणं दिसत नव्हती. त्यामुळे संघमित्राची चौकशी करण्यात आली.
संघमित्राच्या चौकशीत असं समोर आलं की, संघमित्रा आणि रोशन कुंभारेची मामी रोझा रामटेके या दोघींनी मिळून कुटुंबीतील सदस्यांना वेगवेगळ्या दिवशी अन्नातून विष दिलं, ज्यातून पाच जणांचा मृत्यू झाला आणि तिघेजण अजूनही उपचार घेत आहेत."
सासरच्या 5 हत्या का केली?
चौकशीत पुढे असं समोर आलं की, सासरच्या मंडळींकडून आपला छळ होत होता, असा संघमित्राचा आरोप होता.
संघमित्रानं एका वर्षापूर्वीच घरच्यांच्या विरोधात जाऊन रोशन कुंभारेशी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर संघमित्राच्या वडिलांनी आत्महत्या केली. वडिलांची आत्महत्या आणि सासरच्या मंडळींकडून होणारा छळ याचा बदला म्हणून या हत्येत संघमित्रा सहभागी झाली.
दुसरी आरोपी रोझा रामटेके आहे. रोझा ही रोशन कुंभारेची मामी आहे. रोझा आणि कुंभारे कुटुंबात जमिनीवरून वाद सुरू होता. कुंभारे कुटुंबाला संपवल्यास जमिनीत वाटा देण्याची गरज भासणार नाही, असा उद्देश रोझा रामटेकेचा या हत्येत सहभागी होण्यामागे होता.
संघमित्रा आणि रोझा या दोघींनीही मिळून हत्येचा कट रचला आणि बाहेरच्या राज्यातून विष आणलं आणि वेगवेगळ्या दिवशी कुटुंबातील सदस्यांना विष दिलं. यातूनच पाच जणांचा मृत्यू झाला.
आता संघमित्रा आणि रोझा यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानं, पोलीस पुढील तपास करत आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)