क्रिप्टोकरन्सी: 'डॉलरिया' गावातल्या बाप-लेकाने असा केला कोट्यवधींचा घोटाळा

    • Author, लक्ष्मी पटेल
    • Role, बीबीसी गुजरातीसाठी

"माझी 25 लाखांची फसवणूक झाली. मी कर्ज काढून 15 लाख भरले होते. माझी फसवणूक करणाऱ्या मास्टरमाइंड बाप-बेट्याला मी कधीच विसरू शकत नाही. आता मला कर्जाचे हप्तेही भरायचे आहेत. कृपया माझं नाव छापू नका."

ही व्यथा आहे राजस्थानातील जयपूर इथं राहणाऱ्या फसवल्या गेलेल्या एका व्यक्तीची. त्यांची ही व्यथा सांगताना ते अक्षरशः रडले. ते सांगतात की, "जेव्हा लोकांना कळेल की माझी फसवणूक झाली आहे तेव्हा लोक मला कमी लेखतील."

अशाच फसवणुकीच्या घटना राजस्थान, गुजरातसह आणखीही बऱ्याच राज्यात घडल्या आहेत.

लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारे हे बाप-बेटे गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील अखाज गावचे आहेत.

अहमदाबादपासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव 'डॉलरिया' या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे.

खरं तर या गावात प्रत्येक कुटुंबातली किमान एक तरी व्यक्ती परदेशी स्थायिक असून डॉलरमध्ये पैसे कमावते. या गावची लोकसंख्या पाच हजारांच्या आसपास आहे आणि यातले दोन हजार लोक तर परदेशातच स्थायिक आहेत. त्यातही बरेचजण अमेरिकेत राहतात.

आता पुन्हा एकदा या गावाच्या नावाची चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे. ज्या गावाचा मेहसाणा जिल्ह्याला एकेकाळी गर्व होता, आज त्याच गावाची सगळीकडे बदनामी सुरू आहे. कारण फक्त एकच... या बाप-बेट्याची जोडी.

41 वर्षीय नील उर्फ हितेश पटेल आणि त्याचे वडील गोरधनभाई पटेल आखाज गावचे रहिवासी आहेत. या जोडगोळीवर एका घोटाळ्यात कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या दोघांनीही मोबाईल अॅप्लिकेशन आणि कंपनी बनवून लोकांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

या घोटाळ्यात फसवणूक झालेल्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुजरातमधील लोक असल्याचा अंदाज आहे. यातील अनेकांनी पोलिस स्टेशन आणि सायबर क्राईम सेलकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.

20 फेब्रुवारी 2022 च्या सकाळी हैदराबाद पोलीस अहमदाबादला आले. गोरधनभाई पटेल यांना आपल्यासोबत हैदराबादला घेऊन गेले.

हैदराबाद क्राइम ब्रांचचे पोलीस इन्स्पेक्टर सीएच गंगाधर सांगतात, "आम्ही गोरधन पटेलला अटक केली आहे. ज्या कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे, त्या कंपनीचा तो एमडी आहे. तेलंगणात या कंपनीविरुद्ध पाच तक्रारी नोंदवल्या गेल्या असून, देशातील विविध राज्यांत 90 पोलिस तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. गोरधन पटेलला ताब्यात घेण्यासाठी राजस्थान पोलिस आणि कर्नाटक पोलिसांनी ही आमच्याशी संपर्क साधला आहे."

नील पटेल उर्फ हितेश पटेल आणि त्याचे वडील गोरधन पटेल हे स्क्वीक्स टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस नावाच्या कंपनीचे मालक आहेत. वेबसाईट आणि मोबाईल अप्लिकेशन यांच्या माध्यमातून लोकांची फसवणूक केल्याचा आरोप या कंपनीवर आहे.

नीलचे वडील गोरधन हे या कंपनीचे संचालक होते, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. नीललाही अटक करण्यात आली आहे.

गुजरातमध्येसुद्धा या बाप-लेकांच्या विरोधात फसवणुकीच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. मात्र, अहमदाबाद सायबर सेलचे डीसीपी अमित वसावा सांगतात की, "अद्याप पोलिसांत तरी कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही."

'बरेच बडे नेते आणि अधिकारीही शेअर करत होते लिंक'

जयपूरमधील ज्या लोकांची फसवणूक झाली आहे, ते लोक सांगतात की, ते सप्टेंबर 2020 मध्ये ते एका ट्विटर अकाउंटद्वारे नीलच्या संपर्कात आले होते.

"त्याच ट्विटर अकाउंट व्हेरिफाईड होतं आणि अनेक बड्या नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी ते अकाउंट शेअर केलं होतं, त्यामुळे मी नील पटेलवर विश्वास ठेवला होता."

ते सांगतात, "पूर्वी, नील पटेल याचं नारद-पे नावाचं एक अॅप होतं. यात जर तुम्ही 15,000 रुपयांचा प्लॅन घेतला तर तुम्हाला दरमहा 3,334 रुपये परत मिळायचे. म्हणजेच एका वर्षानंतर टप्याटप्याने 15,000 रुपये परत मिळायचे. मी त्याच्या बऱ्याच स्कीमचं सबस्क्रिप्शन घेतलं होतं. आणि माझ्या बहिणीलाही या स्कीममध्ये गुंतवणूक करायला सांगितली होती. तीन महिने पैसे आले आणि नंतर ही स्कीमच बंद झाली."

"याशिवाय नील पटेलची 15 हजार रुपयांची आयफोन स्कीम होती. मी ऑर्डर केली आणि मला दोन आयफोन मिळाले, त्यामुळे मी नील पटेलवर विश्वास ठेवला."

ते पुढे म्हणाले, "नील पटेलने क्रिप्टो करन्सीमध्ये ट्रेड शिकण्यासंबंधित आणखी एक स्कीम सांगितली होती. त्यांनी मला 43 हजार रुपयांच्या बदली एक सर्टिफिकेट दिलं. सर्टिफिकेट दिल्यानंतर त्यांनी मला दोन वर्षांसाठीच्या नोकरीची ऑफर दिली होती.

"मला लग्न करायचं होतं आणि माझी नोकरीही पर्मनंट नव्हती म्हणून मीही स्कीम घेतली. ट्रेडिंग शिकवल्यानंतर त्याने मला इथेरियम क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करायला सांगितली. ते म्हणाले की तीन महिन्यांचा लॉक-इन पिरियड असेल. मग मी 20 बिटकॉइन आणि 5 इथरियम विकत घेतले."

"त्याच्याशी संबंधित फसवणुकीच्या अनेक गोष्टी समोर आल्या, तेव्हा तो म्हणायचा की, त्याचे वडील मोठे असामी आहेत आणि ज्याची इच्छा नाही त्यांना तो त्यांचे पैसे परत करेल. त्यामुळेच काही लोकांनी त्याच्यावर विश्वास टाकला, तर काही लोकांनी पैसे काढून घेतले."

टेस्ला आणि क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक

टेस्ला आणि क्रिप्टो करन्सीच्या गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक केल्यासंदर्भात ते सांगतात की, "यानंतर त्याने द बुल रन नावाची वेबसाइट तयार केली. वेबसाइट लॉगिनसाठी अकाऊंट नंबर आणि पासवर्ड दिला. त्या अकाऊंटमध्ये इथेरियम क्रिप्टो करन्सी दिसत होती. यानंतर त्याने टेस्लामध्ये गुंतवणूक करायची म्हणून एक हजार डॉलर्स घेतले.

"त्याचा दावा होता की, टेस्लाच्या शेअर्सची किंमत दहा हजार डॉलर्सच्या तोडीची आहे. त्या बदल्यात त्याने अमेरिकेत राहणाऱ्या व्यक्तीच्या नावे एक चेक दिला. आम्ही हा चेक जमा केला, तेव्हा तो बाऊन्स झाला. यानंतर नील पटेल गायब आणि त्याची वेबसाइट सोशल मीडिया अकाउंटही गायब."

"आपली फसवणूक झाली आहे असं लक्षात आल्यावर आम्ही नील आणि गोरधन पटेल यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला."

ते म्हणाले की, "पाच महिन्यांपूर्वी मी गुजरातमधील अखाज गावात पोहोचलो, तिथं मी नीलचे वडील गोरधन पटेल यांना भेटलो. त्यांनी पैसे परत करण्याचं आश्वासन दिलं. मात्र, दोन महिने उलटूनही काही झालं नाही. म्हणून गेल्या डिसेंबरमध्ये फसवणूक झालेल्या 20 -30 लोकांना घेऊन मी नीलचं गाव गाठलं.

तिथं एका कम्युनिटी हॉलमध्ये गोरधन पटेल यांच्यासोबत बैठक झाली, ज्यामध्ये त्यांनी 15 दिवसांत पैसे परत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं."

कोट्यवधींची फसवणूक?

अहमदाबादमध्ये एका खासगी कंपनीत काम करणारा आकाश सांगतो, "नील पटेलने या घोटाळ्यात माझी 2.35 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. नारद-पे आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली ही फसवणूक केली. मी ऑनलाइन सायबर सेलकडे तक्रार केली होती. त्याच्या गावात 4 ते 5 वेळेस गेलो. प्रत्येकवेळी नीलचे वडील गोरधन यांनी मला पैसे परत करण्याचं आश्वासन दिलं.

"आता एक वर्ष झालं पण त्यांनी एक रुपयाही परत दिलेला नाही. या स्कीममध्ये फसलेले गुजरातमधील 10 ते 15 या लोक माझ्या माहितीत होते. आम्ही मिळून पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी फक्त तक्रार ऐकली. तक्रार नोंदवून घेतली नाही."

मूळचा गुजरातचा एक तरुण जो आता मुंबईत राहतो तो सांगतो, "माझं 16 लाख रुपयांचं नुकसान झालं. मी माझ्या आई आणि बहिणीच्या बचतीचे पैसे गुंतवले होते. ते सर्व पैसे पैसे बुडाले. आम्ही नील पटेलच्या गावीही गेलो तिथं त्याचे वडील गोरधन पटेल यांना भेटले. त्यांनी मला त्यांचं आलिशान घर दाखवलं आणि युगांडातून पैसे कमावल्याचं सांगितलं. त्यांनीही पैसे परत करण्याचं आश्वासन दिलं मात्र अजूनही पैसे मिळालेच नाहीत."

कच्छ जिल्ह्यातील फसवणुकीचा बळी ठरलेला दिनेश सांगतो, "नारद-पे आणि इथेरियम क्रिप्टोकरन्सीच्या नादात मी माझे 6 लाख रुपये गमावून बसलो आहे. आम्ही ग्राहक संरक्षण मंचाकडे तक्रारही केली आहे, पण पैसे परत मिळण्याची आशा नाही. गुजरातमध्ये याप्रकरणी कठोर कारवाई होत नाही.

या घोटाळ्यात हरियाणातील जिंद या गावचा रहिवासी असलेल्या कौशिकचे 16 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

कौशिक सांगतो, "गुजरातमधल्या 15 लोकांना मी ओळखतो ज्यांची अशाप्रकारे फसवणूक झाली आहे. गुजरात पोलिस आमची तक्रार नोंदवून घेत नाहीत, असं त्या लोकांचं म्हणणं आहे. मी एप्रिल 2021 पासून नील पटेलच्या विरोधात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न करत आहे. पण मला ही यात यश मिळालेलं नाही."

"मी 250 लोकांचा एक टेलिग्राम ग्रुपसुद्धा बनवला आहे. नील पटेलने गेल्या आठवड्यात मला फोन करून धमकी दिली होती. नील म्हणाला, 'माझे काका भाजपचे आमदार आहेत, त्यामुळे गुजरात पोलिस माझ्यावर कोणतीही कारवाई करणार नाहीत.'

"कदाचित त्याचंच बरोबर आहे. कारण गुजरातमध्ये बऱ्याच लोकांची फसवणूक झाली असून देखील गुजरात पोलीस त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवत नाहीत.'

अखाज गावातील एका रहिवाशाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की, "गोरधनभाई पटेल हे अखाजचे रहिवासी असून ते युगांडात होते. तीन वर्षांपूर्वीच ते गावी परतले. 7 ते 8 वर्षे ते युगांडामध्ये राहिल्याचं म्हटलं जातं. तिथून परत आल्यानंतर त्यांनी आपले वडिलोपार्जित घर पुन्हा बांधलं. यासाठी त्यांनी करोडो रुपये खर्च केले. गावकऱ्यांनी विचारले एवढे पैसे कसे आले, तेव्हा त्यांनी सांगितलं की, त्यांचा मुलगा नीलने अमेरिकेत लॉटरी जिंकली आहे."

ते पुढे सांगतात, "गोरधनभाई पटेल गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. त्यांनी गावात अनेक देणग्या दिल्या आहेत. शाळेतील मुलांना पुस्तके दिली. त्यामुळे गोरधनभाई पटेल यांच्याकडे लोकांचं लक्ष होतं.

"त्यांनी 60 हजारांचा आयफोन 15 हजार रुपयांना द्यायला सुरुवात केली. त्यांची स्कीम यशस्वी झाली नाही. मात्र त्यांनी काही गावकऱ्यांचे पैसे परत केले आहेत."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)