You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईत आईसह 4 लहानग्यांची हत्या करून ते कतार आणि यूपीला पळाले, पोलिसांनी 29 वर्षांनी जेरबंद केलं
- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी
16 नोव्हेंबर 1994 चा तो दिवस. मुंबईतल्या काशिमीरा परिसरात राहणाऱ्या राजनारायण प्रजापती यांच्या संपूर्ण कुटुंबाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आलेली होती.
त्यांची पत्नी आणि चार मुलांचा खून करून शेजारी राहणारे तीन जण फरार झाले होते.
एकमेकांशेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून हे हत्याकांड घडलं होतं. त्यानंतर राजनारायण प्रजापती यांनी अनिल सरोज, सुनील सरोज आणि राजकुमार चौहान यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला, पोलिसांनी काहीकाळ तपासही केला आणि कालांतराने आरोपी न सापडल्याने हा तपास थांबला.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 2021 मध्ये पुन्हा एकदा या प्रकरणाचा तपास सुरु केला आणि अखेर या तीनही आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे.
सुमारे तीन दशकं फरार असणाऱ्या या आरोपींपैकी दोन जण उत्तर प्रदेशात मांत्रिक म्हणून काम करत होते तर एकजण कतारमध्ये जाऊन काम करू लागला होता. या तिघांनीही नवीन नावं धारण करून, बनावट कागदपत्रं काढून नवीन आयुष्याला सुरुवात केली होती.
मात्र मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत काम करणारे पोलीस निरीक्षक अविनाश कुऱ्हाडे आणि त्यांच्या पथकाने या हत्याकांडाचा तपास सुरु केला.
29 वर्षांपूर्वी हत्या करून पळालेल्या तीन आरोपींच्या नावांव्यतिरिक्त फारसे तपशील नसूनही त्यांनी हे काम केलं आणि अखेर डिसेंबर 2022 मध्ये पहिला आरोपी विमानतळावर त्यांच्या हाती लागला.
किरकोळ वादावरून हत्या, आरोपींचं पलायन, सुमारे तीस वर्षं वेगवेगळी नावं लावून वेगवेगळ्या ठिकाणी राहणं, बनावट कागदपत्रांच्या आधारे पोलिसांना गुंगारा देणं आणि अखेर दोन भोंदू मांत्रिकांना मुंबई पोलिसांनी त्याच प्रकरणात अटक करणं ही एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच गोष्ट आहे.
नेमकं काय होतं प्रकरण?
मुंबई पोलिसातील मीरा-भाईंदर-वसई-विरार (एमबीव्हीव्ही) गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.
त्यांनी सांगितलं की, "1994 मध्ये काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजनारायण प्रजापती आणि त्यांचं कुटुंब राहत होतं. त्यांच्याशेजारी अनिल सरोज, सुनील सरोज आणि राजकुमार चौहान हे राहत होते.
अनिल आणि सुनील यांचा मोठा भाऊ गुलाबचंद सरोज हेही त्यांच्यासोबत राहायचे. या दोन्ही कुटुंबांमध्ये छोट्या मोठ्या कारणावरून वाद होत असत."
नोव्हेंबर महिन्यात गुलाबचंद सरोज यांचे तीन हजार रुपये आणि एक सुटकेस चोरल्याचा आरोप सरोज बंधूंनी प्रजापती कुटुंबियांवर लावला.
त्यावरून त्यांच्यात वाद झाला, राजनारायण प्रजापती यांनी पोलिसांना बोलवण्याची धमकी दिली आणि त्यादिवशी तो वाद तिथेच थांबला.
त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 नोव्हेंबर 1994 ला राजनारायण प्रजापती कामावर गेले. दुपारच्या जेवणासाठी ते घरी परत आले तेंव्हा त्यांना त्यांच्या घराच्या दाराला बाहेरून कुलूप असल्याचं त्यांनी पाहिलं.
घरातून त्यांच्या बायकोच्या रडण्याचा क्षीण आवाज येत होता, त्यामुळे घराची खिडकी उघडून ते आत डोकावले तेंव्हा त्यांना त्यांच्या पत्नीसह त्यांची चारही मुलं रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अनिल सरोज, सुनील सरोज आणि राजकुमार चौहान यांनी प्रजापती यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या बायको आणि मुलांचा खून करून पळ काढला होता.
राजनारायण प्रजापती यांनी दिलेल्या तक्रारीवरून हे प्रकरण नोंदवण्यात आलेलं होतं. यामध्ये त्यांची पत्नी जगराणी देवी, पाच वर्षांचा प्रमोद नावाचा मुलगा, साडेतीन वर्षांची पिंकी नावाची मुलगी आणि चिंटू नावाचा दोन वर्षांचा मुलगा आणि एक तीन महिन्यांचं बाळ अशा एकूण पाच लोकांची निर्घृण हत्या या तीन आरोपींकडून करण्यात आलेली होती.
राजनारायण प्रजापती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या तीन आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 302 आणि 201 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
पोलिसांनी या आरोपीना पकडण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश मिळालं नाही. अखेर हे आरोपी न सापडू शकल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास थांबवला होता.
एक आरोपी नाव बदलून कतारला गेला होता
2021मध्ये या प्रकरणाचा तपास सुरु झाला आणि त्यानंतर त्यातील राजकुमार चौहान उर्फ काल्या याच्याविरुद्ध पोलिसांनी लूकआऊट नोटीस काढली होती.
काल्या हा नोकरीसाठी कतारला पळून गेलेला होता. तो भारतात परतला तेंव्हा विमानतळावरून पोलिसांनी त्याला अटक केली.
काल्याला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा तपास पुढे सरकला आणि उर्वरित दोन आरोपींच्या संभाव्य ठिकाणांची माहिती पोलिसांना मिळाली.
तब्बल 29 वर्षे नावं बदलून, जागा बदलून, पोलिसांना दिला गुंगारा
पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितल्या प्रमाणे अनिल सरोज, सुनील सरोज आता अंदाजे पन्नास वर्षांचे आहेत, गुन्हा घडला त्यावेळी त्यांचं वय सत्तावीस वर्षे असावं.
अनिल आणि सुनील यांचा तपास सुरु होता तेंव्हा पोलिसांना उत्तर प्रदेश एसटीएफने आरोपी हे उत्तर प्रदेशात तांत्रिक म्हणून राहत असल्याची माहिती दिली.
त्यावरूनच अनिल सरोज हा उत्तर प्रदेशातल्या जौनपूरमध्ये विजय या नावाने आधार कार्ड, राशन कार्ड काढून राहत होता आणि सुनील हा संजय या नावाची कागदपत्रे काढून तिथे राहत होता हे पोलिसांना कळलं.
जौनपूर आणि वाराणसी जिल्ह्यातल्या गावांमध्ये जाऊन हे दोघे भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली लोकांना लुटत होते. पोलिसांना या दोघांची माहिती मिळताच गुन्हे शखेचं एक पथक थेट वाराणसीला पोहोचलं.
भूतबाधा झाल्याचे सांगून एक पोलीस कर्मचारी आरोपींना भेटला
वाराणसीतल्या सारंगनाथ मंदिरात राहून या पथकाने पुढील तपास केला. पोलिसांच्या पथकातील एका सदस्याने स्वतः आजारी असल्याचं सांगून या दोघांशी संपर्क साधला आणि भूतबाधा उतरवण्यासाठी या दोघांना उपचार करण्याची विनंती केली.
रुग्ण बनून गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने या दोघांचे फोटो काढले आणि विजय आणि संजय नावाचे हेच प्रजापती हत्याकांडातील आरोपी असल्याची खात्री केली.
मुंबई पोलिसांच्या या पथकाने उत्तर प्रदेश पोलिसांच्या सहकार्याने जवळजवळ पंधरा दिवस या दोघांवर पाळत ठेवली आणि खात्री पटताच त्यांना अटक करण्यात आली.
मागील काही वर्षांपासून हे दोघे मांत्रिक बनून त्या भागात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
त्याआधी दिल्ली, हरियाणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहून अनेक कामं केली, मोलमजूरी केली. एवढंच काय त्यांच्या नातेवाईकांनाही माहिती नव्हतं की ते कुठे होते.
त्यामुळे पोलिसांसमोर त्यांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान होतं असं अविनाश अंबुरे म्हणाले. एवढ्या वर्षांनी आरोपींना अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश मिळालेलं असलं तरी त्यांच्याविरोधात लावलेले आरोप सिद्ध करणं हे एक आव्हान असल्याचं अंबुरे यांनी कबूल केलं.
त्यावेळचे साक्षीदार, गुन्ह्याचे तपशील तपासून या गुन्ह्यात आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी पोलीस प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)