मोठ्या पगाराचं आमिष दाखवून नववी पास आरोपीने घातला 22 लाखांचा गंडा

    • Author, लक्ष्मी पटेल
    • Role, बीबीसी गुजरातीसाठी

"तो भामटा नसून खरा एजंट आहे आणि मला तो परदेशात मोठ्या पगाराची नोकरी मिळवून देईल असं त्याने शपथेवर सांगितलं होतं. त्यासाठी मी माझ्या बहिणीचे दागिने गहाण ठेवले आणि त्याला 1 लाख 40 हजार दिले. पण शेवटी आमची फसवणूक झाली. मी आता आर्थिक अडचणीत आहे. माझ्यावर 1 लाख 40 हजारांचं कर्ज आहे."

34 वर्षीय काश्मिरीउद्दीन मोहम्मद साबीर कुरेशी एका फसवणुकीला बळी पडले आहेत. ते राजस्थानमध्ये छोटी मोठी नोकरी करून आपलं आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

राजस्थानच्या खंडेला तालुक्यातील कश्मिरुद्दीन चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात होते. कौटुंबिक आर्थिक संकटावर मात करण्यासाठी त्यांना नोकरीची गरज होती.

मात्र, परदेशात भरमसाठ पगाराची नोकरी देतो असं आमिष दाखवत त्यांना फसवलं गेलं. काश्मिरीउद्दीनसह एकूण 13 जणांची फसवणूक झाली असून आरोपी 22 लाख 40 हजार रुपये घेऊन पसार झाल्याची तक्रार अहमदाबाद पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.

या चार आरोपींनी इतरही लोकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्या दिशेने तपास सुरू केला आहे

पीडित व्यक्ती आरोपींच्या जाळ्यात कसा अडकला?

कश्मिरीउद्दीनसह अन्य 13 जणांची फसवणूक कशी झाली याबद्दल बीबीसीशी बोलताना कश्मिरीउद्दीनने सांगितलं की, "आम्हाला नोकरी मिळवायची होती जेणेकरून आम्हाला चांगलं आयुष्य जगता येईल. मुश्ताक आणि दिनेश आम्हाला भेटायला आमच्या गावात आले. त्यांनी अल्लाहची शपथ घेऊन आम्हाला विश्वासात घेतलं. तो फसवणूक करणार नाही असं म्हणाला.

अल्लाहच्या शपथेमुळे मी त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि माझ्या बहिणीचे दागिने गहाण ठेवून त्याला 1.40 लाख रुपये दिले. पण त्याने आमची फसवणूक केली. याविरोधात आम्ही पोलिसात तक्रार दाखल केली आहे."

पैसे दिल्यानंतर तुमची फसवणूक झाली आहे हे तुमच्या लक्षात कसं आलं?

याबाबत बीबीसीशी बोलताना कश्मिरीउद्दीन यांनी सांगितलं की, "त्याने आम्हाला विमानाचं तिकीट दिलं. आम्ही विमानतळावर पोहोचल्यावर तिकीट तपासकाने सांगितलं की, तुमचं तिकीट बनावट आहे, त्यानंतर आम्हाला कळलं की आमची फसवणूक झाली आहे. आम्ही एजंटची शोधाशोध सुरू केली पण आम्हाला कोणीही सापडलं नाही."

भाडेतत्वावर घेतलेलं कार्यालय

आरोपींनी फसवणूक कशी केली याबाबत सायबर क्राइम पोलिस निरीक्षक मंजुला परडवा यांच्याशी बोलून बीबीसीने माहिती जाणून घेतली.

त्यांनी सांगितलं, "हे आरोपी अहमदाबादमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. आणि तिथेच त्यांनी कार्यालय देखील सुरू केलं होतं. या प्रकरणात आरोपींना बिहारमधून अटक करण्यात आली आहे. त्यांनी लोकांकडून पासपोर्ट घेतले आहेत. 13 फिर्यादींपैकी पाच पासपोर्ट आम्ही आरोपींकडून जप्त केले आहेत.

हे पाच पासपोर्ट हिंमतनगर येथील लोकांचे असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात मुश्ताक नावाच्या आरोपीला यापूर्वीही अटक करण्यात आली होती."

वृत्तपत्रात खोट्या जाहिराती दिल्याचा आरोप

आरोपींनी कंबोडियात चालक, मदतनीस आणि कामगार हवे असल्याची जाहिरात वर्तमानपत्रात दिली होती. ही जाहिरात एस डी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या नावे होती.

गुजरातमध्ये राहणाऱ्या एका नातेवाइकाने ही जाहिरात काश्मिरीउद्दीनला पाठवली.

या संपूर्ण प्रकरणाबाबत आपण मुश्ताक अन्सारी यांच्याशी फोनवर बोलल्याची तक्रार काश्मिरीउद्दीन यांनी पोलिसात केली आहे.

अन्सारीने त्यांना अहमदाबाद येथील कार्यालयात भेटण्यासाठी बोलावलं. अन्सारीने वैयक्तिकरित्या कंबोडियातील नोकरीचे तपशील दिले आणि त्या सर्वांना कंबोडियातील गेल कंपनीचे ऑफर लेटरही दिले. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अन्सारीने हा अहवाल आणि मूळ पासपोर्ट ठेऊन घेतला. शुल्काच्या नावाखाली प्रति व्यक्ती 1 लाख 40 हजारांची मागणी केली.

पैशांची मागणी करताच कश्मिरुद्दीनसह इतर लोकांना संशय आला आणि त्यांनी पैसे देण्यास नकार दिला.

"पण त्याच्यावर विश्वास ठेवून 13 मार्च 2023 रोजी सिकंदर हमीद, अक्रम अरब, मोहम्मद रियाझ, मोहम्मद हारून यांनी मुश्ताकच्या एसडी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात प्रत्येकी 1 लाख 40 हजार रुपये जमा केले. यावर मुन्ना चौहान नावाच्या व्यक्तीने त्यांना मुंबई ते कंबोडियाच्या प्रवासाचे तिकीट दिले."

दिल्लीत आल्यावर त्यांना तिकीट बनावट असल्याचं समजलं.

"अचानक दिनेश यादव याने सिकंदर अब्दुलला फोन केला आणि सांगितलं की, तुम्हा सर्वांना प्रतिव्यक्ती 60 हजार रुपये घेऊन मुंबईला यावं लागेल. त्यांच्याकडे इतके पैसे नसल्याने त्यांनी येण्यास नकार दिला. त्यामुळे मुंबई ते कंबोडियाचे तिकीट रद्द करतो असं सांगून त्या सगळ्यांना दिल्लीतील पहाडगंजला बोलावलं."

"इथे आरोपी मुन्ना चौहान आणि दिनेश यादव यांनी सर्व लोकांकडून पासपोर्ट आणि प्रति व्यक्ती 60 हजार रुपये घेतले आणि त्यांना तिकिटं दिली. ही तिकिटं दिल्ली ते बँकॉकच्या प्रवासाची असून तिथून पुढे कंबोडिया असा प्रवास करावा लागेल असंही सांगितलं. पुढे त्यांना 25 एप्रिलला दिल्लीला बोलावलं."

दिल्लीत आपल्यासोबत काय घडलं याचं वर्णन करताना कश्मिरुद्दीन यांनी तक्रारीत म्हटलं की, "25 एप्रिल रोजी आम्ही दिल्लीत आलो. आम्ही बराच वेळ वाट पाहिली, पण मुन्ना चौहान आणि दिनेश यादव आले नाहीत. आम्ही त्यांना अनेक वेळा फोन केला, पण त्यांचा फोन बंद होता."

"म्हणून आम्ही मुश्ताक अन्सारीला फोन केला. त्याचा फोनही बंद होता. त्यानंतर आम्हाला कळलं की त्याने कंबोडियात नोकरी देण्याच्या बहाण्याने आम्हा सर्वांकडून 22 लाख 40 हजार उकळले आहेत. हा नियोजित कट होता."

बिहारमधून आरोपीला अटक

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मुख्य आरोपी बिहारचा असल्याचं कळताच पोलिसांनी बिहार गाठलं.

सायबर क्राईम पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती माध्यमांना दिली.

त्यात म्हटलं आहे की, "तपास पथक बिहारला गेले, तेथून टोळीचा म्होरक्या अन्सारुल हक उर्फ मुन्ना चौहान याला ताब्यात घेण्यात आले. 43 वर्षीय आरोपी सध्या बेरोजगार असून त्याचं शिक्षण नवव्या इयत्तेपर्यंतच झालं आहे. त्याने दोन वर्ष सौदी अरेबिया मध्ये ड्रायव्हर म्हणूनही काम केलंय."

या प्रकरणात मुश्ताक अन्सारी, मुन्ना चौहान, दिनेश यादव आणि विद्या सागर यांचा सहभाग आहे.

पोलिसांनी आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलम 406, 420, 120(बी) आणि आयटी कायद्याच्या कलम 66 (सी), 66 (ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)